Thursday, July 13, 2023

 विशेष वृत्त

हातभट्टी व ताडीमुक्त अभियानाद्वारे चिकाळातांड्याने घेतले मुक्तिचे श्वास
▪️सलग महिनाभर मोहीम व समुपदेशनामुळे तांड्यावरील लोकांना रोजगाराचे नवे मार्ग
विभागीय उपआयुक्त उषा शर्मा
▪️जिल्हा प्रशासनाकडून शासकीय योजनाद्वारे केली जातेय मदत
नांदेड (जिमाका) दि. 13 :- नांदेड जिल्हा हातभट्टी व ताडी मुक्त होण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक व्यापक मोहिम हाती घेतली आहे. आजवर राबविल्या जाणाऱ्या मोहिमेचे अनुभव लक्षात घेऊन याला अधिक सकारात्मक व परिणामकारक करण्यासाठी ज्या हद्दीत हातभट्टी आहे ती संबंधित ग्रामपंचायत, महसूल विभाग व पोलीस विभागासमवेत ही मोहिम राबविली जात आहे. एकाच वेळी धाड टाकून हातभट्टी, ताडी मुक्तीला आळा बसत नसल्याने सलग महिनाभर दररोज समुपदेशनासह कारवाई करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले. या दुहेरी कार्यपद्धतीमुळे आता हातभट्टी चालक रोजगाराच्या नव्या संधीसाठी तयार झाले आहेत. नांदेड जिल्ह्यातील हातभट्टीसाठी आव्हानात्मक ठरलेल्या मुदखेड तालुका व विशेषत: मौजे चिकाळा तांडा यासाठी प्रातिनिधीक ठरला असून लवकरच इतर तांडे व ठिकाणे नवा बदलासाठी तयार होतील, असा विश्वास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय उपआयुक्त उषा शर्मा यांनी व्यक्त केला.
हातभट्टी व ताडीमुक्तीचे हे अभियान 10 मे पासून आजतागायत सलग सुरू आहे. मुदखेड तालुक्यातील चिकाळा तांडा हा यासाठी आव्हानात्मक असल्याने यावर लक्ष देण्यात आले. आतापर्यंत 81 गुन्हे दाखल करून 4 लाख 75 हजार 660 रुपयाचा मुद्देमालही जप्त करण्यात आलेला आहे. याचबरोबर या संपूर्ण परिसरातील सराईत गुन्हेगार शोधून त्यांच्यावर एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. हातभट्टीसाठी जे व्यापारी काळा गुळ पुरवतात त्या व्यापारी व इसमांना शोधून त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या गुन्ह्यातील लोकांना रोजगाराचे नवीन मार्ग मिळावेत यासाठी त्यांच्या पात्रतेप्रमाणे शासकीय योजना पोहचविता याव्यात यादृष्टीने जिल्हा परिषद, महसूल विभाग व शासनाच्या इतर विभागाच्यावतीने एकत्रित प्रयत्न केले जात आहेत. याचबरोबर गटविकास अधिकारी, तहसिलदार, सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी, इतर समुपदेशकांना बोलावून त्यांचाही चिकाळा तांड्यातील लोकांशी सुसंवाद घडवून आणल्या जात असल्याची माहिती उपायुक्त उषा शर्मा यांनी दिली. जिल्ह्यात ज्या ठिकाणी हातभट्टी, गावठी दारू, ताडी / सिंधी निर्मिती विक्रीचे समुळ उच्चाटन करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क दक्ष आहे. नागरीकही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद देत आहेत. ज्या गावात हातभट्टी अथवा ताडी व्यवसाय चालू असेल त्याबाबतची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 1800 233 9999 या टोलफ्री क्रमांकावर कळवावी, असे आवाहन अधिक्षक अ. अ. कानडे यांनी केले आहे.
00000




खरीप हंगाम पिक स्पर्धा-2023 शेतकऱ्यांनी भाग घेण्याचे आवाहन

खरीप हंगाम पिक स्पर्धा-2023 शेतकऱ्यांनी भाग घेण्याचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 13 :- खरीप हंगाम पीक स्पर्धा 2023 कृषी विभागाकडून राबविण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत मूग व उडीद पिकासाठी 31 जुलै तर ज्वारी, बाजरी, तूर, सोयाबीन पिकासाठी 31 ऑगस्ट 2023 पर्यंत आहे. पिक स्पर्धेच्या मार्गदर्शक सुचना कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, तालुका कृषि अधिकारी कार्यालशी संपर्क साधावा, असे आवाहन नांदेड जिल्हा अधीक्षक कृषि कार्यालयाने केले आहे. सध्याच्या पीक स्पर्धेतील महत्वाच्या बाबी पुढीलप्रमाणे आहेत. पिक स्पर्धेसाठी पिकनिहाय तालुका हा एक घटक आधारभुत धरण्यात येईल. खरीप हंगामासाठी स्पर्धेतील समाविष्ट पिके ज्वारी, बाजरी, तुर, मुग, उडीद, सोयाबीन असे पिके आहेत. प्रति तालुका किमान स्पर्धक संख्या सर्वसाधारण गटासाठी 10 व आदिवासी गटासाठी 5 आहे. पीकस्पर्धेत सहभागी लाभार्थ्याचे शेतावर त्यापिकाखाली किमान 10 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पुरेशे अर्ज प्राप्त झाल्यानंतर व संबंधित पिकाचे क्षेत्र पीक स्पर्धा घेण्याइतके म्हणजे 1 हजार हेक्टर पेक्षा जास्त असेल तरचे पिकस्पर्धा संबंधित तालुका कृषि अधिकारी जाहीर करतील. तालुक्यात पीक कापणी प्रयोग घ्यावयाची किमान संख्या सर्वसाधारण गटासाठी 5 व आदिवासी गटासाठी 4 राहिल. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाचवेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. प्रवेश शुल्क सर्व गटासाठी पीकनिहाय प्रत्येकी रक्कम 300 रुपये एवढी राहिल. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क 0401-पिक संवर्धन, 104-शेती क्षेत्रापासून प्राप्त जमा रकमा, (00)(02)-पिकस्पर्धा योजनेखालील जमा रकमा 0401047301 या लेखाशिर्ष मध्ये चलनाद्वारे शासकीय कोषागारात मुदतीत जमा करावे. पीक स्पर्धेत भाग घेवू इच्छिणाऱ्या स्पर्धकांचे अर्ज विहित नमुन्यात भरुन त्यासोबत ठरवून दिलेले शुल्क चलन, सातबारा, 8 अ चा उतारा व जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास) या कागदपत्रांची पूर्तता करुन कृषी कार्यालयास द्यावे. पिकस्पर्धा विजेत्यांसाठी बक्षिस स्वरुप हे तालुका पातळीवर सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिसे रुपये पहिले 5 हजार रुपये, दुसरे 3 हजार रुपये तर तिसरे 2 हजार रुपये तर जिल्हा पातळीवर पहिले 10 हजार, दुसरे 7 हजार, तिसरे बक्षीस 5 हजार रुपये, राज्य पातळीवर पहिले 50 हजार, दुसरे 40 हजार, तिसरे 30 हजार रुपये राहिल. खरीप हंगाम 2023 साठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मुग व उडीद पिकासाठी 31 जुलै पुर्वी तर इतर खरीप पिकांसाठी 31 ऑगस्ट पूर्वी अर्ज सादर करुन पिकस्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे. 000000

दहावी, बारावी लेखी परीक्षेसाठी हेल्पलाईन सुरु

दहावी, बारावी लेखी परीक्षेसाठी हेल्पलाईन सुरु नांदेड, (जिमाका) दि. 13 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यावतीने जुलै-ऑगस्ट 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर इयत्ता दहावीसाठी 02382-251633 व इयत्ता बारावीसाठी 02382-251733 या क्रमांकावर लातूर विभागीय मंडळात हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. विद्यार्थी पालक व शाळा प्रमुखांनी आपल्या अडीअडचणी विषयी दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी केले आहे. तसेच नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचे भ्रमणध्वनी नंबर पुढील प्रमाणे आहेत. सहसचिव एम.सी. फडके यांचा भ्रमणध्वनी 9421030710, सहा.सचिव ए.आर.कुंभार 9405077991, तसेच उच्च माध्यमिक साठी एन.एन.डुकरे (व.अ) मो.नं. 8379072565, ए.सी.राठोड (क.लि) मो.नं. 8329471523 तर माध्यमिक साठी ए.पी. चवरे (व.अ) मो.क्र. 9421765683 तर आर.ए. बिराजदार (क.लि) मो.क्र. 9892778841 हा भ्रमणध्वनी संपर्क क्रमांक आहे. तर नांदेड जिल्ह्यासाठी समुपदेशक बी. एम. कच्छवे यांचा भ्रमणध्वनी 9371261500, बी.एम.कारखेडे मो.क्र.9860912898, पी.जी. सोळंके मो.क्र. 9860286857, बी. एच. पाटील 9767722071 यांचे भ्रमणध्वनी क्रमांक लातूर विभागीय मंडळाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहेत. 000000

शेतकरी उत्पादक कंपन्यांनी गोडाऊन घटकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

शेतकरी उत्पादक कंपन्यांनी गोडाऊन घटकासाठी अर्ज करण्याचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 13 :- मानव विकास कार्यक्रमा अंतर्गत नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्यांना उत्पन्न वाढीसाठी समुह संसाधन विकास केंद्र स्थापन करणे (गोडाऊन उभारणे) योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्यांनी संबंधीत तालुका कृषि कार्यालयात 15 जुलै 2023 पर्यंत अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी, बिलोली, धर्माबाद, मुदखेड, भोकर, हिमायतनगर, किनवट कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बी.एस. बऱ्हाटे यांनी केले आहे. नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनींना रोजगार उपलब्ध करून त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी समुह संसाधन विकास केंद्र स्थापन करणे (गोडाऊन उभारणे) योजना कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे. जिल्हयातील बिलोली (02), धर्माबाद(02), मुदखेड(01), भोकर(02), हिमायतनगर(02), किनवट(01) या तालुक्यांमध्ये 10 समुह संसाधन विकास केंद्र स्थापन करणे (गोडाऊन उभारणे) लक्षांक प्राप्त झाले आहे. लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लॉटरी पध्दतीने लक्षांकाच्या अधिन राहुन लाभार्थी शेतकरी उत्पादक कंपनीची निवड करण्यात येणार आहे. मार्गदर्शक सुचनेप्रमाणे काम पुर्ण करणाऱ्या गटांना 75 टक्के अनुदान देण्यात येईल असेही कृषी विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे. 0000

शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 13 :- डॉ. पंजाबराव देशमुख जैविक मिशन अंतर्गत नविन शेतकरी गट व नविन शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यासाठी लक्षांक प्राप्त झाले आहे. 200 शेतकरी गट व 20 शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करावयाच्या आहेत. शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गट स्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी संबधित तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे. नविन स्थापन झालेल्या शेतकरी गटांना व शेतकरी उत्पादक कंपनीना डॉ. पंजाबराव देशमुख जैविक मिशन अंतर्गत नैसर्गिक सेंद्रीय शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी क्षेत्रविस्तार, शेतकरी प्रशिक्षण, शेतकऱ्यांच्या शेतावर सेंद्रिय निविष्ठा निर्मिती करणे, शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गट स्तरावर जैविक निविष्ठा संसाधन केंद्र उभारणे, शेतकरी उत्पादक कंपनींना स्थायी /फिरते सेंद्रीय शेतमाल विक्री केंद्र उभारणी करणे इ. बाबींसाठी अनुदान देय आहे असे कृषी विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. 00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...