Thursday, November 10, 2016

बिहारचे राज्यपाल राम नाथ कोविंद यांचा नांदेड दौऱ्यावर  
नांदेड , दि. 10 :-  बिहार राज्याचे राज्यपाल राम नाथ कोविंद हे तीन दिवसाच्या नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शुक्रवार 11 नोव्हेंबर 2016 रोजी औरंगाबाद येथून मोटारीने रात्री 8.35 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन, राखीव व मुक्काम.  
शनिवार 12 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी 10.45 वा. शासकीय विश्रामगृह येथून शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहाकडे प्रयाण. सकाळी 11 वा. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे आगमन व अखिल भारतीय कोळी समाजाच्या 11 व्या राष्ट्रीय संमेलनास उपस्थिती. दुपारी 12.30 वा. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथून व्हिआयपी शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. दुपारी 12.45 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव.  सायंकाळी 5 वा. तख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिबकडे प्रयाण. सायं. 5.30 वा. तख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब नांदेड येथे आगमन, दर्शन व राखीव. सायं. 6.30 वा. गुरुद्वारा येथून शासकीय विश्रागृहाकडे प्रयाण. सायं. 7 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन, राखीव व मुक्काम.
रविवार 13 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी 9 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे औरंगाबादकडे मोटारीने प्रयाण करतील.

000000
शासकीय कर भरणा करण्यासाठी
पाचशे, एक हजार रुपयांची नोट स्विकारणार
नांदेड , दि. 10 :- भारत सरकारने भारतीय चलन बाजारातील पाचशे एक हजार रुपयाच्या चलनी नोटा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. परंत शासन आदेशान्वये  शुक्रवार 11 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत सर्व शहर व ग्रामीण भागातील कर, नगरपालिकांचे कर अथवा शुल्क, महसुली जमा, विविध शासकीय कर भरणा करण्याची संधी नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी पाचशे रुपये व एक हजार रुपयांच्या चलनी नोटांचा स्विकार करण्यात येणार आहे. जास्तीतजास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा , असे आवाहन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी केले आहे.

*****
कौटुंबिक न्यायालयात विशेष शिबीर संपन्न
नांदेड , दि. 10 :- कौटुंबिक न्यायालय नांदेड व अभिवक्ता संघ कौटुंबिक न्यायालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश गोविंद वायाळ यांच्या कल्पनेतून साकारण्यात आलेल्या या कार्यक्रमात सुप्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञ श्रीमती डॉ. तेजल दोशी व समाजसेविका श्रीमती मथू सुरेश सावंत यांनी दांम्पत्यांना मार्गदर्शन केले व कौटुंबिक खटले तडजोडीने निकाली काढण्यासाठी प्रोत्साहित केले. नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाचे अध्यक्ष मिलिंद एकताटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. व्यासपिठावर अभिवक्ता संघ कौटुंबिक न्यायालयाचे अध्यक्ष शिवाजी वडजे यांचीही उपस्थिती होती.
सुरवातीला प्रमुख न्यायाधीश गोविंद जी. वायाळ यांनी प्रास्ताविकात कार्यक्रम आयोजनाची भुमिका व अपेक्षा व्यक्त केली. समुपदेशक श्रीमती प्रतिभा काचेवार, श्रीमती राधा गावारे, श्रीमती शितल उदगीरकर यांनी समुपदेशन केले. कार्यक्रमास पक्षकार, विधिज्ञ आणि कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित पक्षकारांपैकी जास्तीत जास्त पक्षकारांनी शनिवार 12 नोव्हेंबर रोजी आयोजित राष्ट्रीय महालोकन्यायालयात प्रकरणे तडजोडीने निकाली काढली जातील असा आशावाद व्यक्त केला.
 ॲड ऋषीकेश संतान, ॲड. शफीक खान, ॲड वर्धमान सोनटक्के, ॲड विक्रम राजे शिंदे, ॲड पल्लवी औरादकर, ॲड अंबादास बडगे, ॲड जयेश पाटील, ॲड चंद्रशेखर राजेवार, ॲड आरेफा अली आणि कौटुंबिक न्यायालयातील कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. ॲड. मुजाहिद सय्यद यांनी सुत्रसंचालन केले. ॲड. अस्मिता वाघमारे यांनी  आभार मानले.

00000000
सहकार सप्ताहानिमित्त सोमवारपासून
जिल्ह्यात कार्यशाळा व विविध कार्यक्रम
नांदेड , दि. 10 :- सहकार विभागाच्यावतीने 14 ते 20 नोंव्हेंबर 2016 या कालावधीत 63 वा सहकार सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. यंदा शाश्वत विकासात सहकाराचे योगदान या संकल्पनेवर सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी कार्यशाळा व संस्थांच्या यशोकथांचे सादरीकरण होणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने कळविली आहे.
सहकार सप्ताहामध्ये घेण्यात येणाऱ्या कार्यशाळेत त्या-त्या क्षेत्रातील दोन यशस्वी सहकारी संस्थांच्या यशोगाथेचे सादरीकरण, तज्ज्ञाचे मार्गदर्शन, सहकारी संस्थांच्या समस्या व त्यावरील उपाय योजना, भविष्याचे नियोजन याबाबत तज्ज्ञांचे व्याख्याने व परिसंवाद होणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, सभासदांनी व कर्मचाऱ्यांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक व्ही. डी. कहाळेकर यांनी केले आहे.
सहकार सप्ताहातील कार्यशाळेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे.  सोमवार 14 नोव्हेंबर रोजी उद्घाटन नागरी सहकारी बॅका – ठिकाण मर्चट को-ऑप बॅक लि. नांदेड. मंगळवार 15 नोव्हेंबर रोजी- नागरी , ग्रामीण बिगरशेती पतसंस्था- ठिकाण भुविकास बॅक लि. नांदेड. बुधवार 16 नोव्हेंबर रोजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक लि. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था- ठिकाण नांदेड जिल्हा मध्य. बॅक लि. गुरुवार 17 नोव्हेंबर रोजी सहकारी गृहनिर्माण संस्था व पणन सह संस्था- ठिकाण अशोकनगर गृहनिर्माण सह संस्था नांदेड. शनिवार 19 नोव्हेंबर रोजी सुतगिरण्या, हातमाग व यंत्रमाग संस्था- ठिकाण भुविकास बॅक लि. नांदेड.

0000000
मागेल त्याला शेततळे योजनेसाठी
अर्ज करण्यास मुदतवाढ
नांदेड , दि. 10 :-  मागेल त्याला शेततळे योजना नांदेड जिल्हयात सन 2015-16 पास सुरु आहे. शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज तथा संमती या योजनेत भाग घेण्यासाठी ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे भरावयाची दत 13 मेपर्यंतच होती. पण या योजनेस आता शासनाने मुदतवाढ दिल्याने आँनलाईन अर्ज भरण्याची ही प्रणाली 10 आँक्टोंबरपासून पुन्हा सुरु करण्यात येत आहे, अशी माहिती नांदेड जिल्हा अधीक्षक कृषि कार्यालयाने दिली आहे.
            इच्छुक लाभार्थ्यानी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज www.mahaonline.gov.in या संकेतस्थळावरुन अर्जाचा नमुना (प्रपत्र-2) डाऊनलोड करुन घ्यावेत ऑनलाईन अर्जाची पोच पावती डाऊनलोड करुन स्वत:कडे ठेवावी.
   यामध्ये जास्तीतजास्त 30x30x3 मीटर या आकारमानाचे कमीतकमी इनलेट आऊटलेटसह प्रकारामध्ये किमान 15x15x3 मीटर या आकारमानाचे शेततळे घेता येईल. तसेच इनलेट आऊटलेट विरहीत प्रकारमध्ये किमान 20x15x3 मीटर या आकारमानाचे शेततळे घेता येईल.आकारमानानुसार कमाल रक्कम 50 हजार रुपये इतकी राहील. अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. शेतक-यांनी  मागेल त्याला शेततळे या योजनेमध्ये मोठया प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000
वैज्ञानिक संशोधनासाठीचे हवाई फुगे आढळल्यास
तात्काळ पोलीस, टपाल किंवा प्रशासनाशी संपर्क साधा
नांदेड, दि. 10 :- टाटा मुलभूत संशोधन संस्था ( टिआयएफआर ) हैद्राबाद यांच्यावतीने संशोधनासाठी हवाई फुगे प्रक्षेपित केले जाणार असून. असे हवाई-फुगे आढळल्यास जिल्ह्यातील नागरिकांनी जवळचे पोलीस स्थानक, टपाल कार्यालय किंवा प्रशासनाशी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा. फुगे किंवा त्याच्याशी संलग्न उपकरणे हाताळू नयेत, असे आवाहन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी केले आहे. याबाबत त्यांनी जिल्ह्यातील महसूल प्रशासन, पोलीस विविध घटकांनीही सतर्क रहावे असेही संबंधीत यंत्रणांना निर्देशित केले आहे.
टाटा मुलभूत संशोधन संस्था ( टिआयएफआर ) यांच्यामार्फत 15 नोव्हेंबर 2016 ते 30 एप्रिल 2017 या कालावधीमध्ये अंदाजे 10 हवाई-फुगे प्रक्षेपित केले जाणार आहेत. हे प्रक्षेपण रात्री 8 ते सकाळी 6.30 यावेळेत केले जाणार आहे. अशा हवाई-फुग्यांसोबत पाठविण्यात आलेली संशोधनासाठीची शासकीय उपकरणे पॅराशुटच्या साह्याने जमिनीवर येण्याची शक्यता आहे. हे पॅराशुट व उपकरणे आढळल्यास आल्यास ते आहे त्याच स्थितीत ठेवण्यात यावीत. ही उपकरणे लाकडी तसेच धातुच्या चौकटीत बंदीस्त करण्यात आली आहेत. ही उपकरणे आहे त्याच स्थितीत राहू द्यावीत. व त्याबाबत टाटा मुलभूत संशोधन संस्था ( टिआयएफआर ) हैद्राबाद, दुरध्वनी क्रमांक (040) 27123978, 27122505 किंवा 27130019 किंवा फॅक्स – (040) 27123327 या क्रमांकाशी किंवा जवळचे पोलीस स्थानक, टपाल कार्यालय, जिल्हा प्रशासनाशी संबंधित तलाठी, तहसील किंवा सक्षम अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. या फुग्यांशी संलग्न उपकरणांना हात लावू नये. यासंदर्भात माहिती देणाऱ्यास संबंधित संस्थेकडून माहिती देण्याचा खर्च व योग्य ते बक्षीस दिले जाणार आहे. या उपकरणावरही संपर्कासाठी पत्ता, दुरध्वनी क्रमांक, तार आदी माहिती देण्यात आली आहे. पण कोणत्याही परिस्थितीत उपकरणास हाताळले जाऊ नये. ते जोखमीचेही ठरू शकते. त्यामुळे वेळीच माहिती देणाऱ्यास, खर्चापोटीची रक्कम दिली जाईल. पण उपकरण उघडले असल्यास, किंवा हाताळले असल्यास मात्र खर्च-बक्षिस दिले जाणार नाही.
नोव्हेंबर महिन्याच्या तीसऱ्या आठवड्यापासून या प्रयोगात या फुग्यांचे प्रक्षेपण करणे सुरु होईल. हा एक वैज्ञानिक प्रयोग आहे. त्याबाबत विविध घटकांनी दखल घेऊन, ग्रामीण व सर्वदूर दुर्गम अशा परिसरातील नागरिकांनाही माहिती द्यावी, त्यांना असे फुगे व सोबत उपकरणे आढळल्यास नजीकच्या सक्षम शासकीय यंत्रणेशी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन आवाहनही जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

00000
मराठी साहित्य सृष्टीच्या समृद्धतेत
दिवाळी अंकामुळे भरच - गवळी
जिल्हा ग्रंथालयात प्रदर्शनाचे उद्घाटन
नांदेड , दि. 10 :- दिवाळी अंकांनी मराठी साहित्य सृष्टीला समृद्ध केले. दिवाळी अंकातूच अनेक नवोदितांना साहित्यिक क्षेत्रात ओळख मिळाली, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी यांनी आज येथे केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित दिवाळी अंक प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी श्री. गवळी बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कथा-कथनकार दिगंबरराव कदम होते. जिल्हा ग्रंथालयात संपन्न झालेल्या कार्यक्रमास कवी महेश मोरे, जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव निर्मलकुमार सुर्यवंशी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांची उपस्थिती होती.
            उद्घाटनपर भाषणात श्री. गवळी म्हणाले की , माहिती तंत्रज्ज्ञान युगाचा स्पर्श होण्याआधी, ग्रंथ आणि त्यातही दिवाळी अंक हेच साहित्यीक मेजवानीचे साधन होते. विशेषतः मराठीत दिवाळी अंकाची परंपरा मोठी आहे. दिवाळी अंक ही मराठी साहित्यीक विश्र्वाचे वैशिष्ट्य आहे. पुर्वी दिवाळी अंक विविध साहित्य प्रकारांनी नटलेले असत. आता मात्र विविध विषयांना वाहिलेली दिवाळी अंक उपलब्ध होऊ लागले आहेत. वाचन प्रेमींसाठी दिवाळी अंक आजही मेजवानी ठरतात. दिवाळी अंकातून लिहीत्या झालेल्या नवोदितांना साहित्य विश्र्वातही प्रवेश मिळतो, ओळख मिळते, असा अनुभव आहे. त्याअर्थाने दिवाळी अंकांचे मराठी साहित्य समृद्ध करण्यात मोठे योगदान आहे, असेच मानावे लागेल.
यावेळी कवी श्री. महेश मोरे यांनी कविता सादर करून वाचनप्रेम, दिवाळी अंक यावर मार्मिक सादरीकरण केले. कथा-कथनकार श्री. कदम यांनी विनोदीबाज असलेली ग्रामीण कथा सादर करून, उपस्थितांना खळखळून हसविले.
सुरवातीला ग्रंथालयशास्त्राचे जनक रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल हुसे यांनी प्रास्ताविकात प्रदर्शन आयोजनाबाबतची भुमिका विशद केली. प्र. के. सुर्यवंशी यांनी सुत्रसंचालन केले. अजय वट्टमवार यांनी आभार मानले. तत्पुर्वी जिल्हा ग्रंथालयाच्या सभागृहातील दिवाळी अंक प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. याठिकाणी दोनशेहून अधीक दिवाळी अंकाची वैशिष्ट्यपुर्ण मांडणी करण्यात आली आहे.

00000