Monday, January 25, 2021

 विकेल ते पिकेल धोरणातर्गंत शेतकरी ते ग्राहक थेट विक्री मेळाव्याचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 25 :- "विकेल ते पिकेल" धोरणातर्गंत संत शिरोमणी सावतमाळी रयत बाजार अभियानशेतकरी ते ग्राहक थेट विक्री मेळावा कृषि विभागाने आयोजित केला आहे. हा मेळावा 26 ते 29 जानेवारी 2021 या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सकाळी  10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या या मेळाव्याचा जास्तीत जास्त  ग्राहकांनी लाभ घ्यावा असे, आवाहन   जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी केले आहे. 

या महोत्सवामध्ये विविध प्रकारचे फळे व भाजीपाला, डाळी, सेंद्रीय पदार्थ, पाक, मध, मसाले, लाकडी घाण्याचे तेल, लोणची तसेच तीळ, कारळ, जवस, ज्वारी, बिबेची गोडींबी, शेतमालावर प्रक्रिया केलेले विविध पदार्थ इत्यादी उत्पादनांचे आकर्षण असणार असून हा शेतीमाल शेतकऱ्यांमार्फत ग्राहकांना थेट विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नांदेड यांनी दिली.

000000

 10 कोरोना बाधितांची भर तर 25 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

 

नांदेड (जिमाका) दि. 25 :- सोमवार 25 जानेवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 10 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 5 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 5 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 25 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 

 

आजच्या 1 हजार 573 अहवालापैकी 1 हजार 554 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 22 हजार 274 एवढी झाली असून यातील 21 हजार 184 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 305 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 9 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 582 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.    

 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 5,  माहूर तालुक्यांतर्गत 2जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 9, मुदखेड तालुक्याअंतर्गत 4 , खाजगी रुग्णालय 3 असे एकूण 25 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.10 टक्के आहे.  

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 1, कंधार 1, हदगाव 1, अर्धापूर 1, किनवट 1, असे एकुण 5 बाधित आढळले.  ॲटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड हदगाव 1, मुखेड 1, मुंबई 1, किनवट 1, कंधार 1 असे एकूण 5 बाधित आढळले.

 

जिल्ह्यात 305 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 16, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 17, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 9, मुखेड कोविड रुग्णालय 7, महसूल कोविड केअर सेंटर 9, किनवट कोविड रुग्णालय 2, देगलूर कोविड रुग्णालय 4, नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण 193नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 35, खाजगी रुग्णालय 13 आहेत.  

 

सोमवार 25 जानेवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 167, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 90 एवढी आहे.  

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 3 हजार 590

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 77 हजार 44

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 22 हजार 274

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 21 हजार 184

एकुण मृत्यू संख्या-582

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.10 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-9

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-396

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-305

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-9.          

00000

 

नांदेड जिल्हा वार्षिक योजनेच्या 2021-22 साठी

एकुण 462.91 कोटीच्या प्रारुप आराखड्याला मान्यता 

जिल्ह्यातील विकास कामांसाठी अधिकचा

दीडशे कोटी रुपये निधी मिळविण्यासाठी प्रयत्नशील  

-         पालकमंत्री अशोक चव्हाण 

नांदेड, (जिमाका) दि. 25 :- नांदेड जिल्ह्याची भौगोलिक रचना लक्षात घेता आणि तालुक्यांची संख्या विचारात घेऊन विकास कामांची संख्या इतर जिल्ह्याच्या तुलनेत जास्त आहे. या विकास कामांसाठी अधिकचा दिडशे कोटी रुपये निधी मिळावा यादृष्टिने येत्या 9 फेब्रुवारीला होणाऱ्या राज्यस्तरीय बैठकीत मागणी करु, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत नांदेड जिल्हा वार्षिक योजनेच्या सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी एकुण 462.91 कोटीच्या प्रारुप आराखड्याला सर्वांनुमते मान्यता देण्यात आली. 

डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, खासदार हेमंत पाटील, आमदार अमर राजूरकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार राजेश पवार, आमदार भिमराव केराम, आमदार मोहन हंबर्डे, आमदार रावसाहेब अंतापूरकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, आणि सदस्य उपस्थित होते. 

सन 2020-21 आर्थीक वर्षातील जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजनेसाठी एकुण 542.59 कोटी रुपये तरतुद मंजूर आहे. हा निधी शासनाकडून प्राप्त असून तरतुदीपैकी यंत्रणेच्या मागणीप्रमाणे 73.43 कोटीचे वितरण करण्यात आलेले आहे. यात 64.59 कोटी खर्च झालेला आहे. जिल्ह्यातील विविध विकास कामे सुरु असून उर्वरीत खर्च मार्च अखेरपर्यंत नियोजित आहे. या बैठकीत 2019-20 च्या जिल्हा वार्षिक योजनेतील सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजनेच्या 479.33 कोटी खर्चास मान्यता देण्यात आली. 

राज्यातील नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा लाभ जिल्ह्याला व्हावा यादृष्टिने नांदेड ते जालनापर्यंतच्या विशेष महामार्ग मंजूर केल्याद्दल यासभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री पालकमंत्री अशोक चव्हाण याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष अभिनंदानाचा ठराव या बैठकीत सर्वांनमुते घेण्यात आला. कोरोना काळात शासनाच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी जनतेला वैद्यकीय सेवासुविधा व इतर जीवनावश्यक वस्तुंची कमतरता पडू नये यासाठी जे नियोजन केले होते त्याबद्दलही अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला.

0000





 

आदिवासी विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणाची दारे उघडी करून देणाऱ्या

"मिशन निट -2021" या उपक्रमाचे प्रजासत्ताक दिनी

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार उद्घाटन  

नांदेड (जिमाका) दि. 25 :- शासकीय आश्रम शाळा व  कनिष्ठ महाविद्यालयातील  विज्ञान शाखेच्या आदिवासी विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणाची दारे उघडी करून देण्यासाठी प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या "मिशन निट-2021" या उपक्रमाचे मंगळवार 26 जानेवारीला पालकमंत्री अशोक चव्हाण व जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे हस्ते ऑनलाईन उद्घाटन होणार आहे. 

शासकीय आश्रम शाळा किनवट व बोधडी (बु ) येथे 22 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2021 पर्यंत "मिशन निट -2021" हा उपक्रम चालणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी या उपक्रमाची आखणी केली आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या पाटोदा (खु ), बोधडी (बु) , सहस्त्रकुंड व सारखणी या शासकीय आश्रम शाळेतील कनिष्ठ महाविद्यालयात 11 वी व 12 वी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची चाचणी परीक्षा घेऊन 325 विद्यार्थ्यांची निवड या मिशनकरिता करण्यात आली आहे. मुख्याध्यापक नागनाथ कराड यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय आश्रम शाळा किनवट येथे 152 मुले-मुली व मुख्याध्यापक श्याम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय आश्रम शाळा बोधडी (बु) येथे 153 मुली प्रशिक्षण घेत आहेत. 

325 विद्यार्थ्यांना दररोज सकाळी 8 ते 1 वाजेपर्यंत डॉ. मोटेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरसीसीचे तज्ज्ञ प्राध्यापक ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत ; तर दुपारी 3 ते 5 या वेळेत शासकीय आश्रम शाळा कनिष्ठ महाविद्यालयातील 10 शिक्षक किनवट येथे व 12 शिक्षक बोधडी (बु) येथे जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, मराठी व इंग्रजी या विषयाचं मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत स्वयंअध्ययन असणार आहे. 

सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) मनोज टिळे यांच्या नेतृत्वात गोकुंदा (पूर्व) व किनवट येथील गृहपालांनी मुलांची राहण्याची व्यवस्था आपल्या शासकीय वसतिगृहात केली आहे. तर मुलींची व्यवस्था शासकीय आश्रम शाळा किनवट व बोधडी (बु) येथे केली आहे.

00000


 

 राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास

सक्त मनाई , ध्वजसंहितेचे पालन व्हावे

नांदेड (जिमाका) दि. 25 :- राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. यासाठी सर्व शासकीय यंत्रणांसह शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना आदीसह नागरीकांनी दक्ष रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे तसेच मराठवाडयात 17 सप्टेंबर आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा सामन्यांच्यावेळी विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. अशा कार्यक्रमात प्लास्टिकेचे ध्वज वापरल्याने, कार्यक्रमानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे ध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले असतात, पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत स्पष्ट तरतूद आहे. ध्वजसंहितेच्या कलम 2.2 (x) मधील प्रयोजनासाठीच कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये उल्लेख नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये. 

प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करण्याकरीता जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत. त्यांनी असे खराब झालेले, माती लागलेले ध्वज जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी तसेच नागरिकांनी सुपूर्द केले असे ध्वज गोणी किंवा कपडयामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक नष्ट करण्याबाबत परिपत्रकात व ध्वजसंहितेत स्पष्ट सूचना आहेत. त्यानुसार खराब झालेल्या ध्वजाची विल्हेवाट लावण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर केलेल्या उपरोक्त व्यवस्थेबाबत सर्व शासकीय कार्यालये, अर्धशासकीय कार्यालये, स्थानिक प्राधिकरणे व शैक्षणिक संस्था यांनी योग्य ती दखल घ्यावी व कार्यवाही करावी, असेही गृह विभागाने म्हटले आहे.

000000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...