Wednesday, February 7, 2024

वृत्त क्र. 114

 तत्पर व युध्दपातळीवरील आरोग्य यंत्रणेच्या सतर्कतेमुळे विष बाधेतील बाधित रुग्णांची प्रकृती स्थिर

▪️जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागाशी समन्वय साधत तातडीने उपचाराचे केले नियोजन
▪️लोहा तालुक्यातील अन्न विषबाधित झालेले सर्व रुग्ण सुखरुप
  • कोणतीही जीवीतहानी नाही
नांदेड (जिमाका) दि. 7 :- लोहा तालुक्यातील कोष्ठवाडी येथे संत बाळूमामा यांच्या सप्ताह कार्यक्रमाच्या प्रसादातून सुमारे 2 हजार भाविकांना मंगळवारी 6 फेब्रुवारी रोजी अन्न विषबाधा झाली होती. जिल्हा प्रशासनाने तातडीने धाव घेवून आरोग्य विभाग, शासकीय वैद्यकीय रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, लोहा येथील उपजिल्हा रुग्णालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय येथे रुग्णांना तातडीने हलवून युध्द पातळीवर उपचार केले. मध्यरात्रीनंतर अचानक रुग्णांची संख्या लक्षात घेवून कुठेही न डळमळता आरोग्य विभागाने रुग्णांवर केलेले उपचाराचे व्यवस्थापन हे महत्वाचे ठरले. तात्काळ सर्व रुग्णांना रुग्णालयात हलविल्या मुळे कोणतीही जीवीत हानी न होता सर्व रुग्णांना या विषबाधेतून बाहेर काढण्यात आरोग्य विभागाला यश आल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.
सद्यस्थितीत दि. 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वा. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुमारे 19 रुग्ण, जिल्हा रुग्णालय नांदेड येथे 60, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयात 50, लोहा येथील उपजिल्हा रुग्णालयात 70 व खाजगी रुग्णालयात सुमारे 150 रुग्ण असे सुमारे 500 रुग्ण उपचार घेत आहेत. उर्वरित सर्व रुग्णांवर उपचार होवून ते सुखरुप असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. विष बाधा झाल्याचे तात्काळ प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने शीघ्र कृती पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या घटनेची शहानिशा करून आरोग्य विभागाला अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती डॉ. भोसीकर यांनी दिली.
कोष्ठवाडी येथे संत बाळूमामा यांच्या सप्ताह निमित्ताने भरवण्यात आलेल्या यात्रेमध्ये 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजेनंतर प्रसाद वाटप करण्यात आला. त्यानंतर सुमारे 2 हजार भाविकांना 7 फेब्रुवारी रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास अन्न विषबाधा झाल्याचे प्राथमिक अहवालात आढळलेले आहे. या रुग्णांना मळमळ, उलटी, संडास अशी लक्षणे दिसून आल्यानंतर काही रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय, लोहा येथे दाखल करण्यात आले.
दिनांक 6 फेब्रुवारी च्या मध्यरात्रीनंतर म्हणजेच दि. 7 फेब्रुवारीच्या पहाटे डॉ. शंकराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे सुमारे 600 रुग्णांना, श्री गुरु गोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयात 100 रुग्णांना, उपजिल्हा रुग्णालय लोहा येथे 150 रुग्णांना, प्राथमिक आरोग्य केंद्र, माळाकोळी येथे 20 रुग्णांना, डॉ. पवार रुग्णालय, लोहा खाजगी येथे 50 रुग्णांना तसेच डॉ. धनवडे रुग्णालय लोहा येथे 100 रुग्णांना औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याचबरोबर काही रुग्ण हे स्वत: खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड येथे आरोग्य विभागाने अतिरिक्त खाटांची पूर्वतयारी करुन सर्व यंत्रणा सज्ज ठेवली.
रुग्णांना कोष्ठवाडी, सावरगाव, पोस्ट वाडी, रिसनगाव, मस्की या गावातून रुग्णालयात उपचारासाठी आणण्यासाठी टोल फ्री 102 क्रमांकाच्या 8 रुग्णवाहिका आणि टोल फ्री 108 क्रमांकाच्या 6 रुग्णवाहिका, खासगी 3 बसेस, 1 महामंडळ बस तसेच गावातील इतर प्रवासी वाहतूक वाहनांचा वापर करण्यात आला. रुग्णांवर औषधोपचारासाठी मुबलक औषधाचा साठा उपलब्ध होता. याचबरोबर खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित रुग्णांलयाना अतिरिक्त औषध साठ्याची पूर्तता करण्यात आली.
रुग्णांच्या पुढील तपासणीसाठी अन्न, पाणी आणि उलटीचे नमुने घेण्यात आलेले आहेत. आरोग्य विभाग जिल्हा परिषद नांदेड यांच्या मार्फत सदर गावामध्ये 5 आरोग्य पथके हे औषधोपचार, सर्वेक्षण यासाठी कार्यरत करण्यात आलेली आहेत. तसेच या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी शीघ्र कृती पथक स्थापन करण्यात आलेले आहे. डॉ. संतोष सूर्यवंशी (पीएसएम) अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. नांदेड (पथक प्रमुख), डॉ. नितीन अंभोरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड, डॉ. बालाजी माने (बाल रोग तज्ञ) जिल्हा रुग्णालय नांदेड, डॉ. तज्जमुल पटेल (भिषक) जिल्हा रुग्णालय नांदेड यांचा या पथकात समावेश आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन, वैद्यकीय महाविद्यालय, सार्वजनिक आरोग्य विभाग हे समन्वयाने कार्यरत आहेत.
00000



वृत्त क्र. 113

 महासंस्कृती महोत्सवामध्‍ये शिवकालीन

पारंपारीक खेळ सादर करण्‍याची खेळाडूंना संधी 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान प्रदानस्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठलुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धनतसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात लढवय्यांची माहिती इ.बाबी जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी, 2024 या कालावधीत पाच दिवसीय "महासंस्कृती महोत्सवाचे" आयोजन करण्याचे  शासनाचे निर्देश आहेत.

 

त्‍याअनुषंगाने नांदेड जिल्‍हामध्‍ये जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 15व 16 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पोलीस कवायत मैदान, वजिराबाद, नांदेड येथे महासंस्‍कृती महोत्‍सव अंतर्गत शिवकालीन पारंपारीक खेळाचे आयोजन करण्‍यात आलेले आहे. यामध्ये  खो-खो व कबड्डी या खेळामध्ये सन 2023-24 या वर्षातील शालेय तालुकास्तरावर 19 वर्षाआतील मुले-मुली संघनी प्रथम क्रमांक संपादन केलेल्या संघास संधी देण्यात येणार आहे.  कुस्ती या खेळ प्रकारासाठी 19 वर्षाआतील मुले-मुली खेळाडूंना आपली नांवे नोंदविता येईल व आटयापटया, लेझीम, लाठीकाठी, रस्सीखेच, गतका, लगोरी व मल्लखांब (पुरुष व महिला खुला गट) या खेळाचा समावेश करण्यात आला आहे.

 

या क्रीडा प्रकारात पारंगत असणाऱ्या जिल्हयातील जास्तीत जास्त खेळाडूंनी  13 फेब्रुवारी, 2024 पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज भरुन खेळाडूची/ संघाची प्रवेशिका ई-मेल आयडी dsonanded@rediffmail.com यावर किंवा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल नांदेड येथे प्रत्यक्ष सादर करावेत.

 

उक्‍त कालावधी नंतर प्राप्‍त प्रवेशअर्जाची छानणी होऊन समितीद्वारे अंतिम करण्‍यात येवूननिवडक खेळाडूं/ संघास "महासंस्‍कृती महोत्‍सवात" सहभाग घेता येईल. वैयक्तिक व सांघीक खेळ प्रकारात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक संपादन करणाऱ्या खेळाडू/ संघास रोख पारीतोषीक व सन्मानचिन्ह मान्यवरांच्या शुभ- हस्ते पुरुष व महिला गटात स्वतंत्र देण्यात येणार आहे असे महासंस्कृती महोत्सव समिती नांदेड तर्फे निवासी उपजिल्हाधिकारी व जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

0000

वृत्त क्र. 112

रस्ता सुरक्षा विषयी माहिती व प्रबोधनासाठी
जिल्ह्यात एलईडी वाहनाद्वारे जनजागृती


नांदेड (जिमाका) दि. 7 :- परिवहन विभागामार्फत रस्ता सुरक्षा अभियान 2024 हे 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अंतर्गत नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षा विषयक माहिती व प्रबोधन व्हावे यासाठी एलईडी वाहनांद्वारे रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती 11 फेब्रुवारीपर्यत करण्याचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांचे हस्ते नुकतेच या एलईडी वाहनांची फित कापून हे वाहन रवाना करण्यात आले. यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत, मोटार वाहन निरिक्षक विजयसिंह राठोड, श्रीमती भाग्यश्री देशमुख, श्रीमती रेणुका राठोड, सहा.मोटार निरिक्षक नितीन राख, केशव जावळे, सतीश भोसले, सचिन मगरे व लिपीक कर्मचारी राजेश गाजुलवाड, गजानन शिंदे, गजानन पवळे व इतर कर्मचारी उपस्थित होते. प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी नांदेड शहरासह जिल्हयातील सर्व तालुक्यामध्ये या वाहनाद्वारे प्रबोधन करण्यात येणार असल्याचे सांगितले.
0000




 वृत्त क्रमांक 111

अडचणीतल्या महिलांसाठी हक्काचा शासकीय आधार 


नांदेड (जिमाका) दि. 7 :-  महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत नांदेड शहरात माता अनुसया शासकीय महिला वसतिगृह (राज्यगृह) ही शासकीय संस्था अनाथनिराधारनिराश्रीत व अडचणीतल्या महिलांसाठी कार्यरत आहे. येथे 18 ते 60 वर्षापर्यंत निवाऱ्याची आवश्यकता असणाऱ्या निराधारविधवाकुमारी मातापरित्यक्ताअत्याचारीत महिलांसाठी विनाशुल्क अन्नवस्त्रनिवारासमुपदेशन व पुर्नवसनाची व्यवस्था केली जाते. त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाते. येथे आवश्यकतेनुसार कायदेशीर सल्ला व मदत दिली जाते. 

तसेच नियमित आरोग्य तपासणी केली जाते. 18 वर्षापुढील महिलांना मानसिकसामाजिकआर्थिकशैक्षणिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनविण्यासाठीपुनर्वसनाच्यादृष्टिने त्यांच्या विवाहकरीता संस्थेत सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. येथे शिक्षण व प्रशिक्षण घेत असलेल्या महिलांना आवश्यकतेनुसार प्रवेश दिला जातो. समस्याग्रस्त 18 वर्षापुढील महिलांनी संकटकाळी चुकीच्या मार्गाने न जाता समस्येचे निराकरण होईपर्यंत अल्प कालावधीसाठी या संस्थेत दाखल होण्याचा लाभ घ्यावा. प्रवेशाकरीता फोटोसह ओळखपत्र आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी कामकाजाच्या दिवशी दुपारी ते यावेळेत अधिक्षक माता अनुसया शासकीय महिला वसतिगृह (राज्यगृह) हॉटेल भाईजी पॅलेसच्या पाठीमागे शिवाजीनगर उड्डाणपुल परिसर शिवाजीनगर नांदेड येथे किंवा दुरध्वनी क्रमांक 02462-233044 येथे संपर्क साधावाअसे आवाहन शासकीय महिला राज्यगृहचे अधीक्षक वर्ग-एस. एम. पुजलवार यांनी केले आहे.

00000 

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...