Wednesday, May 3, 2017

मानव विकास निर्देशाकांत मराठवाडा
अग्रेसर होईल यासाठी प्रयत्न करा - डॉ. भापकर
नांदेड येथील कार्यशाळेत ग्रामस्तरीय यंत्रणांशी साधला थेट संवाद

नांदेड दि. 3 :- मानव विकास निर्देशाकांत मराठवाडा अग्रेसर होईल यासाठी प्रयत्न  करा. या भुमिचे पाईक आहात, तर तिच्यासाठी झिजण्याची तयारी ठेवा. कामाशी प्रामाणिक राहिलात, तर त्यातून आरोग्य पर्यायाने आनंद लाभेल, असा मन मोकळा संवाद साधत विभागीय आयुक्त डॅा. पुरुषोत्तम भापकर यांनी आज येथे थेट ग्रामस्तरीय यंत्रणांना प्रेरीत केले. थेट विभागीय आयुक्तांनीच संवाद साधल्यामुळे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांच्यासह जिल्ह्यातील महसूल, विकास तसेच कृषी आदी यंत्रणांतील अधिकारी-कर्मचारी भारावून गेले. मराठवाडा विकासात्मक विविध कार्यक्रम विशेष मोहिम स्वरुपात राबविण्याच्या उद्देशाने डॅा. भापकर यांनी मराठवाड्याचा व्यापक दौरा सुरु केला आहे. त्यानिमित्ताने आज येथील ए. के. संभाजी मंगल कार्यालयात कार्यशाळा संपन्न झाली.
कार्यशाळेस जिल्हा परीषद उपाध्यक्ष समाधान जाधव, शिक्षण व आरोग्य समिती सभापती माधवराव मिसाळे, समाज कल्याण समिती सभापती शिला निखाते यांच्यासह जिल्हाधिकारी अरूण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, मनपा आयुक्त समीर उन्हाळे, सहायक जिल्हाधिकारी डॅा. राजेंद्र भारूड, विभागीय अप्पर आयुक्त विजयकुमार फड, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपायुक्त (विकास) पारस बोथरा, उपायुक्त (पुरवठा) वर्षा ठाकूर, मनरेगांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, श्री. रेणापूरकर, तसेच उपजिल्हाधिकारी बी. एम. कांबळे, अधीक्षक कृषी अधिकारी डॅा. तुकाराम मोटे, डीआरडीएचे प्रकल्प संचालक डॅा. सुधीर भातलंवडे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी, तसेच तालुका कृषि अधिकारी, कृषी सहायक, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, तलाठी, सहायक प्रकल्पाधिकारी आदींची उपस्थिती होती.
मार्गदर्शनपर भाषणात डॅा. भापकर म्हणाले की, नांदेड जिल्हा आकाराने, विस्ताराने मोठा आहे. सोळा तालुक्यांचा जिल्हा आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळही या जिल्ह्यात आहे. हे संख्याबळच आपली ताकद आहे. त्यामुळे मागे रहायचे नाही, या मनोधैर्याने प्रयत्न करा. प्रत्येक सैनिक हा सेनापती आहे, या सक्षमतेची जाणीव व्हावी यासाठी हा प्रयत्न आहे. काही कारणांनी मराठवाडा प्रदेश मानव विकासात मागे आहे. शिक्षण या घटकासाठी प्रयत्न करण्यात आले. पण आता यापुढे शिक्षण, पाणी, शेती, स्वयंरोजगार यांच्यासह जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, आरोग्याचे कार्यक्रम राबविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्याकडे सामर्थ्य आहे पण ते ओळखले पाहिजे. जे चांगले काम करतात, त्यांचा सन्मान करू. जे मध्येच आहेत, त्यांचे स्थान निश्चित करू. बाहेर आहेत, त्यांना कामाच्या प्रवाहात आणू. यातून काम करणाऱ्यांची संख्या वाढवू असेही त्यांनी सांगितले.
कामाशी प्रामाणिक राहतात त्यांचे आरोग्य चांगले राहते, ते अधिक आनंदी राहतात, असे सांगून डॅा. भापकर म्हणाले की, या कार्यशाळेचा उद्देशच हा आहे की, तुम्हाला आनंदाचा मार्ग शोधून द्यायचा आहे. भूमिपूत्र असाल, तर तुम्हाला या भुमीसाठी झिजण्याची तयारी ठेवा. सरकारचे "फ्लॅगशीप"चे कार्यक्रम हे समाजाचे कार्यक्रम आहेत. या प्रत्येक कार्यक्रमाशी आपल्या प्रत्येकाचा संबंध आहे. त्यामुळे या सर्व कार्यक्रमांच्या अंमलबजावणीच्या पातळीवर मराठवाड्याला अग्रेसर ठेवा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मनरेगा अंतर्गत समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना, मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार अभियान, मनरेगा, वृक्षारोपण, स्वच्छ भारत मिशन, घरकुल योजना, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान, सात / बारा संगणकीकरण, ईपॉज मशीन व ईपीडीएमएस या विषयांच्या अनुषंगाने उपस्थितांशी प्रश्नोत्तरे करत, अडीअडचणी जाणून घेत मोकळा संवाद साधला. तसेच या कार्यक्रमांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावाही घेतला.
प्रास्ताविकात जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले की, ग्रामीण भागात विकासासाठी काम करणाऱ्या यंत्रणांबरोबर थेट संवाद साधण्याचा हा अनोखा उपक्रम आहे. आपल्याकडे गुणवत्ता आणि आपण मनात आणले तर खूप काही साध्य करु शकतो. त्यामुळे योजना नागरिकांच्या दारात पोहचविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, ज्यातून अनेक घटकांचे स्थलांतर थांबेल. यावेळी त्यांनी जलयुक्त शिवार, स्वच्छ भारत मिशन यासारख्या योजनांना आणखी गती दयावी लागेल, असेही नमूद केले.
सुरुवातीला कार्यशाळेचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन झाले. उपायुक्त श्रीमती ठाकूर यांचेही समयोचित भाषण झाले. कार्यक्रमात महसूल कर्मचारी संघटना यांच्यासह विविध घटकांनी डॉ. भापकर यांचा सत्कार केला. तत्पूर्वी कार्यशाळेत मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शिनगारे यांनीही स्वच्छ भारत मिशन, मनरेगा, या विषयी मार्गदर्शन केले. सहाय्यक वनसंरक्षक जी. एस. पवार, वरिष्ठ भूवैज्ञानिक विजेता सोळंकी यांनी नांदेड जिल्ह्यातील यशस्वी योजनांविषयी सादरीकरण केले. उपजिल्हाधिकारी रोहयो श्री. कांबळे यांनीही मनरेगा विषयी मार्गदर्शन केले. उपविभागीय अधिकारी दिपाली मोतियेळे यांनी सूत्रसंचालन केले. अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आभार मानले.

000000
मराठवाडा विकासात्मक विविध कार्यक्रम विशेष मोहिम स्वरुपात राबविण्याबाबत विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी बुधवारी नांदेड येथे जिल्ह्यातील महसूल तसेच विकास, कृषि, सामाजिक वनीकरण यासह विविध यंत्रणांसाठी कार्यशाळा घेतली. ए के संभाजी मंगल कार्यालय येथे झालेल्या या व्यापक कार्यशाळेत बोलताना विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, तसेच याप्रसंगी उपस्थित जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, मनपा आयुक्त समीर उन्हाळे आदी. कार्यशाळेस जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव, शिक्षण आणि आरोग्य समिती सभापती माधवराव मिसाळे, समाज कल्याण सभापती शिला निखाते यांच्यासह विविध नगरपालिकांचे नगराध्यक्षही उपस्थित होते. ( छाया - विजय होकर्णे नांदेड  )










राष्ट्रीय लोकअदालतीच्या आयोजनासाठी
विविध प्रकरणाबाबत आढावा बैठक संपन्न
नांदेड, दि. 3  :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये 8 जुलै 2017 रोजी राष्ट्रीय लोकअदालत जिल्हयातील सर्व न्यायालयात संपन्न होणार आहे. त्याअनुषंगाने नुकतीच प्रमुख जिल्हा न्यायाधीश सविता बारणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. प्रमुख जिल्हा न्यायाधीश नांदेड यांच्या निजकक्षात 2 मे 2017 रोजी बैठक संपन्न झाली.
लोकअदालतीत दिवाणी प्रकरणे, तडजोडपात्र अशी फौजदारी प्रकरणे, वितरण कंपनींची प्रकरणे तसेच मनपा नगरपालीका यांची पाणीपट्टी प्रकरणे, विविध विमा कंपन्यांची प्रकरणे विविध बॅंकांची प्रलंबित दाखल र्व प्रकरणे सामजस्याने निकाली काढण्यात येणार आहेत. आढावा बैठकीत विमा प्रकरणे बॅंक प्रकरणे तडजोडीने जास्तीतजास्त प्रमाणात निकाली काढण्यासाठी न्या. . एल. यावलकर, न्या. जी. बी. गुरव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी सचिव न्या. डी. टी. वसावे तसेच जिल्हा अभिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड. मिलींद एकताटे,  जिल्हा सरकारी कील अॅड. अमरिकसिंघ वासरीकर, न्यायालयीन व्यवस्थापक एम. के. आवटे, विधीज्ञ, विविध विमा कंपन्यांचे बॅंकांचे विधी सल्लागार, विमा अधिकारी, बॅंकांचे अधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली.
यामध्ये सदरील प्रकरणे चालविणारे विधीज्ञ, उपस्थित अधिकारी यांनी प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी विचारलेल्या विविध अडचणींच्या समस्यांचे सविता बारणे यांनी इतर न्यायाधीशांची विस्तृत चर्चा करून त्यांच्या समस्यांचे निराकरण केले. ही राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करून या सुवर्णसंधीचा संबंधित पक्षकारांनी फायदा रुन घ्यावा, असेही आवाहन सर्व न्यायाधीशाच्यावतीने करण्यात आले.

                                                               000000
एमएचटी- सीईटी 2017 परीक्षा आयोजनातील
विविध घटकांचे प्रथम प्रशिक्षण संपन्न
नांदेड, दि. 3 :- एमएचटी सीईटी 2017 या परीक्षेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय व शासकीय तंत्रनिकेतन नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने परीक्षेसाठी नियुक्त उपकेंद्र प्रमुख, समवेक्षक, पर्यवेक्षक यांच्यासाठीचे प्रथम प्रशिक्षण वर्ग नुकतेच संपन्न झाले. येथील डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात मंगळवार 2 मे 2017 रोजी प्रशिक्षण संपन्न झाले.  

प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी विभागीय प्राधिकारी तथा गुरु गोबिंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. एल. एम. वाघमारे उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे तहसिलदार ज्योती पवार या उपस्थित होत्या. परीक्षेचे जिल्हा संपर्क अधिकारी तथा प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन नांदेडचे पी. डी. पोपळे यांनी बारावी नंतरचा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील परीक्षेचा टप्पा महत्वाचा असल्याने परीक्षा सुरळीत संपन्न होण्यासाठी संबंधितांनी आपआपली जबाबदारी व्यवस्थीत पार पाडावी असे सांगितले. परीक्षेच्या अनुषंगाने महत्वपूर्ण बाबी पुढीलप्रमाणे आहे, जिल्ह्यात एकूण 27 परीक्षा केंद्र असून विद्यार्थी संख्या 8 हजार 42 इतकी आहे. गुरुवार 11 मे 2017 रोजी होणारी एमएचटी-सीईटी 2017 ही अभियांत्रिकी व औषध निर्माण शास्त्र (फार्मसी) व फार्मडी या अभ्यासक्रमासाठी सामायिक प्रवेश परीक्षा आहे. केंद्राची विभागणी एमएम, एमबी, बीबी अशी करण्यात आली आहे. जिल्हा केंद्र प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा होणार आहे.
एमएम केंद्रावर पेपर-1 गणित व पेपर-2 (फिजीक्स व केमिस्ट्री) असून सकाळी 9.15 पासून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. दुपारी 2 वा. परीक्षा संपणार आहे. एम. बी. केंद्रावर पेपर-1 गणित, पेपर-2 (फिजीक्स व केमिस्ट्री) आणि पेपर-3 (बायोलॉजी) आहे. सकाळी 9.15 वाजेपासून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार असून सायं. 4.30 वा. परीक्षा संपणार आहे. बीबी केंद्रावर पेपर-2 (फिजीक्स व केमिस्ट्री ) व पेपर-3 (बायोलॉजी) असणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर दुपारी 12 वाजेपासून प्रवेश मिळणार असून सायं. 4.30 वा. परीक्षा संपणार आहे.
सर्व परीक्षा केंद्रावर वीज पुरवठा खंडीत होणार नाही याची खबरदारी घेतली जाणार आहे. दोन-तीन परीक्षा केंद्राच्या जवळपास एक वैद्यकीय पथक वैद्यकीय अधिकाऱ्यांसह तैनात रहणार आहे. उपकेंद्र प्रमुखाच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक उपकेंद्रावर "तक्रार निवारण समिती" कार्यरत असणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या दिवशी 144 कलम लागू करण्यात येणार आहे. परीक्षेचे स्वरुप बहुपर्यायी स्वरुपाचे असल्याने ओएमआर शीट उत्तरपत्रिकेवर केवळ काळ्या शाईचे बॉलपेन विद्यार्थ्यांना वापरता येणार आहे. परीक्षा केंद्रावरील व्यवस्थेचे, नियोजनाचे सुक्ष्म निरिक्षण करण्यासाठी राज्य सामायिक कक्षातर्फे निरीक्षक म्हणून केंद्राच्या संस्थेच्या प्रमाणात नेमण्यात आले आहेत. परीक्षा केंद्रावर मोबाईल, घडयाळ नेण्याची परवानगी नाही. तसेच इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक संयंत्र आणण्याची परवानगी नाही. 
प्रा. उश्केवार यांनी परीक्षेची रुपरेषा व जबाबदारीचे वाटप याबाबत प्रास्ताविकात माहिती दिली. प्रा. लोकमनवार व प्रा. दमकोंडवार यांनी दृकश्राव्य माध्यमातून सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रथम प्रशिक्षणाचे सुत्रसंचलन प्रा. एस. आर. मुधोळकर यांनी केले तर आभार प्रा. बी. व्ही. यादव यांनी मानले.
परिक्षा आयोजनासाठी प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा मंगळवार 9 मे 2017 रोजी डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. प्रशिक्षणासाठी उपकेंद्र प्रमुख समवेक्षक, पर्यवेक्षक उपस्थित राहणार आहेत. जिल्हा संपर्क अधिकारी यांच्या मदतीला सात सहाय्यक जिल्हा संपर्क अधिकारी नेमण्यात आले आहेत.

000000
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरा
शुक्रवारी प्रा. हावळे यांचे व्याख्यान
            नांदेड दि. 3 :- स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय सेतू समिती, नांदेड वाघाळा शहर महानगरपालीका, जिल्हा ग्रंथालय धिकारी यांच्यावतीने उज्ज्वल नांदेड" माहिमेअतंर्गत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार 5 मे 2017 रोजी सायंकाळी 5 वा. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये  डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथे "चालू घडामोडीची तयारी" या विषयावर लक्षवेध मासिकाचे संपादक प्रा. बळीराम हावळे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. 
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, नांदेड मनपा आयुक्त समीर उन्हाळे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी विविध स्पर्धा परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार होणार आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या शिबिराउपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकाच्यावतीने करण्यात आले आहे.

000000
प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेत 'ई-ठिबक'द्वारे
शेतक-यांचे ऑनलाईन अर्ज स्विकारण्यास सुरवात
            नांदेड दि. 3 :-  प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत केंद्र पुरस्कृत सुक्ष्म सिंचन योजना सन 2017-18 साठी सुक्ष्म सिंचन संच बसविण्यासाठी शेतक-यांना ऑनलाईन नोंदणी करण्यास शेतकऱ्यांकड अर्ज स्वीकृती करण्यासाठी ई-ठिबक ज्ञावली 1 मे 2017 पास सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांचे अर्ज ई-ठिबक अज्ञावलीमध्ये ऑनलाईन प्रणालीव्दारे अर्ज स्विकारणे सुरु झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड यांनी दिली आहे.
सुक्ष्म सिंचन संच बसविण्यासाठी शेतक-यांना ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी अर्ज भरण्यासाठी 'ई-ठिबक' अज्ञावली दिनांक 1 मे 2017 ते दिनांक 31 डिसेंबर 2017 या कालावधीत सुरु राहील. अर्ज फक्त 'ई-ठिबक' आज्ञावली www.mahaethibak.gov.in मध्ये ऑनलाईन प्रणालीव्दारेच स्विकारण्यात येतील. ई-ठिबक आज्ञावलीवर शेतकरी नोंदणीसाठी लाभधारकाचा आधार क्रमांक हाच संबंधी लाभधारकाचा लॉगीन आयडी राहणार आहे. शेतकरी नोंदणी अर्जामध्ये E-KYC साठी अर्जदारांची संमती असल्याबाबत सुक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार संबंधीत 'माझ्या वैयक्तिक माहितीचा उपयोग करण्यास माझी सहमती आहे" या तरतुदीचा समावेश करण्यात आला आहे. ई-ठिबक आज्ञावली केंद्र शासनाच्या DBT (Direct Benefit Transfer) पोर्टलशी जोडण्यात येत आहे. यामुळे अर्जदाराच्या जन्म दिनांकाचा समावेश नोंदणी अर्जामध्ये करण्यात आला आहे. लाभार्थी नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड यंत्रणेव्दारे आधार कार्डचा डाटा ई-ठिबक आज्ञावलीशी संलग्न करण्याची कार्यवाही चाल आहे. तोपर्यत लाभार्थींना आधार अपलोड करण्याची सुविधा निर्माण करुन देण्यात आली आहे. लाभार्थींना ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर स्वयंचलित संगणकीय प्रणालीव्दारे शेतक-यांना उपलब्ध अनुदानाच्या मर्यादेत ऑनलाईन पुर्वसंमती प्रदान करण्यात येईल. पुर्वसंमती दिल्यानंतर शेतक-यांने 30 दिवसाच्या कालावधीत सुक्ष्म सिंचन संच बसव बिलाची प्रत 'ई-ठिबक' आज्ञावलीवर अपलोड करणे आवश्यक राहील. विहीत कालावधीत शेतकऱ्यांने बिलाची प्रत अपलोड केल्यास लाभधारकाचा अर्ज 'ई-ठिबक' आज्ञावलीत आपोआप (Auto Delete) रद्द होणार आहे. लाभधारकाचा अर्ज आपोआप (Auto Delete) रद्द झाल्यानंतर र्व संमती आपोआप रद्द होईल तथापी लाभार्थ्यास योजनेचा लाभ घेण्यासाठी पुन्हा अर्ज करता येईल.  शेतकरी नोंदणी अर्जामध्ये 'मी पुर्वसंमती शिवाय सुक्ष्म सिंचन संच बसविल्यास अनुदानास पात्र असणार नाही. याची मला जाणीव आहे,' अशा आशयाच्या स्वंय घोषणापत्राचा समावेश करण्यात आला आहे. स्वयं घोषणापत्र देणे लाभधारकास बंधनकारक राहील. अर्ज करतना अर्जामध्ये सुक्ष्म सिंचन संच उत्पादक वितरक यांचा समावेश असणार नाही. सुक्ष्म सिंचन संच उत्पादकांचे वितरकाचे नाव बील इनव्हाईस इंट्री नंतर मोका तपासणीच्या वेळी घेण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. पुर्वसंमती प्राप्त झाल्यानंतर 30 दिवसांच्या कालावधीत सुक्ष्म सिंचन संच बसवुन 'ई-ठिबक' अज्ञावलीमध्ये बील इनव्हाईस अपलोड करणे अनुदान मागणीचा प्रस्ताव विहित कालावधीत आवश्यक कागदपत्रासह तालुका कृषि अधिकारी कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे. अर्जदारास विविध टप्प्यावर झालेल्या कार्यवाहीची माहिती मोबाईलव्दारे एसएमएस अलर्ट पाठविण्याची सुविधा निर्माण करण्यात आली असल्यामुळे आपला मोबाईल क्रमांक बिनचुकपणे नोंदविणे आवश्यक आहे. शेतक-यांच्या बँक खाते क्रमांकात बदल करण्याची सुविधा बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतक-यांनी त्यांचा बँक खातेक्रमांक बिनचूकपणे नोंदविणे आवश्यक आहे.
लाभ घेण्यासाठी वरील कालावधीत विहित पध्दतीत शेतक-यांनी अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. टी. एस. मोटे यांनी केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी संबंधीत कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क करावा किंवा कृषि विभागाचे अधिकृत स्थळ  www.mahaethibak.gov.in वर माहिती उपलब्ध आहे.

0000000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...