Friday, November 18, 2016

विधान परिषद निवडणुकीसाठी
आज आठ केंद्रांवर मतदान
मतमोजणी 22 नोव्हेंबर रोजी
नांदेड, दि. 18 :- महाराष्ट्र विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शनिवार 19 नोव्हेंबर 2016 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी आज निवडणूक कार्यालयाकडून मतदान साहित्य रवाना करण्यात आले.
शनिवारी 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 यावेळेत मतदान होईल. मतदान पद्धतीबाबत मतदारांना विहीत प्रक्रिया अवगत करण्यात आली आहे. त्याप्रमाणे मतपत्रिका आणि मतदान याबाबतची सर्व प्रक्रिया गुप्त मतदान प्रक्रियेनुसार काटेकोरपणे अंमलात आणली जाणार आहे.
या निवडणुकीसाठी डॅा. जगदीश पाटील निवडणूक निरीक्षक तर जिल्हाधिकारी सुरेश काकाणी  निवडणूक निर्णय अधिकारी आहेत.  
मतदानासाठी मतदान केंद्र म्हणून आठही उपविभागीय कार्यालयस्तरावर तहसील कार्यालयांची निश्चिती करण्यात आली आहे. आठही मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष, दोन मतदान अधिकारी आणि एक क्षेत्रीय अधिकारी अशा अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वच मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मतमोजणी मंगळवार 22 नोव्हेंबर, 2016 रोजी सकाळी 8 वाजता सुरु होईल. तर जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे मतमोजणी होईल.

00000
जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड, दि. 18  :- जिल्ह्यात बुधवार 30 नोव्हेंबर 2016  रोजी मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
आगामी काळातील सण, उत्सव आणि इतर सार्वजनिक कार्यक्रम, विविध प्रकारची संभाव्य आंदोलनांची शक्यता यांच्‍या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात बुधवार 16 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2016 रोजीच्‍या मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमूद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
000000

  
माजी सैनिक, कुटुंबासाठी पुनर्वसनाच्या
विविध योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन  
नांदेड दि. 18 :- पुनर्वसन व कल्याण विभाग सरंक्षण मंत्रालय नवी दिल्ली यांच्यावतीने युद्ध विधवा, युद्धात अपंगत्व आलेले माजी सैनिक व सैन्य सेवेत असताना शहीद पावलेल्या जवानांच्या विधवा पाल्यांसाठी विविध योजनेसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.
यामध्ये मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी 7 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत, मुलीच्या विवाहासाठी 1 लाख रुपये, अपंग माजी सैनिकांसाठी मोडीफाईड स्कूटर खरेदीसाठी 70 हजार रुपये व अनाथ मुलांसाठी 1 लाख रुपये आर्थिक मदतीच्या योजना जाहीर झाल्या आहेत. यासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहे. पात्र माजी सैनिक, विधवा यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे भेट देवून या योजनांची माहिती घ्यावी, असे आवाहन मेजर मिलींद तुंगार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000000
माजी सैनिकांच्या पाल्यासाठी
पंतप्रधान शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
नांदेड दि. 18 :- माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी असलेली पंतप्रधान शिष्यवृत्तीकरीता ऑनलाईन अर्ज स्विकारण्याची मुदत बुधवार 30 नोव्हेंबर 2016 पर्यंत वाढविण्यात आली आहे. ज्या माजी सैनिकांनी त्यांच्या पाल्यांचे अर्ज ऑनलाईन भरले नाहीत त्यांनी अर्ज ऑनलाईन करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
जे माजी सैनिकांचे पाल्य इयत्ता 12 वी परीक्षेत 60 टक्के गुण प्राप्त करुन उत्तीर्ण झाले आहेत व त्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी (जसे इंजिनिअरींग, एमबीबीएस, बीएएमएस, बीएस्सी नर्सींग, बीएस्सी, फिजीओथेरीपी, बीएस्सी ॲग्री इत्यादी ) प्रवेश घेतला आहे त्यांना पंतप्रधान शिष्यवृत्ती लागू आहे. यासंबंधी पात्र माजी सैनिकांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे माहिती घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

000000
विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदान, मतमोजणी दिवशी
दारु विक्री बंदीचा आदेश  
नांदेड दि. 18 :- जिल्ह्यात उपविभागीय कार्यालयाच्या ठिकाणी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शनिवार 19 नोव्हेंबर 2016 रोजी मतदान होत आहे. तर मंगळवार 22 नोव्हेंबर 2016 रोजी नांदेड येथे मतमोजणी होणार आहे. ही प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे शांततेत पार पाडण्यास मदत व्हावी तसेच शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडू नये याकरीता मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी नांदेड यांनी जिल्ह्यात मतदान होत असलेल्या उपविभागीय कार्यालयाच्या हद्दीतील सर्व सीएल-3, एफएल-2, एफएल-3 (परवाना कक्ष), एफएल-4, एफएल / बिआर-2 व ताडी विक्रीच्या अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.
मतदान होत असलेल्या जिल्ह्यातील गावाच्या ठिकाणी मतदानाचा दिवस 19 नोव्हेंबर रोजी पूर्ण दिवस. तर मतमोजणी होणाऱ्या ठिकाणी मुख्यालयी मतमोजणीचा दिवस 22 नोव्हेंबर रोजी मतमोजणी पूर्ण होईपर्यंत हा आदेश लागू राहील. आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल असेही आदेश म्हटले आहे.

0000000
फुले विकास महामंडळाकडून व्यवसाय प्रशिक्षणासाठी अर्ज मागविले   
        नांदेड दि. 18 :- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवाराकरीता तांत्रिक कौशल्य प्राप्त करण्याकरीता विविध व्यवसायाचे शासनमान्य संस्था आयटीआय मार्फत प्रशिक्षण देण्यात येते. यासाठी महामंडळाच्या कार्यालयाकडे  बुधवार 31 नोव्हेंबर 2016 पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापक यांनी केले आहे.
            सन 2016-17 या वर्षासाठी संगणक, ब्युटीपार्लर, इलेक्ट्रीशियन, शिवणकला, मोटार वायरींग, वाहन चालक, नळजोडणी, ॲटोमोबाईल रिपेरिंग इ. प्रशिक्षणासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जासोबत जात प्रमाणपत्र, उत्पन्न, राशनकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला शैक्षणिक प्रमाणपत्र व छायाचित्रे लावून जिल्हा व्यवस्थापक महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ कार्यालय , डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ग्यानमाता शाळेसमोर नांदेड येथे यात 31 नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करावेत , असेही आवाहन केले आहे.

00000000