Friday, September 8, 2017

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या
शिष्यवृत्ती अर्जासाठी मुदतवाढ
 नांदेड दि. 8 :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली या जिल्ह्यातील शासकीय, अशासकीय, कनिष्ठ, वरिष्ठ, कला, वाणिज्य, विज्ञान अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानीत महाविद्यालये, अध्यापक महाविद्यालये तसेच व्यवसायिक महाविद्यालयातील सन 2017-18 या शैक्षणिक वर्षात मुस्लीम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध, पारसी व जैन या समाजातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारची 100 टक्के पुरस्कृत अल्पसंख्यांक पोस्टमॅट्रिक शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना अल्पसंख्यांक पोस्टमॅट्रिक शिष्यवृत्ती नवीन मंजुरी व नुतनीकरणासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 30 सप्टेंबर 2017 पर्यंत वाढविण्यात आली आहे. संबंधीत महाविद्यालयांचे प्राचार्य व संस्थाप्रमुख यांनी महाविद्यालयातील अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी योग्य प्रयत्न करावेत, असे आवाहन नांदेड विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. मोहन खताळ यांनी केले आहे.   

0000000
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन
युवा मंडळांनी साजरा करावा
नांदेड दि. 8 :- जिल्ह्यात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन युवा मंडळांनी उत्साहात साजरा करावयाचा आहे. यानिमित्ताने ध्वजारोहण, मराठवाडा मुक्ती संग्रामात भाग घेतलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार, स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक ठिकाणी स्वच्छता करणे, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा घेऊन वृक्षारोपण, रक्तदान शिबिराचे आयोजन करावे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात युवकांनी आपल्या गावात साजरा करावा. त्याबाबत नेहरु युवा केंद्र नांदेड यांना अहवाल सादर करावा, असे आवाहन नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक विनायक धंडे यांनी केले आहे.  

000000
शाश्वत वीज आणि समृद्ध शेतीसाठी जिल्ह्यातील
शेतकऱ्यांनी अटल सौर कृषीपंप योजनेचा लाभ घ्यावा
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे

नांदेड दि. 7 :- शाश्वत वीज आणि समृद्ध शेतीसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अटल सौर कृषीपंप योजनेचा लाभ घ्यावा. त्यासाठी शेतकऱ्यांनी 11 ते 21 सप्टेंबर 2017 या कालावधीत विहित नमुन्यातील अर्ज संबंधीत उपकार्यकारी अभियंता महावितरण यांचेकडे करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला असून प्रायोगिक तत्वावर राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये अटल सौर कृषीपंप योजना महावितरणकडून राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत नांदेड जिल्ह्यासाठी अटल सौर कृषीपंप योजनेची भक्कम साथ मिळणार आहे. अटल सौर कृषीपंप अत्यंत माफक दरामध्ये उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
पाच एकर पर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना 95 टक्के अनुदान व 5 एकरच्या पुढे 10 एकरच्या आत पर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना 85 टक्के अनुदान मिळणार आहे. या पंपाची कार्य उपलब्धता ही सकाळी 8 ते सायं 5 वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्यावेळी वीज उपलब्धतेसाठी जागण्याची गरज नाही. तसेच वीज बिल भरण्याची  गरज भासणार नाही. लोडशेडींग, ब्रेकडाऊन, रोहित्र जळणे इत्यादी त्रासापासून मुक्तता मिळत असल्यामुळे सौरपंपाचा जास्तीतजास्त वापर होतो व पिकाची हमी मिळण्यास मदत होते. पंपाची देखभाल व दुरुस्ती 5 वर्षापर्यंतचा खर्च पुरवठादाराकडे असल्यामुळे देखभाल व दुरुस्तीच्या खर्चापासून मुक्त असेल. त्याचबरोबर सौरपंपाचा विमा शासनातर्फे उतरिवण्यात येणार असल्यामुळे पंप चोरीला जाणे आदी बाबींची शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज भासणार नाही. म्हणुन नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अटल सौरकृषी पंप योजनेचा लाभ घेऊन शाश्वत वीज आणि समृद्ध शेतीच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहनही श्री. डोंगरे यांनी केले.
ही योजना मर्यादीत कालावधीसाठी असल्यामुळे प्रथम येणाऱ्यास प्रथम सौरपंप देण्याचे प्राधान्य दिले  जाणार आहे. म्हणुन सर्व शेतकऱ्यांनी 11 ते 21 सप्टेंबर 2017 या कालावधीत विहित नमुन्यातील अर्ज संबंधीत उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता यांचेकडे सादर करणे आवश्यक आहे. सौर कृषीपंप बसवायाचा आहे त्या शेतजमीनीचा मालक संबंधीत लाभार्थी असणे गरजेचे आहे. सौरकृषीपंप मिळण्यासाठी लाभार्थ्यांकडे महावितरणचे विद्युत कनेक्शन नसावे. लाभार्थ्याकडे दहा एकरपेक्षा जास्त जमीन नसावी. विहिर, विंधन विहिरीला मुबलक प्रमाणात पाणी असावे. लाभार्थ्यांकडे सौर ऊर्जा पॅनल बसविण्यासाठी सावली विरहीत जागा असावी, असे या योजनेच्या पात्रतेसाठी निकष आहेत, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाची अटल सौर कृषीपंप योजना
अ.क्र.
सोलार सबमर्सिल पंप
किंमत रु. / पंप
शेतकऱ्याचा वाटा 5 एकर पर्यंत रु. / पंप
शेतकऱ्याचा वाटा 10 एकर पर्यंत रु. / पंप
1
3000 वॅट ( 3 एच. पी. ए. सी. )
3,24,000/-
16,200/-
48,600/-
2
3000 वॅट ( 3 एच. पी. ए. सी. )
4,05,000/-
20,250/-
60,750/-
3
4800 वॅट ( 5 एच. पी. ए. सी. )
5,40,000/-
27,000/-
81,000/-
4
4800 वॅट ( 5 एच. पी. ए. सी. )
6,75,000/-
33,750/-
1,01,250/-
5
6750 वॅट ( 7.55 एच. पी. ए. सी. )
7,20,000/-
36,000/-
1,08,000/-
पात्र लाभार्थ्यांमध्ये प्राधान्यक्रम ठरविण्याचे निकष असून त्यामध्ये सिंचन योजनेंतर्गत विहिरीचा लाभ घेतलेले शेतकरी, अतिदुर्गम भागातील शेतकरी, महावितरणकडे पैसे भरलेले प्रलंबित ग्राहक, ज्यांना तांत्रिक अडचणीमुळे व नजिकच्या काळात वीज पुरवठा करणे शक्य नाही असे शेतकरी, वनविभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेले शेतकरी, राज्यातील पारंपारिक पद्धतीने विद्युतीकरण न झालेल्या गावातील शेतकरी यांचा समावेश आहे. राज्य शासनाने ठरवुन दिलेल्या निकषानुसार लाभार्थ्यांची निवड यादी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीद्वारे करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी  सांगितले.                   000000

वृत्त क्र. 840         

वृत्त क्र. 283

  वृत्त क्र.   283 निवडणूक खर्च निरीक्षक नांदेडमध्ये दाखल ; खर्चावर काटेकोर लक्ष ठेवण्याचे आवाहन नांदेड, दि. 28 : लोकसभा निवडणूक ही अतिशय गं...