Thursday, January 1, 2026

वृत्त क्रमांक 3

हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त पूर्वतयारीचा आढावा

नांदेड दि.१ जानेवारी :-“हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आज पूर्व तयारी आढावा घेण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रतिनिधी जगदीश सकवान यांनी प्रस्तावित कार्यक्रमस्थळाची पाहणी केली. यावेळी कार्यक्रमाचे नियोजन, सुविधा, सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था तसेच इतर आवश्यक बाबींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी व गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक यांची उपस्थितीहोती.

कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने व गतीने काम करावे अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी दिल्या.

००००००








वृत्त क्रमांक 2

नांदेड जिल्ह्यात ‘महाभूसंपादन पोर्टल’चा शुभारंभ

‘महाभूसंपादन पोर्टल’मधून ऑनलाईन पद्धतीने होणार भूसंपादन प्रक्रिया

नांदेड, दि. 1 जानेवारी :- महाराष्ट्र राज्यामध्ये विविध सार्वजनिक प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर खाजगी जमिनीचे भूसंपादन करण्यात येते. सन 2013 पासून भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 या कायद्यान्वये भूसंपादनाची कार्यवाही केली जाते.

या कायद्यातील तरतुदीनुसार भूसंपादन प्रक्रियेचे संपूर्ण डिजिटल व्यवस्थापन करण्यासाठी शासनाच्या “सेवाविषयक बाबींच्या अनुषंगाने 150 दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम” अंतर्गत भूसंपादनासाठी विशेष सॉफ्टवेअर विकसित करण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यावर सोपवली होती. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात https://mahabhusampadan.in, या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे.

या महाभूसंपादन पोर्टलच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील भूसंपादनाची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. या सॉफ्टवेअरमध्ये जिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकारी, संपादीत  संघ तसेच भूमी अभिलेख विभागासाठी स्वतंत्र लॉग-इन सुविधा उपलब्ध आहे.

या पोर्टलचे वैशिष्ट्य म्हणजे, संपादन यंत्रणेकडून भूसंपादन प्रस्ताव सादर झाल्यापासून ते भूधारकांना मोबदला वाटप होईपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया सॉफ्टवेअरद्वारे पार पडणार आहे. यामध्ये कमी-जास्त पत्रके, नवीन सातबारा उतारे तयार होणे, इतर पत्रव्यवहार, अधिसूचना, भूधारकांना नोटीस आदी सर्व कागदपत्रे ऑटो-जनरेट पद्धतीने तयार होतील. त्यामुळे कार्यालयीन कामकाजात गती व अचूकता येणार आहे.

भूसंपादन प्रक्रिया ऑनलाईन झाल्यामुळे निवाडे विनाविलंब होतील. परिणामी जनतेच्या उपयोगाचे प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन शासनाचा खर्चही कमी होणार आहे. भूधारकांना त्यांच्या जमिनीच्या संपादनाबाबतची माहिती व नोटीस थेट मोबाईलवर मिळण्याची सुविधाही या प्रणालीमध्ये उपलब्ध आहे.

या प्रणालीचा प्रायोगिक वापर करताना भूसंपादन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून, महाभूसंपादन पोर्टलमुळे कार्यालयीन कामकाज अधिक सुसूत्र, पारदर्शक व वेळेत होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

सध्या भूसंपादन अधिनियम, 2013 अंतर्गत सुरू असलेली सर्व प्रकरणे या सॉफ्टवेअरद्वारे हाताळण्यात येणार आहेत. पुढील टप्प्यात महाराष्ट्र महामार्ग अधिनियम, 1955, महाराष्ट्र औद्योगिक वसाहत अधिनियम, 1961, रेल्वे (सुधारणा) अधिनियम, 2008 तसेच राष्ट्रीय महामार्ग अधिनियम, 1956 अंतर्गत होणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेचाही या सॉफ्टवेअरमध्ये समावेश करण्यात येणार आहे.

या संकेतस्थळावर भूसंपादनाशी संबंधित कायदे, नियम, शासन निर्णय, कलम 1 व 19 अंतर्गत अधिसूचना सर्व नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच सन 2013 पासून नांदेड जिल्ह्यात घोषित झालेल्या सर्व भूसंपादन निवाड्यांचा तपशील महाभूसंपादन पोर्टलवर उपलब्ध आहे. नोटीस व माहिती थेट मोबाईलवर मिळत असल्याने भूसंपादन प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येऊन तक्रारींचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.

ही प्रणाली विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर जितेंद्र पापळकर यांनी गठित केलेल्या समितीच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या नेतृत्वात विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीच्या निर्मितीत अपर जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर, अपर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड, उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी, उपजिल्हाधिकारी श्रीमती प्रियांका पवार, उपविभागीय अधिकारी विकास माने, नायब तहसीलदार सतीश कुलकर्णी, आय.टी. कन्सल्टंट संतोष निलेवार तसेच भूसंपादन सहायक संदीप ढवळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

महाभूसंपादन पोर्टलच्या वापरामुळे भूसंपादन प्रक्रियेत पारदर्शकता, गतिमानता व लोकाभिमुखता येणार असून प्रशासनासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

चौकट :

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले : महाभूसंपादन पोर्टलमुळे भूधारकांना भूसंपादनाशी संबंधित माहिती, अधिसूचना व स्थिती पाहण्यासाठी सुलभ व्यवस्था उपलब्ध झाली आहे. यामुळे पारदर्शकता येणार असून भू-धारकांना भूसंपादनाबाबतची माहिती तात्काळ मिळणार आहे. तसेच मोजणीमध्ये अक्षांश-रेखांशासह आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे अचूकता येणार असून प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ व पारदर्शक होणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये याचा वापर करणे प्रस्तावित आहे.

०००००



 वृत्त क्रमांक 1

रस्ता सुरक्षा अभियान २०२६चा नांदेडमध्ये शुभारंभ

अपघात रोखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड, दि. १ जानेवारी :-दैनंदिन जीवनात घडणाऱ्या अपघातांमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होत आहे. यासाठी प्रत्येक नागरिकाने वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. तसेच रस्ते अपघात रोखण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

वाहन अपघातांना आळा बसावा तसेच नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने दरवर्षी संपूर्ण देशभरात रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येते. यावर्षी रस्ता सुरक्षा अभियान २०२६ हे १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत परिवहन विभागामार्फत राबविण्यात येत असून, या अभियानाचा शुभारंभ आज प्रादेशिक परिवहन कार्यालय, नांदेड येथे करण्यात आला.

या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले होते. तसेच पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार आणि नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करून रस्ते अपघात कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना दिल्या. नांदेड जिल्ह्यात डंपर व हायवा वाहनांच्या धोकादायक वाहनचालना मुळे होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच नागरिकांनी वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करून उपस्थितांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय शिवराम अहिरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राम गलधर, निवासी वैद्यकीय अधिकारी गुट्टे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत कंकरेज यांनी केले. त्यांनी देश, राज्य व जिल्ह्यातील अपघातांची आकडेवारी सादर करून अपघातांमुळे होणाऱ्या गंभीर परिणामांची माहिती दिली. तसेच नांदेड जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत १ ते ३१ जानेवारीदरम्यान राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

त्यानंतर प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी रस्ते अपघात कमी करण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम स्पष्ट केला. यामध्ये मद्यपान करून वाहन न चालविणे, वेगमर्यादेचे पालन करणे, दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर, चारचाकी वाहनात सीट बेल्टचा वापर तसेच वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.

नांदेड जिल्ह्यात २०२३-२४ च्या तुलनेत २०२४-२५ मध्ये रस्ते अपघातांमध्ये ५.०४ टक्के वाढ झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

यावेळी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी अपघातांमधील मृत्यूसंख्या ही इतर गुन्ह्यांतील मृत्यूंपेक्षा अधिक असल्याचे सांगून नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले.

या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ‘रस्ते की पाठशाला’ या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. तसेच मोटार वाहन निरीक्षक प्रदीप नन्नावरे यांनी “मी राष्ट्रीय महामार्ग बोलतोय” या विषयावर आधारित उद्बोधनात्मक गीताचे प्रकाशन केले.

या कार्यक्रमास गुरू गोबिंदसिंग शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.), नांदेड येथील विद्यार्थी, विविध संघटनांचे पदाधिकारी, मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक, वाहन वितरक तसेच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी अशा एकूण २७५ नागरिकांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोटार वाहन निरीक्षक श्रीमती रेणुका राठोड यांनी केले, तर सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित बोरकर यांनी आभार प्रदर्शन केले.

०००००






विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...