Wednesday, October 17, 2018


नांदेड जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पदाचा
मेजर (नि) मिलींद तुंगार यांच्याकडे अतिरीक्‍त कार्यभार
           नांदेड, दि. 17: - पुणे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (नि) मिलींद तुंगार यांच्याकडे नांदेड आणि परभणी जिल्हयाचा अतिरीक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. 
या पुर्वीही  त्यांच्याकडे  नांदेड जिल्हयाचा  अतिरीक्त  कार्यभार 2016 मध्ये होता.  सैनिक कल्याण कार्यालय नांदेड अधिनिस्त सैनिकी मुलांचे वसतिगृह व सैनिक विश्रामगृह तसेच माजी सैनिक / विधवा यांचे कार्य तत्परतेने होणे आवश्यक असल्याने जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी असणे गरजेचे होते. 
मिलींद तुंगार हे नांदेडचे असल्याने माजी सैनिकांचे कामे तत्परतेने होतील व नवीन योजना येतील असे  जिल्हा सैनिक कार्यालयाचे कल्याण संघटक कमलाकर शेटे यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले.
00000


गुणवंत मुलामुलींना उच्च शिक्षण विभागाची शिष्यवृत्ती
शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 17: उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत राज्यातील खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण विभागाची शिष्यवृत्ती मिळणार आहे. जे गुणवंत विद्यार्थी पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका व पीएचडी अभ्यासक्रमासाठी टीएचई (Times Higher Education) किंवा क्युएस (Quacquarelli Symonds) रँकीग 200 च्या आतील विविध देशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतील अशा 20 विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडून दरवर्षी शिष्यवृत्ती मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ही योजना उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ‘गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती’ मंजूर करणे या नावाने शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून राबविण्यात येणार आहे.
विविध शिक्षण शाखेनुसार विद्यार्थ्यांची अभ्यासक्रमनिहाय विद्यार्थी संख्या कला शाखा- 2, वाणिज्य शाखा- 2, विज्ञान शाखा-2, व्यवस्थापन शाखा-2, विधी अभ्यासक्रम-2, अभियांत्रिकी/वस्तू कला शास्त्र -8 आणि औषधनिर्माणशास्त्र-2 अशी असून या प्रमाणे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे.
  या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरणे, आवश्यक प्रमाणपत्रे/कागदपत्रे अर्जासोबत अपलोड करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्जाशिवाय इतर कोणत्याही पध्दतीने केलेला अर्ज विचारात घेण्यात येणार नाही.
संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरणे आणि आवश्यक प्रमाणपत्र/कागदपत्र अर्जासोबत अपलोड करणे यासाठी 15 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर 2018 (सायंकाळी 5 वाजेपर्यंत) मुदत देण्यात आली आहे. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत, आवश्यक प्रमाणपत्र/कागदपत्रे साक्षांकित प्रतीसोबत मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी संबंधित विभागीय कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. कला, वाणिज्य, विज्ञान व विधी अभ्यासक्रमासाठी उच्च शिक्षण विभागाचे विभागीय कार्यालय तर व्यवस्थापन, अभियांत्रिकी/वास्तुकलाशास्त्र आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी तंत्र शिक्षणचे विभागीय कार्यालय यांना 19 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर 2018 (सायंकाळी 5 वाजेपर्यंत) जमा करणे आवश्यक आहे.
विद्यार्थी व विद्यार्थ्यांचे आई / वडील अथवा पालक भारताचे नागरिक तसेच महाराष्ट्र राज्याचे अधिवास असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांस परदेशातील THE / QS अद्ययावत वर्ल्ड रॅन्कींगमध्ये 200 च्या आत असलेल्या शैक्षणिक संस्था / विद्यापीठामध्ये पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका किंवा पीएचडी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी गुणवत्तेनुसार शैक्षणिक वर्ष 2018-19 मध्ये प्रवेश मिळालेला असणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांचे / कुटुबांचे व विद्यार्थी नोकरी करीत असल्यास त्याचे स्वत:चे उत्पन्न धरुन सर्व मार्गांनी मिळाणारे मागील आर्थिक वर्षातील एकत्रित वार्षिक उत्पन्न 20 लाखापेखा जास्त नसावे. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत व आवश्यक प्रमाणपत्र व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतीसोबत सदर अर्ज संबंधित विभागीय कार्यालयात वेळापत्रकानुसार मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी सादर करावा.
अधिक माहिती सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in आणि संचालनालयाच्या www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. याबरोबरच विभागीय कार्यालय, उच्च शिक्षण व विभागीय कार्यालय आणि तंत्र शिक्षण यांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नांदेड विभागातील नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली या चार जिल्ह्यातील खुल्या प्रवर्गातील उच्च शिक्षित विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. शैला सारंग यांनी केले आहे.
000000



कापसाच्या प्रथम वेचणीत

दोन गुंठ्यात 25 किलो उत्पादन    
नांदेड दि. 17 :- अर्धापूर तालुक्यात खैरगाव येथे कापूस पिकाचा पिक कापणी प्रयोगाअंती दोन गुंठ्यात 25 किलो कापसाचे उत्पादन निघाले आहे. हे उत्पादन दोन गुंठ्यात प्रथम वेचणीत निघाले असून द्वितीय वेचणी शिल्लक आहे. हा प्रयोग उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांच्या पर्यवेक्षणाखाली तहसिलदार नरहिरे, जिल्हा प‍रिषद सदस्य बबन बारसे, पंचायत समिती सदस्य अशोक कपाटे, सरपंच, शेतमालक, इतर गावकऱ्यांच्या समक्ष करण्यात आला.अशी माहिती उपविभागीय अधिकारी प्रदिप कुलकर्णी यांनी दिली.


 







विधानपरिषद विरोधी पक्षनेता
धनंजय मुंडे यांचा दौरा
नांदेड दि. 17 :- महाराष्ट्र विधानपरिषद विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
गुरुवार 18 ऑक्टोंबर 2018 रोजी सकाळी 9.30 वा. शक्तीकुंज वसाहत परळी वैजनाथ जि. बीड येथून हेलीकॉप्टरने माहूरकडे प्रयाण. सकाळी 10.15 वा. माहूर येथे आगमन. सकाळी 10.20 वा. शासकीय विश्रामगृह माहूर येथे आगमन व राखीव. दुपारी 12.30 वा. माहूर येथून हेलीकॉप्टरने परळी वैजनाथ जि. बीडकडे प्रयाण करतील.
00000000

पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांचा दौरा
नांदेड दि. 17 :- राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शनिवार 20 ऑक्टोंबर 2018 रोजी सकाळी 8 वा. शासकीय विश्रामगृह लातूर येथून नांदेडकडे प्रयाण. सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे दुष्काळग्रस्त गावांच्या भेटीच्या अनुषंगाने बैठकीस उपस्थिती. दुपारी 2 वा. उमरी तहसिल कार्यालय येथे दुष्काळग्रस्त गावांच्या आढावा बैठकीस उपस्थिती व उमरी तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना भेटी व पिक पाहणी. सायं 8 वा. शासकीय विश्रामगृह बिलोली येथे आगमन, राखीव व मुक्काम.
रविवार 21 ऑक्टोंबर 2018 रोजी सकाळी 8 वा. बिलोली तहसिल कार्यालय येथे दुष्काळग्रस्त गावांच्या आढावा बैठकीस उपस्थिती. सकाळी 9 वा. बिलोली तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना भेटी व पीक पाहणी. दुपारी 2 वा. देगलूर तहसिल कार्यालय येथे दुष्काळग्रस्त गावांच्या आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 3 वा. देगलूर तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना भेटी व पिक पाहणी. सायं. 8 वा.शासकीय विश्रामगृह मुखेड येथे आगमन, राखीव व मुक्काम.
सोमवार 22 ऑक्टोंबर 2018 रोजी सकाळी 8 वा मुखेड तहसिल कार्यालय येथे दुष्काळग्रस्त गावांच्या आढावा बैठकीस उपस्थिती. सकाळी 9 वा. मुखेड तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना भेटी व पिक पाहणी. दुपारी 12.30 वा. नायगाव तहसिल कार्यालय येथे दुष्काळग्रस्त गावांच्या आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 1.30 वा. नायगाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना भेटी व पिक पाहणी व नांदेड रेल्वे स्टेशनकडे प्रयाण. सायं. 6 वा. नांदेड रेल्वे स्टेशन येथून देवगिरी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.
000000


वाहन नोंदणीसाठी आज
आरटीओ कार्यालय सुरु राहणार   
नांदेड दि. 17 :- सार्वजनिक सुट्टीच्या (दसरा निमित्त) गुरुवार 18 ऑक्टोंबर 2018 रोजी वाहनाच्या नवीन नोंदणीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड चालु राहणार आहे. संबंधित नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले.
0000000


नवउद्योजक घडविण्यासाठीच्या
स्टार्टअप यात्रेस नांदेडमध्ये प्रतिसाद
नांदेड दि. 17 :- नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्टअप इंडिया-महाराष्ट्र यात्रेस नांदेडमध्ये उत्तम प्रतिसाद लाभला.
स्टार्टअप इंडिया-महाराष्ट्र यात्रेचे आयोजन केंद्रीय औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभाग, केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग तसेच महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य इनोव्हेटिव्ह सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या यात्रेचा शुभारंभ 3 ऑक्टोंबर रोजी राजभवन मुंबई येथे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. ही यात्रा 10 जिल्ह्यांमध्ये शिबिर आयोजित करीत असून 23 शहरांमध्ये स्टार्टअप व्हॅन थांबणार आहे. याअंतर्गत नांदेड शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात ही यात्रा आली होती. यावेळी स्टार्टअप याविषयातील मार्गदर्शन, संसाधने, इन्क्युबेटर, ॲक्सेलरेटर यासारखे स्टार्टअपशी संबंधित विविध कार्यक्रम, निधी मिळविण्याची प्रक्रिया आणि स्टार्टअपशी इको सिस्टीमकडून स्टार्टअपला मिळणारे फायदे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. गोरख गर्जे, जिल्हा कौशल्य अधिकारी बी. आर. रिठे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाच्या उद्योग निर्मिती केंद्राचे झोरे, स्टार्टअप माहिती मार्गदर्शक करणसिंग, उपप्राचार्य पी. डी. पोपळे, कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. एस. चौधरी यांनी मार्गदर्शन केले.
 कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्थापत्य अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख एस. पी. कुलकर्णी यांनी केले. यावेळी प्राध्यापक, उद्योजक व विद्यार्थी, विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000

वृत्त क्र. 283

  वृत्त क्र.   283 निवडणूक खर्च निरीक्षक नांदेडमध्ये दाखल ; खर्चावर काटेकोर लक्ष ठेवण्याचे आवाहन नांदेड, दि. 28 : लोकसभा निवडणूक ही अतिशय गं...