Thursday, July 2, 2020


वृत्त क्र. 600   
कोरोनातून 6 व्यक्ती झाले बरे
आज नवीन 7 व्यक्ती बाधित
नांदेड (जिमाका) दि. 2 :- कोरोना आजारातून आज पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 3 बाधित डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथील 1 बाधित आणि औरंगाबाद येथे संदर्भित झालेले 2 बाधित असे एकूण 6 व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 298  व्यक्तीं कोरोनातून बरे झाले आहेत. 
गुरुवार 2 जुलै रोजी सायं 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या एकुण 79 अहवालापैकी 58 अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाले आहेत. आज 7 नवीन बाधित आढळल्याने जिल्ह्यात एकूण बाधित व्यक्तीची संख्या 398 एवढी झाली आहे.
नवीन बाधितांमध्ये निजाम कॉलनी येथील 60 वर्षाची 1 महिला, खुदबेनगर येथील 40 वर्षाची 1 महिला, जुना मोंढा येथील 36 वर्षाचा 1 पुरुष, हैदरबाग येथील 53 वर्षाचा 1 पुरुष, म्हाडा कॉलनी येथील 35 वर्षाचा 1 पुरुष, आंबेडकरनगर येथील 80 वर्षाचा 1 पुरुष तसेच मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथील 30 वर्षाचा 1 पुरुष बाधित यांचा समावेश आहे. या सर्व बाधित व्यक्तींवर उपचार सुरु आहेत.  
आतापर्यंत 398 बाधितांपैकी 298 बाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरीत 83 बाधितांवर औषधोपचार चालू आहेत. यातील 13 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 7 महिला व 6 पुरुष बाधिताचा समावेश आहे.
नांदेड जिल्ह्यात 83  बाधित व्यक्तींमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 29, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 40 तर मुखेड कोविड केअर सेंटर येथे 1,  देगलूर कोविड केअर सेंटर येथे 1, हदगाव कोविड केअर सेंटर येथे 1 बाधित तसेच जिल्हा रुग्णालय येथे 1 बाधित उपचार घेत आहे. तर 9 बाधित औरंगाबाद आणि 1 बाधित सोलापूर येथे संदर्भित झाले आहेत. गुरुवार 2 जूलै रोजी 90  व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल.
जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.
सर्वेक्षण- 1 लाख 46 हजार 935,
घेतलेले स्वॅब- 6 हजार 607,
निगेटिव्ह स्वॅब- 5 हजार 710,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 07,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 398,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 14,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक,
मृत्यू संख्या- 17,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 298,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 83,
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 90 एवढी संख्या आहे.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
00000


शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी शाळेचे आयोजन
-      उपविभागीय कृषि अधिकारी सुखदेव
नांदेड (जिमाका) दि. 2 :- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत दर पंधरा दिवसांनी होणाऱ्या कापूस व सोयाबिन पिकांच्या शेती शाळेतून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्पादनात वाढ करावी, असे आवाहन उपविभागीय कृषी अधीकारी आर. टी. सुखदेव यांनी केले.  
कृषी विभागामार्फत जिल्ह्यात कृषी दिनानिमित्त 1 ते 7 जुलै 2020 दरम्यान कृषि संजीवनी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने कृषी कापूस पिकावरील (विशेष सत्र) शेतीशाळेचे आयोजन मुदखेड तालुक्यातील वाडी मुक्ताजी येथे 1 जुलै रोजी करण्यात आले. शेती शाळेची सुरुवात माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन करण्यात आली.
या शेतीशाळेच्या वर्गाला मार्गदर्शन कृ. प. बारड जी. पी. वाघोळे यांनी केले. कापुस पिकावर आढळुन येणारे रस शोषन करणाऱ्या किडी (मावा, तुडतुडे, पांढरी माशी) यांची निरीक्षणे कशी घ्यावीत.  कापुस पिकाच्या परिसंस्थेचा अभ्यास कसा करावा याविषयी प्रत्यक्ष शेतात उतरुन निरीक्षण, चित्रीकरण, सादरीकरण कसे करावे याबाबतचे मार्गदर्शन करण्यात आले.
सोबतच पिकावर आढळुन येणाऱ्या मित्र किडींचा (ढाल किडा,कातीन) यांची ओळख करुन देण्यात आली. मावा या  किडीचा जीवनक्रम चित्रीकरणाद्वारे समजावुन सांगण्यात आला. निसर्गात उपलब्ध असलेल्या  निंबोळया गोळा करुन त्यापासुन 5 टक्के निंबोळी अर्क  तयार करण्याची पध्दती समजावुन सांगण्यात आली. कपाशीवर आढळुन येणाऱ्या गुलाबी बोंड अळी प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरुवातीच्या काळातच कामगंध सापळयांचे महत्व व उपयुक्तता याचे प्रात्याक्षीक करुन दाखवण्यात आले. या शेती वर्गात सांघीक खेळ (पावसाची टाळी) याद्वारे शेतकऱ्यांचे सामुहिक गुणदर्शन, आनंद व उत्साह वाढविण्यासाठी घेण्यात आला.ही शेतीशाळा दत्तराव इंगोले यांच्या शेतात घेण्यात आली. शेतीशाळा पुर्ण करण्यासाठी कृषी सहाय्यक श्रीमती. एस. डी. रेशमलवार, समुह सहाय्यक शरद कवळे, मन्मथ गवळी व शेतीशाळा समन्वयक श्री. देशमुख तसेच गावातील कापूस उत्पादक शेतकरी उपस्थीत होते.
00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...