Wednesday, October 30, 2019


राष्ट्रीय एकता दिनानिमित्त
एकता दौडमध्ये विविध घटकांचा सहभाग ;
सरदार पटेल यांना अभिवादन
नांदेड दि. 31 :- विविधतेतील एकतेचा मंत्र घेवून लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त आज शहरात एकता दौड संपन्न झाली. या दौडमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांसह विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक उत्साहात सहभागी झाले. महात्मा गांधी पुतळा परिसर वजिराबाद ते जुना मोंढा टॉवर येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापर्यंत एकता दौड काढण्यात आली. या दौडमध्ये सुरेख वेशभूषेतील विद्यार्थी, अग्निशमन व पोलीस दलाच्या पथकाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.   
एकता दौडच्या प्रारंभी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास महानगरपालिका आयुक्त लहुराज माळी, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यानंतर एकता दौडचा हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. 
दौडमध्ये महानगरपालिका आयुक्त लहुराज माळी, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अप्पर पोलीस अधीक्षक दत्तराम राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश मारावार, क्रीडा अधिकारी किशोर पाठक, गुरुदिपसिंघ संधू, स्वामी रामनंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. विठ्ठलसिंघ परिहार, नायब तहसिलदार मुगाजी काकडे, लेखाधिकारी निळकंठ पाचंगे, नेहरु युवा केंद्राचे कुलदिपसिंघ, क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे सुमित डोडल, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी आदि सहभागी होते.   
तसेच पोलीस दलाच्या पथकाने वाद्य वृदांसह संचलन करत या दौडमध्ये सहभाग घेतला. महात्मा गांधी पुतळा ते जुना मोंढा टॉवर या ठिकाणाहून एकता दौड मार्गक्रमण झाली. या दौडमध्ये सहभागी घटकांनी राष्ट्रीय एकात्मतेच्या घोषणा दिल्या. दक्षता जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने जनजागृतीपर फलक घेवून दौडमध्ये सहभागी झाले.  
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या परिसरात दौडमध्ये सहभागी पथके, विद्यार्थी-विद्यार्थींनी यांनी  एकतेच्या घोषणा दिल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरदार पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. महानगरपालिका आयुक्त लहुराज माळी यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिनाची प्रतिज्ञा व दक्षता जनजागृती दिनानिमित्त शपथ दिली. पोलीस दलाच्यावतीने सलामी देऊन एकता दौडचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. या दौडमध्ये विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  
00000


पदवीधर मतदारसंघ यादीत
नाव नोंदणी करण्याचे आवाहन
नांदेड दि. 30 :- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदार यादीत नाव समावेश करण्याबाबत सर्व पदवीधरांना जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
यापूर्वी मतदार यादीत नाव असेल ती यादी सदर निवडणुकीत वैध नाही. कुठलाही शाखेचा पदवीधर किंवा डिप्लोमा 1 नोव्हेंबर 2016 पूर्वीचा असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय किंवा संबंधीत तहसिल कार्यालयात संपर्क साधावा. 
अर्ज करण्याची शेवटचा दिनांक 6 नोव्हेंबर 2019 असून अर्जासोबत कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती पदवी किंवा डिप्लोमा, रहिवासी दाखला, मतदान ओळखपत्र / आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे. मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज नि:शुल्क उपलब्ध आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.   
0000


प्रेस नोट
सन 2019-20 साठी IDMI SPQEM या दोन योजनांचे एकत्रिकरण करुन
SPEMM ही नवी योजना सुरु होणार
नांदेड, दि. 30 :- अल्पसंख्यांक समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी क्षेत्रिय सघन कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक दृष्टया मागास असलेल्या अल्पसंख्याक समाजाच्या शिक्षण संस्थांना पायाभुत सुविधा तसेच मदरसा मधून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी केंद्रशासन पुरस्कृत योजना एकत्रित करुन नवीन योजना SPEMM (Scheme for Providing Quality Education in Madarsas / Minorties) सुरु करण्यात आली आहे. SPEMM योजनेंतर्गत IDMI SPQEM या योजनांबाबत मार्गदर्शक बाबी व संस्था / शाळा/ मतदरसा यांना प्रस्तावासोबत सादर करावयाची विहित नमुन्यातील प्रपत्रे शिक्षणाधिकारी (नि.शि.) कार्यालय जिल्हा परिषद नांदेड व गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती येथे उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत.
या योजनेचा लाभ संस्था, शाळा, मदरसा यांनी घ्यावा. या योजनेविषयी अधिक माहितीसाठी शिक्षणाधिकारी (नि.शि.) कार्यालय जिल्हा परिषद नांदेड व गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रशांत दिग्रसकर शिक्षणाधिकारी (नि.शि.) कार्यालय, जिल्हा परिषद नांदेड व दिलीपकुमार बनसोडे उपशिक्षणाधिकारी (नि.शि.) कार्यालय जि. प. नांदेड यांनी केले आहे.
00000


अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी
जमात प्रमाणपत्र पडताळणीसाठी प्रस्ताव
समिती कार्यालयात सादर करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 30 :- सहआयुक्त तथा उपाध्यक्ष, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती औरंगाबाद कार्यालयामार्फत या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात अंतर्गत औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यातील सन 2020-2021 या शैक्षणिक वर्षाकरिता वैद्यकीय, अभियांत्रिकी व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जमातीच्या (एसटी) राखीव जागेवर प्रवेश घेणाऱ्या किंवा प्रवेश घेण्यास इच्छूक विद्यार्थ्यांना त्यांचे अनुसूचित जमातीचे जमात प्रमाणपत्राच्या तपासणीसाठी प्रस्ताव 7 ऑक्टोंबर 2019 ते 31 एप्रिल 2020 पर्यंत या समिती कार्यालयात सादर करण्याकरिता जाहिर आवाहन करण्यात आले आहे.
तसेच विद्यार्थ्यांचे जमात प्रमाणपत्र वेळेवर तपासणी होऊन त्यांचे प्रवेशाची कार्यवाही विहित वेळेत पूर्ण व्हावी, त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी या समिती कार्यालयामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी आपले जमात प्रमाणपत्र तपासणीच्या प्रकरणासंदर्भात समिती कार्यालयाशी संपर्क साधून सदर प्रकरणाचा पाठपुरावा करावा. विद्यार्थ्यांना त्यांनी दाखल केलेल्या जमात प्रमाणपत्र तपासणीच्या प्रस्तावात कोणत्याही प्रकारची त्रुटी, चुक किंवा अपुर्णता राहू नये याची दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन सहआयुक्त अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती औरंगाबाद यांनी केले आहे.
000000


राष्ट्रीय एकता दिनानिमित्त गुरुवारी
एकता दौडीत सहभागी होण्याचे आवाहन
नांदेड, दि. 30 :- जिल्हा प्रशासनाच्यावतीने सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंती दिनानिमित्त गुरुवार 31 ऑक्टोंबर 2019 रोजी राष्ट्रीय एकता दिवस तसेच स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीदिनानिमित्त राष्ट्रीय संकल्प दिवस आणि राष्ट्रीय एकता दौडीचे आयोजन करण्यात आले आहे. ही दौड महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन राष्ट्रीय एकता दौडीचे गुरुवार 31 ऑक्टोंबर 2019 रोजी सकाळी 7.30 वाजता सुरु होणार आहे. या दौडीचा समारोप जुना मोंढा टावर परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेऊन कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. राष्ट्रीय एकता दौडीमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.  
000000


  वृत्त क्र.   389   लोकसभा निवडणुकीसाठी आज नांदेड जिल् ‍ ह्यात मतदान   प्रशासन सज् ‍ ज ; मोठ्या संख् ‍ येने मतदान करण् ‍ याचे ...