Friday, September 10, 2021

 जिल्ह्यातील 101 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 101 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. शनिवार 11 सप्टेंबर 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 

मनपा क्षेत्रातील श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पौर्णिमा नगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर, रेल्वे हॉस्पिटल या 17 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. याचबरोबर श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पौर्णिमा नगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर, रेल्वे हॉस्पिटल या 17 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत.

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, माहूर, मांडवी, लोहा, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. तसेच उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, माहूर, मांडवी, लोहा, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस डोस उपलब्ध आहेत. ग्रामीण भागात 68 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस देण्यात आले आहेत.

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. जिल्ह्यात 9 सप्टेंबर 2021 पर्यंत एकुण 11 लाख 33 हजार 323 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात 10 सप्टेंबरपर्यत कोविड लसींचा साठा खालीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 9 लाख 90 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 3 लाख 2 हजार 80 डोस याप्रमाणे एकुण 12 लाख 92 हजार 110 डोस प्राप्त झाले आहेत.

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणी सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

00000

 

 सार्वजनिक गणेशोत्सवातील सुधारीत मार्गदर्शक सूचना 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- सार्वजनिक गणेशोत्सवात गणेश मुर्तीचे मुखदर्शन अथवा प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. दर्शन केवळ ऑनलाईन अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे उपलब्ध करुन देण्यात यावे अशा सुधारीत मार्गदर्शक सुचना जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केल्या आहेत. यापूर्वी मुद्दा क्र. 10 मध्ये प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारीरिक अंतराचे (फिजीकल डिस्टन्सिंग) तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे असे नमूद केले होते.

0000

 

 जिल्ह्यातील भौगोलिक रचना व नदी-नाल्यांचे रुप पाहता

कोकणाच्या धर्तीवर पायी चालण्यासाठी साकवाचा विचार करू

-         सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण 

पुरात वाहून गेलेल्या लक्ष्मीबाईच्या परिवाराला आर्थिक मदतीचा धनादेश 

नांदेड (जिमाका) दि. 10:- नैसर्गिक आपत्ती आणि पुरात होणारी जीवत हानी ही अनपेक्षित आणि तेवढीच दु:खद असते. कोणाच्या परिवारात झालेली जिवीत हानी कितीही मदत केली तरी ती भरुन काढता येणारी नाही. पालकमंत्री व शासनाचा एक घटक या नात्याने मी जिल्ह्यातील सर्व अतिवृष्टीग्रस्त लोकांच्या समवेत असून शासन पातळीवर जे काही शक्य आहे ती सारी मदत करण्यास आम्ही तत्पर असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. 

भोकर तालुक्यातील डौर या गावातील पुरात वाहून मयत पावलेल्या लक्ष्मीबाई हनमंत चंदापुरे यांच्या परिवारातील सदस्यांची आज त्यांनी भेट घेऊन धीर दिला. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते मयत लक्ष्मीबाई यांचे पती हनमंत चंदापुरे यांना शासनाच्यावतीने 4 लाख रुपयाचा मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी आमदार अमर राजूरकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, प्रशिक्षणार्थी आयएएस कार्तिकेयन, भोकरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे, जिल्हा परिषदेचे कृषि व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर, आदी मान्यवर उपस्थित होते. 

नांदेड जिल्ह्यातील भौगोलिक रचना, लहान-मोठ्या नदी-नाल्यांना पूर येऊन ग्रामीण भागात होणारी जिवीत हानी चिंताजनक आहे. अनेक खेड्यात पुरामुळे शेतात अडकून पडलेल्या लोकांना आपल्या घरी परतण्यासाठी नाल्यावरुन सुरक्षित मार्ग नसल्याची वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. घरी परतण्याच्या प्रयत्नात काही प्रसंगी लोक वाहून जातात. या आपत्तीत केवळ मानवी चुका म्हणून पाहून चालणार नाही, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. यातून मार्ग काढण्यासाठी कोकणाच्या धर्तीवर नाल्याच्या ठिकाणी पायी सुरक्षित चालण्यापुरते लोखंडी साकव तयार करता येतात का याची चाचपणी करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांना दिले. नांदेड येथे ठरावीक चौकात गर्दीतून लोकांना सुरक्षित जाता यावे या उद्देशाने उभारण्यात आलेल्या ओव्हर ब्रिजचा वापर नसल्याने हे लोखंडी ब्रिज जर अशा अपघात प्रवन क्षेत्रात हलवता येतील का याचीही चाचपणी करण्याचे त्यांनी सांगितले. 

पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज अर्धापूर तालुक्यातील शेलगाव, सांगवी खु., सावरगाव, भोकर तालुक्यातील डौर, सायाळ, सायखोड व इतर क्षेत्रातील पूरग्रस्त भागाची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे त्यांनी निर्देश दिले. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पुरात वाहून गेलेल्या व नैसर्गिक आपत्ती (वीज पडून) मृत पावलेल्या व्यक्तींच्या 20 कुटुंबांना शासनाच्यावतीने आर्थिक मदत करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.

00000





  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...