Friday, September 8, 2017

शाश्वत वीज आणि समृद्ध शेतीसाठी जिल्ह्यातील
शेतकऱ्यांनी अटल सौर कृषीपंप योजनेचा लाभ घ्यावा
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे

नांदेड दि. 7 :- शाश्वत वीज आणि समृद्ध शेतीसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अटल सौर कृषीपंप योजनेचा लाभ घ्यावा. त्यासाठी शेतकऱ्यांनी 11 ते 21 सप्टेंबर 2017 या कालावधीत विहित नमुन्यातील अर्ज संबंधीत उपकार्यकारी अभियंता महावितरण यांचेकडे करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला असून प्रायोगिक तत्वावर राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये अटल सौर कृषीपंप योजना महावितरणकडून राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत नांदेड जिल्ह्यासाठी अटल सौर कृषीपंप योजनेची भक्कम साथ मिळणार आहे. अटल सौर कृषीपंप अत्यंत माफक दरामध्ये उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
पाच एकर पर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना 95 टक्के अनुदान व 5 एकरच्या पुढे 10 एकरच्या आत पर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना 85 टक्के अनुदान मिळणार आहे. या पंपाची कार्य उपलब्धता ही सकाळी 8 ते सायं 5 वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्यावेळी वीज उपलब्धतेसाठी जागण्याची गरज नाही. तसेच वीज बिल भरण्याची  गरज भासणार नाही. लोडशेडींग, ब्रेकडाऊन, रोहित्र जळणे इत्यादी त्रासापासून मुक्तता मिळत असल्यामुळे सौरपंपाचा जास्तीतजास्त वापर होतो व पिकाची हमी मिळण्यास मदत होते. पंपाची देखभाल व दुरुस्ती 5 वर्षापर्यंतचा खर्च पुरवठादाराकडे असल्यामुळे देखभाल व दुरुस्तीच्या खर्चापासून मुक्त असेल. त्याचबरोबर सौरपंपाचा विमा शासनातर्फे उतरिवण्यात येणार असल्यामुळे पंप चोरीला जाणे आदी बाबींची शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज भासणार नाही. म्हणुन नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अटल सौरकृषी पंप योजनेचा लाभ घेऊन शाश्वत वीज आणि समृद्ध शेतीच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहनही श्री. डोंगरे यांनी केले.
ही योजना मर्यादीत कालावधीसाठी असल्यामुळे प्रथम येणाऱ्यास प्रथम सौरपंप देण्याचे प्राधान्य दिले  जाणार आहे. म्हणुन सर्व शेतकऱ्यांनी 11 ते 21 सप्टेंबर 2017 या कालावधीत विहित नमुन्यातील अर्ज संबंधीत उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता यांचेकडे सादर करणे आवश्यक आहे. सौर कृषीपंप बसवायाचा आहे त्या शेतजमीनीचा मालक संबंधीत लाभार्थी असणे गरजेचे आहे. सौरकृषीपंप मिळण्यासाठी लाभार्थ्यांकडे महावितरणचे विद्युत कनेक्शन नसावे. लाभार्थ्याकडे दहा एकरपेक्षा जास्त जमीन नसावी. विहिर, विंधन विहिरीला मुबलक प्रमाणात पाणी असावे. लाभार्थ्यांकडे सौर ऊर्जा पॅनल बसविण्यासाठी सावली विरहीत जागा असावी, असे या योजनेच्या पात्रतेसाठी निकष आहेत, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाची अटल सौर कृषीपंप योजना
अ.क्र.
सोलार सबमर्सिल पंप
किंमत रु. / पंप
शेतकऱ्याचा वाटा 5 एकर पर्यंत रु. / पंप
शेतकऱ्याचा वाटा 10 एकर पर्यंत रु. / पंप
1
3000 वॅट ( 3 एच. पी. ए. सी. )
3,24,000/-
16,200/-
48,600/-
2
3000 वॅट ( 3 एच. पी. ए. सी. )
4,05,000/-
20,250/-
60,750/-
3
4800 वॅट ( 5 एच. पी. ए. सी. )
5,40,000/-
27,000/-
81,000/-
4
4800 वॅट ( 5 एच. पी. ए. सी. )
6,75,000/-
33,750/-
1,01,250/-
5
6750 वॅट ( 7.55 एच. पी. ए. सी. )
7,20,000/-
36,000/-
1,08,000/-
पात्र लाभार्थ्यांमध्ये प्राधान्यक्रम ठरविण्याचे निकष असून त्यामध्ये सिंचन योजनेंतर्गत विहिरीचा लाभ घेतलेले शेतकरी, अतिदुर्गम भागातील शेतकरी, महावितरणकडे पैसे भरलेले प्रलंबित ग्राहक, ज्यांना तांत्रिक अडचणीमुळे व नजिकच्या काळात वीज पुरवठा करणे शक्य नाही असे शेतकरी, वनविभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेले शेतकरी, राज्यातील पारंपारिक पद्धतीने विद्युतीकरण न झालेल्या गावातील शेतकरी यांचा समावेश आहे. राज्य शासनाने ठरवुन दिलेल्या निकषानुसार लाभार्थ्यांची निवड यादी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीद्वारे करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी  सांगितले.                   000000

वृत्त क्र. 840         

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   392   23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद ; निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये   ·      लोकसभा...