Sunday, May 17, 2020


राज्यातील लॉकडाऊनच्या कालावधीत 31 मे पर्यंत वाढ
           मुंबई, दि. 17- राज्यात कोविड-19 विषाणूचा प्रादूर्भाव वाढत असल्याने शासनाने प्रतिबंधात्मक अत्यावश्यक उपाययोजना करण्यासाठी राज्यातील लॉकडाऊनच्या कालावधीत 31 मे 2020 पर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. साथरोग कायदा 1897 तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत शासनास असलेल्या अधिकारांचा वापर करून राज्याच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष तथा मुख्य सचिव अजोय मेहता यांनी हे आदेश जारी केले आहेत.
        यापूर्वी वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांची शासनाच्या सर्व विभागांनी या कालावधीत काटेकोर अंमलबजावणी करावी. तसेच यापूर्वी काढण्यात आलेले सर्व आदेश 31 मे पर्यंत लागू राहतील, असे निर्देश मुख्य सचिवांनी दिले आहेत. विभागनिहाय सूट किंवा लॉकडाऊन उठविण्यासंदर्भात योग्य त्या सूचना वेळोवेळी दिल्या जातील, असेही त्यांनी या आदेशात म्हटले आहे.
        यापूर्वी दि. 2 मे 2020 रोजीच्या आदेशानुसार राज्यात 17 मे 2020 पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. तसेच त्यात गरजेनुसार वेळोवेळी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या.
०००००


कार्यालयाच्या ठिकाणी उपाययोजना बंधनकारक ;
प्रतिबंधित क्षेत्र वगळता उपनिबंधक, प्रादेशीक,
उपप्रादेशीक परिवहन कार्यालय आजपासून सुरु
नांदेड, (जिमाका) दि. 17 :- कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत नांदेड जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन) वगळता उपनिबंधक कार्यालय, प्रादेशीक तसेच उपप्रादेशीक परिवहन अधिकारी यांचे कार्यालय नमूद अटीवर सोमवार 18 मे 2020 पासून चालू ठेवण्याची परवानगी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली आहे.  
या अटीमध्ये उपनिबंधक कार्यालय ही पाच कर्मचारी संख्येवर चालू राहतील. प्रादेशिक तसेच उपप्रादेशिक परीवहन अधिकारी यांचे कार्यालय 10 टक्के कर्मचारी संख्या बळावर चालू राहतील. या नमूद सुचना व्यतिरिक्त अंमलात आणवयाच्या काही बाबी असल्यास त्याकरीता या विभागास स्वतंत्ररित्या अपर मुख्य सचिव (वित्त), अपर मुख्य सचिव (महसूल), अपर मुख्य सचिव (परिवहन) यांचे अधिनस्त समितीची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असेल व अशी परवानगी जिल्हादंडाधिकारी कार्यालयास अवगत करणे बंधनकारक असेल. या आदेशाची अंमलबजावणी सोमवार 18 मे 2020 पासून राहील.
या कार्यालयाच्या / आस्थापनाच्या ठिकाणी पुढील उपाययोजना बंधनकारक असतील. कार्यालयाच्या ठिकाणी प्रवेशापूर्वी हॅन्डवॉश, सॅनिटायझरचा वापर करणे. एकावेळेस कार्यालयात 5 पेक्षा जास्त अभ्यागतांना प्रवेश राहणार नाही. कार्यालयातील कर्मचारी व अभ्यागत यांच्या चेहऱ्यावर मास्क असणे व सामाजिक अंतराचे पालन करणे. मानवी संपर्कातील येणाऱ्या सर्व वस्तू / ठिकाणांचे वेळोवेळी नियमित निर्जंतूकीकरण करावे. 
या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल, असे आदेश 17 मे 2020 रोजी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत.
00000


सुचनांचे, सामाजिक अंतराचे पालन करणे बंधनकारक
कंटनमेंट झोन वगळता जिल्ह्यातील काही दुकानांना
ठरवून दिलेल्या दिवशी, वेळेत सुरु ठेवण्याची परवानगी
नांदेड, (जिमाका) दि. 17 :- कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत अटी व शर्तीच्या अधीन राहून कंटनमेंट झोन वगळता नांदेड जिल्ह्यातील काही दुकाने / आस्थापनांना ठरवून दिलेल्या दिवशी, वेळेत तसेच पुढील आदेशापर्यंत सामाजिक अंतराचे व सुचनांचे पालन करुन सुरु ठेवण्याची परवानगी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी एका आदेशाद्वारे दिली आहे. 
या आदेशानुसार महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीतील शहरी भागातील सर्व मॉल्स, व्यापरी संकूल, आणि बाजारपेठ या बंद राहतील. परंतू अशा व्यापारी संकूलातील व बाजारपेठेमधील अत्यावश्यक वस्तुंची विक्री करणारी दुकाने चालू राहतील. तसेच सर्व एकल दुकाने, वस्तीतील दुकाने, निवासी संकूलातील दुकाने कंटेनमेंट झोन वगळता, शहरी भागात चालू ठेवण्यास व ग्रामीण भागातील सर्व दुकाने (मॉल मधील वगळून) चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे. नमूद सर्व दुकाने चालू ठेवतांना सामाजीक अंतराचे पालन करणे अनिवार्य असेल असे निर्देशीत केले आहे.
नांदेड शहरात कोरोना विषाणुच्या वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता नांदेड जिल्ह्यातील नमूद निर्देशाची जशाच तशी अंमलबजावणी करणे शक्य नाही. त्याचप्रमाणे कोरोना विषाणूचा नांदेड जिल्ह्यात वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनेचा एक भाग तसेच नांदेड जिल्ह्यातील नागरिकांची गैरसोय होवू नये म्हणून यापूर्वी काढलेल्या प्रतिबंधात्मक आदेशात अंशत: बदल करुन पुढील तपशीलाप्रमाणे आस्थापनांना ठरवून दिलेल्या दिवशी व वेळेत चालू ठेवण्यास पुढील आदेशापर्यंत कंटनमेंट झोन वगळता सामाजिक अंतराचे व नमूद सुचनांचे पालन करण्याचे अधिन राहून परवानगी देण्यात आली आहे.
सोमवार ते शुक्रवार (शनिवार व रविवार वगळून ) दुकानाचा प्रकार- ॲटोमोबाईल्स, कॉम्पुटर, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रीकल्स, टायर्स, बॅटरी, मोबाईल शॉपी, रस्सी, वॉच स्टोअर्स, स्टेशनरी / बुक स्टोअर्स (पुस्तकालय), सायकल स्टोअर्स, स्टील ट्रेडर्स, बिल्डींग मटेरीयल या दुकानांची वेळ सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत राहील. रविवार वगळून दररोज किराणा दुकानांची वेळ सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत राहील. रविवारसह  दररोज शेतीविषयक-बी, बियाणे, औषधे इत्यादींची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यत तर हॉस्पीटल, मेडीकल स्टोअर्स सुरु ठेवण्याची वेळ 24 तास दररोज देण्यात आली आहे.
या दुकाने / आस्थापनाच्या‍ ठिकाणी पुढील उपाययोजना करणे बंधनकारक राहील. यामध्ये कामाच्या ठिकाणी / दुकानात प्रवेशापूर्वी हॅन्डवॉश, सॅनिटायझरचा वापर करणे, एकावेळेस दुकानात 5 पेक्षा जास्त ग्राहकास प्रवेश राहणार नाही. दुकानातील कर्मचारी व ग्राहक यांच्या चेहऱ्यावर मास्क असणे व सामाजिक अंतराचे पालन करणे, मानवी संपर्कात येणाऱ्या सर्व वस्तू / ठिकाणांचे वेळोवेळी नियमीत निर्जंतूकीकरण करणे, ग्राहकांकडून खरेदीनंतर पैशाची देवाण-घेवाण आरबीआयच्या सुचनेनुसार ई वॉलेटस व स्वाईप मशीनद्वारे करण्यास भर द्यावा. नेमून दिलेल्या वेळेनंतर दुकान चालू ठेवल्यास तसेच उपाययोजनेचा भंग केल्यास 5 हजार रुपये एवढा दंड संबंधित दुकानदाराकडून आकारण्यात येईल. दुपारी 2 वाजेनंतर नमूद आदेशाप्रमाणे संचारबंदी / जमावबंदी आदेश कायम राहतील.
या आदेशाची अंमलबजावणीच्या देखरेखीसाठी पथके गठीत करुन पर्यवेक्षणाची जबाबादारी निश्चित करण्यात आली आहे. महानगरपालिका हद्दीत- महानगरपालिका, पोलीस विभाग व उपप्रादेशिक परीवहन अधिकारी यांनी संयुक्त पथके गठीत करावीत. नगरपालिका हद्दीत- नगरपालिका, पोलीस विभाग व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी संयुक्त पथके गठीत करावीत. तर गावपातळीवर ग्रामपंचायत व पोलीस विभागाचे संयुक्त पथक गठीत करावे.
वरीलप्रमाणे संबंधीत यंत्रणेने पर्यवेक्षणासाठी गठीत केलेले पथकाचे आदेश संबंधित उपविभागीय दंडाधिकारी तथा (Incident Commander) यांच्याकडे सादर करावीत. संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची वरीलप्रमाणे आदेशाची अंमबलजबावणीच्या अनुषंगाने संनियंत्रणाची जबाबदारी असले.
या व्यतीरिक्त नमूद नांदेड जिल्हादंडाधिकारी कार्यालयाचे समक्रमांकीत आदेश, शुद्धीपत्रकानुसार निर्गमीत आदेशातील अटी व शर्ती पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल.
संबंधीत यंत्रणांनी अत्यावश्यक साधने व सुविधा यांची साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी तसेच आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतूने केलेल्या कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचारी यांचेवर विरुद्ध कुठल्याही प्रकारची कायदेशिर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही, असे आदेश 16 मे 2020 रोजी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत.
0000


आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करा ;
 रविवारी नवीन 13 रुग्ण पॉझिटिव्ह  
नांदेड जिल्ह्याची एकुण रुग्ण संख्या 97 
नांदेड, दि. 17 :- कोरोना विषाणु संदर्भात रविवार 17 मे 2020 रोजी दुपारी 12 वा. नांदेड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या माहितीनुसार 14 ते 16 मे या कालावधीत पाठविण्यात आलेल्या 374 स्वॅबपैकी सर्व रुग्णांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये नवीन 13 रुग्ण हे पॉझिटिव्ह आढळून आली आहेत. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 97 वर पोहचली आहे.
रविवार 17 मे रोजी प्राप्त नवीन 13 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 9 रुग्ण प्रवासी असून 1 रुग्ण करबला भागातील असून 2 रुग्ण हे अबचलनगर भागातील व ग्रामीण रुग्णालय बारड येथील 1 रुग्ण आहे. या रुग्णांपैकी 12 पुरुष असून त्यांचे अनुक्रमे वय वर्षे 13, 14, 14, 19, 24, 25, 30, 37, 44, 50, 59, 74 असे आहे. तसेच एक स्त्री त्यांचे वय वर्षे 57 आहे.  या रुग्णांवर यात्री निवास एनआरआय भवन व ग्रामीण रुग्णालय बारड येथे औषधोपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे चालू आहे.
नांदेड जिल्ह्यात 97 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 26 रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उपचार सुरु असलेल्या 64 रुग्णांपैकी- 8 रुग्ण हे डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे तसेच पंजाब भवन कोवीड केअर सेंटर व यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे- 54 रुग्ण तर बारड ग्रामीण रुग्णालय येथील धर्मशाळेत कोवीड केअर सेंटरमध्ये- 2 रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे एकुण पॉझिटिव्ह 5 रुग्णांचा मृत्यू झाला असून या रुग्णांना रक्तदाब, मधुमेह या आजाराने बाधित होते. या आजाराने बाधित रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी.
जनतेनी अफवांवर विश्वास न ठेवता मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये व अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि नांदेड जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच आपल्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा, जेणेकरुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास या ॲपद्वारे सतर्क राहण्यास मदत मिळेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...