Monday, January 12, 2026

 #नांदेड

#हिंददीचादर श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमासंदर्भात अधिक माहितीकरिता खालील लिंकवर क्लिक करा. 👇

वृत्त क्रमांक 40

स्पर्धा पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या आदिवासी उमेदवारांचे समुपदेशन शिबीर संपन्न  

नांदेड दि. 12 जानेवारी :- आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र किनवट या कार्यालयातील स्पर्धा पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या उमेदवारांना नुकतेच 8 जानेवारी रोजी समुपदेशन शिबीर उपक्रम कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र किनवट   कार्यालयामार्फत राबविण्यात आले.

यावेळी कौशल्य विकास विभागाचे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी सुरेश शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. जालना येथील मॉडेल करिअर सेंटरचे समुपदेशक डॉ. अमोल परिहार यांनी समुपदेशन शिबिराचे मार्गदर्शन केले. तसेच या कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी कनिष्ठ कौशल्य विकास अधिकारी सुदाम चव्हाण,  लिपीक विष्णू राठोड, अक्षय राठोड यांनी सहकार्य केले. शेवटी प्रा. नवनीत चव्हाण यांनी आभार व्यक्त केले.

00000

वृत्त क्रमांक 39

महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांची आज नांदेड आकाशवाणीवर मुलाखत

नांदेड दि. १२ जानेवारी: - नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर निवडणूक आणि मतमोजणीची जय्यत तयारी केली जात आहे. या तयारीबाबत नांदेड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे यांची आकाशवाणीचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी पत्रकार अनुराग पोवळे यांनी घेतलेली मुलाखत मंगळवार, दि.१३ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी नांदेड आकाशवाणीवरून प्रसारित होणार आहे. 

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी १६ जानेवारी रोजी होणार आहे. २० प्रभागातील ८१ नगरसेवक पदासाठी ही निवडणूक होणार आहे. या सर्व निवडणूक तयारीचा आढावा या मुलाखतीत घेण्यात आला आहे. सर्व नांदेडकर, श्रोत्यांनी ही मुलाखत ऐकावी असे आवाहन नांदेड आकाशवाणीचे प्रसारण अधिकारी राहुल आत्राम आणि सहायक निदेशक तथा केंद्र प्रमुख विश्वास वाघमारे यांनी केले आहे.

00000



 वृत्त क्रमांक 38

“हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन

नागरिकांनी सोशल मीडियावर या कार्यक्रमाशी संबंधीत पोस्ट करण्याचे आवाहन

शालेय विद्यार्थ्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन

नांदेड दि.१२ जानेवारी :- श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे सन २०२५-२६ हे ३५० वे शहीदी समागम शताब्दी वर्ष असल्याने त्यांचा गौरवशाली इतिहास, धर्मासाठी दिलेले महान बलिदान तसेच समाजासाठी केलेले अमूल्य कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने नांदेड येथे ऐतिहासिक, भव्य व दिव्य “हिंद-दी-चादर” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

नांदेड येथे असर्जन भागातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी मा.मुख्यमंत्री महोदय विविध स्पर्धांमध्ये विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करणार आहेत.

शैक्षणिक उपक्रम

या कार्यक्रमाच्या व्यापक प्रचार व प्रसिद्धीसाठी जिल्ह्यातील सर्व शाळा, आश्रमशाळा व महाविद्यालयांमध्ये खालील शैक्षणिक व जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत.

जनजागृती मोहीम १५ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान प्रभातफेरीचे आयोजन. २५ जानेवारी २०२६ पर्यंत शाळांमधील परिपाठाच्यावेळी श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या कार्यावर आधारित गीतांचे सादरीकरण करण्याबाबत सूचना निर्गमित,डॉक्युमेंटरी प्रदर्शन, घोषवाक्याचा प्रसार : “हिंद दी चादर- श्री गुरु तेग बहादुर”

तालुकास्तरीय स्पर्धा (१५ ते १७ जानेवारी २०२६)

चित्रकला स्पर्धा, गायन स्पर्धा, निबंध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा ई.

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

दिनांक : २० जानेवारी २०२६

ठिकाण : गुरुग्रंथसाहेबजी भवन, सचखंड पब्लिक स्कूलजवळ हिंगोली गेट, नांदेड

विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमध्ये सहभागाची संधी असून, जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना मुख्य कार्यक्रमाच्या वेळी मा. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येईल.

नागरिकांसाठी आवाहन

नागरिकांनी सोशल मीडियावर #hinddichadar350 या हॅशटॅगचा वापर करून कार्यक्रमाशी संबंधित पोस्ट शेअर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमासंबंधी सविस्तर माहिती gurutegbahadurshahidi.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क 

शिक्षणाधिकारी (प्राथमिक),

शिक्षणाधिकारी (माध्यमिक),

शिक्षणाधिकारी (योजना),

जिल्हा परिषद, नांदेड

ई-मेल : ssananded1@gmail.com

वेबसाइट : zpnanded.mahara

000

 विशेष लेख  क्रमांक 1

धर्म, मानवता व स्वातंत्र्याचे प्रतीक श्री गुरु तेगबहादुर साहिब जी !

शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेगबहादुर साहिब जी हे धर्म, मानवी मूल्ये व धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे महान गुरु होते. शीख इतिहासातच नव्हे तर संपूर्ण भारतीय इतिहासात त्यांना ‘हिंद-दी-चादर’ म्हणून सन्मानाने ओळखले जाते. 

श्री गुरु तेगबहादुर साहिब जी यांचा जन्म पंजाबमधील अमृतसर येथे वैशाख कृष्ण पंचमी या पवित्र तिथीला झाला. बालपणी त्यांना त्यागमल या नावाने ओळखले जात होते. लहानपणापासूनच ते निर्भय, शूर, विचारशील व उदार स्वभावाचे होते. त्यांचे शिक्षण मीरी-पीरीचे स्वामी, गुरु-पिता श्री गुरु हरगोबिंद साहिबजी यांच्या छत्रछायेत झाले.

अवघ्या 14 व्या वर्षी त्यांनी वडिलांसोबत परकीय आक्रमणाविरुद्ध लढा देत पराक्रम गाजवला. त्यांच्या शौर्याने प्रभावीत होऊन गुरु हरगोबिंद साहिबजी यांनी त्यांना ‘तेगबहादुर’ हे नाव दिले, ज्याचा अर्थ ‘तलवारीचा धनी’ असा होतो. या काळात त्यांनी गुरुबाणी, धर्मग्रंथांचे अध्ययन तसेच अस्त्र-शस्त्रविद्या व घोडेस्वारीचे शिक्षण आत्मसात केले.

शीख (सिख) धर्माचे आठवे गुरु श्री गुरु हरिकृष्णजी यांची आत्मज्योति विसर्जित झाल्या नंतर श्री गुरु तेगबहादुर साहिब जी यांची नववे गुरु म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी आपल्या गुरुपदाच्या कार्यकाळात संस्कृती रक्षक, सामाजिक समता, मानवी मूल्ये व धार्मिक स्वातंत्र्य यासाठी अखंड प्रयत्न केले.

17 व्या शतकामध्ये तत्कालिन शासन कर्त्यांच्या अन्याय व अत्याचाराविरुध्द आवाज उठवून मानवी हक्कांसाठी बलिदान देवून भारताच्या सांस्कृतिक व आध्यामिक अस्मितेचे त्यांनी रक्षण केले. त्यांच्या बलिदानामुळे संपूर्ण भारतात तसेच शीख धर्मात शौर्य आणि त्यागाची परंपरा अधिक दृढ (मजबुत) झाली. त्यांच्या या त्यागामुळेच ते खऱ्या अर्थाने ‘हिंद-दी-चादर’ ठरले.

गुरु तेगबहादुर साहिब जी यांच्या शिकवणीत क्षमा, करुणा, समता, प्रेम व मानवतेचा संदेश आहे. चुका स्वीकारण्याचे धैर्य असल्यास क्षमा शक्य आहे, हा त्यांचा विचार आजही मार्गदर्शक आहे. त्यांनी 15 रागांमध्ये रचलेले 116 शबद (गुरुबाणी) श्री गुरु ग्रंथसाहिबमध्ये संकलित असून ते आध्यात्मिक प्रेरणेचा अमूल्य ठेवा आहे.

श्री गुरु तेगबहादुर साहिब जी यांचे सन 2025 हे 350 वे शहीदी समागम शताब्दी वर्ष असल्याने त्यांचा गौरवशाली इतिहास सर्वांना माहिती व्हावा तसेच त्यांनी केलेला प्रचार व दिलेले योगदान स्मरण होण्यासाठी नांदेड येथे दिनांक 24 व 25 जानेवारी 2026 रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात निशान साहिबांना चोला अर्पण करण्याची सेवा, श्री अखंडपाठ साहिब, कीर्तन, धार्मिक दीवान भरवण्यात येणार आहे. तसेच देशातील नामवंत रागी जत्थ्यांकडून शबद गायन होणार आहे.

त्यांच्या अद्वितीय बलिदानाच्या स्मरणार्थ यावर्षी 350 वा शहीदी समागम वर्ष साजरा होत असून त्या निमित्ताने राज्यात तीन ठिकाणी श्री तेगबहादुर साहिब जी 350 वी शहीदी समागम शताब्दी कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे. यापुर्वी नागपूर येथे हा कार्यक्रम 7 डिसेंबर 2025 रोजी साजरा करण्यात आला. आता दिनांक 24 व 25 जानेवारी रोजी नांदेड येथे राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विभाग, हिंद-दी-चादर श्री गुरु तेगबहादुर साहिब जी 350 वी शहीदी समागम समिती तसेच शीख, सिकलीकर, बंजारा, लबाना, मोहियाल, सिंधी  वाल्मिकी, उदासीन संप्रदाय आणि भगत नामदेव वारकरी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथे मामा चौक येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मोदी मैदानावर या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. नांदेडच्या या कार्यक्रमानंतर नवी मुंबई येथे 18 व 19 फेब्रुवारी 2026 रोजी  हिंद-दी-चादर या कार्यक्रमाचे मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य आयोजन करण्यात येणार आहे. 

या पवित्र प्रसंगी सिख धर्मीय बांधवांसह सर्व धर्मीय भाविक गुरु घरात उपस्थित राहून मत्था टेकणार असून श्रद्धा, भक्ती व ऐक्याचे दर्शन घडणार आहे. धर्म, मानवता व धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी प्राणार्पण करणाऱ्या या महान गुरूंच्या स्मरणार्थ नांदेड येथे होणारा हा शहीदी समागम समाजाला सत्य, त्याग व साहसाचा संदेश देणारा ठरणार आहे.

अलका पाटील

उपसंपादक, जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड

00000




वृत्त क्रमांक 37

जिल्हाधिकाऱ्यांची अवैध उत्खननावर धडक कारवाई

३ कोटी ३२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

नांदेड, दि. १२ जानेवारी : लोहा तालुक्यातील मौजे येळी येथील नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी धडक कारवाई करत ३ कोटी ३२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

रविवार ११ जानेवारी रोजी लोहा तालुक्यातील मौजे येळी येथे नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याची गोपनीय माहिती जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी रात्री सुमारे १०.३० वाजता प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

या वेळी नदीपात्रात अवैध उत्खनन सुरू असताना ३ हायवा ट्रक, ७ जेसीबी, १ मोठी फायबर बोट व ४ तराफे आढळून आले. तत्काळ स्थानिक पोलीस प्रशासन व तहसीलदार यांना घटनास्थळी बोलावून अवैध उत्खननासाठी वापरण्यात येणारे सर्व साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईत ४५ ब्रास वाळूचा साठा देखील जप्त करण्यात आला असून, एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ३ कोटी ३२ लाख रुपये इतकी आहे.

जप्त केलेला सर्व मुद्देमाल तहसील कार्यालय, लोहा येथे जमा करण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्यावर दंडात्मक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

या कारवाईमुळे नांदेड जिल्ह्यातील अवैध उत्खनन व अवैध वाहतुकीवर निश्चितच आळा बसण्यास मदत होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली आहे.

००००००




वृत्त क्रमांक 36

हिंद-की-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन

नांदेड दि,१२ जानेवारी:- “हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे सन २०२५–२६ हे ३५० वे शहीदी समागम शताब्दी वर्ष असून, या ऐतिहासिक प्रसंगाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासन व गुरु नानक नाम सेवा संगत (सिख, सिकलकार, बंजारा, लबाना, सिंधी व मोहियाल) तसेच इतर सर्व समाज यांच्या संयुक्त विद्यमाने २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथील मोदी ग्राउंड (सार्वजनिक बांधकाम विभागाची मोकळी जागा, आसर्जन) येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या कालावधीत सदर ठिकाणी दरबार साहिब असणार असल्याने भाविकांना कार्यक्रमस्थळी अनवाणी प्रवेश करावा लागणार आहे. त्यामुळे भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, परिसर स्वच्छ व सुस्थितीत राहावा, यासाठी दि. १३ व १४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८ वाजता विशेष श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा श्रमदान उपक्रम जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत नांदेड शहरातील विविध शाळांतील विद्यार्थी, सामाजिक संस्था व स्वयंसेवकांच्या सहभागातून राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून सेवाभाव, सामाजिक एकात्मता व स्वच्छतेचा संदेश देण्यात येणार आहे.

00000

वृत्त क्रमांक 35

तृतीयपंथीयांसाठी नॅशनल हेल्पलाईन क्रमांक 14427

नांदेड, दि. १२ जानेवारी : केंद्र शासनाचा ट्रान्सजेंडर व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) अधिनियम, 2019 व त्याअंतर्गत नियम 2020 संपूर्ण देशात लागू करण्यात आले आहेत. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने तृतीयपंथीय समाजातील व्यक्तींसाठी केंद्र शासनामार्फत स्वतंत्र पोर्टल विकसित करण्यात आले आहे.

या पोर्टलच्या माध्यमातून तृतीयपंथीयांसाठी नॅशनल हेल्पलाईन क्रमांक 14427 उपलब्ध करून देण्यात आला आहे. या हेल्पलाईनद्वारे तृतीयपंथीय व्यक्तींना त्यांच्या हक्कांबाबत माहिती, मार्गदर्शन व सहाय्य मिळणार आहे.

नांदेड जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी या नॅशनल हेल्पलाईन क्रमांकाचा व्यापक प्रचार व प्रसिध्दी करण्यात येत आहे, अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. 

००००००

 वृत्त क्रमांक 34

मतदारांना मतदानाच्या दिवशी 15 जानेवारी रोजी मतदानासाठी सुट्टी 

नांदेड, दि. 12 जानेवारी :- नांदेड वाघाळा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक मतदानासाठी सदर क्षेत्रातील मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी गुरुवार 15 जानेवारी 2026 रोजी सुट्टी अथवा दोन ते तीन तासांची सवलत देण्यात येणार आहे.   

त्यानुसार मतदान क्षेत्रातील मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेबर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येणार आहे. 

ही सुट्टी सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने आदींना लागू राहील. जसे राज्य शासन, केंद्र शासन व खाजगी कंपन्या यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स आदी. 

अपावादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. मात्र कोणत्याही परिस्थितीत कामगारांना मतदानासाठी सुट्टी देण्याची  दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील. 

सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींच्या मालकांनी / व्यवस्थापनाने आदेशाचे अनुपालन होईल याची खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानासाठी योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास त्यांच्या विरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे 30.12.2025 रोजीच्या शासन परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे, अशी माहिती नांदेडचे सहाय्यक कामगार आयुक्त अ.गो. थोरात यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

00000

वृत्त क्रमांक 33

श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत

स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रीय युवा दिन उत्साहात साजरा

नांदेड, दि. १२ जानेवारी : श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे आज स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 

स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा व मूल्यांचा प्रसार करणे, तरुणांना देशाच्या प्रगतीत सक्रिय योगदान देण्यासाठी प्रेरित करणे तसेच त्यांच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण करणे हा या दिनाच्या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे.

राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने स्वामी विवेकानंद यांचे जीवनकार्य, त्यांचे प्रेरणादायी विचार यावर प्रकाश टाकण्यासाठी मुख्याध्यापक तथा राष्ट्रीय कीर्तनकार श्री. जी. बी. गिरोड यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून अत्यंत विनोदी, मार्मिक आणि प्रभावी शब्दांत प्रशिक्षणार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. समाजप्रबोधनपर विचार मांडताना त्यांनी अंधश्रद्धा, व्यसनाधीनता व अपप्रवृत्तींपासून दूर राहण्याचे आवाहन केले तसेच चांगले विचार व सवयी अंगीकारण्याचे महत्त्व स्पष्ट केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य तथा जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी श्री. सचिन सूर्यवंशी होते. कार्यक्रमास संस्था व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. हर्षद शहा, उपप्राचार्य व्ही. डी. कंदलवाड, तसेच संस्थेतील सर्व अधिकारी, कर्मचारी व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गटनिदेशक एस. जी. सोनटक्के यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य व्ही. डी. कंदलवाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

00000



विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...