Tuesday, July 31, 2018


"फेक न्यूज परिणाम आणि दक्षता"
विषयावर पत्रकारांसाठी आज कार्यशाळा
            नांदेड, दि. 31 :- समाज विघातक घटनांच्या पार्श्वभूमीवर फेक न्यूजबाबत दक्षता घेण्यासाठी जनजागृती व प्रसार करण्यात येत आहे. "फेक न्यूज परिणाम आणि दक्षता" या विषयावर पत्रकारांसाठी कार्यशाळा बुधवार 1 ऑगस्ट 2018 रोजी नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयातील "चिंतन हॉल" येथे दुपारी 12 वा. आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यशाळेच्या माध्यमातून समाज माध्यमांवरुन येणारी फेक न्यूज कशी ओळखायची, त्याविषयी कशी दक्षता घ्यावयाची याबाबत सायबर सेलचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेस जिल्ह्यातील संपादक, पत्रकार, प्रतिनिधी दूरचित्रवाणी, केबल टिव्ही, छायाचित्रकार, प्रतिनिधी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांच्यावतीने करण्यात आले आहे.
00000


कापुस, सोयाबीन पिकासाठी कृषि संदेश
नांदेड, दि. 31 :- जिल्ह्यात कापुस व सोयाबीन पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पांतर्गत काम सुरु आहे. या पिकावरील किड संरक्षणासाठी नांदेडचे उपविभागीय कृषि अधिकारी यांनी कृषि संदेश दिला आहे. 
कापुस पिकावर गुलाबी बोंडअळीसाठी कामबंध सापळे लावावे व निरीक्षण करावे. तसेच प्रोफेनोफॉस 50 ईसी 20 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. सोयाबीन पिकावर तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवावे. अंडीपुंजी तसेच लहान अळ्या आढळल्यास नष्ट कराव्यात. निंबोळी अर्क 5 टक्के या प्रमाणात फवारणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी यांनी केले आहे.
00000


माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी
एअर मार्शल व्ही ए पाटकर गौरव पुरस्कार
नांदेड, दि. 31 :- एअर मार्शल व्ही ए पाटकर गौरव पुरस्कारासाठी  माजी सैनिक विधवा यांचे पाल्य दहावी व 12 वी परिक्षा उत्तीर्ण झाले आहेत अशा  पात्र पाल्यांनी विहित नमुन्यातील अर्ज 31 ऑगस्ट 2018 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी केले आहे.
एअर मार्शल व्ही ए पाटकर गौरव पुरस्कार हा माजी सैनिकांच्या विधवा पाल्यामधून 10 वी 12 वी परिक्षेत राज्यात सर्वाधिक गुण प्राप्त करुन येणाऱ्या  पाल्यांना  दिला जातो.  राज्यातून  दोन माजी सैनिक विधवांच्या पाल्यांची निवड यासाठी केली जाते व त्यांना प्रत्येकी 5 हजार रुपये अदा करण्यात येतात.  वर्ष 2017-18 मध्ये उत्तीर्ण होणाऱ्या माजी सैनिक विधवा यांच्याकडून या पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास दूरध्वनी क्र. 02462-245510 वर संपर्क करावा, असेही आवाहन केले आहे.   
000000


विशेष गौरव पुरस्कारासाठी 
माजी सैनिकांना अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 31 :- विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करुन राज्याची व देशाची प्रतिष्ठा वाढवली आहे अशा  सर्व  माजी सैनिक / पत्नी / पाल्य यांच्याकडून सन 2017-18 साठी विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येते आहे.
यामधे राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, वादन, नर्तन इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळणारे, संगणक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे, पूर, जळीत, दरोडा, अपघात अगर इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बहूमोल कामगिरी करणारे आदी कार्याबद्वल सन्मानार्थ पुढील प्रमाणे एकरकमी पुरस्कार, शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह / प्रशस्तीपत्रक देण्यात येते. यामध्ये राष्ट्रीय पातळीवर बहूमोल कामगिरी करणा-या माजी सैनिक / पत्नी / पाल्यांना रोख 10 हजार रुपये  व आंतरराष्ट्रीय पातळीवर बहूमोल कामगिरी करुन देशाची प्रतिष्ठा वाढवतील अशा माजी सैनिक / पत्नी / पाल्यांना 25 हजार रुपये विशेष गौरव पुरस्कार दिला जातो.   त्याचप्रमाणे दहावी व बारावी  परीक्षेत प्रत्येक मंडळातून 90 प्रतिशत पेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्या प्रत्येकी पहिल्या 5 माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी 10 हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह / प्रशस्ती पत्रक देवून विशेष गौरव पुरस्कार दिला जातो. अशा विशेष गौरव पुरस्कारासाठी माजी सैनिकांकडून विहीत नमुण्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील माजी सैनिकांनी अधिक माहिती व अर्जासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे  संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी केले आहे.
00000


  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...