Monday, July 26, 2021

 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेवून जिल्ह्यातील सर्व सुपर स्प्रेडर व्यक्तींच्या होणार चाचण्या

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

जिल्ह्यात दररोज किमान 5 हजार 700 चाचण्याचे उद्दिष्ट 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका दृष्टीपथात ठेवून नागरिकांनी अधिकाधिक दक्षता घेणे अत्यावश्यक आहे. कोरोनाचा धोका अजून तसूभरही कमी झालेला नाही. सुपर स्प्रेडर ठरणाऱ्या विविध शासकीय कार्यालयासह सेवा क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तींची कोरोना चाचणी करण्याची महत्वपूर्ण मोहीम जिल्हा प्रशासनाने हाती घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा व संभाव्य तिसरी लाट लक्षात घेवून करावयाच्या उपाययोजनाच्या संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक संपन्न झाली. 

या बैठकीस मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता    डॉ. जमदाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंघ बिसेन व आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

नागरिकांनी कोरोना संदर्भात वेळोवेळी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. ज्या शासकीय कार्यालयाचा आणि सेवावर्गात मोडणाऱ्या ज्या व्यावसायिकांचा अधिकाधिक विविध लोकांशी दररोज संपर्क येतो अशा व्यक्तींची सोळा वर्गवारीत विभागणी केली आहे. यात पंचायत समितीपासून जिल्हा परिषदेपर्यत, ग्रामीण आरोग्य उपकेंद्र अंगणवाडी पासून ते वैद्यकीय महाविद्यालयापर्यत गट केलेले आहेत. याचबरोबर बँका, कृषी विभाग, पोलीस विभाग, शिक्षण विभाग, विजवितरण, बस वाहतूक-डेपो पासून दुध विक्रेते, फळवाले, फेरीवाले, पेपर विक्रेते, रिक्षाचालक, खाजगी वाहनचालक आदी सेवा क्षेत्राचा समावेश सुपर स्प्रेडर मध्ये केला आहे. सर्वाधिक काळजी याच घटकापासून घेणे अत्यावश्यक असल्याने या सर्वांची कोरोना चाचणी युध्दपातळीवर करता यावी यादृष्टीने ही विशेष मोहिम असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले. 

ही मोहिम 27 जुलैपासून सुरु होत असून ती 11 ऑगस्टपर्यत चालणार आहे. यासाठी आरोग्य विभागाचे विशेष पथक तयार करण्यात आले आहेत. दररोज किमान 5 हजार 700 चाचण्या करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व तहसिल, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामीण आरोग्य यंत्रणा यांच्या समन्वयातून ही मोहिम राबविली जाणार आहे. प्रत्येक विभागाला नेमून दिलेल्या तारखेप्रमाणे पथकामार्फत कोविड-19 ची तपासणी केली जाईल. यात आरटीपीसीआरचे प्रमाण जास्तीत जास्त राहणार आहे. नांदेड मनपा क्षेत्रासाठी दररोज 2 हजार 310 चाचण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.

0000

 

 

जिल्ह्यातील 75 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

नांदेड (जिमाका) दि. 26 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 75 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. मंगळवार 27 जुलै 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 

मनपा क्षेत्रातील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर,जंगमवाडी, दशमेशहॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, पौर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर, येथे एकूण 16 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. याचबरोबर डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग,दशमेश हॉस्पिटल, श्रावस्तीनगर (विजयनगर) कौठा, रेल्वे हॉस्पिटल, खडकपुरा, करबला, अरबगल्ली या 11 रुग्णालयामध्ये कोव्हॅक्सीनचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय हदगाव, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, हिमायतनगर, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव उमरी या 11 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस दिले आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, गोकुंदा, ग्रामीण रुग्णालय धर्माबाद, कंधार या 5 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस दिले आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 15 ठिकाणी कोव्हॅक्सीन प्रत्येकी 100 डोस, ग्रामीण भागात 30 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस, तर 10 प्राथमिक आरोग्य केंद्रावर प्रत्येकी 50 डोस कोविशील्डचे देण्यात आले आहेत. 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 

जिल्ह्यात 26 जुलैपर्यंत एकुण 7 लाख 79 हजार 208 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात कोविड लसींचा साठा खालीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 6 लाख 15 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 84 हजार 640 डोस याप्रमाणे एकुण 7 लाख 99 हजार 670 डोस प्राप्त झाले आहेत.

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

00000

 नांदेड जिल्ह्यात 7 व्यक्ती कोरोना बाधित तर 9 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 942 अहवालापैकी 7 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 7 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 149 एवढी झाली असून यातील 87 हजार 456 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 38 रुग्ण उपचार घेत असून यात 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 6, हिंगोली 1 असे एकूण 7 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 9 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील 8 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 38 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 5, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 2, देगलूर कोविड रुग्णालय 3, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 24, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 4 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 128, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 143 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 6 लाख 49 हजार 974

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 47 हजार 888

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 149

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 456

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.01 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-4

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-44

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-38

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3

00000



 

इयत्ता अकरावी प्रवेश परीक्षा CET आवेदनपत्र 2 ऑगस्टपर्यत ऑनलाईन भरण्याचे आवाहन

  

नांदेड (जिमाका) दि. 26 :-इयत्ता अकरावी प्रवेशासंदर्भात संपूर्ण राज्यामध्ये सामाईक प्रवेश परीक्षा CET आयोजन करण्यात येत आहे. मंडळाच्या इयत्ता 10 परीक्षा 2021 साठी मंडळाकडे नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यासाठी इयत्ता 11 वी प्रवेशासंदर्भात घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेची CET आवेदनपत्रे सोमवार 26 जुलैपासून दुपारी 3 पासून 2 ऑगस्ट 2021 रात्री 11.59 पर्यत https://cet.11thadmission.org.in  या संकेतस्थळावर भरण्याची सुविधा पुन:श्च उपलब्ध करुन देण्यात येत आहे, असे आवाहन मंडळाचे सचिव      डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.

 

या परीक्षेसाठी मंडळाच्या संकेतस्थळावरुन अर्ज भरण्याची सुविधा 20 जुलै रोजी सकाळपासून सुरु करण्यात आली होती. तांत्रिक कारणास्तव ही सुविधा 21 जुलै पासून बंद ठेवण्यात आली आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरही सीईटी पोर्टल ॲसेस करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.संगणक प्रणालीमध्ये अर्ज भरण्यासाठी पुढील माहिती नोंदवावी लागणार आहे.  

 

ई-मेल आयडी उपलब्ध असल्यास, पूर्वीचा मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे किंवा नव्याने नोंदविणे अनिवार्य आहे. परीक्षेचे माध्यम, विद्यार्थ्यांने सेमी इंग्रजीचा विकल्प निवडल्यास त्याला इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांच्या प्रश्नासाठी अंग्रजी माध्यम असेल. सामाजिक शास्त्रे  (इतिहास व राज्यशास्त्र, भुगोल) या विषयासाठी विद्यार्थ्यांस एक माध्यम निश्चित करावे लागेल. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांस त्यांच्या तात्पुरत्या, कायमच्या निवासस्थानाच्या पत्त्यानुसार परीक्षा केद्र मिळण्यासाठी जिल्हा व तालुका, शहराचा विभाग, वार्ड, निश्चित करावा लागेल.  ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता 10 ची आवेदनपत्र भरताना एसईबीसी प्रवर्गाची नोंद केली आहे अशा विद्यार्थ्यांना शासनाच्या सुधारित तरतुदीनुसार खुला प्रवर्ग अथवा ईडब्लुएस हा प्रवर्ग निवडावा लागेल. प्रथम आवश्यक माहिती निश्चत करुन ठेवावी व तदनंतर इयत्ता 11 वी प्रवेशासाठी आयोजित सामाईक प्रवेश परीक्षेचे आवेदनपत्र भरण्याची कार्यवाही करावी.

 

ज्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण प्रक्रीया 20 ते 21 जुलै 2021 या कालावधीत  पूर्ण करुन सामाईक प्रवेश परीक्षेसाठी मंडळाकडे अर्ज सादर केले आहेत. त्यांनी आपल्या अर्जाचा तपशिल पूर्वीचा अर्ज क्रमांक अप्लीकेशन क्रमांक व आवेदनपत्र भरताना नोंदविलेला मोबाईल क्रमांक टाकून या संकेतस्थळावर पाहता येईल. या प्रक्रीये दरम्यान परिपूर्ण अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. मात्र प्रक्रिया पूर्ण करुन न शकलेल्या उमेदवारांचा तपशिल संकेतस्थळावर उपलब्ध नसल्यास त्यांनी नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक राहील. सीईटी परीक्षेसंदर्भात विद्यार्थी, पालक व अन्य संबंधित घटकांच्या शंकाचे निरसन करण्यासाठी मंडळामार्फत यापूर्वी हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याचा तपशील मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 

राज्यमंडळाची इयत्ता 10 वी परीक्षा सन 2021 पूर्वी उत्तीर्ण, प्रविष्ठ झालेले विद्यार्थी आणि सीबीएसई, आयसीएसई व अन्य मंडळाचे विद्यार्थी यांना सामाईक प्रवेश परीक्षेसाठी शुल्क भरावे लागणार आहे. यासाठी पेमेंट गेटवेची सुविधा उपलब्ध करुन घेण्यात येणार आहे. त्यामूळे अशा विद्यार्थ्यांची आवेदनपत्र भरण्याची प्रक्रीया बुधवार 28 जुलै रोजी दुपारी 3 पासून उपलब्ध करुन देण्यात येत आहे. याबाबतचा तपशिल स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. याबाबत संबंधीत विद्यार्थी, पालक व अन्य घटकांनी यांची नोंद घ्यावी असेही मंडळाने प्रसिध्दपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

 

कार्यालये, संस्था, इतर आस्थापनेत महिला संरक्षणासाठी तक्रार निवारण समिती गठीत करणे अनिवार्य 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- महिलाचे संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 नुसार प्रत्येक कार्यालयीन / कामाच्या ठिकाणी तक्रार निवारण समिती गठीत करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यापुर्वी अशा समित्या काही कार्यालयाने स्थापन केल्या आहेत त्या अद्यावत कराव्यात. या अंतर्गंतची तक्रार समिती गठीत करुन त्याचा अहवाल जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयास iccdwcdned@gmail.com या ई-मेलवर उपलब्ध करुन देण्यात यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रेखा काळम यांनी केले आहे.   

शासकीय, निमशासकीय, खाजगी कार्यालये, संघटना, शासन अनुदानित संस्था, महामंडळे, आस्थापना संस्था, ज्याची शासनाने स्थापना केली असेल किंवा नियंत्रणाखाली असेल किंवा पुर्ण किंवा अंशत: प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष निधी शासनामार्फत किंवा स्थानिक प्राधिकरण किंवा शासकीय कंपनी, नगरपरिषद, सहकारी संस्था किंवा कोणत्याही खाजगी क्षेत्र कंपनी किंवा खाजगी उपक्रम, संस्था, इंटरप्रायजेस, अशासकीय संघटना सोसायटी ट्रस्ट, उत्पादक, पुरवठा, वितरण व विक्री यासह वाणिज्य व्यावसायिक, शैक्षणिक, करमणूक, औद्योगिक इत्यादी सेवा किंवा वित्तीय कामकाज पार पाडणारे युनिट किंवा सेवा पुरवठादार, रुग्णालये, सुश्रुषालये, क्रिडा संस्था, प्रेक्षागृहे इत्यादी ठिकाणी अंतर्गत तक्रार निवारण समिती गठीत करणे बंधनकारक आहे. ज्या आस्थापनेवर 10 किंवा त्यापेक्षा जास्त अधिकारी-कर्मचारी असतील अशा कार्यालयीन किंवा कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळापासून संरक्षणासाठी स्वंतत्र अधिनियम करण्यात आले आहे. 

अधिनियमातील कलम 26 मध्ये जर एखादया मालकाने () अंतर्गत तक्रार समिती स्थापन केली नाही. () अधिनियमातील कलम 13,14,22 नुसार कारवाई केली नाही () या कायद्यातील व नियमातील विविध तरतुदीचे व जबाबदारीचे पालन न केल्यास 50 हजार रुपयापर्यत दंड होईल तसेच हाच प्रकार पुन्हा केल्यास लायसन्स रद्द, दुप्पट दंड अशी तरतूद आहे, असे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...