Thursday, June 13, 2019

21 जून आंतरराष्‍ट्रीय योग दिन



            दिनांक 21 जून, 2019 रोजी आंतरराष्‍ट्रीय योग दिन मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. त्‍यानिमित्‍ताने नांदेड येथे राज्‍यस्‍तरीय योग दिन सोहळा साजरा होणार आहे.   सदर योग दिन साजरा करण्‍यासाठी दिनांक 10.06.2019 रोजी प्रधान सचिव, मा.मुख्‍यमंत्री कार्यालय यांनी व्‍हीडीओ कॉन्‍फरंसव्‍दारे सूचना दिल्‍या असून योग दिनानिमित्‍ताने निर्देश दिले आहेत.
            आंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्‍त यावर्षी नांदेडमध्‍ये आयोजित करण्‍यात आलेल्‍या राज्‍यस्‍तरीय कार्यक्रमास मुख्‍यमंत्री देवेद्र फडणवीस उपस्थित राहणार असून योगसत्राचे संचालन स्‍वामी रामदेव बाबा करणार आहेत.
            स्‍वस्‍थ महाराष्‍ट्र या संकल्‍पनेवर आधारित या कार्यक्रमास पंतजली योगपीठाचे सहकार्य मिळणार आहे. अंदाजे एक लक्ष एवढया लोकांना एकाच वेळी योगासने करता येतील अशी व्‍यवस्‍था मौ.असर्जन, नांदेड येथील 32 एकर शासकिय जमिनीवर करण्‍यात येणार आहे. 
राज्‍यस्‍तरीय कार्यक्रम नांदेड येथे राबविणेसाठी सुक्ष्‍म नियोजन करण्‍यासाठी निर्देश असून सदर राज्‍यस्‍तरीय योगदिन सुरळीत पार पाडण्‍यासाठी जिल्‍हास्‍तरीय समिती गठीत करण्‍यात करण्‍यात आली असून सदर समितीची बैठक घेण्‍यात आली आहे.
                सदर योग शिबीरात नांदेड जिल्‍ह्यातील शैक्षणिक संस्‍था, शाळा, महाविद्यालयातील 09, 10 वी 11 वी ते पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांचा राज्‍यस्‍तरीय योग शिबीरात समावेश होणार आहे. यासाठी जिल्‍ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, दंत विद्यालय, एनसीसी, एनएसएस मधील सर्व विद्यार्थ्‍यांचा समावेश करण्‍यात यावा, असे निर्देश प्रशासनामार्फत देण्‍यात आले आहे.  जिल्‍ह्यात अंदाजे एक लक्ष एवढया लोकांसाठी योग साधनेसाठी सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहे. तसेच देशातील विविध भागातून सदर योग शिबीरासाठी नागरीक उपस्थित राहणार आहेत.
                योग साधणेसाठी आवश्‍यक असणारे प्रशिक्षण प्रशिक्षीत असलेल्‍या योग साधक यांचेकडून देण्‍यात येणार आहे. दिनांक 12,13 व 14 जून, 2019 या तीन दिवसामध्‍ये शासकीय, खाजगी शाळा, कॉलेज मधील पीटी शिक्षकांसह प्रशिक्षण ए.के.संभाजी मंगल कार्यालय, नांदेड येथे सकाळी 6 ते 8 या कालावधीत देण्‍यात येत आहे. दिनांक 17 जून, 2019 पासून शाळा, महाविद्यालय सुरु होणार असून दि. 17,18 व 19 जून 2019 या कालावधीमध्‍ये विद्यार्थ्‍यांसाठी सकाळी 7 ते 8.00 या कालावधीमध्‍ये त्‍या-त्‍या शाळा, महाविद्यालयामध्‍ये प्रशिक्षण देण्‍यात येणार आहे.
                सदर योग प्रशिक्षण शिबीरामध्‍ये ग्रामसेवक, अंगणवाडी सेवीका व इतर कर्मचारी वृंद तसेच तालुक्‍यातील इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनाही दिनांक 13 ते 15 जून, 2019 या तीन दिवशी योग प्रशिक्षण आयोजित करण्‍यात आले असून त्‍यांच्‍या मार्फत गाव पातळीवर दि. 17 ते 19 जून 2019 या दरम्‍यान योग विषयक प्रशिक्षण देणार आहेत.
            नांदेड जिल्‍हयातील महानगरपालीका, जिल्‍हापरिषद, पोलीस अधिक्षक कार्यालय, तसेच जिल्‍हयातील सर्व विभाग प्रमुख, जिल्‍हाधिकारी कार्यालय, उ‍पविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना दि. 17 जून 2019 रोजी सकाळी 06.00 ते 08.00 या वेळात ए.के.संभाजी मंगल कार्यालय, पावडेवाडी नाका नांदेड येथे योग विषयक प्रशिक्षण देण्‍यात येणार आहे.
             नांदेड शहरात असलेल्‍या कोचिंग क्‍लासेसमधील विद्यार्थ्‍यांना देखील सदर प्रशिक्षण शिबीरात सहभाग नोंदविणेसाठी कळविण्‍यात आले आहे. महाराष्‍ट्रातून पतंजली चे योग प्रशिक्षक व स्‍वयंसेवक हे देखील मोठया प्रमाणात योग शिबीरास उपस्थित राहणार आहेत. नांदेड जिल्‍हयातील व महाराष्‍ट्र राज्‍यातील इतर जिल्‍हयातील नागरिकांना आवाहन करण्‍यात येते की, सदर योग शिबीरासाठी उपस्थित राहून शिबीराचा लाभ घ्‍यावा.
                आज जिल्‍हयातील सर्व विभाग प्रमुख, स्‍वयंसेवी संस्‍था, पतंजली स्‍वयंसेवक, कोंचीग क्‍लासेस यांची बैठक घेण्‍यात आली असून सर्वस्‍तरावरील व्‍यक्‍तींना सदर योग दिनात (शिबीरात) सहभागी होण्‍याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्‍यात आले आहे. तसेच नांदेड शहर परिसर व आजूबाजूच्‍या परिसरातुन येणा-या व्‍यक्‍तींना कार्यक्रम स्‍थळी जाण्‍यासाठी आगावू बसेसची व्‍यवस्‍था करण्‍यासाठी विभाग नियंत्रक महाराष्‍ट्र राज्‍य परिवहन मंडळ यांना सूचना देण्‍यात आल्‍या आहेत.
00000


‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान’ पंधरवडा : 19 लाख शेतकऱ्यांचा सहभाग



मुंबई, दि. 13 : राज्यात ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान पंधरवडा’ नुकताच राबविण्यात आला. त्यात 36 हजार मेळावे घेण्यात आले असून सुमारे 19 लाख शेतकऱ्यांनी त्यात सहभाग नोंदविला. यावेळी शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांविषयक मार्गदर्शन करण्यात आले. राज्यात 12 हजार शेती शाळांचे आयोजन केले जात असून त्या माध्यमातून 3 लाख शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यात येत असल्याचे कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
दि. 25 मे ते 8 जून या काळात हा पंधरवडा आयोजित करण्यात आला होता. विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीत अधिक सुटसुटीतपणा आणि सुसूत्रता आणण्याकरिता उन्नत शेती समृद्ध शेतकरी पंधरवडा राबविला जातो. त्या माध्यमातून अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि विभागाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातात.
जमीन आरोग्यपत्रिका, बियाणे-खते खरेदी करताना घ्यायची काळजी, बीज प्रक्रिया, भाऊसाहेब फुंडकर व रोहयो अंतर्गत फळबाग लागवड योजना, ठिबक व तुषार सिंचन इत्यादी अनेक योजनांबद्दल कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या पंधरवड्यात राज्यभरात 36 हजार मेळावे आयोजित करण्यात आले.
कृषी विभागाच्या उत्पादन व उत्पादकता वाढीच्या तंत्रज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करण्याकरिता शेतीशाळा संकल्पनेवर भर देण्यात येत आहे. त्याअंतर्गत राज्यात 12 हजार शेतीशाळांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यामध्ये भात, कापूस, सोयाबीन, मका, तूर, ज्वारी, ऊस व हरभरा या पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार शेतीशाळा आयोजित केल्या जाणार असून नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची माहिती त्याद्वारे देण्यात येणार आहे, असे विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले.
००००

बालकामगार विरोधी दिन जनजागृती रॅलीने साजरा



नांदेड दि. 13 :- राष्‍ट्रीय बालकामगार प्रकल्‍प जिल्‍हाधिकारी कार्यालय येथे 12 जुन जा‍गतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्‍त जनजागृती रॅलीचे आयोजन बुधवारी करण्‍यात आले होते. या रॅलीस उपजिल्‍हाधिकारी तथा राष्‍ट्रीय बालकामगार प्रकल्‍पाचे प्रकल्‍प सचिव श्रीमती अनुराधा ढालकरी यांचे हस्‍ते हिरवी झेंडी दाखवुन जिल्‍हाधिकारी कार्यालयातून रॅली काढण्‍यात आली.
राष्‍ट्रीय बालकामगार प्रकल्‍पा अंतर्गत जिल्‍हामध्‍ये 9 विशेष प्रशिक्षण केंद्र चालविल्‍या जातात. त्‍यामध्‍ये एकुण 441 बालकामगारांनाशिक्षणदिल्‍याजाते.नांदेडशहराअंतर्गतएकुणसहा (06) विशेष प्रशिक्षण केंद्र असुन त्‍यामध्‍ये  300 बालकामगारांना शिक्षण दिल्‍या जाते. या विद्यार्थ्‍यांपैकी 300 जणांनी रॅलीमध्‍ये सहभाग नोंदविला आहे. या रॅलीस उपस्थित अधिकारी तहसिलदार (सा.) प्रसाद कुलकर्णी, नायब तहसिलदार तथा प्रभारी प्रकल्‍प संचालीका श्रीमती प्रिया जाबळे पाटील, सहाय्यक कामगार आयुक्‍त, मोसीन सय्यद सरकारी कामगार अधिकारी अविनाश पेरके, अविनाश देशमुख व त्‍यांचे सर्व कर्मचारी वर्ग, तसेच शिक्षण विभागाचे विस्‍तार अधिकारी बसवदे आर. एम., जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड कर्मचारी एम. पी. धमणे,  जिल्‍हा महिला बालसंरक्षण अधिकारी विभागाचे डिसीपिओ. कल्‍पना राठोड व त्यांचेसह  कार्यक्रमाचे आयोजीका कार्यक्रम व्‍यवस्थापक राष्‍ट्रीय बालकामगार प्रकल्‍प, जिल्‍हाधिकारी कार्यालय  श्रीमती पवळे रूक्‍मीणी गणपतराव, गजानन शंकरराव घोटाळे तसेच बालकामगार विरोधी दिनानिमित्त संस्‍था अध्‍यक्ष डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर व शाळेतील (STC) कर्मचारी व विदयार्थी रॅलीस उपस्थित होते. उपस्थित मान्‍यवरांनी बालकामगार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता बचत भवन जिल्‍हाधिकारी कार्यालय येथे करण्‍यात आली. तसेच अर्धापूर,भोकर,मुदखेड या ठिकाणी बालकामगार विरोधी दिन साजरा करण्‍यात आला.
000000

नांदेड जिल्हा नियोजन समितीवर 15 विशेष निमंत्रितांची नियुक्ती



नांदेड, दि. 13 :- नांदेड जिल्हा नियोजन समितीवर नियोजन विभागाचा शासन निर्णय 6 मार्च 2019 नुसार 15 विशेष निमंत्रित व्यक्तींची नियुक्ती करण्यात आलेली आहे, अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी नांदेड यांनी दिली आहे.
विशेष निमंत्रितांचे नाव (कंसात पत्ता) पुढील प्रमाणे आहे. श्रीमती सुर्यकांताबाई जयवंतराव पाटील (पाटणूरनगर ता. नांदेड), डॉ. संतुकराव मारोतराव हंबर्डे (विष्णुपुरी ता. नांदेड), लक्ष्मण गंगाराम ठक्करवाड (कासराळी ता. बिलोली), बळवंतराव माधवराव पाटील (बेटमोगरा ता. मुखेड), प्रविण चक्रधर साले (शाकुंतल 65 भाग्यनगर ता. नांदेड), राजु शरणप्पा गंदिगुडे (नरसी ता. नायगाव खै.), बाबाराव अमृतराव रोकडे (रामतिर्थ ता. बिलोली), दत्ता भुजंगराव कोकाटे (सांगवी ता. नांदेड), आनंद शंकरराव तिडके (बोंढार ता. नांदेड), निखील वसंतराव लातुरकर (अशोकनगर नांदेड), वसंत ईरन्ना सुंबटवाड (तबेला गल्ली मुखेड), दिलीपराव गणपतराव देबगुंडे (सोनाळा ता. हदगाव), अशोक मोरे (बाबुलगाव ता. नांदेड), शिवाजी कदम (तुप्पा ता. नांदेड), किरण नरहरी वट्टमवार (ता. लोहा) या 15 व्यक्तींची जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  
000000

प्रधानमंत्री पीक योजना खरीप हंगाम


पीक विमा उतरवण्याचे आवाहन  
नांदेड, दि. 13 :- राज्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2019 राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून कर्जदार व बिगर कर्जदार शेतक-यांना पिक विमा उतरवण्याची अंतिम मुदत 24 जुलै 2019 ही आहे. अधिकच्या माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या तालुका कृषि अधिकारी किंवा जवळच्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार शेतकऱ्यांना अधिसुचीत क्षेत्रातील अधिसुचीत पिकांसाठी बंधनकारक असुन, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. या योजनेअंतर्गत वास्तवदर्शी विमा हप्ता आकारण्यात येणार आहे. खरीप हंगामातील पिकांसाठी 2 टक्के व कापसासाठी 5 टक्के ठेवण्यात आलेला आहे. या योजनेअंतर्गत जोखीम स्तर सर्व पिकांसाठी 70 टक्के निश्चित करण्यात आला आहे. पीक पेरणीपासुन काढणी पर्यंतचा कालावधी नैसर्गीक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पुर, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग ईत्यादी बाबीमुळे पिकांच्या उत्पादनात येणारी घट काढणी पश्चात नुकसान इत्यादी जोखीम यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. नांदेड जिल्हयातील भात, खरीप ज्वारी, तीळ, मुग, उडीद, तुर, सोयाबीन व कापुस या पिकांसाठी ही योजना लागु आहे.
या योजने अंतर्गत विमा संरक्षीत रक्कम व विमा हप्ता पुढील प्रमाणे राहणार आहे.
पीक
विमा संरक्षीत रक्कम रु./हेक्टर
शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता (रु)
भात
43500/-
870/-
ख.ज्वार
24500/-
490/-
तुर
31500/-
630/-
मुग
19000/-
380/-
उडीद
19000/-
380/-
सोयाबीन
43000/-
860/-
तीळ
23100/-
462/-
कापुस
43000/-
2150/-
नांदेड जिल्हयात खरीप हंगाम 2019 मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप-2019 लागु करण्याबाबत शासनाने मान्यता दिली आहे. बँकेत पिक विमा भरण्याची अंतिम तारीख कर्जदार व बिगर कर्जदार शेतक-यांना पिक विमा उतरवण्याची अंतिम तारीख 24 जुलै 2019 ही आहे. जिल्हयात खरीप हंगाम 2019 मध्ये सदरची योजना एग्रीकल्चर इन्शुरंस कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
000000

आंतरराष्ट्रीय योग दिनात जास्तीतजास्त संख्येने सहभागी व्हावे - जिल्हा क्रीडा अधिकारी मारावार



नांदेड, दि. 13 :- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार 21 जून 2019 रोजी सकाळी 7 ते 7.30 यावेळेत नांदेड येथील आसर्जन कौठा मामा चौक येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती राहणार आहे.  
आयुष मंत्रालय दिल्ली, महाराष्ट्र शासन, जिल्हा प्रशासन, आयुक्त क्रीडा व युवक सेना संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने व पतंजली योगपीठ यांच्या सहकार्याने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
यावेळी लोकप्रतिनिधी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाअंतर्गत  येणारे महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक, लोकप्रतिनिधी, पतंजली योग समितीचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, योग साधक, शिवछत्रपती पुरस्कारार्थी, जिल्हा क्रीडा पुरस्कारार्थी, युवा पुरस्कारार्थी, शालेय विद्यार्थी, खेळाडू, क्रीडा शिक्षक, क्रीडा संघटनेचे पदाधिकारी व खेळाडू, विविध संस्थेचे पदाधिकारी, क्रीडा मंडळे, युवक मंडळे, कोचींग क्लासेस विद्यार्थी, स्काऊट गाईड, एन.सी.सी. एन.एस.एस., नेहरु युवा केंद्र असे एकुण जवळपास दीड ते दोन लाख योग साधक उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील नागरिक, क्रीडाप्रेमी यांनी कार्यक्रमात जास्तीतजास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नांदेडचे जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी केले आहे.
00000

जातप्रमाणपत्र, नॉनक्रिमीलीअर प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने



नांदेड, दि. 13 :- नांदेड तहसिल कार्यालयाकडून निर्गमीत होणारे जात प्रमाणपत्र व नॉनक्रिमीलीअर प्रमाणपत्र शनिवार 15 जून 2019 पासून ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. त्यामुळे सेतू सुविधा चालकांनी जात प्रमाणपत्र व नॉनक्रिमीलीअर ऑफलाईन प्रमाणपत्र घेऊ नये. या ऑनलाईन सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसिलदार किरण अंबेकर यांनी केले आहे.
0000

योगा दिन सर्व तालुक्यांमध्ये साजरा होणार -- विनोद तावडे



मुंबई, दि. 13 : गेल्या चार वर्षांपासून 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी हा दिवस राज्यातील सर्व 288 तालुक्यांमधील तालुका क्रीडा संकुलामध्ये साजरा करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यांमध्ये किमान 5 हजार विद्यार्थी सहभागी होणार असल्याचे शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आज सिडनहॅम महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनासंदर्भात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
श्री. तावडे म्हणाले, या वर्षीचा पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिन राज्यातील सर्व 36 जिल्ह्यातील 288 तालुक्यांमध्ये साजरा करण्यात येणार आहे. या योग दिनामध्ये प्रत्येक तालुक्यातील किमान 5 हजार विद्यार्थी (शाळा/महाविद्यालये/एनएसएस/एनसीसी/स्काऊट गाईड) असे जवळपास 15 लाख विदयार्थी सहभागी होणार आहेत. केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयामार्फत देण्यात आलेला योगबाबतचा प्रोटोकॉल यावेळी विदयार्थी करणार आहेत. राज्यातील योग शिकविणाऱ्या संस्थांच्या मार्गदर्शनाखाली योग दिन साजरा होणार आहे.21 जून रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे.याशिवाय 21 जून रोजी नांदेड येथे रामदेवबाबा यांच्यामार्फत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 1.50 लाख नागरिक सहभागी होणार आहेत.
ज्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे उदाहरणार्थ मुंबई, कोकण किंवा पुणे अशा ठिकाणी पाऊस पडल्यास विद्यार्थ्यांना योग कुठे करता येईल, याबाबतही तयारी करण्यात येणार आहे. आयुष मंत्रालयामार्फत योगासाठी सकाळी 7 ते 8 ही वेळ देण्यात आली असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता याला सुध्दा प्राधान्य देण्यात आल्याचे श्री. तावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
००००

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नांदेडमध्ये राज्यस्तरीय कार्यक्रम



मुख्यमंत्री फडणवीस राहणार उपस्थित
मुंबई, दि. 13 : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त यावर्षी नांदेडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून योगसत्राचे संचालन योगऋषी स्वामी रामदेव बाबा करणार आहेत.
स्वस्थ महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमास पतंजली योगपीठाचे सहकार्य मिळणार आहे. एक लाखापेक्षा अधिक लोकांना एकाचवेळी योगासने करता येतील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. यानिमित्ताने शिक्षण, क्रीडा, युवक कल्याण आणि वैद्यकीय क्षेत्रात योगाचे महत्त्व आणि त्याचा अवलंब याबाबत धोरण ठरविण्याबाबत शासन विचाराधीन असून छत्तीसगढ आणि हरियाणा राज्यांनी निर्माण केलेल्या योग आयोगाचाही अभ्यास करण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस घोषित केला असून जगभरातील 177 देश हा दिवस उत्साहाने साजरा करीत आहेत. योगाला आता वैद्यकीय चिकित्सा व जीवनपद्धतीच्या स्वरुपात जगभरातील लोक स्वीकारत आहेत.
-----000-----

वृत्त क्र. 283

  वृत्त क्र.   283 निवडणूक खर्च निरीक्षक नांदेडमध्ये दाखल ; खर्चावर काटेकोर लक्ष ठेवण्याचे आवाहन नांदेड, दि. 28 : लोकसभा निवडणूक ही अतिशय गं...