Friday, February 10, 2017

जिल्ह्यातील आरोग्य सुविधा , सेवांबाबत
यंत्रणांनी तत्पर रहावे - जिल्हाधिकारी काकाणी
नांदेड दि. 10 :- कर्करोगाच्या दुष्परिणामाविषयी प्रभावी जनजागृती करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने प्रयत्न करावेत. तसेच शाळा, महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य वस्तूंची विक्री होऊ नये, सार्वजनिक ठिकाणी तंबाखुचे सेवन, धुम्रपान यासाठी कडक कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज येथे दिले. आरोग्याशी निगडीत विविध यंत्रणांनी समन्वयाने आणि चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. याबाबत काही यंत्रणा पुरेशा सतर्क नसल्याबाबत श्री. काकाणी यांनी नाराजी व्यक्त केली. त्यासाठी संबंधीत अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असेही त्यांनी निर्देशीत केली.
आरोग्य विभागाशी निगडीत विविध समन्वय समितींच्या बैठकीत श्री. काकाणी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. हत्तीरोग नियंत्रणासाठीची सामुदायीक औषधोपचार मोहीम, कर्करोग पंधरवडा म्हणून 20 फेब्रुवारीपर्यंत आयोजित करण्यात येणारे विविध उपक्रम याबाबत बैठकीत माहिती सादर करण्यात आली. याशिवाय आरोग्य विभागाशी निगडीत विविध कार्यक्रम, समन्वय आणि संनियंत्रण समित्यांचे अहवालही सादर करण्यात आले. बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॅा. बी. पी. कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा. बी. एम. शिंदे, जिल्हा हिवताप अधिकारी डॅा. राजेंद्र पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॅा. एच. आर. गुंटूरकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॅा. उत्तम इंगळे, डॅा. डी. टी. कानगुले आदींसह, पोलीस उपअधिक्षक अशोक बनकर आदींची उपस्थिती होती.
बैठकीत कुष्ठरोग प्रतिबंध आणि रुग्णांसाठीच्या सेवा-सुविधा, प्रसृतीपुर्व लिंग निवड  प्रतिबंत्माक कायद्यातील उपाय योजना आणि तरतूदी, तसेच अत्यावश्यक सेवा 108 रुग्णवाहिका, जननी सुरक्षा योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यांच्यासह जिल्हा शल्य चिकीत्सकांकडील विविध योजना, तसेच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या अखत्यारीतील विविध योजना यांचाही आढावा सादर करण्यात आला. या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी विविध सूचना केल्या. तसेच या अंमलबजावणीबाबत वेळोवेळी अद्ययावत अहवाल सादर करण्याचेही त्यांनी निर्देश दिले.

000000
जिल्हयातील सर्व न्यायालयात
आज  राष्ट्रीय लोकअदालत
तडजोडीसाठी 7 हजार 961 प्रकरण 
नांदेड दि. 10 :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय नांदेडच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सविता बारणे यांचे मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यातील सर्व न्यायालयात शनिवार 11 फेब्रुवारी 2017 रोजी  राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
नांदेड जिल्हा न्यायालयात लोकअदालतीसाठी एकूण 10 पॅनल तयार करण्यात आले असून प्रलंबित 1175 प्रकरणे दाखल पुर्व प्रकरणे 2907 अशी एकूण 4082 प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आली आहेत. जिल्हयातील तालुका न्यायालयातील प्रलंबित 1968 प्रकरणे दाखलपुर्व 1793 प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत. कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय यांचे पॅनल सुध्दा त्या-त्या न्यायालयात कार्यरत आहेत. जिल्ह्यातून एकूण  7961 प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालतमध्ये तडजोडीकरीता ठेवण्यात आली असून त्यामध्ये दिवाणी, फौजदारी, एन.आय.अॅक्ट., मोटार वाहन अपघात, भूसंपादन, महसूल इतर, तसेच कामगार न्यायालय, सहकार न्यायालय सर्व तालुका न्यायालयात असलेली प्रलंबित दाखपुर्व प्रकरणे तडजोडीकरीता ठेवण्यात आली आहेत. ते सामंजस्याने मिटविण्यासाठी जिल्हयातील सर्व न्यायाधीश, जिल्हा सरकारी की, सहाय्यक सरकारी की, सर्व विधिज्ञ, भूसंपादन अधिकारी, विविध कंपन्यांचे अधिकारी, मनपा अधिकारी, हे सर्वतोपरी प्रयत्न करणार आहेत.
नांदेड अभिवक्तासंघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सदस्य तसेच विविध विमा कंपनी, मनपा, महसुल विभाग यांच्या सहकार्याने जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीच्या माध्यमातून निकाली निघतील असा विश्वास सविता बारणे यांनी व्यक्त केला आहे. या दिवशी होणा-या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये संबंधित पक्षकारांनी या संधीचा लाभ घेवून जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढावीत आपसातील वाद सामंजस्याने मिटविण्याच्या या  धीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेडचे प्रभारी सचिव न्या. एस. आर. नरवाडे यांनी केले आहे.                  

0000000
धर्मादाय आयुक्तांचे संस्था, न्यासांना आवाहन
नांदेड दि. 10 :- जिल्ह्यातील सर्व संस्था व न्यासाच्या विश्वस्तांनी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 अन्वये विशेष मोहिमेअंतर्गत आपल्या संस्थेच्या संदर्भातील कलम 22 अन्वये बिनवादाची फेरफाराची सर्व प्रलंबीत प्रकरणे 28 फेब्रुवारी 2017 पर्यंत कार्यालयामार्फत निकाली काढावयाची असल्याने सर्व संबंधितांनी कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून व आवश्यक सर्व दस्तऐवज सादर करुन प्रलंबीत बिनवादाची प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन धर्मादाय उपआयुक्त व सहाय्यक धर्मादाय आयुक्त नांदेड यांनी केले आहे.

0000000
जि.प.,पं.स. निवडणूक मतदानादिवशीचे
आठवडी बाजार बंद राहणार
नांदेड दि. 10 :- जिल्ह्यातील जिल्हा परिषद व 16 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा तसेच मतदान शांततेत पार पडावे या दृष्टीकोनातून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या हद्दीत ज्या गावी, ठिकाणी आठवडी बाजार भरतात ते बंद ठेवण्यास आणि ते अन्य दिवशी भरण्यास मान्यता प्रदान केली आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सुरेश काकाणी यांनी मार्केट ॲड फेअर ॲक्ट 1862 चे कलम 5 अन्वये प्रदान अधिकाराचा वापर करुन नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व 16 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दिवशी गुरुवार 16 फेब्रुवारी 2017 रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या हद्दीत ज्या गावी, ठिकाणी आठवडी बाजार भरतात ते बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत.
ज्या गावचे, ठिकाणाचे आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार 17 फेब्रुवारी 2017 रोजी भरविण्यात यावेत, असेही या आदेशात म्हटले आहे.

000000
जि.प., पं.स. निवडणूक प्रक्रियेबाबत
मुख्य निवडणूक निरीक्षकांकडून समाधान व्यक्त
जि.प.साठी 374, पं.स.साठी 603 उमेदवार रिंगणात
नांदेड दि. 10 :- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आतापर्यंतच्या  प्रक्रियेबाबत जिल्ह्यासाठीचे मुख्य निवडणूक निरीक्षक तथा परभणी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी   सुशील खोडवेकर यांनी समाधान व्यक्त केले आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या दालनात आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत सादर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रियेचा तपशील सादर केल्यानंतर श्री. खोडवेकर यांनी ही प्रतिक्रीया व्यक्त केली. बैठकीस जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक विभागाच्या समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी उपस्थित होत्या.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्त परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खोडवेकर यांनी निवडणूक निरीक्षक म्हणून लोहा, कंधार, मुखेड आणि देगलूर या तालुक्यांचाही दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडूनही निवडणूक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. दौऱ्यात त्यांनी विविध मतदान केंद्रांचीही पाहणी केली. तसेच केंद्रांच्या ठिकाणच्या सुव्यवस्थेबाबत सूचनाही केल्या. या दौऱ्यानंतर आज जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीतही श्रीमती ढालकरी यांनी निवडणूक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत तपशीलवार  माहिती सादर केली. नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यापासून ते अंतिम उमेदवारी निश्चित करण्याची प्रक्रिया, मतदान केंद्राची निश्चिती, ईलेक्ट्रॅानिक मतदान यंत्रांचे वाटप, निवडणूक कार्यक्रमांविषयी प्रशिक्षण, आचारसंहिता पालनाची अंमलबजाणी व त्यासाठी विविध पथकांचे नियुक्त्या, या पथकांनी सादर केलेले अहवालही याबैठकीत सादर करण्यात आली. निवडणूक आणि मतदानाची प्रक्रिया निर्भय आणि शांतता व सुव्यवस्थेत पुर्ण व्हावी, यासाठी विविध उपाय योजना या अनुषंगानेही चर्चा झाली. एकंदर निवडणूक प्रक्रिया विहित पद्धतीने आणि सुरळीतपणे सुरु असल्याबद्दल श्री. खोडवेकर यांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान, या निवडणुकीसाठी आज अंतिम उमेदवारी यादी निश्चित करण्यात आली. त्यानुसार जिल्हा परिषद गटासाठी 374 व पंचायत समिती गणासाठी 603 उमेदवार निवडणूक लढविणार असल्याची माहिती जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्याकडून देण्यात आली आहे.
 जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण यांच्यासाठी निवडणूक रिंगणात राहिलेल्या उमेदवारांची संख्या पुढील प्रमाणे आहे. सुरुवातीला जिल्हा परिषद गटातील निवडणूक रिंगणातील उमेदवारांची तालुकानिहाय संख्या ( कंसात पंचायत समिती गणासाठी उमेदवारांची संख्या ) पुढील प्रमाणे -  माहूर- 10 (24)  , किनवट-  48 (73) , हिमायतनगर  13 (16). हदगाव- 45 (54) , अर्धापूर- 12 (20) , नांदेड- 34 (43) , मुदखेड- 7 (17) , भोकर- 16 (31) , उमरी- 9 (22), धर्माबाद- 12 (20) , बिलोली- 26 (36)  , नायगाव- 21 (39) , लोहा- 28 (57) , कंधार-  29 (56), मुखेड- 33 (56) , देगलूर- 31 (39) असे एकूण जिल्हा परिषद गटासाठी 374 व पंचायत समिती गणासाठी 603 उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.  

0000000
..ही तर उज्ज्वल नांदेड च्या वाटचालीतील
घवघवीत यशाची नांदी – जिल्हाधिकारी काकाणी
अधिव्याख्याता पदासाठी निवडलेल्या 11 जणांचा सत्कार संपन्न

नांदेड दि. 10 :- अधिव्याख्याता वर्ग-2 पदासाठी निवड झालेले अकरा उमेदवार म्हणजे उज्ज्वल नांदेडच्या वाटचालीतील घवघवीत यशाची नांदी, असल्याची भावना जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज येथे व्यक्त केली. उज्ज्वल नांदेड उपक्रमातील अभिरूप मुलाखतीद्वारे शिक्षण-प्रशिक्षण संस्था अधिव्याख्याता पदांसाठी निवड झालेल्या जिल्ह्यातील अकरा उमेदवारांचा आज जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी विशेष सत्कार केला.  हा क्षण या अकरा उमेदवारांच्या आणि त्यांच्या स्नेह्यांसाठी अवर्णनीय समाधानाचा होता. या निवडीत श्रीमती करूणा आवरगंड यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकाविल्याचे विशेष कौतूकही होते.
भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षातील एक उपक्रम म्हणून एप्रिल 2016 मध्ये दहा आठवड्यांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियान राबविण्यात आले. तीव्र उन्हाळा आणि टंचाईच्या परिस्थितीत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध झाली पाहिजे यासाठी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी त्यावेळी विविध विभागांच्या समन्वयातून या उपक्रमाला सुरवात केली. यासाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड सेतू समिती आणि समितीची अभ्यासिका, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांचा सक्रीय सहभाग घेण्यात आला. यातूनच उज्ज्वल नांदेडची संकल्पना साकारली. या संकल्पनेत पुढे दोन महाविद्यालायांचाही सहभाग घेण्यात आला. त्यातूनच उज्ज्वल नांदेडची वाटचाल सुरु झाली.
याच दरम्यान, विविध स्पर्धा परीक्षांसाठीच्या मुलाखतींचे कार्यक्रम जाहीर झाले. मुलाखतींसाठी पात्र उमेदवारांना आवाहन करण्यात आले, आणि त्यासाठी अभिरूप मुलाखतींचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले. या अभिरूप मुलाखतींच्या उपक्रमात जिल्हा शिक्षण-प्रशिक्षण संस्थांसाठीच्या अधिव्याख्याता पदांसाठीच्या उमेदवारांसाठी पुण्यातील तज्ज्ञ मनोहर भोळे, उपविभागीय अधिकारी डॅा. अजित थोरबोले, नांदेडच्या डायटचे प्राचार्य डॅा. बी. टी. पुटवाड, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे आणि समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांनी या मुलाखती घेतल्या होत्या. या उपक्रमांचा लाभ घेतलेल्या 35 पैकी अकरा जणांची प्रत्यक्ष निवड झाली. त्यामध्ये श्रीमती करुणा आवरगंड यांनी तर राज्यात पहिला क्रमांक पटकाविला. आवरगंड यांच्यासह राजेश गोरे, लिंगूराम राजूरे, श्रीमती आशाताई लोहटे, राजाराम टकले, सिद्धेश्र्वर कांबळे, शिवाजी साखरे, श्रीमती सुधाताई मेश्राम, श्रीमती शितल शिंदे, चंद्रकांत धुमाळ आणि प्रकाश सिरले यांचाही समावेश होता.
या यशस्वी उमेदवारांचा आज जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी आपल्या निजीकक्षात बोलावून सत्कार केला. या सर्वांचे अभिनंदन करतानाच, पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या. यावेळी सेतू समितीचे सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सूनील हुसे, जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी, मीना सोलापूरे, आरती कोकूलवार आदींची उपस्थिती होती.

0000000

वृत्‍त क्र.   384   देगलूर तहसील कार्यालयासमोरील वाहतूक वळण रस्यात बदल   नांदेड दि. 24 एप्रिल- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने...