Thursday, August 18, 2016

नोकरीच्या मागे न लागता
उद्योजक होणे काळाची गरज  
-          महेश पाटील
नांदेड दि. 18 –  अभियांत्रिकी क्षेत्रातील पदवी किंवा पदविका शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा स्वत:चा उद्योग सुरु करुन उद्योजक होणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन समुपदेशक महेश पाटील यांनी आज येथे केले.
         
नांदेड शासकीय तंत्रनिकेतन  येथे आयोजित प्रथम वर्ष पदविका विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ प्रसंगी श्री. पाटील बोलत होते. यावेळी  विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र उद्योजकता प्रकल्प अधिकारी शंकर पवार  तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य पी. डी. पोपळे उपस्थित होते.
शासनस्तरावर पदवी व पदविका प्रवेशासाठी यावर्षी नव्या पद्धतीचा वापर करुन विद्यार्थ्यांना शेवटच्या टप्प्यापर्यंत इच्छीत संस्था व शाखा निवडण्याचे स्वातंत्र्य मिळाल्याने पालक व‍ विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शासकीय तंत्रनिकेतन संस्थेत प्रवेश पात्र विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.
मोठ्या प्रमाणावर उत्तीर्ण होण्याचे प्रमाणे, गुणवत्ता, स्पर्धा परीक्षा यातून काही जणाना नोकरी मिळू शकते त्यामुळे अभियंता प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वत:चा विकास करण्याची भरपूर संधी असून स्वयंरोजगारावर  भर  देवून  स्वत:च्या विकासासोबतच देशाचा विकास करावा, त्यांनी उद्योग वाढविण्यावर भर दयावा व उद्योजक व्हावे, असे पाटील यांनी सांगितले.  
उद्योजक प्रकल्प अधिकारी श्री. पवार यांनी महिला उद्योजकता सक्षमीकरण अंतर्गत संस्थेत नोंदणी करुन महाराष्ट्र उद्योजकता मंडळामार्फत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. अध्यक्षीय समारोपात संस्थेचे प्राचार्य पी.डी. पोपळे यांनी विद्यार्थ्यांना भावी काळासाठी शुभेच्छा देवून सर्व तासिकांना उपस्थित राहून अभ्यासक्रम चांगल्या प्रकारे पार पाडा, असे सूचविले.
यावेळी विभाग प्रमुख डी. एम. लोकमवार, बी. व्ही. यादव, सी. व्ही. लहाडे, एस. एस. कंधारे, ए. टी. आढावे, एस. पी. कुलकर्णी, श्री. पवार, श्री. उश्केवार, डॉ. जी. एम. डक, तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचालन काम प्रा. बिटीगिरी यांनी तर अभार एस. पी. कुलकर्णी यांनी मानले.

000000
विधानपरिषद विरोधी पक्षनेते
धनंजय मुंडे यांचा नांदेड दौरा
नांदेड दि. 18 – राज्य विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.  
शनिवार 20 ऑगस्ट 2016 रोजी दुपारी 3.30 वा. उदगीर येथून शासकीय मोटारीने अर्धापूर शासकीय विश्रागृह येथे आगमन व राखीव. दुपारी 4 वा. राष्ट्रवादी युवक काँग्रेस आयोजित केडर कॅम्प कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ सनशाईन फंक्शन हॉल अर्धापूर. सायंकाळी 5 वा. अर्धापूर येथून नांदेड रेल्वेस्टेशनकडे प्रयाण. सायंकाळी 5.45 वा. नांदेड रेल्वेस्टेशन येथे आगमन व देवगिरी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.

0000000
रास्तभाव धान्य दुकानात
सप्टेंबरसाठीची साखर उपलब्ध
नांदेड दि. 18 - सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील बीपीएल व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांसाठी  सप्टेंबर 2016 साठीची (सणासुदीचे नियतन) साखर रास्त भाव धान्य दुकानात उपलब्ध झाल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी कळवले आहे.
या नियतनानुसार प्रती व्यक्ती 660 ग्रॅम प्रमाणे साखर प्रौढ अथवा मुल-बालक अशा भेदभाव न करता शिधापत्रिकाधारकांना साखर वितरीत करण्यात येईल. त्यासाठी जिल्ह्याला आवश्यक 6 हजार 39 क्विंटल साखरेचा पुरवठा उपलब्ध झाला आहे. तालुका निहाय उपलब्ध साखर पुढील प्रमाणे क्विंटल मध्ये : नांदेड- 675, हदगाव- 504, किनवट- 721, भोकर- 233, बिलोली-387, देगलूर-358, मुखेड-691, कंधार-471, लोहा-420, अर्धापूर-167, हिमायतनगर-251, माहूर-248, उमरी-198, धर्माबाद-200, नायगाव-331, मुदखेड-184. याची शिधापत्रिकाधारकांनी नोंद घेवून स्वस्त धान्य दुकानातून साखरेची उचल करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000000
लोकसहभागातून पांदनरस्ता
मोकळा करण्यास प्रारंभ
नांदेड, दि. 18 : राजस्व अभियानात लोकसहभागातून धर्माबाद तालुक्यातील पाटोदा (बु) ते पाटोदा (खु) जाणारा रस्ता मोकळा करण्यासाठी  जेसीबी  मशीनव्दारे  धर्माबादचे  प्रभारी तहसिलदार सुनिल माचेवाड यांच्या  हस्ते  नुकतेच सुरुवात  करण्यात  आले.
यावेळी  जारीकोटचे मंडळ  अधिकारी  अनिल परळीकर, पाटोदा (बु.) चे तलाठी एम.व्ही. पांचाळ, अशोक माधवराव वडजे, सरपंच लोकडोबा आबाजी वानखेडे, हणमंतराव पा. जाधव, पोलीस पाटील शंकरराव बाजीराव भायेगाये, बाबाराव जाधव, रामचंद्र पांडूरंग मेळगावे, दिगंबर बळीराम बाचेवाड, बाबू केरबा जाधव, रामराव महाजन जाधव, पिल्ले बालाजी शंकरराव, जारीकोटे इरवंत संजय, गोविंद लक्ष्मण मेळगावे, शिवाजी शेषराव वडजे आदी उपस्थित होते.

******
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील
यांच्या जयंती निमित्त शेतकरी दिन संपन्न
नांदेड, दि. 18 : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त 17 ऑगस्ट रोजी कै. यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद नांदेड येथे शेतकरी दिनाचे आयोजन करण्यात आले होते.  कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी   जिल्हा  परिषद  अध्यक्षा  मंगलाताई गुंडेले  होत्या. शिक्षण व आरोग्य समिती सभापती संजय बेळगे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. टी. एस. मोटे,, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) राहुल  काळभोर,  पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदीचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत देवसकर,  नांदेड  जिल्हा  कृषी  निवीष्ठा  संघटनेचे अध्यक्ष मधुकर मामडे, दिवाकर वैद्य, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक श्री. दुधाळकर, नांदेड कापूस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. बेग, पांडागळे, तेलंग यांची  प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी  जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. मोटे यांनी शेतकऱ्यांना गटशेती व कमी खर्चात शेती करण्याविषयक  मार्गदर्शन केले.  किनवट तालुक्यातील नंदगाव  येथील शेतकरी भुजंग पाटील यांनी त्यांचे शेतीतील अनुभव सांगून गटशेती व कमी खर्चात शेती करण्याचे अनुभव सांगीतले. भागवत देवसकर व मधुकर मामडे यांनी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जीवन चरित्राबाबतची  माहिती  दिली.  
कार्यक्रमास जिल्हयातील शेतकरी, कृषी निविष्ठा विक्रेते, कृषी विभाग, जिल्हा परिषदेचे अधिकारी-कर्मचारी उपिस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा मोहिम अधिकारी ए. जी. हांडे तर आभार कृषी अधिकारी विश्वास अधापूरे यांनी मानले.

                                                  *******
व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारासाठी
22 ऑगस्ट अर्ज करण्याची मुदत
नांदेड, दि. 18 :- राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारासाठी विहीत अर्ज नमुने जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद नांदेड येथे उपलब्ध असून संबंधित व्यक्ती, संस्थांनी त्यांचे परीपूर्ण अर्ज प्रस्ताव सोमवार 22 ऑगस्ट 2016 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे  जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनिल खमितकर यांनी केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार  व्यसनमुक्ती क्षेत्रात मौलीक  कार्य  करणाऱ्या राज्यातील कार्यकर्त्यांचा, संस्थांचा गौरव करण्यात यावा तसेच व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य करत असलेल्या कार्यकर्ते व संस्थांच्या कार्याला दाद दयावी  व इतर  कार्यकर्त्यांना  त्यापासून प्रेरणा मिळावी. जेणे करुन  व्यसनमुक्ती कार्याच्या उत्थानासाठी कार्यकर्ते सरसावून पुढे यावेत व व्यसनमुक्ती प्रचार कार्याचा दर्जा वाढविताना सर्व समावेशकता निर्माण करणे , त्या योग्य पात्र  व्यक्ती  व संस्था यांच्या कार्याची दखल घेवून राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार देवून गौरविण्यात येते.  
पुरस्काराचे स्वरुप  पुढील प्रमाणे राहील. व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीला 15 हजार रुपये तर संस्थेला  30 हजार रुपये तसेच सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल किंवा साडी, खण आणि श्रीफळ देण्यात येते. तर या पुरस्काराची संख्या पुढीलप्रमाणे आहे. व्यसनमुक्ती कार्यकर्त्यांसाठी- लेखक, कवि, पत्रकार / संपादक व साहित्यीक (प्रत्येकी एक) 5 पुरस्कार. सामाजिक कार्यकर्ते 10 पुरस्कार. किर्तनकार,  प्रवचनकार  4 पुरस्कार. पारंपारिक  लोक कलावंत उदा. शाहीर, गोंधळी, भारुडकार, पोतराज, वासूदेव, लोकनाट्यकार  (प्रत्येकी एक) सहा पुरस्कार. शासकीय अधिकारी / कर्मचारी, निमशासकीय अधिकारी / कर्मचारी  तीन  पुरस्कार.
सामाजिक  सेवाभावी  संस्थांसाठी तीन पुरस्कार, युवक मंडळे, महिला मंडळे, भजनी मंडळे, बचत गट व क्रिडा मंडळे तीन पुरस्कार. शाळा व महाविद्यालयांसाठी (प्रत्येकी एक) तीन पुरस्कार. मिडीयासाठी  वृत्तपत्रे (हिंदी, इंग्रजी व मराठी ) प्रत्येकी एक तीन पुरस्कार. इलेक्ट्रॉनिक मिडीया दोन पुरस्कार. उद्योग- कारखाने- तीन पुरस्कार, उद्योग व्यवस्थापन-तीन पुरस्कार, मजूर संघटना-तीन पुरस्कार असे एकुण 51 पुरस्कार देण्यात येतात.
वरील विविध गटातून देण्यात येणाऱ्या 51 पुरस्कारांसाठी व्यसनमुक्ती क्षेत्रात भरीव व मौलीक कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थाकडून शिफारशी व कागदपत्रांसह अर्ज / प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
यासाठी  पात्रता  व निकष पुढीलप्रमाणे आहेत. व्यसनमुक्ती  क्षेत्रात मौलीक / भरीव कार्य करणारी व्यक्ती / संस्था असावी. या पुरस्कारासाठी वयाची अट बंधनकारक नाही. व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था महाराष्ट्र  राज्यात कार्यरत असावी. पुरस्कारासाठी व्यक्ती राज्य, जिल्हा, तालुका  पातळीवर किमान 15 वर्ष व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य केलेले असावे, पुरस्कारासाठी  एकापेक्षा अधिक वेळा पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येणार नाही. व्यसनमुक्ती  क्षेत्रात  कार्य करणारे खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सभासद व इतर कोणतेही लोकप्रतिनिधी  पुरस्कारासाठी पात्र राहतील. संस्था नोंदणी अधिनियम 1860 व 1950 प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. संस्था किमान 15 वर्षे जुनी असणे गरजेचे आहे व संस्थेने किमान 10 वर्षे व्यसनमुक्ती क्षेत्रात अधिक कार्य केलेले असावे व मागील 5 वर्षाचे लेखा अहवाल, वार्षिक अहवाल जोडणे आवश्यक आहे.

0000000