Wednesday, January 7, 2026

वृत्त क्रमांक 17

अवैध वाळू उत्खननाविरोधात तहसील प्रशासन व ग्रामीण पोलिसांची संयुक्त धडक कारवाई २७ लाखांचा मुद्देमाल नष्ट 

नांदेड, दि. ७ जानेवारी  : नांदेड तहसील प्रशासन व नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अवैध वाळू उत्खननाविरोधात कडक कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

मंडळ अधिकारी सय्यद मोहसीन, ग्राम महसूल अधिकारी रमेश गिरी, मनोज सरपे, मनोज जाधव, माधव भिसे, मारुती श्रीराम, महसूल सेवक बालाजी सोनटक्के व शिवा तेलंग यांच्या महसूल पथकाने पिंपळगाव निमजी परिसरात गस्त घालत असताना अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या एक मोठी बोट, एक छोटी बोट व १२ तराफे आढळून आले. संबंधित बोटी नदीच्या मध्यभागी ठेवण्यात आल्या होत्या.

सदर बोटी जप्त करण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी माधव भिसे, मनोज जाधव व शिवा तेलंग यांनी धाडसाने नदीत पोहत जाऊन बोटी ताब्यात घेतल्या. कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या बोटी व तराफ्यांचा एकूण अंदाजे २७ लाख रुपयांचा मुद्देमाल पूर्णपणे जाळून व फोडून नष्ट करण्यात आला.

या कारवाईसाठी नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ओंकान्त चिंचोलकर यांनी आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून दिला.

अवैध वाळू उत्खननाच्या प्रकरणांमध्ये महसूल प्रशासनाकडून यापुढेही सक्तीची कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिला आहे.

००००




वृत्त क्रमांक 16

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड मधील भव्य कार्यक्रम यशस्वी करण्याचे निर्देश – मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ.  श्रीकर परदेशी

कार्यक्रमासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना – सचिव रुचेश जयवंशी

मुंबई/नांदेड, दि. 7 जानेवारी— ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५०व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे होणाऱ्या भव्य कार्यक्रमाचे सर्वांगीण व काटेकोर नियोजन करण्यात यावे. देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावरून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार असून, त्यांच्या सुरक्षा, वाहतूक, वैद्यकीय सेवा व मूलभूत सोयी-सुविधांबाबत सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री  यांचे प्रधान सचिव डॉ.  श्रीकर परदेशी यांनी दिल्या.

नांदेड येथे २४ व २५ जानेवारी रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या या भव्य कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

बैठकीस अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव रूचेश जयवंशी,  राज्य समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. तर दूरदृश्य प्रणालीव्दारे छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव, जळगाव, धुळे, नंदूरबार जिल्हयाचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालीका आयुक्त, शिक्षण, परिवहन, अल्पसंख्याक विभागाचे वरिष्ठ अधिकारी व जिल्हा माहिती अधिकारी उपस्थित होते. 

श्रीकर परदेशी म्हणाले की, या शहीदी समागम वर्षानिमित्त राज्य, देश तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरून श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांना मानणारे लाखो भाविक नांदेडमध्ये येणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, भगत नामदेव व उदासीन असे नऊ समाज-संप्रदाय एकत्र येणार आहेत.

श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या त्याग, बलिदान व मानवतेसाठी दिलेल्या शहीदीचा इतिहास देश-विदेशात पोहोचवणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी २६ विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. सुमारे १० लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन चोख सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता, वाहतूक नियोजन, निवास व्यवस्था, स्वच्छ पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा आदी मूलभूत सुविधा पुरविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

युवकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध व वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच भाविकांच्या सोयीसाठी https://gurutegbahadurshahidi.com या संकेतस्थळावर रस्ते, रेल्वे, बस, वाहतूक व्यवस्था तसेच कार्यक्रमासंदर्भातील सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय समितीच्या समन्वयाने सर्व यंत्रणांनी आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी सचिव रुचेश जयवंशी यांनी सांगितले की, मराठवाडा विभागातील सर्व जिल्हे, महानगरपालिका, शाळा-महाविद्यालये, पोलीस यंत्रणा व परिवहन विभागाने समन्वयाने काम करत भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच सुरक्षेच्या दृष्टीने काटेकोर कार्यवाही करावी.

रामेश्वर नाईक म्हणाले की, श्री गुरु तेग बहादुर यांनी राष्ट्र व संस्कृतीच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान सर्वसामान्य जनतेपर्यंत, विशेषतः गावपातळीवर विविध उपक्रमांच्या माध्यमातून पोहोचविण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वोत्तम संस्था आणि विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. असेही त्यांनी सांगितले. 

“हिंद-दी-चादर” श्री गुरु तेगबहादूर साहिबजी

शहीदी समागम कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रशासन सज्ज - जिल्हाधिकारी राहूल कर्डिले                                                                                                                                                                                                 “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी 350 व्या शहीदी समागमाच्या यशस्वी भव्य आयोजनासाठी नांदेड जिल्हा प्रशासनामार्फत एकूण 25 समित्या स्थापन करण्यात आल्या असून प्रत्येक समिती प्रमुखांवर जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. सर्व यंत्रणा समन्वयाने कार्यरत असून तयारी अंतिम टप्प्यात आहे. शहीदी समागम कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी यावेळी दिली. 

सदर बैठकीसाठी दुरदृश्य प्रणालीव्दारे नांदेड येथून पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे कार्यकारी अधिकारी व शासकीय समन्वयक डॉ. जगदीश सकवान, गुरुद्वारा बोर्डाकडून अधीक्षक हरजितसिंघ कडेवाले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी म्हणाले की, मुख्य कार्यक्रम असर्जन परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर होणार असून मैदानाचे सपाटीकरण व स्वच्छतेच्या कामासह मुख्य पेंडाल उभारणीसाठी आवश्यक सर्व कामे पूर्ण झालेली आहेत. विद्युत व पाणीपुरवठ्याची व्यवस्था आज पूर्ण करण्यात येणार आहे.  भाविकांसाठी जिल्हानिहाय पार्किंगची ठिकाणे निश्चित करण्यात आली असून निवासासाठी शहरातील शाळा, महाविद्यालये व मोकळ्या जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वाहतूक व्यवस्थेचे सुसूत्र नियोजन करण्यात आले असून आवश्यक वाहनांची व्यवस्था देखील करण्यात येत आहे. नांदेड हे रेल्वेमार्गावर असल्याने रेल्वे विभागाच्या सहकार्याने अधिकाधिक भाविकांना रेल्वे सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. लंगर, निवास व वाहतूक व्यवस्थेचा दैनंदिन आढावा घेतला जात असून आरोग्य सेवांसाठी 72 रुग्णालयांमार्फत वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येणार आहेत. कार्यक्रमस्थळी विविध आरोग्य स्टॉल उभारण्यात येणार आहोत. स्वच्छतेसाठी सध्या 100 शौचालयांची व्यवस्था उपलब्ध आहे. यासाठी इतर जिल्ह्यांचेही सहकार्य घेतले जाणार आहे. कार्यक्रमाच्या प्रचार-प्रसिद्धीसाठी विविध शाळांमध्ये स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून येत्या १५ जानेवारीपासून प्रभातफेऱ्या काढण्यात येणार आहेत. तसेच होर्डिंग्सद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रचार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सुरक्षा व्यवस्था, पार्किंग व सुरक्षा पासेस याबाबतच्या नियोजनाची सविस्तर माहिती दिली.

000000











 वृत्त क्रमांक 15

सैनिकी मुलांचा वसतीगृहात कंत्राटी पद्धतीने भरती

नांदेड दि. ७ जानेवारी :- सैनिकी मुलांचे वसतीगृह विष्णूपुरी नांदेड येथील वसतीगृहात कंत्राटी पध्दतीने माजी सैनिक, माजी सैनिक अवलंबित मधुन सफाई कामगाराचे एक पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी माजी सैनिक/माजी सैनिक अवलंबित उपलब्ध नसल्यास हे पद नागरी (सिविलन) संवर्गातून भरण्यात येईल. यासाठी वयोमर्यादा 21 ते ४५ वर्षे असून कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल. इच्छुक उमेदवाराने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे सोमवार १० जानेवारी 2026 पर्यंत अर्ज दाखल करावेत. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 02462-359056  वर संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 14

एकलव्य रेसिडेन्शियल पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

१ मार्च २०२६ रोजी प्रवेश परीक्षा

नांदेड, दि. ७ जानेवारी : इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशासाठी रविवार १ मार्च २०२६ रोजी प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. 

ही प्रवेश परीक्षा अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती यांच्या अधिनस्त येणाऱ्या प्रकल्प कार्यालयाअंतर्गत असलेल्या सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिकांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील अनुसूचित व आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणार आहे.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट अंतर्गत ही प्रवेश परीक्षा एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल पब्लिक स्कूल, सहस्रकुंड, ता. किनवट, जि. नांदेड येथे होणार आहे. इयत्ता सहावीकरिता प्रवेश परीक्षा सकाळी ११ ते दुपारी १ या कालावधीत, तर इयत्ता सातवी ते नववीकरिता सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत घेण्यात येणार आहे.

प्रवेश परीक्षेसाठी विहित नमुन्यातील अर्ज प्रकल्प कार्यालय, किनवट तसेच प्रकल्प कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल पब्लिक स्कूल, सहस्रकुंड येथे तसेच सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या मुख्याध्यापकांकडे विनामूल्य उपलब्ध आहेत.

सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी, सहावी, सातवी व आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित व आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांचे पूर्ण भरलेले विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी दि. ४ फेब्रुवारी २०२६ पर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट येथे सादर करावेत, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट यांनी केले आहे.

००००००

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...