Thursday, January 15, 2026

 विशेष वृत्त 

‘हिंद-दी-चादर’च्या जयघोषाने दुमदुमणार नांदेड !

विद्यार्थ्यांच्या ‘प्रभात फेरी’तून आजपासून जनजागृती मोहीम

चिमुकल्या विजेत्यांचा मुख्य सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मान

लातूर, ‍दिनांक 15 (विमाका) :  धर्म, सत्य आणि मानवी हक्कांच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणारे ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे ३५० वे शहीदी समागम वर्ष ! या ऐतिहासिक पर्वाचे औचित्य साधून, श्री. गुरू तेग बहादूर  साहिबजींचा गौरवशाली इतिहास, त्यांच्या त्यागाची गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न ‘प्रभात फेरी’च्या माध्यमातून शिक्षण विभाग करत आहे. प्रभात फेरी गुरूवार पासून (दि.१६ ते २३ जानेवारी) जिल्हाभरातील शाळांमधून निघणार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.

 नांदेड येथील आसर्जन परिसरातील (मोदी ग्राउंड) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ‘घराघरात आणि मनामनात’ हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजींचे विचार रुजविण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

विद्यार्थी होणार ‘विचारदूत’

केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर कृतीतून इतिहास समजून घेण्यासाठी जिल्हाभरात भव्य प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या हाती असलेले फलक आणि मुखातील जयघोष यामुळे वातावरण भक्तीमय होणार आहे. याशिवाय, २५ जानेवारीपर्यंत सर्व शाळांच्या नित्य परिपाठात हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजींच्या शौर्यावर आधारित गीतांचे गायन, त्यांच्या जीवनपटाचा (डॉक्युमेंटरी) विशेष शो आयोजित करण्यात येणार आहे. 

विजेत्यांना 'सुवर्णसंधी'

विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी तालुका, जिल्हास्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. तालुकास्तरावर १५ ते १७ जानेवारी दरम्यान चित्रकला, गायन, निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा होतील.  जिल्हास्तरीय महाअंतिम फेरी २० जानेवारी रोजी निवडक विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा ‘गुरुग्रंथसाहेबजी भवन’, सचखंड पब्लिक स्कूलजवळ, हिंगोली गेट, नांदेड येथे पार पडेल.  जिल्हास्तरावर विजेत्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव मुख्य सोहळ्यात (२४ व २५ जानेवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येईल. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊनही सन्मानित केले जाईल.

डिजिटल सेवेची साद

#hinddichadar350 या ऐतिहासिक सोहळ्याची व्याप्ती वाढविण्यासाठी डिजिटल माध्यमांचाही प्रभावी वापर करण्यात येत आहे. नागरिकांनी आणि तरुणाईने #hinddichadar350 या हॅशटॅगचा वापर करून कार्यक्रमाशी संबंधित पोस्ट, फोटो आणि रिल्स सोशल मीडियावर शेअर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

अधिक माहितीसाठी: कार्यक्रमाची सविस्तर रूपरेषा gurutegbahadurshahidi.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच शाळांनी अधिक माहितीसाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगार, शिक्षणाधिकारी (योजना) दिलीप बनसोडे, जिल्हा परिषद, नांदेड यांच्याशी ssananded1@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा, असेही त्यांनी कळवले आहे.  

**

 विशेष क्रमांक वृत्त 47

“हिंद दी चादर” कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी जिल्हाभर व्यापक उपक्रम

नांदेड, दि. 15 जानेवारी : गुरु श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त “हिंद दी चादर” हा भव्य व ऐतिहासिक कार्यक्रम 24 व 25 जानेवारी 2026 रोजी नांदेड येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या व्यापक प्रचार-प्रसिद्धीसाठी जिल्ह्यात शालेय स्तरावर विविध स्पर्धाच्या माध्यमांतून जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये निबंध, चित्रकला, वक्तृत्व तसेच हिंद दी चादर या विषयावरील डॉक्युमेंट्री, चित्रपट व गीतांचे सादरीकरण करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या त्याग, बलिदान व धर्मनिष्ठेचा संदेश देण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या अनुषंगाने लोहा तालुक्यातील पेनूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आली तसेच चित्रफित दाखविण्यात आली. 

कंधार तालुक्यातील फुलवळ केंद्रांतर्गत असलेल्या जि. प. शाळेत चित्रकला व भाषण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जैतापूर व जि.प. प्राथमिक शाळा रहाटी बु. येथे “हिंद दी चादर” ही माहितीपट विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली.  जि.प. केंद्र प्राथमिक शाळा चिखली, जि.प. केंद्र प्राथमिक शाळा कौठा व जि.प. कन्या शाळा कौठा (ता. कंधार) येथील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच चित्रफितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या महान कार्याची माहिती देण्यात आली.

जि.प. नवीवाडी, जि.प. प्राथमिक शाळा बळीरामपूर (केंद्र वसरणी), जि.प. प्राथमिक शाळा ब्राह्मणवाडा तसेच जिल्हा परिषद हायस्कूल भायेगाव येथे हिंद दी चादर गीत व व्हिडिओ विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काकांडी येथे हिंद दी चादर गीत व कथा सादरीकरण टीव्हीच्या माध्यमातून सादर करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद नागापूर व जि.प. प्राथमिक शाळा तुप्पा येथे विद्यार्थ्यांना हिंद दी चादर चित्रपट दाखविण्यात आला.

या कार्यक्रमाच्या व्यापक प्रचार व प्रसिद्धीसाठी जिल्ह्यातील सर्व शाळा, आश्रमशाळा व महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक व जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. जनजागृती मोहीम १५ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. २५ जानेवारी २०२६ पर्यंत शाळांमधील परिपाठाच्यावेळी श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या कार्यावर आधारित गीतांचे सादरीकरण करण्याबाबत सूचना निर्गमित,डॉक्युमेंटरी प्रदर्शन, घोषवाक्याचा प्रसार : “हिंद दी चादर- श्री गुरु तेग बहादुर”

तालुकास्तरीय स्पर्धा (१५ ते १७ जानेवारी २०२६) चित्रकला स्पर्धा, गायन स्पर्धा, निबंध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा ई.

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा दिनांक : २० जानेवारी २०२६

ठिकाण : गुरु ग्रंथसाहेबजी भवन, सचखंड पब्लिक स्कूलजवळ हिंगोली गेट, नांदेड

विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमध्ये सहभागाची संधी असून, जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना मुख्य कार्यक्रमाच्या वेळी मा. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येईल. हिंद दी चादर कार्यक्रमाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीद्वारे आजपासून जिल्हाभर जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.

00000








"जिथे कोणीही लहान किंवा मोठा नाही, जिथे फक्त सेवा आणि भक्ती आहे. गुरु नानक देव जी यांच्या पवित्र तत्वांना समर्पित, #लंगर ची ही परंपरा आपल्याला मानवतेचा धडा शिकवते." #हिंद_दी_चादर


 

 #हिंद_दी_चादर

#शीख धर्म हा १५ व्या शतकात #गुरुनानकदेव यांनी स्थापन केलेला एकेश्वरवादी धर्म आहे,जो एकाच देवाची उपासना,समानता,निस्वार्थ सेवा व सामुदायिक सेवा यावर भर देतो.याचे अनुयायी 'शीख' म्हणून ओळखले जातात.त्यांचे पवित्र ग्रंथ 'गुरु ग्रंथ साहिब' आहे.

 विशेष लेख

श्री गुरू तेग बहादूर साहिबजी आणि संत नामदेव : भारतीय संत परंपरेतील धर्म, मानवता व बलिदानाचा संगम

नांदेड येथे येत्या 24 व 25 जानेवारी 2026 रोजी आयोजित हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने श्री गुरू तेग बहादूर साहिबजी आणि संत नामदेव यांच्या भारतीय संत परंपरेतील धर्म, मानवता व बलिदानाचा संगम याविषयी या लेखातून ऊहापोह करण्यात आला आहे. 

भारतीय आध्यात्मिक आणि संत परंपरा ही विविध काळात, विविध प्रदेशात जन्मलेल्या थोर विभूतींनी समृद्ध झालेली आहे. या परंपरेत शीख धर्माचे नववे गुरू, हिंद दी चादर म्हणून ओळखले जाणारे श्री गुरू तेग बहादूर साहिबजी आणि महाराष्ट्रातील म्हणजेच हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव येथील वारकरी संप्रदायातील महान संत नामदेव महाराज यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. दोघांचे कार्य, विचार आणि त्याग हे धर्मरक्षण, मानवता, समता आणि नैतिक मूल्यांचे प्रतीक मानले जातात.

संत नामदेव महाराज हे १३ व्या-१४ व्या शतकातील महान भक्त संत असून त्यांनी विठ्ठल भक्तीच्या माध्यमातून समाजात समता, नामस्मरण आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला. जात-पात, उच्च-नीच भेद नाकारून त्यांनी सामान्य जनतेला ईश्वरभक्तीचा मार्ग मोकळा करून दिला. त्यांनी रचलेल्या अभंगांमधून मानवता, करुणा आणि सामाजिक ऐक्याचे तत्त्व प्रभावीपणे मांडले गेले. संत नामदेव महाराजांची कीर्ती महाराष्ट्राच्या सीमांपुरती मर्यादित न राहता उत्तर भारतापर्यंत पोहोचली. त्यांचे अनेक अभंग पंजाबी भाषेत आहेत.

दुसरीकडे, १७ व्या शतकात शीख धर्माचे नववे गुरू श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांनी धर्मस्वातंत्र्य, मानवाधिकार आणि धार्मिक सहिष्णुतेसाठी अद्वितीय बलिदान दिले. तत्कालिन शासकाच्या‌ धार्मिक अत्याचारांविरुद्ध उभे राहत, त्यांनी काश्मिरी पंडितांच्या धर्मरक्षणासाठी प्रसंगी आपले प्राण अर्पण केले. धर्मासाठी शिश कापले गेले, परंतु त्यांनी कधीही अन्यायासमोर शरणागती पत्करली नाही. त्यामुळेच त्यांना हिंद दी चादर ही गौरवपूर्ण उपाधी प्राप्त झाली आहे.

संत नामदेव आणि श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या काळात सुमारे तीन शतकांचे अंतर असले, तरी त्यांच्या विचारांमध्ये मूलभूत समानता आढळून येते. दोघांनीही ईश्वर एकत्व, मानवमूल्ये, अन्यायाविरुद्ध संघर्ष आणि धार्मिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. संत नामदेवांनी भक्तीच्या मार्गाने समाजपरिवर्तन घडविले, तर गुरू तेग बहादूर साहिबजी यांनी त्याग आणि बलिदानाच्या मार्गाने धर्मरक्षणाचा आदर्श निर्माण केला.

विशेष म्हणजे, संत नामदेव महाराजांचे अभंग शीख धर्माच्या पवित्र ग्रंथ गुरुग्रंथ साहिबमध्ये समाविष्ट आहेत. यावरून संत नामदेव यांच्या विचारांचा शीख धर्मपरंपरेवर झालेला प्रभाव स्पष्ट होतो. हा संबंध भारतीय संत परंपरेतील सांस्कृतिक एकात्मतेचे आणि सर्वसमावेशकतेचे उत्तम उदाहरण आहे.

आजच्या काळात श्री गुरू तेग बहादूर आणि संत नामदेव यांच्या विचारांचे महत्त्व अधिकच अधोरेखित होते. धार्मिक सहिष्णुता, सामाजिक सलोखा, मानवाधिकार आणि नैतिक मूल्यांची जोपासना करण्यासाठी त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळते.  श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांचे बलिदान आणि संत नामदेव यांची भक्तीपर परंपरा ही भारतीय समाजाला एकता, सद्भावना आणि राष्ट्रभावनेच्या दिशेने नेणारी दीपस्तंभ ठरते. त्यामुळे आज त्यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर भारतवर्ष विविध जनजागृतीपर कार्यक्रम राबवून त्यांना अभिवादन करत आहे.

- चंद्रकांत कारभारी, उपसंपादक, जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

***



 आपल्या बोटाला शाई, भक्कम होईल लोकशाही !

#नांदेड शहर महानगरपालिका सार्वत्रिक #निवडणूक २०२५-२६
मतदान तारीख : १५ जानेवारी २०२६
वेळ: स. ७:३० ते ५:३० ​
कर मतदान, सांगतंय संविधान !!



विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...