Wednesday, November 14, 2018


शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि. 14 :  महाराष्ट्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या पुरस्कारांसाठी 5 ते 25 नोव्हेंबर दरम्यान ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावयाचे आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय स्तरावरील पदक विजेते पुरुष व महिला खेळाडू, साहसी उपक्रम, दिव्यांग खेळाडूंसह क्रीडा मार्गदर्शक यांच्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख 5 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2018 अशी ठेवण्यात आली आहे.
अर्जदारांनी विहीत नमुन्यात अर्ज ऑनलाईन पध्दतीने सादर करून त्याची एक प्रत जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत प्रतिवर्षी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्याची योजना कार्यान्वित असून राज्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू, साहस उपक्रम, दिव्यांग खेळाडूंसह संघटक/ कार्यकर्ते, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, महिला मार्गदर्शक व संघटक/ कार्यकर्ती यांच्यासाठी जिजामाता क्रीडा पुरस्कार तसेच ज्येष्ठ क्रीडा महर्षीकरिता शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
सन 2017-18 या वर्षासाठी मान्यताप्राप्त खेळांच्या अधिकृत राज्य संघटनेमार्फत त्या त्या आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय स्तरावरील कनिष्ठ व वरिष्ठ गटातील पदक विजेते पुरुष व महिला खेळाडू, साहसी उपक्रम दिव्यांग खेळाडूंसह संघटक/ कार्यकर्ते, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, महिला मार्गदर्शक व संघटक/ कार्यकर्ती यांच्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज संबंधित राज्य संघटनेच्या कार्यकारिणीच्या ठरावासह दि. 25 नोव्हेंबर 2018 पर्यंत अर्जदाराने आपल्या कामगिरीचा तपशील देऊन विहित नमुन्यात अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.mumbaidivsports.com या वेबसाईटवर उपलब्ध करुन दिलेल्या लिंकवर अर्ज सादर करावा. तसेच ऑनलाईन अर्जाची एक प्रत अर्जदाराने संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात 27 नोव्हेंबर पूर्वी स्वयंसाक्षांकित प्रमाणपत्रांसह सादर करावी. तर उर्वरित पुरस्काराच्या अर्जदारांनी 5 डिसेंबर 2018 पूर्वी सादर करावी.
अधिक माहितीसाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे संबंधित विभागाचे विभागीय उपसंचालक अथवा जिल्हा क्रीडा अधिकारी यांना संपर्क साधावा.
00000



अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेचे
सुधारीत वेळापत्रक जाहीर
नांदेड दि. 14 :- (शिकाउ उमेदवारी योजना) 108 वी अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेचे सुधारीत वेळापत्रक प्राप्त झाले असून परिक्षा सोमवार 17 डिसेंबर 2018 पासून सुरु होणार आहे, असे आवाहन केंद्राचे अंशकालीन प्राचार्य जी. जी. पाटनूरकर यांनी केले आहे.
ही परीक्षा 17 ते 29 डिसेंबर या कालावधीत होणार असून प्रात्यक्षीक परीक्षा 17 ते 19 डिसेंबर व अभियांत्रिकी चित्रकला 20 डिसेंबर रोजी होणार आहे. लेखी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने 27 ते 29 डिसेंबर दरम्यान होणार आहे. परीक्षेचे हॉल तिकीट संबंधीत परीक्षार्थ्यांनी 7 डिसेंबर 2018 रोजी संबंधीत आस्थापनेच्या लॉगीन आयडीवरुन प्राप्त करुन घ्यावेत. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी बी.टी.आर.आय. केंद्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे संपर्क साधावा,  अशी माहिती नांदेड औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्राचे अंशकालीन प्राचार्य यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
000000


वृद्ध कलावंतानी मानधनासाठी
बँक खात्याची माहिती दयावी
नांदेड दि. 14 :- वृद्ध कलावंत लाभार्थ्यांना मानधन थेट त्यांच्या खात्यावर जमा केले जात आहे. त्यासाठी वृद्ध कलावंताच्या बँक खात्याचा 12 / 18 अंकी खाते क्रमांक व बँक शाखेचा आयएफएस कोड अनिवार्य आहे. यासाठी लाभार्थ्यांच्या बँक खात्याचे पासबूकची सत्यप्रत सहायक संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय औरंगाबाद यांचेकडे त्वरीत पाठवावी, असे आवाहन सहायक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय औरंगाबाद यांनी केले आहे. काही वृद्ध कलावंत लाभार्थ्यांचे बँकेचे खाते क्रमांक किंवा शाखा क्रमांक चुकीचे असल्याने या लाभार्थ्यांचे मानधन बँक खात्यावर ऑनलाईन जमा करण्यास अडचण येत आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. 
00000


महिला लोकशाही दिनी
अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 14 :- समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी सोमवार 19 नोव्हेंबर 2018 रोजी महिला लोकशाही दिनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. सोमवार 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमुद संबंधीत विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000


पीओएसद्वारे केरोसिनचे वितरण
576 के. एल. केरोसीन बचत
  नांदेड दि. 14 :- केरोसिनची विक्री पीओएस मशीनद्वारे व हमीपत्र, घोषणापत्राशिवाय वितरीत करण्‍यात येणार नाही. जिल्‍ह्यातील तहसिल कार्यालयाकडून केरोसीन लाभधारकांना दिलेल्‍या गॅस जोडणी नसल्याबाबत हमीपत्रांच्‍या संख्‍येनुसार तालुक्‍याची केरोसीन मागणी निश्‍चीत होत आहे. त्‍याआधारे तालुक्‍याना ऑक्‍टोंबर पासून केरोसीन नियतन देण्‍यात येत आहे. ऑक्‍टोंबरमध्‍ये नांदेड जिल्‍ह्याचे 144 के.एल तर नोव्‍हेंबर मध्‍ये 432 के.एल असे एकूण 576 के.एल केरोसीन बचत झाले, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी‍ दिली आहे.
अन्‍न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या निर्देशानुसार तहसिलदार यांच्याकडून गॅसधारक शिधापत्रिकांवर स्‍टॅम्पिंग करण्‍याबाबत व पात्र शिधापत्रिकाधारकांची कुटुंबातील सदस्‍यांसह आधार क्रमांक नोंद करुन अद्यावत शिधापत्रिकाधारक यादी 30 नोव्हेंबर 2018 पर्यंत सादर करण्‍याची कार्यवाही होणार आहे.
जिल्ह्यात शिधापत्रिकेला आधार क्रमांक लिंक करण्याचे काम एप्रिल 2018 पासून सुरु झाले आहे. हे काम सुरु झाल्‍यापासून दुबार, मयत, स्‍थलांतरीत आदी कारणामुळे 93 हजार 759 शिधापत्रिका डिलिट करण्‍यात आल्‍या आहेत. आधार सिडींगमुळे शिधाप‍त्रिकाधारक राज्‍यात एकाच ठिकाणाहन धान्‍य उचल करु शकतो. त्यामुळे लाभधारकाचे नाव राज्‍यात एकापेक्षा जास्‍त शिधापत्रिकेत राहणार नाही.
केरोसिन लाभधारकांकडून गॅस जोडणी नसल्याबाबत हमीपत्र दुकाननिहाय मोजून घेतल्‍यानंतर या हमीपत्राच्‍या संख्‍येच्‍या आधारे नियतनाची मागणी तहसिलदार यांच्याकडून जिल्‍हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे नोंदविण्यात येणार आहे. अनुदानित केरोसिनचे वितरण केवळ आधार क्रमांक सादर केलेल्‍या बिगरगॅस जोडणी शिधापत्रिकाधारकांना त्‍यांनी सादर केलेल्‍या गॅस जोडणी नसल्याबाबतच्‍या  हमीपत्राच्‍या सत्‍यतेची खात्री करूनच करण्‍यात येईल. रास्‍तभाव दुकानातील पीओएस मशीनद्वारे कुटुंबातील कोणत्‍याही एका सदस्‍याचेही आधार प्रमाणिकरण झाले असल्‍यास केरोसिन वितरण होईल.
शिधापत्रिकेवरील माहिती पीओएस मशिनवर उपलब्‍ध नसल्‍यास आधार नोंदणीची प्रत कुटुंबातील प्रत्‍येक सदस्‍याकडून प्राप्‍त करून घेऊन केरोसिन वितरण केले जाईल. परंतु हा पर्याय एकदाच वापरण्‍यात येईल. ही माहिती दुकानदाराने तात्‍काळ तहसिल कार्यालयास कळवावी. ज्‍या रास्‍तभाव दुकानांमध्‍ये पीओएस DEVICE ला नेटवर्क उपलब्‍ध नाही त्‍या दुकानामधून पात्र लाभार्थ्‍यांना केरोसिनचे वितरण प्रचलित पद्धतीनेच करण्‍यात येईल. परंतू त्‍यासंदर्भात शिधापत्रिकाधारकाकडून आधार क्रमांक उपलब्‍ध करून घ्‍यावे. केरोसिन विक्री पावतीवर लाभार्थ्‍यांचे नाव, आधार क्रमांक व शिधापत्रिकेचा क्रमांकाची नोंद घ्‍यावी आणि केरोसिन विक्री पावतीवर लाभार्थ्‍यांची स्‍वाक्षरी घ्‍यावी. शिधापत्रिकाधारकानी केरोसीन मिळण्यासाठी गॅस जोडणी नसल्याबाबत भरुन दिलेल्‍या हमीपत्रकातील माहिती चुकीची निघाल्‍यास किंवा सदर माहिती खेाटी असल्‍याचे आढळून आल्‍यास संबंधीत  लाभधारकाविरूध्‍द जीवनावश्‍यक वस्‍तु अधिनियम 1955 तसेच भारतीय दंड संहितेतील तरतुदीनुसार कारवाई होईल.
स्‍थानिक गॅस एजन्‍सीनी गॅसजोडणी लाभार्थ्‍यांची यादी संबंधित तहसिलदार (पुरवठा शाखा) यांना पाठवावी व ही यादी तहसिलदार यांनी संबंधित रास्‍तभाव दुकानदार / केरोसिन विक्रेत्‍यांना उपलब्‍ध करुन द्यावी. स्‍थानिक एजन्‍सीनी गॅसधारकांची यादी उपलब्‍ध करुन न दिल्‍यास संबंधितांविरुध्‍द जीवनावश्‍यक वस्‍तु अधिनियमांतर्गत कारवाई होईल. याची नोंद जिल्ह्यातील रास्‍तभाव दुकानदार, किरकोळ केरोसीन विक्रेते, शिधापत्रिकाधारक व गॅस एजन्‍सीधारकांनी  घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.   
000000


अनुसूचित जातींच्या स्वयंसहय्यता बचत गटांना
90 टक्के अनुदानावर मिन ट्रॅक्टरची योजना
नांदेड दि. 14 :- अनुसूचित जातींच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टरची योजनेसाठी शासन निर्णयातील तरतुदींची पूर्तता करणाऱ्या स्वयंसहाय्यता बचत गटांनी परिपूर्ण अर्ज संपूर्ण कागदपत्रांसह शुक्रवार 30 नोव्हेंबर 2018 पर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय नांदेड येथे सादर करावेत, असे आवाहन नांदेड समाज कल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे अनुसूचित जाती व नवबौद्ध  घटकांच्या  स्वयंसहाय्यता बचतगटांना 90 टक्के अनुदानावर  9 ते 18 अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना कार्यान्वित झाली आहे. शासन निर्णय 8 मार्च 2017 अन्वये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या  स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्यासाठी लाभाचे हस्तांतर रोख स्वरुपात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
या योजनअंतर्गत पात्रतेचे निकष पुढील प्रमाणे आहेत. बचत गटांतील  सर्व सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावेत. एकूण सदस्यांपैकी 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जातीचे असावेत. तसेच अध्यक्ष व सचिव हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत. सक्षम अधिकाऱ्यानी दिलेले सर्व सदस्यांचे जातीचे प्रमाणपत्र व रहिवाशी प्रमाणपत्र असावेत. बचतगटाची नोंदणी सक्षम अधिकाऱ्याकडून केलेली असावी. बचत गटाचे खाते हे राष्ट्रीयकृत बँकेत असावे व त्या गटातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड हे त्या खात्यास सलग्न केलेले असावेत. सर्व सदस्यांची बँकेने प्रमाणित केलेली यादी असावी. या योजनेअंतर्गत लाभार्थी बचतगटांची निवड झाल्यानंतर बचत गटाने Ministry of Agriculture and Farmers  Welfare Deparment of Agriculture, Co- operation and Farmers Welfare. यांनी निर्धारित केल्यानुसार मिनी ट्रॅक्टर व  त्याची उपसाधने ह फार्म मशिनरी, ट्रेनिंग आणि टेस्टिंग इंस्टीटयूट  यांनी टेस्ट करुन जाहीर केलेल्या उत्पादकांच्या यादीतील परिमाणानुसार असावीत. तसेच निवड झालेल्या लाभार्थी बचत गटाने परिमाणानुसार मान्यता प्राप्त उत्पादकाकडून मिनी ट्रॅक्टर / ट्रॅक्टर व त्याची उपसाधने शासनाने निर्धारित केलेल्या किमतीपर्यंत खरेदी करणे आवश्यक आहे. मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा  3 लाख 50 हजार  इतकी राहील. स्वयंसाह्यता बचतगटांनी वरील कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या किंवा प्रत्यक्ष साधनाच्या किमतीच्या 10 टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर प्रत्यक्ष किमतीच्या 90 टक्के (कमाल 3 लाख 15 हजार रुपये ) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील. एकूण किमतीच्या 10 टक्के स्वहिस्सा भरण्याचे हमीपत्र व गटातील कोणत्याही सदस्याने यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नाही असे हमीपत्र अर्जासोबत जोडावे. आरटीओ कार्यालयातील नोंदणी बचत गटाने स्वतः करून घेण्याचे हमीपत्र शंभर रुपये ाँडवर असावे. इतर अटीं व शर्ती तसेच विहित नमुन्यातील अर्ज समाज कल्याण कार्यालयाच्या सूचना फलकावर डकविण्यात आलेला आहे. बचतगटाने परिपूर्ण अर्ज सादर करावे. त्रुटीयुक्त अर्ज सादर करू नयेत. त्रुटी पूर्ततेसाठी कोणत्याही प्रकारची संधी दिली जाणार नाही.
वरील अटीं शर्तीची तसेच शासन निर्णयातील तरतुदींची पूर्तता करणाऱ्या स्वयंसहाय्यता बचत गटांनी परिपूर्ण अर्ज संपूर्ण कागदपत्रांसह शुक्रवार 30 नोव्हेंबर पर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय नांदेड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ज्ञानमाता शाळेसमोर नांदेड येथे सादर करावा. यापूर्वी निवड न झालेल्या बचतगटानी नव्याने अर्ज करणे आवश्यक आहे. यापूर्वी सादर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असेही आवाहन केले आहे.
000000


दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचा दौरा
नांदेड दि. 14:- राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
शुक्रवार 16 नोव्हेंबर 2018 रोजी श्री गुरुगोविंदसिंघजी विमानतळ नांदेड येथे सकाळी 10.30 वा. आगमन व शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. सकाळी 11 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून साहिबजादा बाबा फत्तेसिंघजी मंगल कार्यालय हर्षनगर नांदेड येथील कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. दुपारी 1.30 वा. महात्मा फुले शिक्षक संघटनेसोबत बैठकीस उपस्थिती. दुपारी 2.15 वा. गुरुगोविंदसिघजी विमानतळ नांदेडकडे प्रयाण. दुपारी 3.20 विमानाने हैद्राबादकडे प्रयाण करतील.
000000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...