Thursday, April 13, 2017

कला प्राविण्यासाठीच्या वाढीव गुणाबाबत
दहावीच्या विद्यार्थ्यांना आवाहन
नांदेड, दि. 13  :-  इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्च 2018 च्या परीक्षेपासून शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य व लोककला प्रकारात सहभागासाठी वाढीव गुण देण्यात येणार आहेत. त्याबाबत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी जाहीर प्रगटनाद्वारे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी, पालक आदींना गुण देण्याच्या कार्यपद्धतीबाबत सुचित केले आहे. त्यानुसार संबंधीत मुख्याध्याकांनी मार्च 2017 मध्ये दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव विहित नमुन्यात सादर करावेत, असे आवाहन केले आहे.
विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रस्ताव गुरुवार 20 एप्रिल 2017 पर्यंत शाळांच्या मुख्याध्यापकांकडे सादर करावेत. तर संबंधीत मुख्याध्यापकांनी रविवार 30 एप्रिल 2017 पर्यंत विहित नमुन्यातील अर्जासोबत सादर करावेत. एखादा विद्यार्थी एकापेक्षा जास्त संस्थांमध्ये कलाविषयक व क्रीडा विषयक शिक्षण घेत असल्यास व एकापेक्षा जास्त कला अथवा क्रीडा विषयांमध्ये प्राविण्य प्राप्त करीत असल्यास त्याला सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याची कमाल मर्यादा 25 गुणांची आहे. याची नोंद घेवून सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, सर्व माध्यमिक शाळांनी याबाबतचा 1 मार्च 2017 च्या शासन निर्णयाची नोंद घेऊन व त्यातील वाढीव गुण देण्याच्या कार्यपद्धतीची नोंद घेवून वेळेत कार्यवाही करावी. कोणताही विद्यार्थी गुणाच्या सवलतीपासून वंचित राहणार नाही याची नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांच्यावतीने लातूर विभागीय मंडळाच्या सचिवांनी केले आहे.

0000000
जि. प. शिक्षकांना भविष्य निर्वाहबाबत आवाहन
नांदेड, दि. 13  :- जिल्हा परिषद नांदेडकडील शिक्षकांचे भविष्य निर्वाह निधीचे वार्षिक विवरणपत्र तसेच या निधीवरील अग्रीम याबाबत गटविकास अधिकारी स्तरावरच कार्यवाही करण्यात येते. त्यामुळे लोहा पंचायत समिती वगळता जिल्ह्यातील अन्य तालुक्यातील शिक्षकांनी अग्रीमाचे धनादेश प्राप्त करुन घेण्यासाठी तसेच विवरणपत्रासाठी जिल्हा परिषद नांदेडकडे येण्याची आवश्यक नसल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी कळविले आहे.
याबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत शिक्षकांचे ( पंचायत समिती लोहा वगळून ) भविष्य निर्वाह निधी वार्षीक विवरणपत्र गट शिक्षणाधिकारी स्तरावर ( तालुकास्तर ) ईमेलद्वारे पुरविण्यात आले आहेत. त्यामुळे शिक्षकांनी आपले भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक विवरणपत्र गटस्तरावर उपलब्ध करुन घ्यावेत. भविष्य निर्वाह निधी वार्षीक विवरणपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी वित्त विभाग जिल्हा परिषद नांदेड या कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. पंचायत समिती लोहा अंतर्गत कार्यरत शिक्षकांचे भविष्य निर्वाह निधी वार्षिक विवरणपत्र लवकरच गट शिक्षणाधिकारी लोहा यांच्याकडे पुरविण्यात येतील.
भविष्य निर्वाह निधी अंतर्गत उचल करण्यात येणारी अग्रीम, रक्कमा धनाकर्षाद्वारे अदा करण्यात येतात. हे धनाकर्ष गटविकास अधिकारी स्तरावर (पंचायत समितीस्तर ) पुरविण्यात येत आहेत. त्यामुळे हे धनादेश प्राप्त करुन घेण्यासाठी वित्त विभाग जिल्हा परिषद नांदेड या कार्यालयात येण्याची आवश्यक नाही, याची नोंद घ्यावी, असेही आवाहन मुख्य लेखा व वित्त अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी केले आहे. 

0000000
जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी
प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 13  :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्हा क्रीडा पुरस्कार 2016-17 वितरणासाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा क्रीडा पुरस्कार समिती नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समिती अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत क्रीडा कार्यकर्ता, गुणवंत खेळाडू पुरस्कार-दोन ( महिला-1 व पुरुष-1 ) यांच्या कार्याचे, योगदानाचे मुल्यमापन करुन त्यांचा गौरव व्हावा व प्रोत्साहन मिळावे यासाठी प्रस्ताव मागविणे व परीपूर्ण पस्ताव सादर करण्यासाठी अर्ज शनिवार 15 एप्रिल ते सोमवार 24 एप्रिल 2017 या कालावधीत विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल, स्टेडीयम परीसर नांदेड येथे प्राप्त होतील. प्रस्ताव कार्यालयीन वेळेत सादर करावे.
पात्रतेचे निकष पुढील प्रमाणे आहेत. पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग 15 वर्षे वास्तव्य असले पाहिजे. संबंधीत जिल्ह्यामध्ये क्रीडा मार्गदर्शक म्हणून सतत दहा वर्ष महाराष्ट्रात क्रीडा मार्गदर्शनाचे कार्य केलेले असले पाहिजे व त्यांने वयाची 30 वर्षे पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. गुणांकनाकरीता नांदेड जिल्ह्यातील खेळाडुंचीच कामगिरी ग्राह्य धरली जाईल. क्रीडा संघटक, कार्यक्रत्याने सतत दहा वर्षे महाराष्ट्रात क्रीडा विकासासाठी भरीव योगदान दिले असले पाहिजे व त्याने वयाची 30 वर्ष पूर्ण  केलेली असणे आवश्यक आहे. गुणांकनाकरीता नांदेड जिल्ह्यातील खेळाडुंचीच कामगिरी ग्राह्य धरली जाईल.
खेळाडुने पुरस्कार वर्षासह लगतपूर्ण 5 वर्षापैकी 2 वर्ष त्या जिल्ह्याचे मान्यताप्राप्त खेळांच्या अधिकृत स्पर्धामध्ये प्रतिनिधीत्व केलेले असले पाहिजे. या पुरस्काराबाबत अधिक माहितीसाठी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा दि. 1 ऑक्टोंबर 2012 शासन निर्णय उपलब्ध असून अधिकच्या माहितीसाठी नांदेडचे क्रीडा अधिकारी एम. जे. सोनकांबळे यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गंगालाल यादव यांनी केले आहे.

0000000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...