Friday, January 10, 2020




पालकमंत्री यांनी घेतला जिल्ह्यातील विविध विकासकामाचा आढावा
·   नागरिकांशी सबंधित विविध विभागातंर्गत प्रलंबित असलेली कामे कालबद्धरीत्या पूर्ण करावीत
                                         --- पालकमंत्री अशोक चव्हाण
       नांदेड, दि. 10: जिल्ह्यातील नागरिकांशी सबंधित विविध विभागातंर्गत प्रलंबित असलेली कामे कालबद्धरीत्या पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. अशोक चव्हाण यांनी दिले.
जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा तसेच विभागातंर्गत जिल्ह्यातील नागरिकांशी संबंधित विविध प्रलंबित विकासकामांचा आढावा पालकमंत्री श्री. अशोक चव्हाण यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कै. शंकरराव चव्हाण नियोजन भवनाच्या  सभागृहात आयोजित बैठकीत अध्यक्षस्थानावरुन श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी माजी मंत्री डी.पी. सावंत, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे, महावितरणचे अधिक्षक अभियंता संतोष वाहने, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता एस.के.सब्बीनवार,  जिल्हा नियोजन अधिकारी संजय कोलगणे आदींसह विविध विभागाच्या विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, जिल्ह्यातील विकासकामासंदर्भात महत्वाचे 50 विषय असून, या विकासाकामांच्या प्रगतीचा आढावा दर 15 दिवसांनी घेण्यात येणार आहे. तसेच सदर प्रस्ताव शासनाकडे पाठविले असल्यास प्रस्ताव कोणत्या विभागाकडे सादर केले आहेत. याबाबतची  सविस्तर माहितीचा अहवाल सादर करावा. तसेच सदर प्रस्तावाबाबत संबंधीत विभागाने केलेल्या पाठपूराव्याबाबतची माहिती दिनांकनिहाय जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावी. तसेच सर्व संबंधित विभागांनी आपल्या विभागाशी संबंधीत कामांचा प्रगतीबाबतचा अहवाल वेळोवेळी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात यावा.
या बैठकीत पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी कौठा येथील जागेत जिल्हा न्यायालीय इमारतीचे बांधकाम, नांदेड  विमानतळ सभोवताली असलेल्या मनपाची जागेची मागणी विमानतळ प्राधिकरणाने करुन विमानतळाचा विकास करावा.  नांदेड येथील एमआयडीसीची जागा संपली असून मारताळा ते कृष्णूरपर्यंत शेतीसाठी वापरात नसलेली जागेची माहिती घेवून अतिरिक्त एमआयडीसीच्या विकासाकरीता भूसंपादन करण्याचे नियोजन करावे. नांदेड शहरातील मालेगाव व  कॅनॉल रस्त्यावरील विद्यूत दिवे बसविले आहेत का ? अशी विचारणा करत, नांदेड शहरातील बाजाराकरिता जागेचा शोध घेवून त्याठिकाणी बाजारकरिता कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध करावी. तसेच शहरातील प्रमुख रस्त्यांचे सुशोभिकरण करावे. भोकर, मुदखेड, धर्माबाद व उमरी येथील रेल्वे उड्डाणपूलाची कामे वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा, अशा सूचना सार्वजनीक बांधकाम विभागाला दिल्या. मनपा, नगर परिषद आणि नगर पंचायतीमधील रिक्त पदांचा आढावा घेत रिक्त पदांची माहिती सादर करण्यास सांगितले. जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाकरिता भूसंपादनाबाबतची माहिती घेवून त्याबाबत असलेली कार्यवाही तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या. पत्रकारांसाठी जिल्ह्यात जिल्हा पत्रकार भवनाची अनेक दिवसाची मागणी होत असून, सदरच्या पत्रकार भवनाचे बांधकाम सुरु करण्यासाठी लवकरात-लवकर नियोजन करावे. तसेच जिल्ह्यात होणाऱ्या सर्व निवडणुकीकरिता कौठा येथील निर्वाचन भवनाची निर्मिती करण्यासाठी केलेल्या कार्यवाहीची यावेळी त्यांनी माहिती घेतली. श्रीक्षेत्र माहूरगड येथील राबविण्यात येणाऱ्या विविध विकास योजनांची माहिती घेवून संबंधित विभागाने कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. राज्य परिवहन महामंडळाने ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांच्या शाळा-महाविद्यालयाच्या वेळेनुसार बसेसची सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना देवून, नादुरुस्त रस्त्यामूळे बस बंद झाल्या असल्यास सदर ख्रराब रस्त्यांची माहिती विभाग नियंत्रकांनी सादर करण्याबाबतही यावेळी सूचना दिल्या. जिल्ह्यात वीज पूरवठ्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. महावितरण कंपनीने यासाठी ऑईल आणि ट्रान्सफार्मरचे नियोजन करुन वीज पुरवठा सुरुळीत करावा. सिडकोमार्फत नांदेड येथे उच्च उत्पन्न गटातील वसाहत निर्मितीसाठी भूसंपादन करण्याची कार्यवाही करावी, अशा सूचनाही संबंधित विभागाला यावेळी पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी दिल्या.
यावेळी लेंडी प्रकल्प, माहूर काळेश्वर, होट्टल येथे केंद्र शासनाकडून प्राप्त निधी व विकास कामे, देगलूर नाका येथील उर्दू घर सद्यस्थिती, नांदेड, अर्धापूर आणि भोकर येथील ईदगाह विकास कामे, जलयुक्त शिवार अभियान, क्रिडा संकुल विकास, मुदखेड शहराजवळील स्मशानभूमी, नांदेड येथील ट्रक टर्मिनल जागाबाबतचा प्रस्ताव तसेच अर्धापूर तालूक्यातील दाभड येथील महाविहार येथील विविध विकासकामांचा आढावा घेवून प्रलंबीत कामे पूर्णत्वास नेण्याबाबत यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्हा पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी संबंधीत विभागांना सूचना दिल्या.  
0000

वृत्त क्र. 283

  वृत्त क्र.   283 निवडणूक खर्च निरीक्षक नांदेडमध्ये दाखल ; खर्चावर काटेकोर लक्ष ठेवण्याचे आवाहन नांदेड, दि. 28 : लोकसभा निवडणूक ही अतिशय गं...