Saturday, May 5, 2018


जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश  
नांदेड, दि. 5 :- जिल्ह्यात शुक्रवार 11 मे 2018 रोजी मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 27 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 11 मे 2018 रोजी मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
000000



लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन
नांदेड, दि. 5 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. त्यानुसार सोमवार 7 मे 2018 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे लोकशाही दिन आयोजित केला आहे. यासाठी अर्ज स्विकारण्याचे व न स्विकारण्याबाबतच्या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे केवळ वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्या‍त आले आहे.
या दिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे उपस्थित राहतील. दुपारी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकूण घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल.
न्याय प्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे.
लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे अशा प्रकरणी पुढील महिन्याच्या पुढील महिण्याच्या होणाऱ्या लोकशाही दिनात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.                             
00000


जलसमृद्धी यंत्र सामुग्री व्याज अर्थसहाय्य योजना
वित्तीय संस्थेचे विनाअट कर्ज मंजुरीचे  
पत्र ऑनलाईन सादर करण्यास मुदतवाढ  
      नांदेड, दि. 5:- वित्तीय संस्थेकडून विनाअट कर्ज मंजुरीचे पत्र ऑनलाईन सादर करण्यास शनिवार 19 मे 2018 पर्यंत मुदवाढ देण्यात आली आहे. कर्ज मंजुरीचे पत्र अपलोड करुन जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हास्तरीय समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड यांनी केले आहे.
यापुर्वी पात्र अर्जदारांनी वित्तीय संस्थेकडून विनाअट कर्ज मंजुरीचे पत्र ऑनलाईन  सादर करण्यास 13 एप्रिल पर्यंत मुदत देण्यात आली होती. राज्यातील जलयुक्त शिवार अभियान तसेच जल मृदसंधारणाची कामे करण्यासाठी जलसमृद्धी (अर्थमुव्हर्स) यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय्य योजनेंतर्गत पात्र अर्जदारास विनाअट कर्जमंजुरीचे पत्र 28 मार्च 2018 पर्यंत सादर करणे अपेक्षित होते. परंतु विहित मुदतीत अर्जदारांची संख्या कमी असल्याने पात्र सुशिक्षित बेरोजगार अर्जदारांची लक्षांक पुर्तता साध्य करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच अधिकृत परवानाधारक असलेल्या जिल्ह्यातील  वित्तीय संस्थकडून / बँककडून या योजनेंतर्गत शासन निर्णयाप्रमाणे विनाअट कर्ज मंजुरीचे पत्र विहित नमुन्यात संकेतस्थळावर लॉगइन आयडीद्वारे सादर करण्यासाठी पात्र लाभार्थ्यास 19 मे 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी ज्या पात्र लाभार्थ्यांनी बँकेचे अटी शर्तीस अधीन राहून कर्ज जुर करण्यात येईल या पत्राऐवजी विनाअट कर्जमंजुरीचे पत्र अपलोड रु पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन जिल्हास्तरीय समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड यांनी केले आहे.   
000000



वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा दौरा  
      नांदेड, दि. 5:- राज्याचे वित्त आणि नियोजन, वने मंत्री सुधीर मुनगंटीवार हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
        रविवार 6 मे 2018 रोजी मुंबई येथुन विमानाने सकाळी 8.30 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 9 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. रात्री नांदेड येथे मुक्काम.
            सोमवार 7 मे 2018 रोजी सकाळी 8 वा. विमानाने नांदेड विमानतळ येथून मुंबईकडे प्रयाण करतील.
000000

व्यायामाची गरज – भाग २
तुम्ही जर सतत व्यायाम करीत असाल तर खूप सुंदर गोष्ट आहे. पण हाच व्यायाम योग्य पध्दतीने घेतला नाही तर हि एक चिंतेची बाब आहे. नियमित व्यायाम करणे, त्याचा वेग आणि वेळ वाढवणे उचित आहे. पण अतिरेक विपरीत परिणाम करु शकतो. योग्य व्यायाम आणि योग्य विश्रांती ही अनिवार्य आहे.
जास्त व्यायाम, म्हणजेच शरीराची अधिक पिळवणूक. ही पिळवणूक घातक ठरू शकते. जबरदस्तीचे शारिरीक आणि मानसिक ताण तुम्हाला आजारी करू शकतात. तुम्ही ‘ओवर ट्रेनिंग सिंड्रोम’ या आजाराने ग्रस्त होऊ शकता.
ओवर ट्रेनिंग सिंड्रोम कसे घातक असू शकते ते जुजबी शब्दांत मांडण्याचा येथे प्रयत्न केला आहे.
यकृतामधील साखरेसारखा पदार्थाचा साठा कमी होतो : यकृतामधील साखरेसारखा पदार्थ आपल्या शरीरातील ऊर्जास्त्रोत आहे. त्यामुळे आपले स्नायू अधिक लवकर थकतात आणि आपल्याला अशक्त वाटते.
ताण हार्मोन्स : ताण  हार्मोन्स हे शरीरासाठी अपायकारक आहेत. ह्यामुळे व्यायाम करून सुद्धा वजन कमी होत नाही. ते शरीरातील चरबी धरून ठेवतात. शरीरातील सैनिक पेशी शत्रूपेशीशी लढू शकत नाही आणि आपली रोगप्रतिकारशक्ती खालवते. त्यामुळे विश्रांती न घेता जास्त व्यायाम, केला की आपण आजारी पडू शकता.
ह्दयावर ताण : ह्दयाची विश्रांती आणि काम करण्याची गती वाढते, त्यामुळे ह्दयावर ताण येतो आणि तो आपली क्रिया निट पार पाडू शकत नाही. रक्ताचे शुद्धीकरण निट होत नाही. या सर्व गोष्टींचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो.
कार्यक्षमता खालावते : कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. अधिक प्रमाणात शरीराची झिज, आपली कार्यक्षमता कमी करते. सततचे व्यायाम आपल्या मांसपेशा, स्नायू आणि शरीराला कमजोर करतात. विश्रांती न घेतल्यामुळे नवीन मासपेशा तयार होत नाही. फक्त त्यांचा वापर आणि घासण होत राहते. परिणामी तुम्ही शरीराने आणि मनाने कमकुवत होता.
स्नायू झीज : रोजचा व्यायाम म्हणजे रोजच स्नायूची झीज. जेव्हा तुम्ही विश्रांती घेता, तेव्हा स्नायू स्वतःला पूर्ववत करण्यात रमतात. ते शरीरातील उर्जा वापरून परत कामासाठी सज्ज होतात. पण जर तुम्ही विश्रांती घेणे टाळले किंवा विश्रांती नाही घेतली तर ह्या सर्व प्रक्रियेत खंड पडतो. त्यामुळे तुम्हाला ताजे-तवाने वाटत नाही. शरीर खूप थकते आणि चिडचिड होते.
अशक्त वाटणे : मांसपेशी आणि स्नायू यांची जडण-घडण ही एक आवश्यक शारीरिक प्रक्रिया आहे. काम केल्याने मांसपेशी खर्च होतात आणि विश्रांती घेताच पूर्ववत होतात. पण अती वापर खरच त्यांना कमजोर बनवतात. शिवाय विश्रांती वगळल्यामुळे त्यांना पुर्ववत होता येत नाही. या सर्वांचा परिणाम म्हणजे स्नायुंना आणि मांसपेशींना सूज. त्यामुळे तीव्र शारिरीक वेदना होत राहतात. शरीर संपत आहे अशी भावना निर्माण होते. मानसिकदृष्ट्या आपण कमकुवत बनता.
मानसिक तणाव : शरीर आणि मन हे दोघे खूप घनिष्ट मित्र आहेत. त्या दोघांचा एकमेकावर खूप परिणाम होतो. शरीर आजारी तर मन आजारी आणि मन दु:खी तर शरीर दु:खी. ह्याच तत्वामुळे शरीराची जास्त झिज झाली की मनाची झिज सुरू होते. आपला आत्मविश्वास कमी होतो. आपल्या प्रसन्न वाटत नाही. कुठल्याही गोष्टीत रस उरत नाही. सारखा ताण आणि राग येत राहतो.आपले मानसिक खच्चीकरण होते.
हे सर्व टाळता येऊ शकते. योग्य व्यायाम आणि भरपूर विश्रांती, हा गुणमंत्र आहे. त्यामुळे तुमचे शरीर आणि मन दोन्हीही स्वस्थ राहतील.तुम्हाला नवीन उर्जा मिळेल आणि तुम्ही सुंदर दिसाल.
-सुजाता नाईकवाडे
**********
" आला उन्हाळा, आरोग्य सांभाळा"
             डॉ. के. आर खरात
              एम.डी.डी.पी.एच 
सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा, मुंबई

          दरवर्षापेक्षा या वर्षी उन्हाळयात उष्णतेच्या लाटाची सुरुवात लवकर झाली आहे. तसेच  या वर्षी उष्णतेची लाट मोठ्या कालावधीसाठी असणार असलयाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविलेला आह. त्यामुळे उष्माघाताचा जास्त धोका संभवतो. या सर्व बाबीचा विचार करता प्रत्येकाने उन्हापासून त्रास होऊ नये म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे. शहरी भागात, औद्योगिक क्षेत्रात वाढते प्रदुषण, सतत घटणारी झाडांची संख्या, पाण्याचे दुर्भिक्ष आदी कारणांमुळे दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र क्षेत्रात उष्माघाताचे प्रमाण जास्त असून उष्माघात टाळण्यासाठी विशेष काळजी घेतली पाहिजे.
          1) उष्माघात :- ग्रामीण भागात याला " ऊन लागणे" असेही म्हणतात. दुपारच्या तीव्र उन्हात काम केल्याने, फिरल्याने, प्रवास केल्याने उष्माघात होण्याचा धोका असतो. उष्माघात हा अतिशय धोकादायक असतो. यामध्ये शरीराचे तापमान साधारण (नॉर्मल) ठेवणारी यंत्रणा काम करेनाशी होते. त्यामुळे उष्माघात झालेल्या व्यक्तीच्या शरीराचे तापमान वाढते. शरीराचे तापमान यामध्ये अगदी 110 अंश फेरनहीट पर्यंतही वाढते. या तीव्र तापासोबतच भोवळ येणे(चक्कर व ग्लानी येणे) आकडी येणे, आणि अर्धवट ते पूर्णपणे बेशुध्द होणे ही लक्षणे दिसून येतात. यामध्ये त्वचा कोरडी पडते व तीव्र ताप येतो. तसेच घाम येत नाही किंवा कमी प्रमाणात येतो, किंवा उष्माघाताच्या काही रुग्णांना खुप घाम येतो. उष्माघातामध्ये मृत्यू मोठ्या प्रामाणावर होतात, त्यामुळे उष्माघाताकडे चुकूनही दुर्लक्ष करू नये . उष्माघात झालेल्या व्यक्तीला तातडीने उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जाणे आवश्यक असते. दवाखान्यात पोहचेपर्यंत उष्माघात झालेल्या व्यक्तीचे अंग थंड पाण्याने पुसत रहावे, कपाळावर थंड पाण्यात भिजवलेल्या कपड्याच्या पट्टया ठेवून त्या वारंवार बदलाव्यात. थोड्या थोड्या वेळाने पाणी, सरबत पाजत रहावे. अंगावर सैलसर कपडे घालावेत. उष्माघातावर सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करण्यात येतात.
2) घामोळ्या - उन्हाळयात अनेक जणांना घामोळ्यांचा त्रास जाणवतो. या घामोळ्या उन्हाचा त्रास आणखी वाढवतात. घामोळ्याचा त्रास असणाऱ्यांनी घामोळया आलेला भाग दिवसातून दोन- तीन वेळा साध्या पाण्याने स्वच्छ करून कोरडा करावा. तसेच कॅलामिन किंवा अन्य थंडावा देणारे मलम त्यावर लावावे.
3) पेटके येणे - उन्हात काम केल्याने तसेच व्यायामामध्ये घामाद्वारे शरीरातील क्षार व पाणी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडते. त्यांमुळे पायांच्या स्नायूमध्ये अचानक पेटके (याला काही भागात गोळे येणे असेही म्हणतात) येतात. अशा व्यक्तींना त्वरीत पाणी, लिंबू शरबत, नारळाचे पाणी दिल्याने पेटके जातात.
4) भोवळ/ चक्कर येणे:- अनेक जणांना उन्हात गेल्यावर अचानक भोवळे येते. अशा वेळी ती व्यक्ती एकदब पांढरीफट्ट पडते. रक्तदाब कमी होतो व एकदम भोवळ येऊन व्यक्ति खाली कोसळते.
5) उन्हामुळे तीव्र भकवा:- उन्हामुळे शरीरावर पडणाऱ्या ताणातून घामाद्वारे शरीरातील पाणी व क्षार मोठ्या प्रमाणावर शरीराबाहेर गेल्याने ही स्थिती उद्भवते. यामध्ये सहसा ताप येत नाही. काही रुग्णांमध्ये सौम्य ताप येतो. अशा रुग्णांमध्ये चक्कर येणे, थकवा ही लक्षणे दिसून  येतात. वयस्कर व्यक्तींना जास्त त्रास जावणतो. भरपूर पाणी, सरबत ,योग्य आहार देऊनही सुधारणा होत नसल्यास अशा रुग्णांना रुग्णालयात दाखल  करण्याची आवश्यकता असते.
उन्हाळयात उन्हाच्या त्रासापासून, उष्माघातापासून आपला बचाव करण्यासाठी प्रत्येकाने स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. याबाबत काय काळजी घ्यावी ? काय करावे? काय करु नये ? याबाबत शासनाने जनजागृतीपर खालीलप्रमाणे मार्गदर्शक निर्देश दिले आहेत.
काय करावे
1) तीव्र  उन्हात प्रामुख्याने दुपारी 12 ते 3 च्या दरम्यान बाहेर पडणे टाळावे.
2) पुरेसे पाणी पित रहाणे.
3) फक्त हलक्या रंगाच्या सुती कपड्यांचा वापर करावा.
4) मद्य, चहा, कॉफी व कार्बोनेटेड शीतपेये घेण्याचे टाळावे
5) घराबाहेर पडतांना छत्री, टोपी, गॉगलचा वापर करावा.
6) शीळे अन्न खाणे टाळावे.
7) उन्हात काम करत असतांना आपला चेहरा व डोके ओल्या कपड्याने झाकावे.
8) चक्कर येत असल्यास किंवा आजारी वाटल्यास त्वरीत डॉक्टारांकडे जावे.
9) ओ.आर.एम (क्षार संजीवनी), ताक, लिंबुपाणी, इत्यादी घरगुती शीतपेयांचे भरपूर सेवन करावे.
10) प्राण्यांना सावलीत ठेवून त्यांना भरपूर पाणी प्यायला द्यावे.
काय करु नये
1) दुपारी 12 ते 3 या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे.
2) गडद, घट्ट व जाड कपडे घालणे टाळावे.
3) बाहेर तापमान अधिक असल्यस शारिरीक श्रमाची कामे टाळावीत.


उष्णतेच्या लाटेमुळे आजारी पडलेल्या व्यक्तीची घ्यावयाची काळजी :
1) अशा व्यक्तीला थंड जागी ठेवा. शरीराचे तापमान खाली आणण्यासाठी प्रयत्न करा. ओल्या कपडयाने त्यांना पुसत रहा. डोक्यावर थंड पाणी टाका.
2) व्यक्तीला ओ.आर.एम (क्षार संजीवनी), ताक लिंबूपाणी इ. घरगुती शातपेये द्या.
3) व्यक्तीला ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जा. त्वरीत हॉस्टिलमध्ये दाखल करून उपचार सुरु करणे गरजेचे आहे. कारण उष्माघात घातक ठरु शकतो.

उन्हाळयातील  विशेषत : ग्रीष्म ऋतूतील आहार :-
          स्वस्थ्य आयुर्वेद चिकित्सालय, पुणे यांनी त्यांच्या "स्वास्थ्य आयुर्वेद पत्रिका" मध्ये एप्रिल व मे महिन्यात आहार कसा असावा याची छान उद् बोधक माहिती दिली आहे. त्याचे ऋणानिर्देश नमूद करून ही माहिती वाचकांसाठी येथे देत आहे.
          उन्हाळ्यात अधिक मात्रेत पेय (पातळ) पदार्थ शरीरात घेतले जात असल्याने भूक कमी होते. अशावेळी उष्णता, रुक्षता कमी करणारा व पचायला हलका असा  आहार आवश्यक असतो. आंबट, खारट व तिखट चवीचा आहार शरीरातील उष्णता वाढवतो  व कडू, तुरट चवी शरीरातील कोरडेपणा  वाढवतात. म्हणून ग्रीष्म ऋतूत मुख्यत्वे मधून पण हलक्या , स्न्ग्धि, थंड गुणाच्या व द्रव (पातळ) अशा आहाराचे सेवन करावे. मधुर रसाचे पदार्थ हे हलक्या गुणाचे असणे आवश्यक आहे तरच  ऋतूत पचन सुयोग्य होते. म्हणून मिठाई, पंचपक्वाने, बासुंदी, लस्सी तसेच पराठा, पोळी अशा स्वरुपातील पदार्थ अयोग्य ठरतात म्हणून टाळावेत.
          या ऋतूत सर्वश्रष्ठ धान्य म्हणजे चवीला मधुर गुणाला स्निग्ध, शीतल व पचायला हलका असा तांदुळ होय. परंतु, भाताला पुलाव, बिर्याणी असे कोणतेही अन्य रुप देऊ नये. असा भात पचायला जड असतो. वरणभात, आमटी भात, ताकभात, दहीभात, दुधभात, तुपभाप हे प्रकार अधिक उपयुक्त ठरतात. ज्वारीची भाकरी , लोणी , तूप , दुध भाज्यांबरोबर खावी. बाजरी उष्ण असल्याने टाळावी. पोळी शक्यतो टाळावी. अगदीच शक्य नसल्यास गव्हाचा अग्नीवर भाजलेला फुलका खावा.
          सर्व कडधान्ये कडू, तुरट चवीची असल्यने वायुतत्व वाढवतात, शरीरातील रुक्षता वाढवितात. कडधान्ये ही वरण, आमटी स्वरुपात घेणे योग्य राहील. मूग पचायला हलके असल्यने त्याचा वापर करण्यात यावा. कडू, तिखट, तुरट, चवीच्या भाज्या (उदा. कारली, माठ,मेथी इ. ) या ऋतूत टाळाव्यत. मधुर चवीच्या पडवळ, तोडली, भेंडी, दोडका, घोसाळी, दुधी फलॉवर, लाल भोपळा, पालक चाकवत, चुका या भाज्य ग्रीष्म ऋतूत उपयुक्त ठरतात.        
          दुध, लोणी, ताक, तुप असे मधुर, स्निग्ध, शीत व हलके पदार्थ या ऋतूत खावेत, मात्र हे सर्व पदार्थ फ्रिजमध्ये ठेवून अति थंड केलेले नसावेत. मेवा,मिठाई, खवा, आटवलेली खीर, बासुंदी असे जड पदार्थ टाळावेत.
          अशा उष्ण ऋतूत गरम मसाले, तिखट व मिरच्या कमीत कमी प्रमाणातच वापराव्यात. धने, जिरे, कोथिंबीर, हळद हे मसाले वापरण्यास हरकत नाही. आले, लसूण, मिरी, लवंग, दालचिनी, हिंग असे गरम मसाले टाळावेत. कैरीचे पन्हे, सरबत, शहाळयाचे पाणी, निरा हे थंड पेयं उपयुक्त आहेत. सरबतात वाळा, चंदन, गुलाब, कोकम अशी शीत गुणाची द्रव्ये, चुर्णे व भरपुर साखर टाकल्याने ती अधिक फलदायी ठरतात. पिण्याचे पाणी शक्यतो माठात ठेवावे. त्यात वाळा, चंदन, गुलाब किंवा कापूर अशा पदार्थांचे अर्क किंवा चूर्ण टाकून त्याला अधिक शीतल करवे. फळांमध्ये य ऋतूत पूर्णपर्ण परिपक्व आंबा उत्तम.  आमरसाने शरीराची तहान कमी होते. मात्र आंब्याला, आमरसाला फ्रिजमध्ये ठेवून खाऊ नये. त्यामुळे अपचन होऊन विविध व्याधी होतात.
          उन्हाळ्यात तिखट, मिठाचे, गरम मसाल्याचे पदार्थ पूर्णपर्ण टाळावे. लोणची मसालेदार पापड, हॉटेलमधील भाज्या, आंबट फळाचे ज्यूस व सरबते पर्णपणे टाळावीत. या ऋतूत मद्य (उष्ण स्वभावाचे असल्याने ) पिणे टाळावे. दही घालून केलेल्या निरनिराळ्या कोशिंबीरी/ रायती या ऋतूत योग्य ठरतील या ऋतूत आहारात कांदा अवश्य वापरावा.
          आहरासोबतच या ऋतूत विहार सुध्दा फार महत्वाचा घटक आहे. उन्हाळयात अधिक प्रामणात धावपळ करु नये. व्यायामदेखील साधासुधा हलका फुलका असाच असावा. घरामध्ये गारवा निर्माण्‍ करण्यासाठी घरात कमीतकमी ऊन येईल अशी व्यवस्था करावी. खिडक्यांना जाड पडदे/ कागद लावून घरात अंधार करावा. शक्य असल्यास वाळयाचे पडदे लावून त्यावर पाणी शिंपडून गारवा निर्माण करावा. अंगावर पांढरे, सैलसर, सुती कपडे घालावेत.डोळयंसाठी गॉगल वापरावा. डोक्यावर टोपी, फेटा, छत्री यांचा वापर करावा. अशा प्रकारे आहार, विहाराची नीट काळजी घेतली तर आपला उन्हाळा नक्कीच सुसह्य होईल.
*********

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...