Wednesday, June 15, 2022

विभागीय क्रीडा संकुलाच्या प्रशासकीय मान्यतेसाठी तातडीने कार्यवाही करा

- सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण 

मुंबई, दि. 15 :- मौजे अर्सजन-कौठा येथे प्रस्तावित नांदेड जिल्हा आणि विभागीय क्रीडा संकुलाच्या प्रशासकीय मान्यतेच्या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज दिल्या. 

नांदेड येथील विभागीय क्रीडा संकुलासह विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आज सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक घेण्यात आली. आमदार अमर राजूरकर, क्रीडा आयुक्त डॉ. ओमप्रकाश बकोरिया (दूरदृश्यप्रणालीद्वारे), जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे, जिल्हा क्रीडा अधिकारी आर. एस. मारावार आदी उपस्थित होते. 

नांदेड-लातूर मार्गावर मौजे अर्सजन-कौठा हद्दीत नांदेड जिल्हा आणि विभागीय क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. 24 एकर क्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या या क्रीडा संकुलांच्या प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही गतीने करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी केल्या. नांदेड येथे विभागीय क्रीडा संकुल विशेष बाब म्हणून उभारण्यात येत असून या संकुलामुळे जलतरण, बॉक्सिंग, धनुष्यविद्या आदी क्रीडा प्रकारांच्या सुविधा खेळाडूंना उपलब्ध होणार आहेत. या संकुलासाठी शासन निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही देतानाच संकुलाच्या आराखड्यात किरकोळ सुधारणा करण्याचे निर्देशही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले. 

नांदेड जिल्ह्यातील भोकर आणि मुखेड येथील क्रीडा संकुलाच्या आराखड्याच्या संदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. लेखक, विचारवंत नरहर कुरुंदकर यांच्या स्मारकाच्या संदर्भाने या बैठकीत पालकमंत्री चव्हाण यांनी आढावा घेतला.

००००००





 नांदेड जिल्ह्यात तीन व्यक्ती कोरोना बाधित   

नांदेड (जिमाका) दि. 15 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 172 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 819 एवढी झाली असून यातील 1 लाख 114 रुग्णांना उपचारा नंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या घडीला 12 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील एका रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 2, मुंबई 1 असे एकुण 2 कोरोना बाधित आढळले आहेत. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 3, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणात 9 असे एकुण 12 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

 

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 5 हजार 256

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 85 हजार 140

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 819

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 114

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.36 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-निरंक

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-12

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक.

 

 कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

0000

 नियमित प्रकाशन व वार्षिक विवरण सादर न केलेल्या

156 वृत्तपत्रांचे टायटल होईल ब्लॉक

 

नांदेड (जिमाका) दि. 15 :- विविध वृत्तपत्र अर्थात दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, द्विपाक्षिक आदींना कायदानुसार रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्स फॉर इंडिया (आरएनआय) यांच्याकडे रीतसर नोंदणी करणे व टायटल पडताळणी करून घेणे आवश्यक आहे. प्रेस ॲन्ड रजिस्ट्रेशन्स ऑफ बुक्स ॲक्ट 1867 नुसार ही माहिती त्या-त्या वृत्तपत्रातर्फे जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे रीतसर सादर केल्याने ही कायदेशीर जबाबदारी संबंधितावर येते. वृत्तपत्राचे मालक, प्रकाशक यांनी दरवर्षी आपले वार्षिक विवरण विहित नमुन्यात दरवर्षी 31 मे पूर्वी आरएनआय कडे सादर केली पाहिजेत. पीआरबी ॲक्ट 1867 च्या सेक्शन 19 डी नुसार हे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

असे असूनही नांदेड जिल्ह्यातील तब्बल 156 वृत्तपत्रांनी ही कार्यवाही पूर्ण केल्याचे आढळून आले नाही. ज्या वृत्तपत्रांनी 3 वर्षाचे विवरणपत्र भरले नाहीत त्यांना शेवटची संधी म्हणून जानेवारी 2020 पर्यंत मुदत दिलेली होती. आरएनआयच्या अभिलेख्याशी पडताळणी केली असता नांदेड येथून तब्बल 156 वृत्तपत्रांनी आपले विवरण सादर केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याची यादी आरएनआयने पडताळणी व चौकशीसाठी जिल्हादंडाधिकारी नांदेड यांच्याकडे पाठविली आहे. त्यांनी दिलेल्या यादीतील वृत्तपत्रांनी गत पाच वर्षात आपले अंक प्रसिद्ध केले किंवा नाही याचीही चौकशी करण्याचे निर्देशीत केले आहेत. ज्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात (फॉर्म 1) दिल्याप्रमाणे जर अंक प्रकाशित केले नसतील तर सदर वृत्तपत्राची नोंदणी पीआरबी ॲक्ट 1867 मधील सेक्शन 8 नुसार रद्द करण्याचे प्रस्तावित केले आहे.

 

चौकशी अंती जर यात कमतरता आढळली तर त्यांची नावे कळविण्याबाबत आरएनआयचे अतिरिक्त प्रेस रजीस्ट्रार रिना सोनुवाल यांनी नांदेड जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी यांना कळविले आहे. जिल्ह्यातील आरएनआयतर्फे देण्यात आलेल्या 156 टायटलची (दैनिक/साप्ताहिके/पाक्षिक आदी) नावे खाली देण्यात येत आहेत. यातील ज्या टायटलने (दैनिक/ साप्ताहिक/पाक्षिक आदी) आरएनआयला कळविल्याप्रमाणे वेळच्यावेळी अंक प्रकाशित केले आहेत व ज्यांनी आपले वार्षिक विवरणपत्र ऑनलाईन सादर केले आहेत तरीही त्यांचे नाव या यादीत आले असेल तर त्यांनी आपले म्हणणे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालयाच्या संबंधित शाखेत पुराव्यासह सादर करावे. ही यादी जिल्हा माहिती कार्यालयाच्या फेसबुक पेजवर, ब्लॉगवर व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दंडाधिकारी शाखेत उपलब्ध आहे.

 

आरएनआयने दिलेले टायटल पुढील प्रमाणे आहे. लोकनेतृत्व मस्ती, नवनंदिग्राम टाईम्स, गुलाम नायम, चक्रपाणी, महासागर समाचार, चमत्कारी चावडी, लोकभास्कर, महासागर समाचार, गोदावरी टाईम्स, संघर्ष वार्ता, श्रमिक एकजूट, संदेश भवन, पद्मरेखा, अर्धापूर वार्ता, आमोल साप्ताहिक समाचार, रेडपँथर, शुरसैनिक, मेलझोल, समता दर्पण, विश्व, सचखंडपत्र, रणधुरंधर चेतक, आघात, चक्षू, एकजाती, सत्यविकास, गोदातीर समाचार, वास्तविकता, माझा महाराष्ट्र, वैश्यवाणी, सचखंड दर्पण, हालत, मराठवाडा विदर्भा, जनवैदना, नंदिग्राम, सहेर, नुतन गोदावरी टाईम्स, पंचनामा, सचखंड संदेश, विद्यावृत्त, प्रतिभा, प्रतिभा पुष्प, निविदा सागर, नया कदम, नांदेड पोलखोल, सावळा गोंधळ समाचार, लालण्य, साप्ताहिक मंडळ समाचार, सचखंड वार्ता, डाउन टाउन पोस्ट, नांदेड विकास वार्ता, शिवप्रताप, लोककैवारी, नांदेड सर्कल, धमाका पत्र, विचारक्रांती, सर्वोच्च सन्मान, गंगोत्री वार्ता, समाज भुषण, नांदेड सर्कल, नांदेड गॅजेट, समता जनक, सत्यवार्ता, गंगोत्री वार्ता, नांदेड प्रतिबिंब, टॅक्स कन्वेअर्स, सर्वोच्च सन्मान, किनवट क्रांती, वृत्तसखा, वृत्तसखा, वृत्तसखा, तहेलका टाईम्स, मंगल समाचार, रोजगार दर्शन, नांदेड प्रतिबिंब, नांदेड गॅजेट, दरक वृत्त, नांदेड एक्सप्रेस, वृत्त सखा, भूमिपूत्र, नांदेड गॅजेट, विजय किसान, माजी मैत्रिण, धर्माबाद टाईम्स, माझा जयभारत, प्रजासत्ताक भारताचा शिल्पकार, सिंधी वार्ता, दलीत कैवारी, सुराज्य दर्पण, बंजारा समाचार, अक्षरगाथा, मुंबई दर्पण, प्रशांत, न्यू परिवर्तनवाही महाराष्ट्र, लोकदंड, संस्कृती वंदना, बॅटरी ॲड सोलर बिजनेस पेपर, नांदेड दर्पण, तरुण मुकनायक टाईम्स, आयडीएल नांदेड, ताजा हालात, मुंबई दर्पण, प्रशांत समाचार, अंमलबजावणी, रहनुमा ए नांदेड, सचखंड ज्योत, दारिद्रय, नांदेड सांज, निशान ए खालसा, विरुद्ध सामना, रंगिलो राज्यस्थान, मारवाडी दर्पण, शिलवंत अशोक, जीवन संगिनी, स्वाती चक्र, आपुलकिचा मित्र, विचारवेध, समर्पण टाईम्स, हदगाव जागृती, संघर्ष दर्पण, नांदेड मराठवाडा, कल्पना शक्ती, आज का गुन्हा, पँथर संघर्ष, विचार निर्मिती, लोकलठ्ठा, आघाध चक्र, प्रभुद्ध जयभिम, नांदेड आज, अन्याय विरुद्ध अंदोलन, पॅट्रन, रिपब्लिकन हक्क, न्यायपत्र समाचार, सामाजिक अनुसंधान, जनकल्याण संदेश, अर्थकल्याण, संघटक, स्पर्धा ग्यान, नांदेड ब्रेक, विचार प्रवाह, केसुला, मल्लिनाथ बाबा, कुंडलवाडी वार्ता, अर्धापूर वार्ता, दिव्यमत, पुढारी, हदगाव एक्सप्रेस, प्रजाप्रतिबिंब, वृत्त वारसदार, नांदेड अपडेट, अबचलनगर टाईम्स, इंडियन गंगासागर, शुद्ध माहिती, नंदिग्राम टाईम्स, संघर्षाचा साथीदार अशी प्रकाशनाची नावे आहेत.

000000







 मोटार सायकल प्रवर्गासाठी नवीन मालिका  

नांदेड (जिमाका) दि. 15 :- प्रादेशिक परिवहन विभाग यांच्यावतीने मोटार सायकल करिता एम.एच 26-सीसी ही नवीन मालिका सोमवार 20 जुन 2022 पासून सुरू करण्यात येत आहेत. यांची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे सहायक प्रादेशिक परिवहन विभाग यांनी प्रसिद्धी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यायचा असेल सोमवार 20 जून 2022 रोजी दुपारी 2.30 पर्यंत आधारकार्ड, पॅन कार्ड, मोबाईल व ईमेलसह अर्ज करावा. ज्या पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्याची यादी 21 जुन रोजी कार्यालयात लावण्यात येणार आहे. तसेच टेक्स मेसेज द्वारे अर्जदारासह कळविण्यात येईल. याची सर्वानी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

 मुदखेड नगरपरिषदेतील मिळकतीची ड्रोनद्वारे होणार मोजणी

 

नांदेड (जिमाका) दि. 15 :- महाराष्ट्र शासन महसूल व वनविभागअंतर्गत भूमिअभिलेख विभागाद्वारे राज्यातील 5 नगरपालिका / नगरपरिषद हद्दीतील क्षेत्राचे खाजगी संस्थाद्वारे नगर भूमापन करण्यात येणार आहे. यात पाच नगरपरिषदेमध्ये नांदेड जिल्ह्यातील मुदखेड नगरपरिषदेची पथदर्शी प्रकल्पाअंतर्गत निवड करण्यात आली आहे.

 

यानुसार मुदखेड नगरपरिषदेच्या हद्दीतील मिळकतीचे नगरभूमापन लवकरच सुरू करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख सुरेखा सेठिया यांनी दिली. यासाठी लागणारी पूर्व तयारी करण्यात आली असून मुदखेडच्या नागरिकांना त्यांच्या मिळकितीचे कायदेशीर संरक्षण प्राप्त होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे मिळकतीचा नकाशा विहित परिमाणात तयार होईल व सिमा निश्चित होतील. मिळकतीचे नेमके क्षेत्र किती आहे याची नोंद होईल.  शहरवासीयांचे नागरी हक्काचे संवर्धन व गावातील रस्ते, शासनाच्या, नगरपरिषदेतील खुल्या जागा, नाले यांच्या सिमा निश्चित होवून अतिक्रमण थांबता येणे शक्य होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याचबरोबर मिळकत पत्रिका तयार झाल्याने मिळकत धारकांना घरावर कर्ज कर्ज घेणे सुलभ होईल. नगरपरिषदेची कर आकारणी, बांधकाम परवानगी यासाठी अभिलेख व नकाशा उपलब्ध होईल. या सर्व्हेक्षणासाठी सर्वे करणाऱ्या पथकाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

 

धर्माबाद नगर परिषदेतील मिळकतीची ड्रोनद्वारे मोजणी

नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद नगरपरिषद हद्दीतील क्षेत्राचे नगरभूमापन कामास महसुल व वनविभाग अंतर्गत भूमि अभिलेख खाते व भारतीय सर्वेक्षण विभाग डेहराडून यांच्या संयुक्त सहभागाने नगर भूमापनचे काम ड्रोनच्या सहाय्याने करण्यात येत आहे. याच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात  करण्यात आली आहे.  

00000




 आत्मविश्वासाची पावले जेंव्हा शाळेत उमटतात


▪️जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचा संपूर्ण जिल्हाभर अभिनव उपक्रम
▪️विद्यार्थ्यांच्या पावलांची ठसे आता वर्गाच्या भिंतीवर

नांदेड (जिमाका) दि. 15 :- शालेय शिक्षणात मानवी मूल्यांच्या संवेदना घेऊन शालेय विद्यार्थ्यांशी शिक्षकांनी कसे वागावे याबाबत आजवर विदेशी उदाहरणांची जोड द्यावी लागत होती. याला नांदेड जिल्ह्यातील एका अभिनव उपक्रमाने छेद देत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांनी आज आत्मविश्वासाचा नवा मापदंड विकसित केला. एरवी शाळेतील पहिले पाऊल म्हणून पालकांसह विद्यार्थ्यांच्या मनातही प्रचंड घालमेल असते. मुले शाळेची वास्तू पाहून काही ठिकाणी घाबरून रडायलाही लागतात. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या पहिल्या पाऊलांना शाळेत ताटातील कुंकवाच्या पाऊलाने ओले करून त्याचा ठसा तो ज्या वर्गात शिकत आहे त्या वर्गाच्या भिंतीवर ठेवत नवा आत्मविश्वास देण्याचा अभिनव प्रयोग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज संपूर्ण जिल्हाभर राबविला.
“मुलांच्या मनात असलेली भिती दूर करणे, शिक्षकांच्या प्रती त्यांच्या मनात विश्वास निर्माण करणे ही अंत्यत आवश्यक असलेली बाब आहे. एरवी ती दूर्लक्षित असते. याबाबत आम्ही सर्वांनी शांततेत विचार करून मुलांच्या व शिक्षकांच्याही मनात नवा विश्वास निर्माण करता यावा यादृष्टिने हा अभिनव उपक्रम घेतल्याची” माहिती वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली. मागील आठवडाभर त्यांनी प्रत्येक तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांशी, शिक्षक विभागातील अधिकाऱ्यांशी प्राथमिक चर्चा करून हा उपक्रम राबविण्याचे नियोजन केले. शिक्षकांनीही याला भरभरून प्रतिसाद देत कोविड-19 च्या काळात मुक झालेल्या शाळांच्या भिंतींना आता अधिक आत्मविश्वासासह बोलके केल्याचे त्यांनी सांगितले.

हदगाव तालुक्याच्या सिमेवर असलेल्या देशमुखवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत त्यांनी आज मुलांसोबत एक तास घेतला. या शाळेत आदिवासी अंध समाजातील 30 मुले शिक्षण घेत आहेत. त्यांच्या मनात विश्वास जागविण्यासमवेत त्यांनी प्रातिनिधीक स्वरुपात स्वखर्चाने या मुलांना दप्तराचीही भेट देऊन आपली वैयक्तिक कृतज्ञतेचा प्रत्यय दिला. दरवर्षी वाढदिवसानिमित्तचा आजवर जपलेला एक पायंडा त्यांनी या आदिवासी मुलांसोबत साजरा केला.

गाव परत्वे शिक्षकांनी दिली कल्पकतेची जोड

किनवटच्या काठावर असलेल्या परोटी तांडा या गावात विद्यार्थी मोठ्या कुतुहलाने शाळेत पोहचले. आदिवासी भागातील तांड्यावरची ही शाळा असल्याने विद्यार्थीही तुरळक. असे असतांनाही जुने सवंगडी एक होत शाळेत दाखल होत होते. वनसंपदेशी जवळिकता असलेल्या या भागातील विद्यार्थ्यांना शिक्षकांनी वाघाची मुखवटे देऊन प्राण्यांप्रती आदर भावना व्यक्त केली. मुलंही या मुखवट्यातून प्रत्यक्ष फळावरील खडूतून उमटलेल्या बाराखडी पर्यंत पोहचले. कोसमेट येथील जिल्हा परिषद शाळेच्या भेटीसाठी शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांनी आवर्जून भेट देत विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास द्विगुणीत केला. काही शाळांनी फुग्यांची जोड देत वर्गांला सजवले तर काही शाळांनी झोके उभारून मुलांच्या स्वछंद मनाला आभाळाला गवसणी घालण्याचे बळ दिले. जिल्हाभरात आज सुमारे 3 लाख 34 हजार विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटण्याच्या उपक्रमाचाही शुभारंभ करण्यात आला. समग्र शिक्षा अंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व माध्यमांच्या जिल्हा परिषद शाळा, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या शाळा, समाज कल्याण, मनपा, नपा, खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित असा एकुण 2 हजार 909 शाळांमध्ये मोफत पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविली जात आहेत. जिल्ह्यातील सुमारे 3 लाख 33 हजार 912 लाभार्थी विद्यार्थ्यांना हे मोफत पुस्तके दिली जात आहेत.
000000








  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...