Saturday, April 2, 2022

महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेता

देवेंद्र फडणवीस यांचा नांदेड दौरा  

 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल. 

 

शनिवार 2 एप्रिल 2022 रोजी सायं 5 वा. वर्धा जिल्ह्यातील देवळी येथून सोईनुसार मोटारीने नांदेडकडे प्रयाण व रात्री नांदेड येथे मुक्काम. 

 

रविवार 3 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10.10 वा. मोटारीने नायगाव तालुक्यातील कुंटूरकडे प्रयाण. सकाळी 11 वा. कुंटूर येथील प्रेरणास्थळ परिसर येथे आगमन. सकाळी 11 वा. स्व. गंगाधरराव देशमुख कुंटूरकर माजी राज्यमंत्री यांच्या स्मारकाचे लोकार्पण व धुरंधर स्मृतिग्रंथ प्रकाशन. सोईनुसार मोटारीने नागपूरकडे प्रयाण करतील.

00000


होट्टल महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी

होट्टलच्या ग्रामस्थांचा पुढाकार

 

·        जिल्हा प्रशासनातर्फे होट्टल मंदिरात सर्वसमावेशक बैठक 

नांदेड, (जिमाका) दि. 2 :- होट्टल महोत्सव गावकऱ्यांच्या दृष्टिनेही तेवढ्याच महत्वाचा असून तो आमचाही उत्सव आहे. लोकसहभागाला प्राधान्य देत होट्टल येथील गावकरी, युवक स्वयंस्फूर्त यात सहभागी होऊन महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नाची शर्त करतील, असा विश्वास आज गावकऱ्यांनी दिला. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली होट्टल महोत्सवाचे नियोजन केले जात असून अधिकाधिक स्थानिकांचा लोकसहभाग घेऊन तो लोक उत्सव होण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रयत्न केले जात आहेत. यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, आमदार अमर राजूरकर, आमदार जितेश अंतापूरकर यांचे विशेष योगदान आहे. 

नांदेड जिल्ह्यातील चालुक्य परंपरेचा वारसा लाभलेल्या होट्टल नगरी येथील महोत्सवाच्या पूर्व तयारीसाठी आज होट्टल मंदिरात जिल्हा प्रशासनाच्यावतीने गावकऱ्यांसमवेत विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस आमदार जितेश अंतापूरकर, अपर जिल्हाधिकारी डॉ. खुशालसिंह परदेशी, देगलूरचे उपविभागीय अधिकारी शक्ती कदम, नांदेड उपविभागीय अधिकारी विकास माने, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुधीर नाईक, तहसिलदार राजाभाऊ कदम, सरपंच हनिफा युसूफ शेख, उपसरपंच माधव दासरवाड, इन्टॅक्टचे सदस्य सुरेश जोंधळे आदी मान्यवर उपस्थित होते. 

होट्टल महोत्सवाकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जाते. याठिकाणचे वास्तुस्थापत्य, मंदिराचे कोरीव काम, शिल्प, ऐतिहासिक संदर्भ लक्षात घेता जागतिक पर्यटकांनाही आकर्षक ठरणारे हे केंद्र म्हणून विकसीत होऊ शकते. या महोत्सवाच्या माध्यमातून पर्यटनाच्यादृष्टिने वेगळा संदेश पर्यटकांपर्यंत पोहचेल असा विश्वास आमदार जितेश अंतापूरकर यांनी व्यक्त केला. या महोत्सवात बचतगटांमार्फत महिलांना रोजगार मिळावा, या भागातील गुणवंताचा गौरव व्हावा व पर्यटकांसह भाविकांपर्यंत महोत्सवाची माहिती पोहचावी अशा अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या.   

महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी प्रशासकीय पातळीवर सर्व संबंधित यंत्रणांना त्या-त्या विभागानुसार जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने वाहतुकीचा प्रश्न महत्वाचा आहे. अधिकाधिक लोकांना या महोत्सवाला उपस्थित राहता यावे यादृष्टिकोणातून योग्य ते नियोजन करण्याच्या सूचना अपर जिल्हाधिकारी डॉ. खुशालसिंह परदेशी यांनी दिल्या. मंदिर परिसरातील स्वच्छता, विद्युत विभाग, आरोग्य, कृषि विभाग, पंचायत समिती, महसूल या सर्वांच्या योगदानातून घ्यावयाच्या कार्यक्रमासंदर्भात या बैठकीत जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. देगलूर नगरपरिषदेने होट्टल महोत्सवासाठी स्वयंस्फूर्त सहभाग घेतला असून स्वच्छता व त्या अनुषंगिक जबाबदारी घेतली आहे. बचतगटांचे स्टॉल या ठिकाणी उभारुन त्यांनाही महोत्सव काळात व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...