Friday, February 23, 2018


मुद्रण दिन विशेष

मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या

 

मुद्रण कलेचा जनक जोहानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर 24 फेब्रुवारी हा जागतिक मुद्रण दिवस म्हणून साजरा केला जातो. ज्या 64 कला सांगितलेल्या आहेत त्यापैकीच एक ही मुद्रण कला.  या कलेविषयी असे म्हणतात अनेकानेक कला असती जगती मुद्रण कलेने रूंदावती समाज मती या मुद्रण कलेमुळेच संपूर्ण मानव जातीसाठी ज्ञानाची कवाडे खुली  झाली आहे.

जनकल्याणासाठी तसेच नागरिकांना विविध योजना, नियम व कायदे माहित व्हावे, आणि त्यांच्या अधिकारांचे संरक्षण होऊन समाजात ज्ञानाचा प्रसार व्हावा यासाठी मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद येथे 6 एप्रिल 1966 रोजी शासकीय मुद्रणालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. स्वातंत्रोत्तर काळानंतर शासकीय मुद्रणालयाने अनेक जुन्या प्रिटींग मशीनसह आजच्या आधुनिक प्रिटींग यंत्राचा खडखडाट अनुभवला आहे. आजही याठिकाणी अक्षरजुळवणी, चेसगाडी, नंबरींग मशीन, मुद्रण ठोकळा हे येथील छोट्याशा संग्रालयात जतन करून ठेवण्यात आला आहे.

या मुद्रण कलेच्या इतिहासाविषयी आणखी जाणून घ्यायचे झाले तर दुसऱ्या शतकात चीनमध्ये खरंतर मुद्रण पद्धतीचा शोध लागला, त्यानंतर आजपर्यंतच्या प्रदीर्घ कालखंडात कोणत्याही क्षेत्रात झाली नाही इतकी प्रगती मुद्रण कला क्षेत्रात झाली आहे. . . 1040 ते 48  दरम्यानच्या कालखंडात बी शंग याने पोर्सेलीनपासून पहिली चल छपाई विकसित केली. बँग झेंग यांनी 1298 मध्ये हे छपाई यंत्र अधिक टिकाऊ होण्यासाठी लाकडाचा उपयोग केला. फिरत्या टेबलवर मुळाक्षरे, वर्ण व संख्याची रचना करून छपाई यंत्र तयार केले.  यामुळे छपाईचा दर्जा सुधारण्यास मदत झाली. बाराव्या शतकामध्ये साँग राजवंशात तांब्याच्या धातूपासून मुद्रण यंत्र बनविले गेले. याचा वापर हा नोटा छापण्यासाठी केला जात असे.  1230 मध्ये कोरीयात कास्याच्या धातूपासून तर 1377 मध्ये जिज्वी नावाचे पुस्तक छापण्यात आले. 
त्यानंतर इसवी सन 1434-1439 या कालखंडात जर्मनीतील जोहानेस गुटेनबर्ग यांनी धात्वलेखी मुद्रण प्रकाराचा शोध लावला आणि तोच मुद्रण कलेतील मोलाचा दगड ठरला. या यंत्राद्वारे 1456 मध्ये 40 पाने असलेल्या बायबलच्या 300 प्रती छापण्यात आल्या. पुढील 30 वर्षाच्या काळात इटली , इंग्लड व हंगेरी येथे याच प्रकारचे कारखाने सुरू झाले आणि संपूर्ण युरोपात ही मुद्रण यंत्रणा पसरली. महाराष्ट्रातील मुद्रण कलेचा इतिहास पाहता सुमारे दीडशे ते दोनशे वर्षातील आहे. सुरूवातीच्या काळात पुस्तकांच्या प्रत, महत्वाचे दस्ताऐवज, कागदपत्रे ही हस्तलिखितच होती. त्यामुळे मोठया प्रमाणात ज्ञानाचा प्रसार झाला नाही. मुद्रणकलेमुळेचे ज्ञानाच्या कक्षा रुंदावत गेल्या.  पोर्तुगीजांनी भारतात मुद्रणकलेचा उपयोग हा धर्मप्रसारासाठी केला. त्यांनी गोव्यात टाईप व छापण्याचे यंत्र आणून धार्मिक पुस्तके छापली.  
गव्हर्नर  जनरल वॉरन हेस्टिंग्ज याने चार्लस वुशाल्किन्स्‍ा याला प्रोत्साहीत करून त्यांच्याकडून बंगाली भाषेचे टाईप करून घेतले. त्याच्याच सहाय्याने पुढे इसवी सन 1778 ला हुबळी येथे बंगाली, इंग्रजी, व्याकरण छापण्यास सुरूवात केली. वुशाल्किन्स याने 1805 साली देवनागरी लिपीचे मोडी वळणाचे टाईप तयार केले. 18 व्या शतकाच्या अखेरीस बंगालमध्ये मुद्रण कलेने चांगलेच मूळ धरले. मुद्रण कलेचे  महत्व छत्रपती शिवाजी महाराज यांना देखील पटले होते. त्यांनी पोर्तुगीजाकडूंन एक यंत्र मिळविले होते. देवगिरी लिपीचे सुटे टाईप तयार करण्यास सुरूवात झाल्यावर 1805 सालानंतर मुद्रण कलेचा संपूर्ण भारतात झपाट्याने प्रसार झाला. मुंबईत बाँम्बे गॅझेट या नावाचे नियतकालिक इ.. 1790 साली सुरू झाले तर मुंबईतच 1793 ला पहिले पुस्तक छापले गेले.
 वाफेवर चालणारे छापखाने ज्याला रोटरी प्रेस म्हणत ते 1811 च्या आसपास वापरात आली. फर्दुनजी मर्झ वान दस्तुर यांनी  मुंबईत 1812 ला छापखाना सुरू केला. 1813 साली  भारतीय व इंग्रजी भाषांचे टाईप श्रीरामपूर येथून व मुद्रण यंत्रे इंग्लडमधून आणून छपाईचे काम सुरू झाले होते. पुढे 1817 ला मुंबईतच पहिले मराठी  पुस्तक छापण्यात आले. 1890 मध्ये लिनोटाईपचा शोध लागला. त्यामुळे टायपरायटरसारखी अक्षरे ही छपाई यंत्रात बसविल्याने रंगीत छपाईला पुढे चालना मिळाली. 20 व्या आणि 21 शतकात मुद्रण कलेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळल्याने अधिकच वेगाने वाढली आहे. त्यामुळे साक्षरतेचा प्रसार मोठया प्रमाणात होत असल्याने समाजाच्या ज्ञानाची भूक तसेच व्यवहारातील मुद्रणाची गरज दिवसेंदिवस वृद्धीगत होत आहे.
प्रतिक्रिया :  जागतिक शिक्षण व्यवस्थेमध्ये मुद्रण कलेला फार महत्व होते. त्यामुळे शिक्षणाचा प्रसार हा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत होत गेल्याने लोक साक्षर होण्याचे प्रमाण वाढत गेले. लिखाणा बरोबरच मुद्रीत साहित्याला लोकांची अधिकाधिक पसंती असते. त्यामुळे आजच्या ऑनलाईनच्या युगात ही मुद्रीत माध्यमांची विश्वासर्हता टिकून आहे. मुद्रण कलेचा जनक जोहानेस गुटेनबर्ग याने मुद्रण कलेला नवे स्वरूप देऊन ही कला जगभर पसरवली आहे, असे औरंगाबाद येथील शासकीय मुद्राणालयाचे सहायक व्यवस्थापक गणेश बचाटे यांनी सांगितले. 

रमेश भोसले
संहिता लेखक
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
मराठवाडा विभाग औरंगाबाद


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...