Wednesday, October 10, 2018

अपघातात बळी पडलेल्या 13 प्रकरणात
नुकसान भरपाईचे 18 लाख रुपये मंजूर
नांदेड, दि. 10 :- अपघातात बळी पडलेल्या व्यक्तींना नुकसान भरपाई म्हण यात एकुण 13 प्रकरणांमध्ये 18 लाख रुपये आर्थिक मदत मंज केली आहे. या निधीमुळे पिडिताच्या कुटूंबाला आधार मिळाला असुन त्यांना भविष्यात या रक्कमेची योग्य ती मदत होईल असा विश्वास जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव न्यायाधीश डी. टी. वसावे यांनी व्यक्त केला.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे जिल्हा न्यायाधीश-1 एस. एस. खरात यांचे अध्यक्षतेखाली मोटार अपघात, अॅसिड हल्ल्यात बळी पडलेल्या फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 357 मधील तरतुदींनुसार पुनर्वसन आवश्यक असलेल्या व्यक्तींना न्यायालयाच्या निर्णयानुसार नुकसान भरपाई देण्याच्या प्रयोजनार्थ जिल्हा न्यायाधीश-1 नांदेड, जिल्हाधिकारी नांदेड, पोलीस अधिक्षक नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड यांची समिती गठीत केली होती.
0000

दिव्यांग मतदार नोंदणीसाठी सहकार्य करावे
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
        नांदेड, दि. 10 :- दिव्यांग मतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी जास्तीतजास्त दिव्यांगांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
दिव्यांग मतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी जिल्हा‍ निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. डोंगरे बोलत होते.
            भारत निवडणूक आयोगाने विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दिव्यांग मतदार नोंदणीवर विशेष भर दिला आहे. नवीन नाव नोंदणी बरोबरच यापुर्वीच ज्याची नावे मतदार यादीत आहेत ती नावे ध्वजांकित केली जात आहेत. जेणे करुन मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांना आवश्यक सुविधा पुरविणे शक्य होईल, असेही श्री. डोंगरे यांनी सांगितले.   
            उपजिल्हा निवडणूक अधिकारी दिपाली मोतीयेळे यांनी विविध शासकीय कार्यालयात कार्यरत कर्मचाऱ्यांची नाव नोंदणी तपासणीसाठी संबंधित आस्थापनाकडून याद्या मागविल्या आहेत. शासकीय कार्यालयाच्या एकत्रीत प्रयत्नांतून जास्तीतजास्त दिव्यांगांकडे पोहचणे शक्य असल्याने जिल्हा परिषद, महानगरपालिका, महसूल, समाज कल्याण, शिक्षण, आरोग्य विभाग, भारत स्काऊड गाइड आदी विभागाचे सहकार्य निवडणूक विभागाने घेतले आहे, असे त्यांनी सांगितले.
जास्तीतजास्त दिव्यांगांची नोंद व्हावी यासाठी संभाव्य उपाय योजनांची तसेच दिव्यांग स्वयंसेवी संस्थांची या कामात कशी मदत घेत येईल याबाबत बैठकीत चर्चा झाली. बैठकीस उपविभागीय अधिकारी प्रदिप कुलकर्णी, तहसिलदार किरण अंबेकर, संबंधित विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.  
00000


आणिबाणीच्या कालावधीत तुरुंगवास भोगाव्या
लागलेल्या व्यक्तींनी माहिती सादर करण्याचे आवाहन
        नांदेड, दि. 10 :-  सन 1975 मे 1977 मधील आणिबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदीवास / तुरुंगवास सोसावा लागला त्यांनी यापुर्वी अर्ज सादर केलेल्या सर्व संबंधितांनी अर्जाचा नमुना परिशिष्ट अ व शपथपत्राचा मसुदा परिशिष्ट ब मध्ये माहिती आवश्यक पुरावा कागदपत्रांच्या प्रमाणित प्रतीसह 20 ऑक्टोंबर 2018 पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सादर करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.  
            सन 1975 व 1977 मधील आणिबाणीच्या कालावधीत लोकशाहीसाठी लढा देणाऱ्या ज्या व्यक्तींना बंदीवास / तुरुंगवास सोसावा लागला अशा व्यक्तींचा सन्मान / यथोचित गौरव करण्यासंबंधी धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने अर्जदारांकडून प्राप्त करुन घ्यावयाच्या अर्जाचा नमुना परिशिष्ट अ मध्ये असून शपथपत्राच्या मसुद्यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. सुधारित शपथपत्राचा मसुदा परिशिष्ट ब मध्ये सादर करण्याबाबत शासनाने सुचना दिल्या आहेत, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
00000


नांदेड शिख गुरुद्वारा सचखंड
श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळ निवडणक 2018
प्रारुप मतदार यादीवर आक्षेप असल्यास
लेखी स्वरुपात दाखल करण्याचे आवाहन   
  नांदेड, दि. 10 :- येथील नांदेड शिख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळाच्‍या निवडणूक प्रारुप मतदार यादीबाबत हरकती, दावे आक्षेप यासंदर्भात 4 ऑक्टोंबर रोजी जिल्‍हाधिकारी नांदेड यांनी पारीत केलेले आदेशान्वये आक्षेप असल्यास संबंधित मतदारांन मुदतीत विभागीय आयुक्‍त कार्यालयात लेखी स्‍वरुपात अपिल दाखल करावेत, असे आवाहन जिल्‍हाधिकारी नांदेड यांच्‍यावतीने करण्‍यात आले आहे.              
जिल्‍हाधिकारी नांदेड यांनी दिलेल्‍या निकालाविरुध्‍द अपिल करण्‍यासाठी सक्षम अधिकारी, विभागीय आयुक्‍त औरंगाबाद विभाग औरंगाबाद यांचेकडे 5 ते 19 ऑक्‍टोबर 2018 या कालावधीत अपीलार्थींना व्दितीय अपील दाखल करता येईल. विभागीय आयुक्‍त औरंगाबाद यांचेकडे 20 ते 26 ऑक्‍टोबर 2018 या कालावधीत प्राप्‍त अपील निकाली काढण्‍यात येतील. त्यानंतर 3 नोव्‍हेंबर 2018 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्‍द होईल.
नांदेड जिल्‍ह्यातील व नांदेड तालुक्‍यातील ज्‍या मतदारांनी दुबार मतदार नोंदणी केली आहे किंवा एकापेक्षा जास्‍त वेळा नोंदणी केली आहे अशा मतदारांची नावे अंतिम मतदार यादीतून वगळण्‍याबाबत 4 ऑक्टोंबर रोजी आदेश पारीत करण्‍यात आल आहेत. या आदेशाच्‍या प्रती संबंधित जिल्‍हाधिकारी कार्यालये, संबंधित तहसिल कार्यालये येथे पाहण्‍यास उपलब्‍ध आहेत.
प्राप्‍त हरकती व दावे, आक्षेप अर्जांच्‍या अनुषंगाने, संबंधित तहसिलदार यांचे अभिप्राय / अहवाल, आक्षेपकर्त्‍यांचे अर्ज, सुनावणी दरम्‍यान निदर्शनास आलेले अभिलेखे यावरुन माजलगाव जि. बीड, मंठा जि. जालना, मुदखेड जि. नांदेड, नांदेड जि. नांदेड  येथील अंतिम मतदार यादीतून काही नावे वगळणे, काही मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्‍ट करणे, काही मतदारांची नावामध्‍ये दुरुस्‍ती करणे, काही मतदाराच्‍या नावाशी संबंधीत विधानसभा मतदार संघ क्रमांक, यादी भाग क्रमांक, यादीतील अनुक्रमांक व नावातील दुरुस्‍ती करणे, नांदेड तालुक्‍याच्‍या प्रारुप मतदार यादीत मुदखेड तालुक्‍यातील विधानसभा मतदारसंघातील ज्‍या मतदारांच्‍या नावाचा समावेश झाला आहे अशा मतदारांची नावे मुदखेड तालुक्‍याच्‍या अंतिम मतदार यादीत समाविष्‍ट करणेबाबत 4 ऑक्टोंबर 2018 रोजी आदेश पारीत करण्‍यात आले आहेत.
नांदेड शिख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब बोर्ड अधिनियम 1956 च्‍या कलम 6 (1) (2) मधील तरतुदीप्रमाणे नांदेड शिख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळाच्‍या तीन सदस्‍यांना निवडून देण्‍यासाठी घ्‍यावयाच्‍या निवडणूकीसाठी तयार करण्‍यात आलेली प्रारुप मतदार यादी या कार्यालयाचे अधिसचनेन्‍वये 27 ऑगस्‍ट 2018 रोजी मतदार क्षेत्र औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, उस्‍मानाबाद, नांदेड, बीड लातूर हे संपुर्ण जिल्‍हे व चंद्रपुर जिल्‍ह्यातील राजूरा, कोरपना व जीवती हे तालुके (तत्‍कालीन हैद्राबाद निजाम संस्‍थानाचा महराष्‍ट्रातील भाग) येथे प्रसिध्‍द करुन 28 ऑगस्‍ट ते 26 सप्‍टेंबर 2018 या कालावधीत प्रारुप मतदार यादीवर हरकती व दावे स्विकारण्‍यात आले. सदरील दावे, व हरकती, आक्षेप अर्जांच्‍या अनुषंगाने 27 29 सप्टेंबर 2018 रोजी सुनावणी घेण्‍यात आली होती, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
00000


महिला लोकशाही दिनी
अर्ज करण्याचे आवाहन 
  नांदेड, दि. 10 :- समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी सोमवार 15 ऑक्टोंबर 2018 रोजी महिला लोकशाही दिनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 
दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. सोमवार 15 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमुद संबंधीत विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000


  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...