Wednesday, November 24, 2021

 नांदेड जिल्ह्यात 2 व्यक्ती कोरोना बाधित

तर 3 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 24 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 818 अहवालापैकी 2 अहवाल कोरोना बाधित आला आहे. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 2 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 470 एवढी झाली असून यातील 87 हजार 792 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 25 रुग्ण उपचार घेत असून 1 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 653 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 2 बाधित आढळले. आज जिल्ह्यातील 3 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 1, खाजगी रुग्णालय 2 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 25 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 2, नांदेड मनपा अंतर्गंत गृह विलगीकरण 19, खाजगी रुग्णालयात 2 व्यक्ती उपचार घेत आहेत.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 70 हजार 789

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 66 हजार 892

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 470

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 792

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 653

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.3 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-1

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-25

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-1. 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 

लसीकरणासाठी पार्डी गावात जाऊन लोकांना केले प्रवृत्त

 ·         लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनातर्फे शर्तीचे प्रयत्न   

नांदेड (जिमाका) दि. 24 :- नांदेड जिल्ह्यातील कोविड-19 लसीकरणासाठी अधिकाधिक नागरिकांचा सहभाग घ्यावा व त्यांना संभाव्य धोक्यापासून दूर ठेवता यावे या उद्देशाने जिल्हा प्रशासनातर्फे हाती घेतलेल्या विशेष लसीकरण मोहिमेसाठी आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पार्डी गावात घरोघरी जाऊन लोकांना प्रवृत्त केले. त्यांच्या समवेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी लोकांना आवाहन करुन लसीकरणाचे महत्व पटवून दिले. 

जिल्हा प्रशासनात अनेक अधिकारी व कर्मचारी हे नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असून समाजाप्रती व आपल्या गावाप्रती उत्तरदायीत्व म्हणून आज 24 नोव्हेंबर रोजी आपआपल्या गावात लसीकरण साक्षरतेसाठी व लोकांना लस घेण्यास प्रवृत्त केले. लसीकरणाची ही मोहिम अधिक व्यापक केली जाणार असून कोणताही नागरिक यापासून वंचित राहू नये याची दक्षता जिल्हा प्रशासनातर्फे घेतली जात आहे. 

00000




 मानव विकासाच्या योजना गरजू वंचितांपर्यंत

पोहचण्यासाठी अधिकाऱ्यांनी घ्यावी दक्षता

- आयुक्त नितीन पाटील 

मानव विकास योजनाच्या प्रगतीचा आयुक्तांनी घेतला आढावा 

नांदेड, (जिमाका) दि. 24 :- मानव विकास कार्यक्रमांतर्गत शिक्षण, आरोग्य व दुर्बल घटकातील लोकांना उपजीविकेची साधने मिळावीत व त्यातून रोजीरोटीचा प्रश्न दूर व्हावा यासाठी विविध विभागाद्वारे विविध योजना व उपक्रम राबविणे अपेक्षित आहे. बदलत्या काळाप्रमाणे ग्रामीण भागातील वंचित असलेल्या दुर्बल लोकांच्या गरजाही बदलत चाललेल्या आहेत. त्यादृष्टीने ज्या योजना हाती घ्यायच्या आहेत त्यात संबंधित अधिकाऱ्यांनी सर्वसामावेशक विचार करुन त्याची व्याप्ती कशी वाढविता येईल यावर भर द्यायला हवा, अशी अपेक्षा मानव विकास आयुक्त नितीन पाटील यांनी व्यक्त केली. 

डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवनात आज नितीन पाटील अध्यक्षतेखाली नांदेड जिल्ह्यातील मानव विकास कार्यक्रम 2021-22 अंतर्गत हाती घेतलेल्या विविध योजनांची आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा नियोजन अधिकारी सु. आ. थोरात, कृषि, आरोग्य, शिक्षण, पशुसंवर्धन, माविम, राज्य परिवहन महामंडळ यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

ग्रामीण भागातील मुलींना शाळेला जाणारी पायपीट सुलभ व्हावी यादृष्टिने 5 किमी अंतरापर्यंत गरजू पात्र असलेल्या मुलींना सायकलींगचे वाटप केले जाते. ही सायकल केवळ या मुलीच्या शाळेपुरत्या मर्यादीत राहत नाही तर ती तिच्या घरच्या लोकांसाठीही उपयोगात येऊ शकते. दुध वाटप व इतर लहान-मोठ्या व्यवसायाच्या मदतीलाही ही सायकल सहाय्यभूत ठरू शकते. शासनाच्या योजनेतून जी मदत सायकलच्या माध्यमातून केली जाते त्याची अधिक उपयोगिता असून तेवढ्याच व्यापक दृष्टीने अधिकाऱ्यांनी मानव विकास योजने अंतर्गत हाती घेतलेल्या उपक्रमांकडे पाहिले पाहिजे, असेही नितीन पाटील यांनी स्पष्ट केले. 

लाभार्थ्यांच्या नेमक्या गरजा कोणत्या आहेत त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी उपजीविकेची कोणती साधने सहाय्यभूत ठरतील, आरोग्याच्या बाबतीत विचार करताना नेमके अधिक आव्हानात्मक विषय कोणते आहेत, यात ज्यात दुर्बल घटकांसाठी मानव विकास कार्यक्रम निश्चित करणे अपेक्षित आहे त्या वर्गाला प्राधान्य कसे देता येईल, भूमीहीन शेतमजूर-बेरोजगार-अल्ट्रा पुअर समाजाला यात कसे स्थान देता येईल हे अभ्यासने आवश्यक आहे. नांदेड जिल्ह्यात 55 टक्के शेतमजूर आहेत. हा आकडा मोठा आहे. उपलब्ध असलेल्या ज्या काही योजना आहेत त्या अत्यंत जबाबदारीने त्यांच्या पर्यंत पोहचविण्यासाठी विभाग प्रमुखांनी मिशन मोडवर जाऊन काम करणे अभिप्रेत असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यातील सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून ज्या काही आदिवासी जाती-जमाती आहेत, मातंग, पारधी व इतर समाज आहे त्यांना त्यांच्या गरजेनुरूप योजना निश्चित झाल्या पाहिजेत. मानव विकास कार्यक्रमांतर्गत वंचित घटकांचा विकास हेच आपले ध्येय असावे यावर भर देऊन आयुक्त नितीन पाटील यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. 

नांदेड जिल्ह्यातील लोहा, मुदखेड, देगलूर, बिलोली, धर्माबाद, किनवट, हिमायतनगर, भोकर, उमरी हे 9 तालुके मानव विकास कार्यक्रमात समाविष्ट आहेत. ग्रामीण भागातील सर्व मुलींना 12 वी पर्यंत शिक्षण घेता येणे शक्य व्हावे यासाठी वाहतुकीची सुविधा अंतर्गत सन 2021-22 साठी 3 हजार 656 बसचे पासेस दिले गेले आहेत. इयत्ता 8 वी ते 12 वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या व शाळेपासून 5 किमी अंतरापर्यंत राहणाऱ्या गरजू असलेल्या 2 हजार 257 मुलींना सायकलीचे वाटप करण्यात आले आहे. 

तज्ज्ञ महिला डॉक्टरकडून गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी व 6 महिन्यापर्यंतच्या बालकांची व मातांची आरोग्य तपासणी, आषोधोपचार अंतर्गत या वर्षात 18 हजार 532 लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला. अ. जा. / अनुसूचित जमाती / दारिद्रयरेषेखालील बाळांत महिलांना बुडीत मजुरी देणे योजनेंतर्गत यावर्षी 1 हजार 416 लाभार्थ्यांना लाभ दिला. मराठवाडा विकास मंडळ‍ विशेष निधी सन 2019-20 अंतर्गत 3 बचतगटांना माविमद्वारे कुलींगव्हान व इतर साहित्य, खवा सेंटर मशीनरीसाठी सुमारे 14 लाख निधी खर्च झाला आहे. याचबरोबर मशाला युनिट, मशीनरी व इतर साहित्य, टेलरिंग युनिट (सीएफसी), स्पायरल सेपरेटर यासाठी माविम तर्फे योजनेचा लाभ देण्यात आला आहे. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी मार्गदर्शन केले. योजनांबाबत अधिक माहिती जिल्हा नियोजन अधिकारी यांचेकडे उपलब्ध आहे.

00000





  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...