Wednesday, December 1, 2021

 नांदेड जिल्ह्यात 1 व्यक्ती कोरोना बाधित

तर 2 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 242 अहवालापैकी 1 अहवाल कोरोना बाधित आले आहे. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 491 एवढी झाली असून यातील 87 हजार 814 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 23 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 654 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 1 असे एकुण 1 बाधित आढळले. आज जिल्ह्यातील 2 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 2 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 23 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, नांदेड मनपा अंतर्गंत गृह विलगीकरण 17, खाजगी रुग्णालयात 3 व्यक्ती उपचार घेत आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 74 हजार 799

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 70 हजार 847

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 491

एकुण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 814

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 654

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-01

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-23

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2. 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

 भोजन, स्टेशनरी पुरवठ्यासाठी

दरपत्रके सादर करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- मागासवर्गीय मुलां-मुलीच्या शासकीय वसतिगृहासाठी व शासकीय निवासी शाळेसाठी भोजन व स्टेशनरी या आवश्यक वस्तुचा पुरवठा करण्यासाठी दरपत्रके 2 ते 9 डिसेंबर 2021 या कालावधीत मागविण्यात आली आहेत. अंतिम मुदतीत 9 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद पाकिटात दरपत्रक सादर करावीत. विहित मुदतीनंतर प्राप्त दरपत्रकाची विचार केला जाणार नाही याची पुरवठाधारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे. 

पुरवठा करावयाच्या साहित्यासाठी भोजन व स्टेशनरी पुरवठा करझ्यासाठी पुरवठाधारकाकडे अन्न व औषध प्रशासनाचे वैद्य अनुज्ञाप्ती प्रमाणपत्र आवश्यक आहे. पुरवठा करावयाच्या साहित्याची यादी, इतर तपशिल व अटी शर्तीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय नांदेड यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

0000

 शिकाऊ उमेदवारांसाठी भरती मेळाव्याचे आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड यांच्यावतीने गुरुवार 2 डिसेंबर रोजी भरती  मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी नांदेड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 2 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वा. या मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य सुभाष परघणे यांनी केले आहे. 

मे. ईंडुरन्स टेक्नॉलॉजिस प्रा. ली. वाळूज एमआयडीसी औरंगाबाद, मे. संजिवनी ऑटो पार्टस वाळूज एमआयडीसी औरंगाबाद, मे. धुत ट्रान्समिशन प्रा. ली. शेंद्रा एमआयडीसी औरंगाबाद या कंपनीचा भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी आवश्यक अर्हता, पात्रता शिकाऊ उमेदवारांसाठी मानधन व आवश्यक व्यवसायाचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे. 

आयटीआय उत्तीर्ण (शिकाऊ उमेदवारांसाठी) इंन्डुरन्स टेक्नालॉजिअस प्रा.ली. वाळूज एमआयडीसी औरंगाबाद यांच्या टर्नर, फिटर, मेकॅनिस्ट, वेल्डर, मोटार मेकॅनिक या व्यवसायासाठी 8 तासाचा वेळ असून 55 जागा रिक्त आहेत. या जागेसाठी मानधन 11 हजार 273 आहे. संजीवनी ऑटो पार्टस वाळूज एमआयडीसी औरंगाबाद येथे टर्नर, फिटर, मेकॅनिस्ट, वेल्डर, मोटार मेकॅनिक या व्यवसायासाठी कामाचा वेळ 8 तास असून रिक्त जागा 60 आहेत. या जागेसाठी मानधन 10 हजार अधिक 1 हजार उपस्थिती बोनस असे एकुण 11 हजार असे आहे. धुत ट्रान्समिशन प्रा. ली. शेंद्रा एमआयडीसी औरंगाबाद येथे इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, वायरमन, पेंटर या व्यवसायासाठी रिक्त जागा 100 या फक्त महिलांसाठी आहेत. या जागेसाठी मानधन 9 हजार 100 आहे.   

00000

 प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने 

माहूर, हिमायतनगरला अनुज्ञप्ती चाचणी शिबिराचे आयोजन 

·   शिबिराला येतांना लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक 

नांदेड (जिमाका) दि. 1 :-  प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने पक्के अनुज्ञप्ती चाचणी संबंधी शिबिराचे आयोजन हिमायतनगर येथे 21 डिसेंबर तर माहूर येथे 23 डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे. तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयात 11 व 18 डिसेंबर रोजी कार्यालयीन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या दिवशी स्थानिक सुट्टी जाहीर झाल्यास अथवा आपत्कालीन परस्थिती निर्माण झाल्यास शिबिराच्या तारखेत बदल होवू शकतो. अर्जदारांनी  उपलब्ध अपॉइंटमेंट घेऊन कोरोना लस घेतल्याचे प्रमाणपत्रासह या शिबिरास उपस्थित राहावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

000000

 मतदार यादीत नाव नोंदणीचा विशेष संक्षिप्‍त पुनरिक्षण कार्यक्रम 

·         दावे व हरकती स्विकारण्‍यास 5 डिसेबरची मुदतवाढ 

नांदेड (जिमाका) दि. 1 :-  भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत राज्यात सर्व विधानसभा मतदारसंघाच्या छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. जिल्ह्यातील मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदणी, दुरूस्‍ती, वगळणी करून घेण्‍यासाठी नागरिकांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्‍यासाठी www.nvsp.in संकेतस्‍थळाचा वापर करावा. तर ऑफलाईन अर्ज सादर करण्‍यासाठी संबंधित मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (बीएलओ), तहसिल कार्यालय किंवा मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी  तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी केले आहे.    

मतदार याद्या प्रसिद्ध केल्यानंतर ज्या पात्र मतदारांची नावे समाविष्ट केली गेली नाहीत किंवा त्यामध्ये दुरुस्ती, सुधारणा करावयाची असेल अशा मतदारांना विहित नमुन्यामध्ये अर्ज करता येतील. या कार्यक्रमानूसार निर्धारित दावे व हरकती स्विकारण्‍याचा कालावधीस मुदतवाढ दिली असून सुधारीत कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. दावे व हरकती स्वीकारण्याचा निर्धारित कालावधी सोमवार 1 ते मंगळवार 30 नोव्हेंबर 2021 याप्रमाणे होता. आता सुधारित कालावधी सोमवार 1 नोव्हेंबर ते रविवार 5 डिसेंबर 2021 आहे. दावे व हरकती निकाली काढण्यासाठी निर्धारित कालावधी सोमवार 20 डिसेंबर पर्यत असून सुधारित कालावधी 20 डिसेंबर 2021 पर्यत आहे. मतदार यादीची अंतिम प्रसिध्द करण्यासाठी बुधवार 5 जानेवारी 2022 निर्धारित कालावधी असून सुधारित कालावधी  5 जानेवारी 2022 असा आहे. मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमास मुदतवाढ-सुधारित कार्यक्रम याप्रमाणे राहील. मतदारांच्या सुलभतेसाठी www.nvsp.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नाव नोंदणीची तसेच यादीतील तपशिलात बदल करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अधिक  माहितीसाठी    www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असेही आवाहन केले आहे.

000000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...