Monday, November 19, 2018


शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन 
नांदेड दि. 19 :  महाराष्ट्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. या पुरस्कारांसाठी 5 ते 25 नोव्हेंबर 2018 दरम्यान ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावयाचे आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय स्तरावरील पदक विजेते पुरुष व महिला खेळाडू, साहसी उपक्रम, दिव्यांग खेळाडूंसह क्रीडा मार्गदर्शक यांच्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख 5 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2018 अशी ठेवण्यात आली आहे.
अर्जदारांनी विहीत नमुन्यात अर्ज ऑनलाईन पध्दतीने सादर करून त्याची एक प्रत जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत प्रतिवर्षी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्याची योजना कार्यान्वित असून राज्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू, साहस उपक्रम, दिव्यांग खेळाडूंसह संघटक/ कार्यकर्ते, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, महिला मार्गदर्शक व संघटक/ कार्यकर्ती यांच्यासाठी जिजामाता क्रीडा पुरस्कार तसचे ज्येष्ठ क्रीडा महर्षीकरिता शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
सन 2017-18 या वर्षासाठी मान्यताप्राप्त खेळांच्या अधिकृत राज्य संघटनेमार्फत त्या त्या आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय स्तरावरील कनिष्ठ व वरिष्ठ गटातील पदक विजेते पुरुष व महिला खेळाडू, साहसी उपक्रम दिव्यांग खेळाडूंसह संघटक/ कार्यकर्ते, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, महिला मार्गदर्शक व संघटक/ कार्यकर्ती यांच्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज संबंधित राज्य संघटनेच्या कार्यकारिणीच्या ठरावासह दि. 25 नोव्हेंबर 2018 पर्यंत अर्जदाराने आपल्या कामगिरीचा तपशील देऊन विहित नमुन्यात अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.mumbaidivsports.com या वेबसाईटवर उपलब्ध करुन दिलेल्या लिंकवर अर्ज सादर करावा. तसेच ऑनलाईन अर्जाची एक प्रत अर्जदाराने संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात 27 नोव्हेंबर 2018 पूर्वी स्वयंसाक्षांकित प्रमाणपत्रांसह सादर करावी. तर उर्वरित पुरस्काराच्या अर्जदारांनी 5 डिसेंबर पूर्वी सादर करावी.
अधिक माहितीसाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा 16 ऑक्टोबर 2017, शासन शुध्दीपत्रक 8 डिसेंबर 2017 आणि शासन शुध्दीपत्रक 24 ऑक्टोबर 2018  चे अवलोकन करावे.
अधिक माहितीसाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे संबंधित विभागाचे विभागीय उपसंचालक अथवा जिल्हा क्रीडा अधिकारी यांना संपर्क साधावा असे, आवाहन मुंबई शहराचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
0 0 0



जिल्हास्तर युवा पुरस्काराकरिता 30 नोव्हेंबरपर्यंत
प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
            नांदेड, दि. 19 : क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत सन 2016-17 व सन 2017-18 या वर्षाच्या जिल्हा युवा पुरस्कार दिले जातात. मुंबई उपनगर जिल्ह्यातील युवक, युवती आणि सामाजिक व युवकांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांनी या पुरस्काराकरिता30 नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील युवांनी व सामाजिक संस्थांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्याकरिता त्यांना प्रोत्साहन मिळावे त्यासाठी जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येतो. सन 2016-17 व सन 2017-18 या दोन वर्षाकरिता  2 युवक, 2 युवती आणि 2 संस्था असे एकूण 6 पुरस्कार देण्यात येणार आहेत.
युवक/युवती पुरस्कार : पुरस्कार वर्षाच्या 1 एप्रिल रोजी पुरस्कारार्थींचे वय 13 वर्षे पूर्ण झाले पाहिजे असावे. 31 मार्च रोजी वय 35 वर्षाच्या आत असले पाहिजे. अर्जदार मुंबई उपनगर जिल्ह्यात सलग 5 वषे वास्तव्यास असावा.केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफीत व फोटो जोडावेत. केंद्र, राज्य शासन, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी, विद्यापीठ अंतर्गत कॉलेज मधील प्राध्यापक/कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.
संस्था युवा पुरस्कार : संस्थेची नोंदणी झाल्यानंतर 5 वर्षे कार्यरत पाहिजे. संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1860 किंवा मुंबई पब्लीक ट्रस्ट ॲक्ट 1950 नुसार पंजीबद्ध असावी. गुणांकणाकरिता संस्थेने केलेल्या कार्याचे वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफीत व फोटो जोडावेत.
            जिल्हास्तर युवा पुरस्काराकरिता इच्छुकांनी विहित नमुन्यातील अर्ज दिनांक 30 नोव्हेंबर पर्यंत सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर, शासकीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय खालील परिसर, संभाजीनगरसमोर, आकुर्ली रोड, कांदिवली (पूर्व) मुंबई-1 येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र.022-28871105 यावर संपर्क साधावा असे जिल्हा क्रीडा अधिकारी, यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
000


लोहा नगरपालिका निवडणूकसाठी आज 84 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल
नांदेड, दि. 19 :- नगरपालिका निवडणूकीसाठी आज सोमवारी राज्‍य निवडणूक आयोगानी वेळ व दिवस याची मुदतवाढ दिली सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्‍यात आले.  आज नगरअध्‍यक्ष 7 जणांचे अर्ज दाखल झाले आहेत. 8 प्रभागामध्‍ये 84 नामनिर्देशनपत्र आले आहेत. आतापर्यंत एकूण 105 उमेदवारी दाखल केले आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पी.एस. बोरगांवकर यांनी दिली.
लोहा नगपालिका निवडणूकीसाठी थेट जनतेतून नगरअध्‍यक्ष निवड होणार आहे त्‍यासाठी 7 जणांनी आज सोमवारी नामनिर्देशन दाखल केले. प्रभाग 1अ :- सर्वसाधारण महिला (चार अर्ज), प्रभाग 1 :- नागरिकाचा मागास प्रवर्ग (5 अर्ज), प्रभाग 2अ :- सर्वसाधारण महिला (तीन अर्ज), प्रभाग क्र. 2ब :-अनुसूचि जाती (सात अर्ज), प्रभाग 3अ :- अनुसूचि जाती महिला (सहा अर्ज), प्रभाग 3ब :- सर्वसाधारण (पाच अर्ज), प्रभाग 4अ :- अनुसूचि जाती महिला (चार अर्ज), प्रभाग 4ब :- सर्वसाधारण (आठ अर्ज), प्रभाग 5अ :- नागरिकाचा मागासप्रवर्ग महिला (ए‍क अर्ज), 5ब :- सर्वसाधारण (सात अर्ज), प्रभाग 6अ :- नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला (चार अर्ज), प्रभाग 6ब :- सर्वसाधारण महिला (पाच अर्ज), प्रभाग 6 क :- सर्वसाधारण (सहा अर्ज), प्रभाग 7अ :- नागरिकाचा मागासप्रवर्ग महिला (एक अर्ज), प्रभाग क्र. 7ब :- (तीन अर्ज), प्रभाग क्रं. 8अ :- सर्वसाधारण महिला (2 अर्ज), प्रभाग क्रं. 2ब :- नागरिकाचा मागासप्रवर्ग (सहा अर्ज) असे एकूण  8 प्रभागात 84 अर्ज दाखल झाले आहेत उद्या मंगळवारी नामनिर्देशन दाखल करण्‍याचा शेवटचा दिवस असून सकाळी 11 ते सायंकाळी 5 यावेळेत ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज स्वीकारण्‍यात येणार आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पी.एस. बोरगांवकर यांनी दिली यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल परळीकर, मुख्‍यअधिकारी काकासाहेब डोईफोडे, नायब तहसिलदार सारंग चव्हाण, अशोक मोकले हे सहकार्य करत आहेत.
0 0 0


शासकीय कापूस खरेदीचा आज शुभारंभ
नांदेड, दि. 19 : - कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत हंगाम 2018-19 साठी कापूस खरेदी केंद्र मे. मनजित कॉटन प्रा. लि. भोकर येथे केंद्र शासनाच्या किंमत आधारभूत किंमतीनुसार सिसिआयचे सब एजंट म्हणून कापूस पणन महासंघाची 20 नोव्हेंबर 2018 रोजी स्थानिक संचालक नामेदवराव केशवे यांच्या हस्ते कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
कापूस खरेदी केल्यावर शेतकऱ्यांना अदा करावयाची रक्कम आरटीजीएसने थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे खरीप हंगाम 2018-19 मधील कापूस पेऱ्याची अद्यावत नोंद असलेला सातबारा उतारा, आयएफएससी कोड असलेले बँकेच्या पासबुकाच्या पहिल्या पानाची झेरॉक्स व आधारकार्डची मूळ प्रत व शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर आदी कागदपत्रे सोबत आणावीत. जेणे करुन शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी अडचण निर्माण होणार नाही, असे आवाहन कापूस उत्पादक पणन महासंघाचे विभागीय व्यवस्थापक अे. व्ही. मुळे यांनी केले आहे.
000000



योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी
बुधवारी वाहनांची तपासणी
नांदेड, दि. 19 :- ईद-ए-मिलाद निमित्त 21 नोव्हेंबर रोजी शासकीय सुट्टी असल्यामुळे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी अपॉईंटमेंट घेतलेल्या वाहनांची तपासणी करण्यात येणार नाही. 
तसेच या दिवशी शिकाऊ पक्के अनुज्ञप्तीसाठी अपॉईमेन्ट घेतलेल्या उमेदवारांची चाचणीसुध्दा घेतली जाणार नाही. संबंधितांनी 21 नोव्हेंबरला अपॉईंटमेंट घेतलेल्या वाहनांची तपासणी शिकाऊ / पक्के अनुज्ञप्तीची चाचणी 26 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर पर्यंत करण्यात येणार आहे. याबाबत वाहन मालक, चालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  
0 0 0


26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान
संविधान सप्ताहाचे आयोजन
नांदेड, दि. 19 :-  राज्यात 26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत संविधान सप्ताह साजरा करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे. 
या संविधान सप्ताहात 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वा. संविधान गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा महात्मा फुले पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधानाच्या परिशिष्ट 1 चे उद्देशिकेचे सामुहिक वाचनानंतर यात्रेचा समारोप होणार आहे.  
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार संविधान सप्ताहामध्ये पुढीलप्रमाणे कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. 26 नोव्हेंबर 2018 रोजी संविधान वाचन (ठिकाण- शाळा, विद्यालय, महाविद्यालय, कारागृह) किंवा जिल्हा निहाय संविधान जागर प्रभात फेरी (विद्यालयाच्या सहकार्याने). संविधान गौरव रॅली (डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नागपूर ते संविधान चौक, नागपूर) व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे. चित्ररथ तयार करणे. 27 नोव्हेंबर रोजी तालुका स्तरीय पोलीस कार्यालय / पंचायत समिती कार्यालय येथे संविधान प्रतीचे वाटप. संविधानावर आधारित पथनाट्य सादरीकरण 26 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत. 28 नोव्हेंबर रोजी जिल्हा व विभागीय स्तरावर वकृत्व स्पर्धेचे आयोजन, संविधान जलसा. 29 नोव्हेंबर रोजी संविधान गौरव एकपात्री प्रयोग स्पर्धा. 30 नोव्हेंबर रोजी विभागीय स्तरावर निबंध स्पर्धा / गीत गायन स्पर्धा, दिव्यांग कला सादरीकरण. 1 डिसेंबर रोजी भारतीय संविधान आधारित प्रबोधन कार्यक्रम (ठिकाण-समाजकार्य महाविद्यालय, विधी महाविद्यालय). 2 डिसेंबर रोजी संविधानातील मुलभूत हक्क याचे वाचन कार्यक्रम (ठिकाण- ग्रामपंचायत कार्यालय). हा कार्यक्रम राबविण्याबाबत विविध यंत्रणा निश्चित करण्यात आली आहे.
0000


लोहा नगरपरिषदेसाठी
नामनिर्देशनपत्र भरण्यास मुदतवाढ
नांदेड, दि. 19 : लोहा नगरपरिषदेच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र वेबसाईटवर भरण्यासाठी व नामनिर्देशनपत्र स्विकारण्याचा कालावधी वाढविण्यात आला आहे.
लोहा नगरपरिषदेसाठी नामनिर्देशनपत्रे राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्यासाठी व ही नामनिर्देशनपत्रे स्विकारणे 12 ते मंगळवार 20 नोव्हेंबर 2018 या कालावधीत सकाळी 11 ते सायं 5 वाजेपर्यंत राहील. नामनिर्देशनपत्रांची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध बुधवार 21 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून होईल.
मुळ कार्यक्रमातील नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक ते निकाल जाहीर करण्याचा दिनांक यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. तसेच अपरिहार्य परिस्थितीत लोहा नगरपरिषदमध्ये नामनिर्देशनपत्र व त्यासोबतचे शपथपत्र वेबसाईटवर भरुन त्याची प्रींट घेऊन सादर करणे शक्य नसल्यास ते ऑनलाईन पद्धत व पारंपारिक या दोन्ही पैकी कोणत्याही पद्धतीने स्विकारण्यास सुधारित कार्यक्रमानुसार आयोगाची मान्यता देण्यात येत आहे, असे राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
00000

  वृत्त क्र.   389   लोकसभा निवडणुकीसाठी आज नांदेड जिल् ‍ ह्यात मतदान   प्रशासन सज् ‍ ज ; मोठ्या संख् ‍ येने मतदान करण् ‍ याचे ...