Thursday, June 4, 2020

कार्यालय, शैक्षणिक संस्थेतील कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामे करण्यासाठी मुभा



नांदेड (जिमाका) दि. 4 :- जिल्ह्यातील कार्यालय, शैक्षणिक संस्था (विद्यापीठे,महाविद्यालये / शाळा) या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना प्रतिबंधीत क्षेत्र वगळून उर्वरीत क्षेत्रासाठी कोव्हिड 19 रोगाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपायायोजनेच्या अधिन राहून अध्यापना व्यतिरिक्त इतर कामांकरिता कार्यालयात उपस्थित राहून उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन आणि परिक्षांचे निकाल यासारखे व इतर कार्यालयीन कामे करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे.
या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत.
00000


तलाठी पदभरतीची अंतिम निवड यादी प्रसिद्ध



  नांदेड (जिमाका) दि. 4 :- महापरीक्षा पोर्टल मार्फत उपलब्ध डाटावरुन नांदेड जिल्ह्यातील तलाठी पदभरती 2019 अंतर्गत मुळ कागदपत्रे तपासणीअंती जिल्हा समितीची बैठक घेऊन शासन निर्णय 4 जुलै 2019 मधील तरतुदीनुसार तलाठी पदाची अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादी तसेच सुचनापत्र नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत http://nanded.nic.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिली आहे.
00000

मिनी ट्रॅक्टरची योजनेतील बचत गटांनी कागदपत्रांची तपासणी करावी



    नांदेड (जिमाका) दि. 4 :- अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याबाबत गटातील सर्व सदस्यांचे मुळ कागदपत्रे  तपासणीसाठी अर्ज केलेल्या सर्व बचत गटांना त्रुटींची पूर्तता करण्यासाठी 9,10,  11 जून 2020 या तीन दिवसात मूळ कागदपत्राची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.
 राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे अनुसूचित जाती व नवबौद्ध  घटकांच्या  स्वयंसहाय्यता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर 9 ते 18 अश्वशक्तीचे  मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने  यांचा पुरवठा करण्याची योजना कार्यान्वित झालेली आहे.
 तसेच शासन निर्णय दिनांक 8 मार्च 2017 अन्वये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या  स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्यासाठी लाभाचे हस्तांतर रोख स्वरुपात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे,
सन 2018-19 या वर्षात ज्या बचत गटांनी मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने मिळविण्यासाठी अर्ज केला  होता, त्या सर्व अर्जांची तपासणी केली असता अर्जात त्रुटी आढळून आल्या होत्या, एकूण 153 बचत गटांनी त्रुटीची पूर्तता केली आहे. पात्र व अपात्र बचत गटांची यादी ज्या त्रुट्या आहेत त्यासह कार्यालयाच्या सूचना फलकावर दर्शनी ठिकाणी लावण्यात आली आहे.
अर्ज केलेल्या सर्व बचत गटांना त्रुटींची पूर्तता करण्यासाठी यापूर्वीच चार वेळा संधी देण्यात आली होती. मा. जिल्हाधिकारी यांचे आदेशान्वये जे अपात्र किवा ज्या बचत गटांनी आजपर्यंत मूळ कागदपत्र या कार्यालयाकडून तपासून घेतले नाहीत त्यांना अंतिम संधी देण्यात येत आहे. दिनांक 9 जून 10 जुन व 11 जून 2020 या तीन दिवसात अध्यक्ष, सचिव व बचत गटातील सर्व सदस्याचे आधार कार्ड, सक्षम अधिकाऱ्यांचे जातीचे प्रमाणपत्र व रहिवासी प्रमाणपत्र, बचत गटाचे नोंदणी प्रमाणपत्र, चारचाकी वाहन चालवण्याचा परवाना, बचत गटाचा शिक्का आणि अध्यक्ष सचिव यांचे बँकेला आधार लिंक प्रमाणपत्र फक्त अध्यक्ष सचिव यांनीच उपरोक्त मूळ कागदपत्र घेऊन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय,डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नमस्कार चौकाच्या पुढे, नांदेड. येथे कार्यालीयीन वेळेत यावे.
या योजनेअंतर्गत मूळ कागदपत्रे तपासणीअंती एकूण पात्र 153 बचत गट पात्र झाले आहेत. त्या बचत गटानी तपासणीसाठी या कार्यालयास येण्याची गरज नाही. यानंतर बचत गटांची कुठलीही तक्रार स्वीकारल्या नाही, याची नोंद घ्यावी असे आवाहन तेजस माळवतकर, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड यांनी केले आहे.
0000

वाहन पाससाठी कोणी फसवणूक करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई


वाहन पाससाठी कोणी फसवणूक करीत असेल
तर त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई
https//covid19.mhpolice.in या लिंकवर मोफत पास सुविधा

नांदेड (जिमाका) दि. 4 :- नांदेड जिल्ह्यातुन बाहेर गावी जाणारे  अथवा जिल्ह्यात अडकलेले याञेकरु, विद्यार्थी, मजुर, अथवा इतर नागरिकांना सुरक्षित त्यांच्या गावी जात यावे यासाठी जिल्हा प्रशासनाने सुरुवातीपासूनच दक्षता घेतली आहे.  स्वतःचे वाहन असल्यास त्यांच्या पाससाठी नागरिकांना आपल्या घरूनच ऑनलाईन फॉर्म/माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. 
स्वतःची वाहने घेऊन कोणी बाहेरगावी जाऊ इच्छित असेल तर पाससाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तींना पास दिले जात आहेत. यासाठी प्रशासनाने स्वतंत्र अधिकारी-कर्मचारी उपलब्ध करून दिले आहेत. सदरील पास करिता शासनाकडुन कोणतेही शुल्क आकारले जात नाही असे नांदेड जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी स्पष्ट केले.  या पाससाठी समाजातील कुण्या व्यक्तीने लोकांची दिशाभूल करून फसविण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असे परदेशी यांनी सांगितले. पाससाठी कोणतीही खाजगी एजन्सी नेमण्यात आलेली नाही असे त्यांनी स्पष्ट केले. 
ज्यांना पासची आवश्यकता आहे त्यांनी वर दिलेल्या लिंकवर आपल्या  मोबाईल वा संगणकावरुन अर्ज करावा. सदरील अर्जावर जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन विहीत वेळेत नियमानुसार निर्णय घेतले जात आहेत. याबाबत कोणत्याही आमिष अथवा भुलथापांना बळी पडु नये. तसेच याबाबत असा कोणताही   प्रकार  आढळुन आल्यास संबधितांवर फौजदारी कार्यवाही करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.
00000

जिल्ह्यात कोरोना बाधितामध्ये 7 व्यक्तींची भर दोन बाधित औरंगाबाद, यवतमाळ जिल्हयातील


नांदेड (जिमाका) दि. 4 :- कोरोना बाधिताच्या संख्येत आज तब्बल 7 बाधित व्यक्तींची भर झाली असून नागरिकांनी काटेकोर दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या 7 बाधितामध्ये औरंगाबाद येथील 1 पुरुष वय 43 वर्षे, यवतमाळ जिल्हयातील उमरखेड येथील 1 पुरुष वय वर्षे 74 तसेच नांदेड येथील नईआबादी शिवाजीनगर परिसरातील 5 बाधित व्यक्ती असून त्यापैकी 1 पुरुष वय 28 वर्षे आणि 4 स्त्री अनुक्रमे वय वर्षे 35 ,45,55,70 आहे. सद्यास्थितीत त्यांची प्रकृती स्थिर आहे. जिल्ह्यातील एकुण बाधिताची संख्या आता 182 वर पोहचली आहे. यापैकी बरे झालेली बाधित व्यक्तींची संख्या 126 आहे.  
जिल्ह्यात गुरुवार 4 जून रोजी सायं. 5 वा. प्राप्त झालेल्या 63 अहवालापैकी 49 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले. नवीन 7 बाधिताचा स्वॅब पॉझिटिव्ह आल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील एकुण बाधित संख्या आता 182 झाली आहे. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथील 1 व मुंबई येथे संदर्भित करण्यात आलेला 1 असे 2 बाधित व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
सद्यस्थितीत रुग्णालयात 48 बाधित व्यक्तींवर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली औषधोपचार सुरु आहेत. त्यातील 3 बाधिताची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 52  65 वर्षांच्या दोन स्त्री बाधित तर 38 वर्षाचा एक पुरुष बाधित आहे.
आतापर्यंत एकूण 182 बाधितापैकी 8 बाधितांचा मृत्यू झाला असून 126 बाधित व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरित 48 बाधितापैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 8 बाधित , एनआरआय यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे 36 बाधित, उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे 4 बाधित व्यक्ती आहेत.  
कोरोना विषयी जिल्ह्याची संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे. सर्वेक्षण- 1 लाख 41 हजार 978, घेतलेले स्वॅब 4 हजार 270, निगेटिव्ह स्वॅब 3 हजार 788, आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या 7, एकुण पॉझिटिव्ह रुग्ण 182, स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या 167, स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या 55, मृत्यू संख्या 8, रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या 126, रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण 48, स्वॅब तपासणी चालू रुग्ण संख्या 73 एवढी आहे.
दिनांक 3 जून रोजी प्रलंबित असलेल्या 111 स्वॅब तपासणी अहवालापैकी 63 तपासणी अहवाल प्राप्त झाले असून उर्वरित 48 अहवाल आज रात्री उशिरापर्यंत प्राप्त होतील. 4 जून रोजी 25 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. त्यांचे अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होतील.
वाढत्या संख्येला अधिक घाबरुन न जाता जनतेने गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून सतत हात धुणे व मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे प्रत्येक व्यक्तींने आपल्या वर्तनात बदल करुन स्वत: सुरक्षितेची अधिक काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. रोजच्या जीवनात आपण ज्या काही वस्तू बाहेरुन आणतो त्याची योग्य ती स्वच्छता केली पाहिजे. भाजीपाला घेतल्यास तो स्वच्छ करुन किमान 12 तास न वापरता स्वच्छ जागी ठेवून आपल्या आहाराप्रतीही अधिक सजग राहिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

00000
वृ

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...