Friday, October 28, 2016

नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीचे
नामनिर्देशनपत्रे 1 नोव्हेंबर रोजी स्वीकारले जाणार
        नांदेड, दि. 28 महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक 2016 साठी भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्र स्विकारण्याची अंतिम मुदत बुधवार 2 नोव्हेंबर 2016 आहे. अधिनियमातील तरतुदी विचारात घेता 1 नोव्हेंबर 2016 रोजीची सुट्टी ही सार्वजनिक सुट्टी या व्याख्येत मोडत नसल्याने मंगळवार 1 नोव्हेंबर रोजी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याची कार्यवाही सुरु ठेवणे आवश्यक आहे. अशा सूचना उपसचिव व सह. मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिल्या आहेत.  म्हणून नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीसाठी 1 नोव्हेंबर 2016 रोजी नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात येतील असे नांदेड जिल्हा निवडणूक कार्यालयाने कळविले आहे.
         शासन राजपत्र 24 नोव्हेंबर 2015 अन्वये शासनाने 1 नोव्हेंबर 2016 रोजी शासकीय, निमशासकीय, कार्यालयांना भाऊबीज निमित्त सुट्टी जाहीर केली आहे. ही सुट्टी पराक्रम्य संलेख अधिनियम 1981 खाली जाहीर केले नाही.  लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1991 मधील नियम 33 मध्ये नामनिर्देशन पत्र सादर करणे आणि विधीग्राह्य नामनिर्देशन याबाबत तरतूद दिली असून त्याखालील दिलेल्या परंतुकामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे नामनिर्देशनपत्र जो दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित केला आहे, त्या दिवशी सादर करता येणार नाहीत अशी तरतूद आहे. अधिनियमातील व्याख्यांमध्ये सार्वजनिक सुट्टी याची व्याख्या दिली असून त्यात सार्वजनिक सुट्टी म्हणजे पराक्राम्य संलेख अधिनियम, 1981 मधील कलम 25 नुसार सार्वजनिक सुट्टी अशी आहे.  या तरतुदी विचारात घेता 1 नोव्हेंबर रोजी सुट्टी ही सार्वजनिक सुट्टी या व्याख्येत मोडत नसल्याने 1 नोव्हेंबर रोजी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याची कार्यवाही सुरु राहणार आहे.  

00000000
जवाहर नवोदय विद्यालयाची शिकवणी
4 नोव्हेंबर पासून सुरु होणार
नांदेड, दि. 28 :- बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या दिवाळी सुट्टीत बदल करण्यात आला आहे. शुक्रवार 4 नोव्हेंबर 2016 रोजी पासून विद्यार्थ्यांना शिकवणी सुरु होणार आहे, अशी माहिती प्राचार्य हरिवरा प्रसाद यांनी दिली आहे.  
शाळेतील संबंधित विद्यार्थी, पालक, शिक्षक व नातेवाईकांनी आपल्या पाल्यास 4 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वा. शाळेत येताना सोबत सुट्टीपुर्वी दिलेले पालक बॉयोडाटा व पालकांचे ओळखपत्र पूर्ण करुन घेवून यावे, असे आवाहनही केले आहे.

00000000
कापूस, तुर पिकावरील किड नियंत्रणासाठी
कृषि विभागाचा संदेश
नांदेड, दि. 28 :-  जिल्ह्यात कापूस व तूर पिकासाठी किड, रोग सर्वेक्षण प्रकल्पांतर्गत काम सुरु आहे. शेतकऱ्यांना पिकावरील किडीच्या संरक्षणासाठी उपविभागीय कृषि अधिकारी नांदेड यांनी संदेश दिला आहे.
कापसावरील फुले येणाच्या व बोंडे निर्मितीच्या अवस्थेत जर पाने लाल पडत असतील तर मॅग्नेशिअम सल्फेट 0.2 टक्के @ 20 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीवरील पांढऱ्या माशीच्या नियंत्रणाकरीता डायफेनथुरिऑन 50 डब्लु. पी. 1.2 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फुलोरामधील तुरीसाठी लिंबोळी अर्क 5 टक्के किंवा एचएएनपीव्ही 500 मिली प्रती हेक्टर याप्रमाणे फवारणी करावी. शेंगा पोखरणाऱ्या अळीसाठी प्रती हेक्टर 5 कामगंध सापळे लावावेत, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.

00000
आरोग्य शिबीरात 118 रुग्णांची तपासणी 
नांदेड, दि. 28 :-राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालयाच्यातीने आज हनुमानगड नांदेड येथे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. शिबिरात 118 रुग्णांचे मधुमेह, उच्च रक्तदाब, मौखिक आरोग्य व नेत्र इत्यादी आजाराची मोफत तपासणी करण्यात आली.
तपासणीत मधुमेहाचे 10, उच्चरक्तदाब 8, मौखिक आरोग्याची 25 व मोतीबिंदे 55 रुग्णांचा समावेश होता. त्यापैकी 50 रुग्णांत दृष्टीदोष असल्याचे आढळून आले. शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर यांच्या हस्ते करण्यात आल. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपक हजारी, नेत्र शल्यचिकित्सक डॉ. जी. सी.घोडके, डॉ. ए. आय. शेख, एनसीडी अधिकारी, कर्मचारी यांचा सहभाग होता.

0000000

वृत्‍त क्र.   357 टपाली मतदान करताना उमेदवारांनी प्रतिनिधी नियुक्त करण्याचे आवाहन गृह मतदानाच्या प्रक्रियेला लक्षात घेण्याचे आवाहन नां...