Sunday, January 24, 2021

 

नांदेड जिल्हा परिषदेचे सावित्रीबाई फुले व कै. नरहर कुरुंदकर पुरस्कार जाहीर

संध्या बारगजे, बेबीसुरेखा शिंदे ह्या सावित्रीबाई फुले तर

डॉ. सुरेश सावंत व आशा पैठणे कै. नरहर कुरुंदकर पुरस्काराचे मानकरी

नांदेड (जिमाका) दि. 24 :  नांदेड जिल्हा परिषदेच्यावतीने दिल्या जाणारे सावित्रीबाई फुले पुरस्कार व कै. नरहर कुरुंदकर पुरस्कारांची घोषणा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, शिक्षण समितीचे सभापती संजय बेळगे व मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केली आहे. सन 2019 व 2020 या दोन वर्षांच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून येत्या प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी 2021 रोजी या पुरस्कार वितरण सोहळा कुसुम सभागृहात सकाळी 10.30 वाजता होणार असून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी सुरेशराव अंबुलगेकर यांची उपस्थिती राहणार आहे. 

 नांदेड जिल्हा परिषद ही विकासात्मक कामाशिवाय सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील अत्युच्च योगदान असणाऱ्या मान्यवरांना दरवर्षी सावित्रीबाई फुले पुरस्कार व कै. नरहर कुरुंदकर पुरस्काराने सन्मानित करत असते. शिक्षण विभाग जिल्हा परिषद नांदेडच्यावतीने दिला जाणारा सन 2019 चा सावित्रीबाई फुले पुरस्कार बीड येथील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती संध्या बारगजे यांना तर सन 2020 चा सावित्रीबाई फुले पुरस्कार नांदेडच्या सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती बेबी सुरेखा शिंदे रावणगावकर यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच 2019 या वर्षाचा कै. नरहर कुरुंदकर पुरस्कार ज्येष्ठ लेखक, कवी डॉ. सुरेश सावंत यांना जाहीर करण्यात आला आहे. तर सन-2020 चा कै. नरहर कुरुंदकर पुरस्कार कवयित्री- लेखिका आशा पैठणे यांना जाहीर झाला आहे. 

सन 1995  पासून कै. नरहर कुरुंदकर व सावित्रीबाई फुले पुरस्काराची सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत कै. नरहर कुरुंदकर पुरस्काराने बाबा भांड, कै. भारतभूषण गायकवाड, प्रा. अमृत संभाजी देशमुख, प्रा. शेषराव मोरे, शयय. ना. धों. महानोर, डॉ. जनार्दन वाघमारे, सुधाकरराव डोईफोडे, प्रा.भू.द. वाडीकर, प्रा. निवृत्ती चांडोळकर, प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी, प्रा. तु. शं. कुलकर्णी, प्रा.बा.ह. कल्याणकर, प्रा.डॉ.जगदीश कदम, प्रा. के. र. शिरवाडकर, प्रा. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, प्रा. फ. मुं. शिंदे, प्रा. दत्ता भगत, प्रा. मधु जामकर, प्रा. मथू सावंत,  भगवान अंजनीकर, प्रा. रा. रं. बोराडे,  भ.मा. परसावळे आदी मान्यवरांना गौरविण्यात आले आहे. तर सावित्रीबाई फुले पुरस्काराने श्रीमती कदम कमल,  तसनीम पटेल, सोनवणे जिजाबाई रावजी,  कुलकर्णी सुधा विद्याधरराव, जोशी आशा सुधाकरराव, येरावार पद्मीनी बळीराम,  सिंधूताई सपकाळ, ताराबाई परांजपे, श्यामला  बोराळकर, मथुताई सावंत,  डॉ. राणी बंग, श्रीमती नसिमा हुरजूक,  डॉ. भारती आमटे,  विमलताई साळवे, मंगल खिवंसरा, श्रीमती अंजली रावते - वाघमारे, श्रीमती गीता लाठकर, अ‍ॅड. पल्लवी रेणके, अस्मा निखात इत्यादी मान्यवरांचा गौरव करण्यात आला आहे. 

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून खा. प्रताप पाटील चिखलीकर, खा. हेमंत पाटील, खा. सुधाकर शृंगारे, महापौर सौ. मोहिनी येवनकर, आ. विक्रम काळे, आ. अमरनाथ राजूरकर, आ. सतीश चव्हाण, आ. राम पाटील रातोळीकर, आ. माधवराव पाटील जवळगावकर, आ. रावसाहेब अंतापूरकर, आ. भीमराव केराम, आ. डॉ तुषार राठोड, आ. श्यामसुंदर शिंदे, आ. मोहनराव हंबर्डे, आ. बालाजी कल्याणकर, आ. राजेश पवार, माजी पालकमंत्री डी.पी.सावंत, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे, महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जि. प. उपाध्यक्षा सौ. पद्मा रेड्डी सतपलवार, शिक्षण सभापती संजय माधवराव बेळगे, कृषी सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, समाजकल्याण सभापती अ‍ॅड. रामराव नाईक, महिला व बालकल्याण सभापती सौ. सुशीलाताई हणमंतराव पाटील बेटमोगरेकर या सर्व सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य तसेच विशेष निमंत्रित अतिथी म्हणून माजी आमदार सौ. अमिताताई चव्हाण,  वसंतराव चव्हाण,  प्रदीप नाईक, ईश्वरराव भोसीकर, शंकरअण्णा धोंडगे, हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, सुभाष साबणे, नागेश पाटील आष्टीकर, रोहीदास चव्हाण आदी माजी आमदारांसह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

या सोहळ्यास लेखक-कवी विचारवंत यांनी उपस्थिती दर्शवावी असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी आंबुलगेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, उपाध्यक्षा पदमा नरसारेड्डी सतपलवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी  शिक्षण सभापती संजय बेळगे,  शिक्षणाधिकारी (प्रा.) प्रशांत दिग्रसकर व  शिक्षणाधिकारी (मा.) बालाजी कुंडगीर यांनी केले आहे.

00000

 

 महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती

योजनेंतर्गत आधार प्रमाणिकरण करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 24 :- जिल्ह्यातील कर्जमुक्तीस पात्र 11 हजार 500 शेतकऱ्याची सातवी यादी 1 जानेवारी 2021 रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यापैकी 9 हजार 176 शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत आधार प्रमाणिकरण केले नाही. आधार प्रमाणिकरण केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात शासनामार्फत कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार नाही. आधार प्रमाणिकरण शिल्लक शेतकऱ्यांनी जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन तात्काळ आधार प्रमाणिकरण करण्याबाबत ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी जिल्हास्तरीय तालुकास्तरीय समितीकडे वर्ग करण्यात आल्या आहेत अशा शेतकऱ्यांनी आवश्यक त्या कागदपत्राची पुर्तता करुन तक्रार निकाली काढून घ्यावी, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक डॉ. अमोल यादव यांनी केले आहे. 

थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने "महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, 2019" ही 27 डिसेंबर 2019 च्या शासननिर्णयाद्वारे कार्यन्वित केली आहे. यात 1 एप्रिल, 2015 ते 31 मार्च, 2019 पर्यंतच्या कालावधीसाठी अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या तसेच या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदतीच्या पीक कर्जाचे पुर्नगठन / फेरपुनर्गठन केलेल्या कर्जामधील 30 सप्टेंबर, 2019 रोजी 2 लाखापर्यंत थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. 

नांदेड जिल्ह्यात या योजनेंतर्गत एकूण 2 लाख 14 हजार 491 शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र असुन त्यापैकी बँकांनी 2 लाख 7 हजार 146 शेतकऱ्याची माहिती पोर्टलवर अपलोड केली आहे. या बँकांनी अपलोड केलेल्या माहिती पैकी शासनाने कर्जमाफी पात्र असणाऱ्या 1 लाख 94 हजार 324 शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यापैकी 1 लाख 85 हजार 148 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण प्रक्रिया पुर्ण केलेली आहे. आधार प्रमाणिकरण प्रक्रिया पुर्ण केलेल्या शेतकऱ्यापैकी 1 लाख 79 हजार 628 शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम 1229.22 कोटी जमा करण्यात आले आहेत. उर्वरीत आधार प्रमाणिकरण केलेल्या शेतकऱ्याच्या खात्यात शासनामार्फत लवकरच कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात येणार आहे. 

ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी जिल्हास्तरीय समिती तालुकास्तरीय समितीकडे वर्ग करण्यात आलेल्या आहेत, अशा शेतकऱ्यांनी तात्काळ आपल्या तालुक्यातील सहायक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक त्या कागदपत्राची पुर्तता करुन तक्रार निकाली काढून घ्यावी, असेही आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ. अमोल यादव यांनी केले आहे.

00000

 

10 कोरोना बाधितांची भर तर

20 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड (जिमाका) दि. 24 :- रविवार 24 जानेवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 10 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 2 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 8 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 20 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 1 हजार 772 अहवालापैकी 1 हजार 748 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 22 हजार 264 एवढी झाली असून यातील 21 हजार 159 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 320 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 8 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 582 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 7,  माहूर तालुक्यांतर्गत 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 4, मुखेड कोविड रुग्णालय 2 , खाजगी रुग्णालय 4 असे एकूण 20 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.03 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे किनवट 1, परभणी 1 असे एकुण 2 बाधित आढळले.  ॲटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 7, परभणी 1 असे एकूण 8 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 320 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 17, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 19, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 16, मुखेड कोविड रुग्णालय 12, महसूल कोविड केअर सेंटर 8, किनवट कोविड रुग्णालय 2, देगलूर कोविड रुग्णालय 4, नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण 185, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 39, खाजगी रुग्णालय 18 आहेत.   

रविवार 24 जानेवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 166, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 81 एवढी आहे.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 1 हजार 666

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 75 हजार 141

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 22 हजार 254

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 22 हजार 264

एकुण मृत्यू संख्या-582

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.03 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-14 

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-396

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-320

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-8.          

00000

 

धर्माबाद व उमरी तालुक्यातील

विकास योजनांसाठी माझी भावनिक कटिबद्धता

-         पालकमंत्री अशोक चव्हाण

 ग्रामपंचायतींना विविध विकासाच्या प्रक्रियेत घेऊ  

नांदेड (जिमाका) दि. 24 :- धर्माबादच्या विकासासाठी आजवर जी काही प्रयत्नांची पराकाष्टा करण्यात आली त्यात मला प्रत्यक्ष सहभाग घेता आला याचे मनोमन समाधान आहे. बाभळी बंधाऱ्यापासून ते या भागातील युवकांना चांगल्या शिक्षणासह क्रीडा क्षेत्रातही नैपुण्य प्राप्त होण्यासाठी विविध विकास योजनांबाबत मी निश्चय केला होता. येथील क्रीडा संकुलनाच्या प्रत्यक्ष उभारणीनंतर त्याचे उद्घाटन करतांना व याचबरोबर धर्माबाद येथील 170 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ आज होत असल्याने आजचा हा दिवस माझ्यासाठी खऱ्या अर्थाने हा वचनपूर्तीचा दिवस असल्याचे भावनिक उद्गार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी काढले.     

धर्माबाद येथील तालुका क्रीडा संकुल, शहर बाह्यवळण रस्ता, रेल्वे उड्डाण पूल व भूयारी पूलाचे भूमिपूजन आज त्यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, निवासी मुलींच्या वसतीगृहाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. यासर्व विकास कामांच्या शुभारंभानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या उद्घाटन समारंभात पालकमंत्री अशोक चव्हाण बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, विधान परिषदेचे प्रतोद आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार राजेश पवार, माजी आमदार वसंत चव्हाण, उपाध्यक्षा पद्मा रेड्डी, गोविंदराव शिंदे नागेलीकर, हरीहरराव भोसीकर, उमेश मुंडे, जि.प.चे सभापती संजय बेळगे, नगराध्यक्षा अफजल बेगम यांची उपस्थिती होती. 

धर्माबादच्या विकासाचा ध्यास व स्व. शंकरराव चव्हाण यांनी धर्माबादवासियांप्रती जपलेली तळमळ मी विसरु शकत नाही. बाभळी बंधाऱ्या पासून, इथल्या कृषि क्षेत्राच्या विकासासाठी, धर्माबाद तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा विडा मी उचला असून शासनस्तरावर ज्या काही योजना शक्य आहेत त्या सर्व योजना येथे आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. 

मध्यंतरी येथील काही अल्पगावांनी तेलंगणात जाण्याचा विचार केला होता. याची आठवण करुन देत त्यांनी बाभळीच्या पाणी प्रश्नांप्रती महाराष्ट्राने न्याय लढा देऊन हा बंधारा पूर्ण करुन शेतकऱ्यांना पाण्याचे स्त्रोत उपलब्ध करुन दिले असल्याचे सांगितले. बाभळी बंधाऱ्यात पाणी रोखून धरले नाही तर ते सरळ कोणाच्याही उपयोगी न पडता वाहून जाते. तेलंगणाच्याही फायदाचे ते पाणी राहत नाही. हे लक्षात घेऊन धर्माबाद तालुक्यातील, नायगाव तालुक्यातील व गोदाकाठच्या परिसरातील गावांना, शेतकऱ्यांना याचा लाभ व्हावा यादृष्टिने महाविकास आघाडीचे शासन सत्तेवर येताच आम्ही पुन्हा प्रयत्न सुरु केले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: तीनवेळेस तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना याबाबत कल्पना दिली आहे. शिवाय स्वतंत्र लेखी पत्रव्यवहारही केलेला आहे. एवढी दक्षता व काळजी धर्माबाद तालुक्यातील तेलंगणाच्या काठावर उभे असलेल्या महाराष्ट्रातील गावांप्रती आणि गावातील नागरिकांप्रती महाराष्ट्र शासनाने घेतली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी संपर्क साधूनही जर एवढा पाठपुरावा तेलंगणाशी करावा लागत असेल तर या गावातील लोकांना तेलंगणा शासन उभे कसे करेल असा सवालही त्यांनी उपस्थित केला. नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी आम्ही कटीबद्ध असून प्रत्येक ग्रामपंचायतीला जे काही शक्य असेल ते देण्याचा प्रयत्न करु असेही त्यांनी स्पष्ट केले. 

हे वर्षे कोरोनामुळे आव्हानात्मक होते याची सर्वांनाच कल्पना आहे, असे असूनही रेल्वे उड्डाणपूल, भुयारी रेल्वेपूल अशा 170 कोटी रुपयांच्या कामासह एशिएन डेव्हलमेंट बँकेअंतर्गत नांदेड ते निळा-आसनापूल-मुगट-अंदुरगा-कारेगावफाटा ते बासर येथील ट्रीपल आयटीपर्यंत जवळपास शंभर कोटीचा रस्ता लवकरच हाती घेऊन याचे भूमीपूजन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करु, असेही त्यांनी सांगितले. या मार्गामुळे धर्माबाद येथून नांदेडपर्यंत अवघ्या 1 तासात व पुढे नांदेड येथून जोडल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पांतर्गत अडीच तासात नांदेड येथून औरंगाबादला पोहचता येईल. या नवीन मार्गामुळे नांदेड जिल्ह्यातील कृषि क्षेत्राच्या उत्पादन वाहतुकीसाठी नवी उपलब्धी होऊन शेतकऱ्यांनाही अधिक सुकर होईल, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. या समारंभात आमदार अमर राजूरकर व इतर मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. धर्माबाद येथील विविध युवक संघटनांनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे भव्य स्वागत केले. 

धर्माबाद येथील विविध विकास कामांच्या शुभारंभानंतर उमरी शहरातील 115 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केला. यात हदगाव-तामसा-भोकर-उमरी-कारेगाव-लोहगाव रस्ता व रेल्वे उड्डाणपूल, उमरी शहरालगत बाह्यवळण रस्ता याचा समावेश आहे.  

000000







  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...