Saturday, September 2, 2017

जिल्ह्यातील 171 ग्रामपंचायतींच्या
सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर  
नांदेड, दि. 2 :- जिल्ह्यात नोव्‍हेंबर व डिसेंबर 2017 या महिन्यात मुदत संपणाऱ्या 171 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.  या निवडणुकीचे मतदान शनिवार 7 ऑक्टोंबर 2017 रोजी होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्‍हा  परिषद पंचायत समिती  निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.  
जिल्ह्यात निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीची संख्या तालुकानिहाय पुढील प्रमाणे आहे. माहुर- 26, किनवट- 48, हिमायतनगर- 1,  हदगाव- 6 अर्धापूर- 2, नांदेड- 7, मुदखेड- निरंक, भोकर- 3 उमरी- 1, धर्माबाद- 3, बिलोली- 9, नायगाव खै.- 7, लोहा- 28, कंधार- 15, मुखेड- 15, देगलूर- निरंक याप्रमाणे एकुण 171 ग्रामपंचायतींसाठी मतदान होईल.  
निवडणुक कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. तहसिलदार निवडणुकीची नोटीस गुरुवार 7 सप्टेंबर 2017 रोजी प्रसिध्‍द करतील. नामनिर्देशन पत्रे मागविण्‍याचा व सादर करण्‍याचा कालावधी (‍ नमुना अ अ मध्‍ये नमुद केलेल्‍या ठिकाणी) शुक्रवार 15 ते 22 सप्टेंबर 2017 या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 4.30 पर्यंत राहील. सार्वजनिक सुट्टीचा 17 व 21 सप्टेंबर हा दिवस वगळून राहील. नामनिर्देशनपत्र छाननी (नमुना अ अ.मध्‍ये नमूद केलेल्‍या ठिकाणी) सोमवार 25 सप्टेंबर रोजी सकाळी 11 पासून ते छाननी संपेपर्यंत. नामनिर्देशन पत्रे मागे घेण्‍यासाठी (नमुना अ अ मध्‍ये नमुद केलेल्‍या ठिकाणी) बुधवार 27 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत. निवडणूक चिन्‍ह नेमुन देण्‍याचा तसेच अंतिमरित्‍या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्‍द बुधवार 27  सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेनंतर. आवश्‍यक असल्‍यास मतदान शनिवार 7 ऑक्टोंबर 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायं 5.30 वाजेपर्यंत होईल. मतमोजणी सोमवार 9 ऑक्टोंबर 2017 रोजी. (मतमोजणीचे ठिकाण, वेळ जिल्‍हधिकारी यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्‍यानुसार राहील) निवडणुकांचा निकाल बुधवार 11 ऑक्टोंबर 2017 रोजी प्रसिध्‍द करण्यात येईल.
कार्यक्रम पत्रातील परिच्छेद क्र. 2 मध्‍ये नमुद केल्‍यानुसार पहिल्‍या टप्‍प्‍यात फक्‍त ऑक्‍टोबर 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या 13 जिल्‍हयातील 114 ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक घेण्यात येणार आहे. त्‍याप्रमाणे किनवट तालुक्‍यातील 4 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम कार्यान्‍वीत आहे. या निवडणूकीमध्‍ये प्रथमतः सरपंच पद थेट पध्‍दतीने निवडून द्यावयाचे असल्‍याने निवडणूक आचारसंहितेच्‍या अंमलबजावाणीबाबत विशेष उपाययोजना करण्‍यात येणार आहे.  तसेच प्रत्‍यक्ष मतमोजणीच्‍यावेळी संवेदनशील मतमोजनी केंद्राच्‍या परिसरात विशेष पोलीस बंदोबस्‍त पुरविण्‍यात येणार आहे. निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे जिल्‍हयात मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी असेल.
आचारसंहिता : सार्वत्रिक निवडणूक असलेल्‍या ग्रामपंचायतीमध्‍ये शुक्रवार 1 सप्टेंबर पासून आचारसंहिता लागू झाली असून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अस्तित्‍वात राहील. निवडणुका निर्भय, मुक्‍त व पारदर्शक वातावरणामध्‍ये होणे आवश्‍यक असल्याने राज्‍य निवडणूक  आयोगाने 14 ऑक्टोंबर 2016 रोजी निर्गमित केलेल्‍या आचारसंहिता विषयक आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत  सर्व तहसिलदार यांना सुचित करण्‍यात आले आहे.
आचारसंहिता पुढील ग्रामीण क्षेत्रामध्‍ये लागू राहील : ज्‍या जिल्‍हयामध्‍ये 50 टक्‍के किंवा त्‍यापेक्षा अधिक ग्रामपंचायतीच्‍या सार्वत्रिक निवडणूका आहेत त्‍या संपूर्ण जिल्‍हयामध्‍ये आचारसंहिता लागू राहील.  ज्‍या तालुक्यात 50 टक्‍के किंवा त्‍यापेक्षा अधिक ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणुका आहेत त्‍या संपूर्ण तालुक्‍यात आचारसंहिता लागू राहील. निवडणुका असलेल्‍या ग्रामपंचायतीच्‍या सीमेलगत गावामध्‍ये सुध्‍दा आचारसंहिता लागू राहील. आदर्श आचारसंहिता जरी संपूर्ण जिल्‍हा, तालुका, लगतच्‍या गावामध्‍ये लागू असेल तरी जेथे स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या क्षेत्रामध्‍ये निवडणुका नसतील त्‍याठिकाणी विकासाच्‍या विविध कामावर कसलाही निर्बंध राहणार नाही. मात्र या क्षेत्रात अशी कोणतीही कृती कोणालाही करता येणार नाही. ज्‍यामुळे निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायतीच्‍या मतदारांवर विपरीत प्रभाव पडेल, असेही प्रसिद्धी पत्रकात जिल्हाधिकारी कार्यालयाने सांगितले आहे.

000000
'आपले जिल्हे - विकासाची केंद्रे
लोकराज्य विशेषांक प्रकाशित
नांदेड दि. 3 :-  राज्य शासनाने गेल्या तीन वर्षांमध्ये जिल्ह्यांमध्ये राबविलेल्या योजना व निर्णयांचा आढावा घेणारा सप्टेंबर महिन्याचा लोकराज्य 'आपले जिल्हे - विकासाची केंद्रे'  हा विशेषांक नुकताच प्रकाशित झाला आहे. हा अंक सर्वत्र बूक स्टॉलवर उपलब्ध आहे.
या अंकात प्रत्येक जिल्ह्यात राबविलेल्या ‍जलयुक्त शिवार योजना, आपले सरकार, स्वच्छता अभियान, वृक्षलागवड मोहीम, स्मार्ट सिटी योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, मेट्रो प्रकल्प, आरोग्य योजना, डिजिटल महाराष्ट्र, विविध महामार्ग, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आदींच्या अंमलबजावणीची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे.
काही जिल्हे विकासाचे, नाविन्यपूर्ण योजनांचे आदर्श पॅटर्न म्हणून समोर येत आहेत. पालकमंत्री व प्रशासनामुळे विकासकामे सूत्रबद्धरित्या राबविली जात आहेत.
आपल्या जिल्ह्यात कोणकोणती विकासकामे राबवली याचा सविस्तर वृत्तांत वाचकांना या अंकाच्या माध्यमातून वाचायला मिळेल. 76 पृष्ठांच्या या विशेषांकाची किंमत 10 रूपये आहे.

000000
विकास योजनांची माहिती देण्यासाठी  
"संवाद पर्व" उपक्रम निश्चित स्तुत्य
- पोलीस उपअधीक्षक बनकर
नांदेड, दि. 2 :- शासनाच्या विविध विकास योजना, निर्णय, उपक्रमांची माहिती संवादाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी "संवाद पर्व" सारखा उपक्रम निश्चित स्तुत्य आहे, असे प्रतिपादन नांदेडचे पोलीस उपअधीक्षक अशोक बनकर यांनी केले.

शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना विविध शासकीय योजनेची माहिती देऊन जनजागृती करण्याकरीता "संवाद पर्व" हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने जिल्हा माहिती कार्यालय व श्री यादव गणेश मंडळ हनुमान पेठ (वजिराबाद) नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने काल आयोजित "संवाद पर्व" कार्यक्रमात श्री. बनकर हे प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल हुसे, जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी, सामाजिक कार्यकर्ते वसंत मैय्या, प्रा. उमाकांत जोशी, गणेश मंडळाचे अध्यक्ष अक्षय यादव, छायाचित्रकार विजय होकर्णे, प्रा. डॉ. कैलाश यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.  
सर्वसामान्य जनतेसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून युवकांना नौकरीसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी शासन व जिल्हा प्रशासन मार्गदर्शन शिबीर घेत असते त्याचा लाभ घ्यावा. युवकांकडून अनेकविध विधायक कामे होऊ शकतात. त्यासाठी त्यांनी आपल्या शक्तीचा वापर करावा व समाजात चांगले बदल घडावावेत. चारित्र्य संपन्न जीवन जगुन आदर्श निर्माण करावा. गणेश मंडळांनी अनावश्यक खर्च टाळून समाजातील गोरगरीबांना आर्थीक मदत व विधायक बाबींवर अधीक भर दिला पाहिजे. शासनाच्या विविध योजनेतून स्वत:बरोबर समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा अशोक बनकर यांनी व्यक्त केली.
श्री. हुसे म्हणाले, शासनाच्या विविध योजनेची माहिती "संवाद पर्व" च्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविली जाते. त्याचा लाभ सर्वांनी घेतला पाहिजे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने "उज्ज्वल नांदेड" या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांकडून एमपीएससी, युपीएससी या परीक्षेसाठी मोफत तयारी करुन घेतली जात आहे. जिल्हा ग्रंथालयात मार्गदर्शनाबरोबरच अभ्यासिकेची चांगली सुविधा उपलब्ध आहे. मराठवाड्यातील अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन अधिकारी झाले आहेत. विधायक कामातून पुढची चांगली पिढी घडविण्यासाठी इच्छुकांना चांगली दिशा देण्यासाठी शासनाचे सर्व प्रयत्न आहेत, असे सांगितले.
"संवाद पर्व" या कार्यक्रमामागील उद्देश विषद करुन श्री. गवळी यांनी महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेले लोकराज्य मासिकाची माहिती दिली. या मासिकात शासनाच्या विविध योजना, घेतलेले निर्णय, उपक्रम याची माहिती दिली जाते. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसाठी लोकराज्य मासिक उपयुक्त आहे. मासिकाचे वर्गणीदार व्हावे असे आवाहन करुन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.  
यावेळी लोकराज्य मासिकाचे वाचक वसंत मैय्या म्हणाले, लोकराज्य मासिकातून शासनाची महत्वपुर्ण माहिती दिली जाते. कमी किंमतीत घरपोच पोहचणारे लोकराज्य मासिकाचे वार्षीक वर्गणीदार सर्वांनी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रा. उमाकांत जोशी यांनी, "संवाद पर्व" कार्यक्रमातून युवकांना भावी आयुष्यासाठी प्रेरणा मिळाली आहे. युवकांनी आत्मविश्वास, इच्छाशक्ती, सकारात्मक दृष्टी, क्रियाशिलता, मनाचा मोठेपणा ठेवून पुढे गेले पाहिजे जीवनात यश नक्की मिळेल, असे सांगितले.
            प्रास्ताविकात छायाचित्रकार विजय होकर्णे यांनी शासनाच्या विविध योजनेची माहिती देण्यासाठी "संवाद पर्व" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी उपस्थित राहून योजनेची माहिती देत आहेत, असे सांगितले तर प्रा. डॉ. कैलाश यादव यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.
           
यावेळी उपस्थित मान्यवरांचा व श्री यादव गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, जेष्ठ नागरिकांचा "लोकराज्य" अंक, "आपला जिल्हा नांदेड" पुस्तिका व "नांदेड जिल्हा वाटचाल विकासाची तीन वर्षपुर्तीची" ही घडीपत्रिका देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास विशाल यादव, भारत यादव, गोकुल यादव, भानुदास यादव, नरसिंग मंडले, गौतम जैन, दीपक यादव, बीरबल यादव, बबलू यादव, सुमीत यादव, विजय बटावाले, स्वराज यादव, बंटी फुलारी, युवक, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.  

000000
संवाद पर्व अंतर्गत विकास योजनेच्या माहितीचे
नांदेड आकाशवाणी केंद्रावरुन आज प्रसारण
नांदेड, दि. 2 :- गणेशोत्सव काळात विविध शासकीय योजनेची माहिती देऊन जनजागृती करण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने संवाद पर्व अभियान घेण्यात येत आहे. या अभियानात शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, उपक्रम जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी नांदेड आकाशवाणी केंद्राच्या सहकार्याने विविध योजनांच्या माहितीचे प्रसारण करण्यात येत आहे.
या संवाद पर्व अभियानांतर्गत रविवार 3 सप्टेंबर 2017 रोजी रात्री 8.15 वा. महिला व बालविकासाच्या विविध योजनांवर आधारीत नांदेडचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डी. पी. शाहु यांची मुलाखत आकाशवाणीवरुन प्रसारीत होणार आहे. ही मुलाखत नांदेड आकाशवाणीचे केंद्र संचालक भिमराव शेळके यांनी घेतली आहे.
या संवाद पर्व अभियानांतर्गत शासनाच्या विविध विकासाच्या योजना, उपक्रमांच्या माहितीचे प्रसारण होणार आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी व नांदेड आकाशवाणी केंद्राचे केंद्र संचालक भिमराव शेळके यांनी केले आहे.  
000000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...