Thursday, May 14, 2020


वैद्यकीय पथकांच्या प्रयत्नांमुळे मोठा दिलासा :  
नांदेड शहरातील 26 रुग्ण कोरोनामुक्त...
गुरुवारी नवीन तीन रुग्ण पॉझिटिव्ह 
नांदेड, (जिमाका) दि. 14 :- नांदेड शहरातील विविध भागात व गुरुद्वारा परिसरात एकूण 66 रुग्ण कोरोना आजाराने बाधित असतांना या रुग्णांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकांच्या अथक प्रयत्नांमुळे यात्री निवास नांदेड येथील 22 व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील 3 रुग्ण हे कोरोना आजारातून आज मुक्त झाली आहेत. नांदेड जिल्हा कोरोना मुक्त करण्यासाठी होत असलेल्या या प्रयत्नांना मोठे यश मिळत असून आतापर्यंत कोरोनामुक्त एकुण 26 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. कोरोनामुक्त होऊ परतणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने नांदेड जिल्ह्यासाठी ही दिलासा देणारी बाब असून यशस्वी उपचारामुळे कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत पुढे वाढ होण्यास मदत होणार आहे.     
कोरोना विषाणु संदर्भात गुरुवार 14 मे रोजी  सायं. 5 वा. प्राप्त 126 अहवालानुसार यात्री निवास कोविड केअर सेंटर येथील नवीन 3 रुग्ण पॉझिटिव्ह आढळली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर 121 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला असून 2 स्वॅब तपासणी अहवाल नाकारण्यात आला आहे.
नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत प्रवासी, प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे 1 लाख 5 हजार 942 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून यातील 2 हजार 302 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी 1 हजार 999 स्वॅब तपासणीचा अहवाल हा निगेटिव्ह आला असून 200 व्यक्तींचा अहवाल प्रलंबित आहे. यात आतापर्यंत घेतलेल्या स्वॅबपैकी एकुण 66 रुग्णांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
उर्वरीत पॉझिटिव्ह 8 रुग्णांवर डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड व ग्रामीण रुग्णालय बारड धर्मशाळा कोविड केअर सेंटर येथे एका रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. पंजाब भवन कोविड केअर सेंटर आणि यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे 24 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे पॉझिटिव्ह 5 रुग्णांचा मृत्यू झाला असून हे रुग्णांना रक्तदाब, मधुमेह या आजाराने बाधित होते. या आजाराने बाधित रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी.
नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जनतेनी मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये व अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडता नांदेड जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा, जेणेकरुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास या ॲपद्वारे सतर्क राहण्यास मदत मिळेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
नांदेड जिल्हा कोरोना विषाणू संसर्गाबाबत माहिती  
आत्तापर्यंत एकूण संशयित – 2224, क्वारंटाईन कालावधी पूर्ण – 791, अजून निरीक्षणाखाली असलेले – 114, पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये – 115, घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले - 1204
एकुण नमुने तपासणी- 2302, एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 66, पैकी निगेटीव्ह – 1999, नमुने तपासणी अहवाल आज बाकी- 200, नाकारण्यात आलेले नमुने – 8, अनिर्णित अहवाल – 28, कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 5, जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी 105942 त्यांना त्यांच्या घरी राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.
00000




पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या संकल्पनेतून
कोविड मोटार सायकल, ड्रोन पेट्रोलिंगला सुरुवात
पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनापासून बचाव होणार
-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
      
नांदेड, (जिमाका) दि. 14 :- कोविड मोटार सायकल, ड्रोन पेट्रोलिंगला सुरुवात केल्यामुळे कोविड पेट्रोलिंगमुळे कंटेनमेन्ट झोनमध्ये लागणारा पोलीस बंदोबस्त कमी होवून पोलीसांवरील झोनचा ताण कमी होणार असून पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचा कोरोना विषाणू संक्रमनातून बचाव होणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
 कोरोना विषाणूने पोलीस अधिकारी, कर्मचारी संक्रमित होवू नये या दृष्टीकोनातून नांदेड शहरातील कंटेनमेन्ट झोनमध्ये मोटार सायकलवर कोविड पेट्रोलिंगच  जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करुन पेट्रोलिंगला सुरुवात करण्यात आली आहे. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन बोलत होते.
यावेळी पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर म्हणाले, या कोविड पेट्रोलिंगमुळे पोलीसांवरील बंदोबस्ताचा ताण कमी होणार असून ही मोटार सायकल कंटेनमेन्ट झोनमध्ये पेट्रोलिंगकरुन जनतेमध्ये कोरोना विषाणूसंदर्भाने जनजागृती करतील कोणीही घराबाहेर निघणार नाही याबाबत पेट्रोलिंगदरम्यान लक्ष ठेवतील. कोविड पेट्रोलिंगसाठी प्रायोगिक तत्वावर सद्या 10 मोटार सायकली सुरु करण्यात आल असून लवकरच नांदेड शहरात कोविड पेट्रोलिंगसाठी सुसज्ज अशा एकूण 32 मोटार सायकली सुरु करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. तसेच अत्याधुनिक ड्रोनच्या सहाय्याने कंटेनमेन्ट झोनमध्ये जनतेवर नजर ठेवून विनाकारण बाहेर फिरणाऱ्या लोकांचे व्हिडीओ चित्रीकरण फोटो काढणार आहे. कोविड पेट्रोलिंग ड्रोनमुळे पोलीस दलावरील बंदोबस्ताचा ताण कमी होणार असल्याचे सांगितले आहे.
मोटार सायकल पेट्रोलिंगसोबतच कंटेनमेन्ट झोनमध्ये आधुनिक ड्रोनच्या सहाय्याने नजर ठेवली जाणार आहे. नांदेड शहरातील पिरबुऱ्हाननगर, अबचलनगर, गुरुद्वारा परिसर रहमतनगर, रविनगर कौठा, सिध्दार्थनगर करबला येथे कोरोना विषाणू संक्रमित रुग्ण आढळल्याने हे ठिकाणे लगतचा परिसर महानगरपालीका आयुक्त यांनी पूर्णत: सील करुन कन्टेनमेंट झोन म्हणून घोषित केला आहे.
नांदेड जिल्हयात कोरोना संक्रमित रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. नांदेड शहरातील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या आरोग्याची तसेच कोरोना विषाणूने पोलीस अधिकारी कर्मचारी संक्रमित होवू नये या दृष्टीकोनातून पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांचे संकल्पनेतून नांदेड शहरातील कंटेनमेन्ट झोनमध्ये मोटार सायकलवर कोविड पेट्रोलिंगची सुरुवात करण्यात आली आहे. तसेच मोटार सायकल पेट्रोलिंगसोबतच कंटेनमेन्ट झोनमध्ये आधुनिक ड्रोनच्या सहाय्याने नजर ठेवली जाईल.
कोविड पेट्रोलिंग मोटार सायकलचे वैशिष्टय
ही मोटार सायकल पी. ए.सिस्टीम, लाईट, सायरन, फेस शिल्ड हेल्मेट, लाठी, हॅडग्लाव्हज, एन-95 मास्क, सॅनिटायझरसह सुसज्ज असून नांदेड शहरातील (6) पोलीस स्टेशन हद्दीतील कंटेनमेन्ट झोनमध्ये ही मोटार सायकल कार्यरत राहिल. मोटार सायकलवर दोन पोलीस कर्मचारी सतत पेट्रोलिंग करतील. पेट्रोलिंग दरम्यान पी. ए. सिस्टीमव्दारे नागरीकांना सतत कोरोना विषाणू आजाराबाबत जनजागृती करुन त्यांना घरातच राहणेबाबत कळवतील.
अत्याधुनिक ड्रोनचे वैशिष्टय
नांदेड शहरातील कंटनेमेन्ट झोनमध्ये कोविड पेट्रोलिंगसोबतच आधुनिक असलेल्या ड्रोनच्या सहाय्याने लोकांवर नजर ठेवली जाईल. या ड्रोनमध्ये पी.ए.सिस्टीम, अत्याधुनिक कॅमेरा आहे. ड्रोन हा विनाकारण बाहेर फिरणाऱ्या लोकांचे व्हिडीओ चित्रीकरण छायाचित्रे काढून कोविड पेट्रोलिंगला लागलीच कळविणार आहे.
कोविड मोटार सायकल पेट्रोलिंगच्या मोटार सायकली तयार करण्यासाठी पोलीस निरीक्षक मंगेश पाटील यांनी परिश्रम घेतले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, दत्ताराम राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत फस्के, धनंजय पाटील, सिध्देश्वर धुमाळ, पोलीस निरीक्षक व्दारकादास चिखलीकर, साहेबराव नरवाडे, कर्मचारी उपस्थित होते.


 00000000


  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...