Saturday, June 26, 2021

सुधारित वृत्त

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश  लागू 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- नांदेड जिल्ह्यात 10 जुलै 2021 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

 जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 26 जून  रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 10 जुलै 2021 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

                        0000

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी

जिल्ह्यात सोमवारपासून प्रतिबंधात्‍मक निर्बंध              

नांदेड (जिमाका) दि. 26:- नांदेड जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण समितीचे सदस्‍य यांच्यासमवेत नांदेड जिल्‍ह्यातील कोविड रूग्‍णांची स्थिती लक्षात घेवून सोमवार 28 जून 2021 पासून सुरू करावयाच्‍या विविध सेवा, आस्‍थापना व त्‍यांच्‍या वेळा निश्चित करण्‍याबाबत निर्णय घेण्‍यात आला आहे. याबाबत जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेश निर्गमीत केले आहेत. 

राज्‍यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच कोरोनाच्‍या डेल्‍टा प्‍लस विषाणुने बाधीत रूग्‍ण आढळून येत आहेत. या विषाणुचा संक्रमणाचा दर जास्‍त असल्‍यामुळे विषाणुमधील बदल आणि त्‍यापासून होणारा प्रादुर्भाव व फैलाव रोखण्‍याच्यादृष्‍टीने राज्‍यातील सर्वच जिल्‍ह्यामध्‍ये स्‍तर-3 मधील तरतूदीनुसार सुरू करावयाच्‍या आस्‍थापना बाबत राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना निर्देशीत केल्या आहेत. 

साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 मधील तरतूदीनुसार संदर्भात नमूद अधिसूचना 14 मार्च 2020 अन्‍वये प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी ज्‍या उपाय योजना करणे आवश्‍यक आहेत त्‍या करण्‍यासाठी सक्षम प्राधिकारी म्‍हणून घोषित केले आहे. तसेच फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 नूसार जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नांदेड जिल्ह्यात सोमवार 28 जून 2021 रोजी पासून शासनाकडील पुढील आदेशापर्यंत पुढील प्रमाणे आदेश निर्गमीत केले आहेत. 

सेवेचा तपशिल व निश्चित करण्यात आलेली वेळ पुढीलप्रमाणे आहेत. अत्यावश्यक सेवेशी संबंधीत सर्व दुकाने, आस्थापना यांच्या वेळा- दुपारी 4 वाजेपर्यंत. अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने व आस्थापना यांच्या वेळा- सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत (शनिवार व रविवार वगळून). मॉल्स, सिनेमा हॉल (मल्टी प्लेक्स व सिंगल स्क्रिन सह), नाटयगृह - पुर्णपणे बंद राहतील. रेस्टॉरंटस- सोमवार ते शुक्रवार 50 टक्के क्षमतेसह दुपारी 4 वाजेपर्यंत तर सायं. 4 नंतर पार्सल सेवा सुरु राहील. शनिवार व रविवार फक्‍त पार्सल व होम डिलेवरी सुविधा चालू राहतील. लोकल ट्रेन्‍स- लागू नाही.  सार्वजनिक ठिकाणे / खुली मैदाने / फिरणे / सायकलींग- दररोज काळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत.  खाजगी आस्थापना / कार्यालये- दुपारी 4 वाजेपर्यंत (सुट दिलेले कार्यालय / आस्‍थापना वगळून). कार्यालयीन उपस्थिती- शासकीय कार्यालये सहीत (सुट असलेली खाजगी कार्यालये)- 50 टक्के उपस्थितीसह सुरु राहतील.  खेळ / क्रीडाप्रकार- सकाळी 5 ते सकाळी 9 पर्यंत.  फक्‍त मैदानी क्रिडा प्रकारासाठी. चित्रीकरण- चित्रीकरणासाठी निश्चित केलेल्‍या बंदिस्‍त ठिकाणी व अशा ठिकाणी इतरांना प्रवेशासाठी मज्‍जाव असेल. सायं. 5 वाजेपर्यंत. सायं. 5 नंतर चित्रीकरणासाठी निश्चित केलेल्या बंदिस्‍त ठिकाणा व्‍यतिरिक्‍त बाहेर फिरण्‍यास / चि‍त्रीकरणास मज्‍जाव असेल (शनिवार, रविवार बंद). जमाव - सामाजिक, सांस्कृतिक आणि करमणुकीचे कार्यक्रम- सोमवार ते शुक्रवार  50 टक्के क्षमतेसह दुपारी 4 वाजेपर्यंत. लग्नसमारंभ- 50 व्‍यक्‍तींची मर्यादा. अंत्ययात्रा / अंत्‍यविधी- 20 व्‍यक्‍तींची मर्यादा. बैठका / निवडणूक - स्थानिक स्वराज्य संस्था / सहकारी संस्था यांच्या सर्वसाधारण सभा 50 टक्के क्षमतेसह. बांधकाम- फक्‍त बांधकामाच्‍या ठिकाणी मजूरांची राहण्‍याची व्‍यवस्‍था असणारी बांधकामे चालू ठेवण्‍यास मुभा असेल, मात्र तशी व्‍यवस्‍था नसेल तर दु. 4 वाजेनंतर मजूरांनी बांधकामाचे ठिकाण सोडणे बंधनकारक असेल. कृषि व कृषि पुरक सेवा- संपूर्ण आठवडाभर दुपारी 4 वाजेपर्यंत. ई कॉमर्स - वस्तू व सेवा

नियमीत. जमावबंदी / संचारबंदी- जमावबंदी दुपारी 5 पर्यंत व तद्नंतर संचारबंदी राहील. व्यायामशाळा, केशकर्तनालय दुकाने, ब्युटी पार्लरस, स्पा, वेलनेस सेंटर्स- 50 टक्के क्षमतेसह पूर्वसूचना देऊन वेळ निश्चित केलेल्‍यासाठीच दुपारी 4 वाजेपर्यंत चालू ठेवण्‍यास मुभा असेल परंतू  एसी / वातानुकुलिन यंत्रणा चालू  ठेवण्‍यास मुभा असणार नाही. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (बसेस)- पुर्ण आसन क्षमतेने परंतू उभे राहून प्रवास करता येणार नाही. माल वाहतूक (जास्तीत जास्त तीन व्यक्ती, चालक/ मदतनीस/स्वच्छक किंवा इतर) प्रवाशांना लागू असलेल्या सर्व नियमांसह नियमीत सुरु राहतील. खाजगी वाहने/ टॅक्सी/ बसेस/  लांब पल्ल्याच्या रेल्वे द्वारे प्रवाशांचा अंतर जिल्हा प्रवास नियमीत सुरु राहतील परंतू स्‍तर पाचमध्‍ये जाण्‍यासाठी किंवा स्‍तर पाचमध्‍ये थांबा घेऊन पुढे जाणा-या प्रवाश्‍यांना ई-पास आवश्‍यक राहील.उत्पादक घटक (निर्माणक्षेत्र) - निर्यात जबाबदा-या पूर्ण करण्याची आवश्यकता असलेली उद्योगक्षेत्र , लघु व मध्यम उद्योगासह युनिट्स नियमीत प्रमाणे चालू राहतील. निर्माणक्षेत्र - अ] अत्यावश्यक वस्तू निर्माण करणारे उद्योग ब ] सातत्याने व निरंतर चालु असणारी उद्योगक्षेत्र क] राष्ट्रीय सुरक्षे करिता आवश्यक संसाधनांची निर्मिती करणारे उद्योग ड] डाटा सेंटर, क्लाउड सर्विसेस, माहिती व  तंत्रज्ञान क्षेत्र इ. नियमीत चालू राहतील. इतर सर्व निर्माण क्षेत्र जे अत्यावश्यक तसेच निरंतर उद्योग या सदराखाली समाविष्ट नाहीत ते सर्व एकूण कामगाराच्‍या 50 टक्के क्षमतेने चालू राहतील. कामगारांची Transport bubble द्वारेच ने-आण करण्‍याची जबाबदारी संबंधित आस्‍थापना प्रमुख यांची राहिल, त्‍याशिवाय सदर उद्योग / व्‍यवसाय चालू करता येणार नाही, असे आदेशात स्पष्ट केले आहे. 

कोविड-19 संसर्ग साखळी तोडणे (Levels of Restrictions for Breaking The Chain) आदेशानुसार अत्यावश्यक सेवेत समाविष्ठ करण्यात आलेल्या बाबी पुढीलप्रमाणे आहेत. अत्यावश्यक सेवा- रुग्णालय, रोग निदान केंद्र, चिकित्‍सालय , लसीकरण केद्रें, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने, औषधे निर्मिती उद्योग इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा यांचा त्यांनाआवश्यक अशा अनुषंगिक उत्पादन आणवितरण तसेच वितरक, वाहतूक आणि पुरवठा साखळी यांचादेखील समावेश असेल. लस, निर्जतुके, मास्क,वैद्यकीय उपकरणे, त्यांनासहाय्यभुतकच्चा माल उद्योग आणि अनुषंगिकसेवा यांचे उत्पादन व वितरण यांचा देखील समावेश असेल. 

शासकीय व खाजगी  पशुवैद्यकीय सेवा,  दवाखाने, पशु संगोपन केंद्रव  पशु खादयाची दुकाने. सर्व वने व त्यासंबंधीत विभागाच्या अत्यावश्यक बाबी. विमान व त्‍यासंबंधी पुरक सेवा (हवाई सेवा, विमानतळे, तत्‍संबंधी दुरुस्‍तीसेवेच्‍या बाबी, कार्गो सेवा.) किराणा समानाची दुकाने, भाजीपाला व फळविक्रीते, दुध डेअरी, बेकरी, मिठाई / चॉकलेट/केक/ खाद्य/मटन/चिकन/अंडी/मासे इत्‍यादी दुकाने. 

शितगृहे आणि साठवणुकीची गोदामसेवा. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जसे की, रेल्वे, टॅक्सी, ऑटोरिक्षा आणि सार्वजनिक बसेस. स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात येणाऱ्या सर्व मान्सूनपूर्व उपक्रम व सेवा.  स्थानिक प्राधिकरणाव्दारे पुरविणेत येणाऱ्या सर्व सार्वजनिक सेवा. रिर्झव्ह बॅक ऑफ इंडीया आणि त्यांच्या कडून अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित केलेल्या सेवा. सेबी तसेच सेबी मान्यताप्राप्त वित्तीय बाजाराशी निगडीत पायाभूतसंस्था, स्टॉक एक्सेजेंस, डिपॉझिटर्स, क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स इत्यादी आणि सेबीकडे नोंदणीकृत इतर मध्यस्थ. दूरसंचार सेवा सुरू राहणेसाठी आवश्यक अशा दुरूस्ती / देखभाल विषयक बाबी. मालाची / वस्तुंची वाहतूक. पाणीपुरवठा विषयक सेवा. शेती संबंधित सेवा आणि शेतीशी निगडीत सर्वकामामध्ये सातत्य राहावे याबाबत शेतीकामासाठी लागणाऱ्या सर्वअनुषंगिकसेवा, बी-बियाणे, खते, औजारे आणि त्यांची दुरूस्ती सेवा यांचा ही समावेश असेल. 

सर्व प्रकारच्या व्यापारी मालाची व उत्‍पादनाची आयात -निर्यात. ई कॉमर्स ( फक्त अत्यावश्यक सेवा आणि माल यांच्या पुरवठांशी निगडीत). मान्यताप्राप्त वृत्तपत्र आणि त्यांच्याशी संबंधित सेवा. पेट्रोलपंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने विषयक सेवा. सर्व प्रकारच्या कार्गो सेवा. डेटासेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर्स, आयटी - माहिती तंत्रज्ञान सबंधित महत्वाच्या पायाभूत सुविधा सेवा. शासकीय आणि खाजगी सुरक्षा विषयक सेवा. विद्युत आणि गॅसपुरवठा विषयक सेवा. एटीएम,  पोस्टल सेवा. कस्टम हाऊस एजंट्स, परवानाधारक मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर ( लस/ औषधी / जीवरक्षक औषधांशी संबंधित वाहतूक). अत्यावश्यक सेवेसाठी लागणारा कच्चा माल, पँकेजिंग मटेरीयल यांचे उत्पादन करणारे उद्योग. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाव्दारे निश्चित केलेल्या अत्यावश्यक सेवा. सर्व ऑप्‍टीकल्‍स शॉप. वाहतूक व्‍यवस्‍थेशी निगडीत टायर विक्री, रिपेअर वर्क शॉप, सर्व्‍हीस सेंटर व स्‍पेअर्स पार्ट विक्री आस्‍थापना. याव्यतिरिक्त कोणतीही सेवा जी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने अत्यावश्यक व आपात्कालीन सेवा म्हणून घोषित केली आहे.

 

या निर्देशांचे काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ग्रामीण भागात गटविकास अधिकारी तसेच नागरी भागात संबंधीत आयुक्त महानगरपालिका, नगरपालिका / नगरपंचायत मुख्याधिकारी यांची राहिल. या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी Incident Commander जिल्हाधिकारी व  तहसिलदार यांची राहिल.

निम्न स्वाक्षरीकार प्रस्तुत आदेश आवश्यकतेनुसार रद्द किंवा सुधारित करू शकतील. या आदेशाची अंमलबजावणी दिनांक 28 जून 2021 चे सकाळी 7 वाजल्यापासून ते पुढील आदेशापर्यंत लागू राहिल. परंतू कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मास्‍कचा वापर करणे, सॅनिटायझरचा वापर, शारिरीक अंतर पाळणे बंधनकारक करण्‍याची जबाबदारी जिल्हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधिक्षक नांदेड, नांदेड वाघाळा महानगरपालीका आयुक्‍त, सर्व नगर परीषद / नगरपंचायत मुख्‍याधिकारी यांचे वर राहील.

या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन तात्‍काळ कार्यवाही करण्‍यात यावी. आदेशाचे पालन न  करणा-या कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था अथवा समुह, भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005, मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहील. परंतु आदेशाची अंमलबजावणी करताना सदभावनेने केलेल्‍या कृत्‍यासाठी कोणत्‍याही अधिकारी / कर्मचारी यांचे विरुध्‍द कार्यवाही केली जाणार नाही. नांदेड जिल्ह्यामध्ये कोविड बाधीत रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ऑक्सिजन बेड्स व्यापन्‍याच्‍या टक्केवारीमध्‍ये वाढ झाल्‍यास नव्‍याने प्रतिबंधात्‍मक आदेश निर्गमीत करण्‍यात येईल, असेही जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेशात नमूद केले.

000000


 

जिल्ह्यातील 93 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 26:- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 93 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोविशील्डचा पहिला आणि दुसरा डोस तर कोव्हॅक्सीन लसीचा दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. दिनांक 27 जून रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या 10 केंद्रावर लसीचे डोस उपलब्ध करुन दिले आहेत. या केंद्रात श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय,  शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय,  शहरी दवाखाना हैदरबाग,  शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर, सिडको या 10 केंद्रावर कोविशील्डचा 18 ते 44 वयोगट आणि 45 वर्षावरील व्यक्तींना पहिला व दुसरा डोस दिला जाईल. या केंद्रावर दोन्ही वयोगटासाठी प्रत्येकी 100 डोस उपलब्ध केले आहेत.

 

या व्यतिरिक्त कोव्हॅक्सीन ही लस श्री गुरु गोविंद सिंग जिल्हा रुग्णालय,  शासकिय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर, सिडको,  या 10 केंद्रावर प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. याठिकाणी 18 ते 44 व 45 वर्षांवरील व्यक्तींना दुसरा डोस दिला जाईल.

 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोविशील्डचे ही लस 18 ते 44 वयोगट व 45 वर्षावरील व्यक्तींना पहिला व दुसरा डोससाठी दिली जाईल. येथे केंद्रनिहाय प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. 

 

उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी अशा एकुण 16 केंद्रावर कोव्हॅक्सिन ही लस उपलब्ध केली आहे. या प्रत्येक केंद्रांना प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहे. हे डोस 18 ते 44 व 45 वर्षांवरील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी दिले जातील.

 

जिल्ह्यातील सर्व 67 प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरणासाठी कोविशील्ड ही लस उपलध करुन देण्यात आली असून याठिकाणी 18 ते 44 व 45 वर्षावरील व्यक्तींना पहिला डोस व दुसऱ्या डोससाठी राहील. या सर्व 67 केंद्रांवर प्रत्येकी 100 याप्रमाणे दोन्ही वयोगटासाठी डोस उपलब्ध करुन दिले आहे.

 

जिल्ह्यात 25 जून पर्यंत एकुण 5 लाख 73 हजार 295 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 26 जून पर्यंत कोविड-19 लसीचा साठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 4 लाख 89 हजार 930 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 44 हजार 960 डोस याप्रमाणे एकुण 6 लाख 34 हजार 890 डोस प्राप्त झाले आहेत.

 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. तसेच कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी 18 ते 44 व 45 वर्षावरील वयोगटासाठी फक्त दुसरा डोस घेण्याकरीता ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

00000

 

नांदेड जिल्ह्यात 7 व्यक्ती कोरोना बाधित

तर  18 कोरोना बाधित झाले बरे  

नांदेड (जिमाका) दि. 26 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 834 अहवालापैकी  7 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 5 तर अँटिजेन तपासणीद्वारे 2 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 91 हजार 219 एवढी झाली असून यातील 88 हजार 566 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 160 रुग्ण उपचार घेत असून 4 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 903 एवढी आहे.आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 3, नांदेड ग्रामीण 1, हिंगोली 1, तर ॲटीजन तपासणीद्वारे नायगाव 1, मुखेड 1, असे एकूण 7 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 18 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 3, नायगाव तालुक्यातर्गंत 3, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 2, खाजगी रुग्णालय 2, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 8, या व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

आज  160 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी  11, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 25,  मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर  4, किनवट कोविड रुग्णालय 3, देगलूर कोविड रुग्णालय 3,  नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 44, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृहविलगीकरण 60, खाजगी रुग्णालय 10 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 120, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 125 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 6 लाख 302

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 97 हजार 487

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 91 हजार 219

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 566

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 903

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.09 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-23

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-96

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 160

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-4                       

00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...