Friday, September 18, 2020

 

   पुढील वर्षीसाठी बियाणे जतन करुन ठेवण्यात यावे

-         कृषि पशुसंवर्धन सभापती, बाळासाहेब रावणगांवकर 

नांदेड, दि. {जिमाका} 18 :-  शेतकऱ्यांनी यावर्षी खरीप हंगामासाठी सोयाबीन बियाणे काढणीच्यावेळी योग्य प्रकारे हाताळणी साठवण करुन पुढील वर्षीसाठी बियाणे जतन करुन ठेवण्याचे आवाहन कृषि पशुसंवर्धन सभापती, बाळासाहेब किशनराव रावणगांवकर केले आहे.

जिल्हयात सर्वाधिक सोयाबीन पिक पेरणीक्षेत्र असून सोयाबीन पिकाखाली 3 लाख 81 हजार 518 हे. क्षेत्रावर झाली आहे. मागील वर्षी सोयाबीन काढण्याच्या वेळी अवेळी पावसामुळे बियाण्याच्या उगवण क्षमतेवर परिणाम झाल्यामुळे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वत:कडील उच्च प्रतीचे सोयाबीन बियाणे स्थानिक पातळीवर जतन करुन पुढील खरीप हंगामासाठी त्याचा वापर करावा असे  कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

                             महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती 2019 योजनेंअंतर्गत

तात्काळ आधार प्रमाणिकरण करावे.

 - जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था नांदेड डॉ. अमोल यादव

नांदेड, दि. {जिमाका} 18 :- नांदेड जिल्ह्यात महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, 2019" योजनेंतर्गत 9,905 शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणिकरण करण्याची प्रक्रिया बाकी आहे. सदर शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात शासनामार्फत कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार नाही. त्याकरिता आधार प्रमाणिकरण शिल्लक शेतकऱ्यांनी तात्काळ जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन तात्काळ आधार प्रमाणिकरण करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था नांदेड डॉ. अमोल यादव, यांनी केले आहे.

राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने "महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, 2019" अन्वये 27 डिसेंबर, 2019 च्या निर्णयान्वये कार्यन्वित केली आहे. 1 एप्रिल, 2015 ते 31 मार्च, 2019 पर्यंतच्या कालावधीसाठी अल्पमुदतीचे पीककर्ज घेतलेल्या, तसेच या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदतीच्या पीक कर्जाचे पुर्नगठन / फेरपुनर्गठन केलेल्या कर्जामधील 30 सप्टेंबर, 2019 रोजी 2 लाखापर्यंत थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना सदर कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

जिल्ह्यात सदर योजनेंतर्गत एकूण 2 लाख 14 हजार 491 शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र असुन त्यापैकी बँकांनी 1 लाख 97 हजार 141 शेतकऱ्याची माहिती पोर्टलवर अपलोड केलेली आहे. सदर बँकांनी अपलोड केलेल्या माहितीपैकी शासनाने कर्जमाफी पात्र असणाऱ्या 1 लाख 84 हजार 842 शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात  आलेली आहे. त्यापैकी 1 लाख 67 हजार 827 शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम 1154 कोटी 25 लाख रुपये जमा करण्यात आलेले आहेत. उर्वरीत आधार प्रमाणिकरण केलेल्या शेतकऱ्याच्या खात्यात शासनामार्फत लवकरच कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात येणार आहे असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

                     00000    

 

मूग, उडीद,सोयाबिन हमीभाव खरेदीसाठी

ऑनलाईन नोंदणी करावी

-         जिल्हा पणन अधिकारी सुधीर पाटील़

नांदेड, दि. {जिमाका} 18 :- किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत हंगाम 2020-21 मध्ये नाफेडच्यावतीने मूग, उडीद, सोयाबिन खरेदी करण्यासाठी शेतक-यांनी ऑनलाईन नोंदणी करावी,असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी, सुधीर पाटील यांनी केले आहे.

जिल्ह्यात नांदेड {अर्धापूर}, मुखेड, हदगाव, किनवट, बिलोली {कासराळी}, देगलूर याठिकाणी मार्केटिंग फेडरेशनमार्फत ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरु झाली आहे. खरीप हंगाम 2020-21 करीता प्रतिक्विंटल मूग-7 हजार 196 रुपये तर उडीद- 6 हजार रुपये तर सोयाबिन -3 हजार 880 रुपये हमी भावाने असणार आहे. तरी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी चालू हंगामातील मूग, उडीद, सोयाबिन, या पिकांचा ऑनलाईन पिकपेरा नोंद असलेला सातबारा उतारा, आधारकार्ड व बँकपासबूक इत्यादी कागदपत्रे संबंधित तालुक्यातील खरेदी केंद्रावर जावून नोंदणी करावी असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयासाठी

आता दहा हजार क्षमतेच्या ऑक्सीजन टँकची भर  

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन 

 नांदेड (जिमाका) दि. 18 :- जिल्ह्यातील जनतेला अत्याधुनिक वैद्यकीय सेवा-सुविधा मिळाव्यात यासाठी स्व. डॉ. शंकरराव चव्हाण अग्रही होते. त्यांच्या दूरदृष्टीतून डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय साकारले असून येथील सुविधेबाबत मी कायम दक्ष आहे. लोकसेवेतील त्यांच्या भावना व नांदेड जिल्हावासियांबद्दल त्यांनी जपलेली कटिबद्धता ही तितक्याच तळमळीने जपून यासाठी जो काही निधी लागेल तो मी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा  नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. 

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे कोरोना बाधित रुग्णांना गरजेप्रमाणे ऑक्सीजन व इतर अत्यावश्यक सुविधा मिळाव्यात या उद्देशाने विस्तारीत 10 हजार क्षमतेच्या लिक्वीड ऑक्सीजन टँकचे लोकार्पण पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अधिष्ठात डॉ. सुधिर देशमुख, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने आदींची उपस्थिती होती. 

मार्चपासून मी नांदेडमधील वैद्यकीय सेवा-सुविधांबाबत शासनस्तरावर अग्रही भूमिका घेत विकास कामांचे नियोजन केले आहे. यातूनच जिल्हा रुग्णालयातील दोनशे खाटांच्या बाह्य रुग्णालयाचा विस्तार व इतर शासकीय रुग्णालयांसाठी आवश्यक ती यंत्रसामुग्री, सिटीस्कॅन सारख्या सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध केल्या आहेत. यापुढेही अधिकाधिक नियोजन करु असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.    

शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आता व्हीआरडीएल लॅब व प्लाझमा थेअरपीसह सर्व यंत्रणा सुसज्ज करण्यात आले असून आवश्यक तो औषधसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती यावेळी अधिष्ठाता डॉ. सुधिर देशमुख यांनी दिली. कोरोना बाधित जे गंभीर रुग्ण आहेत त्या गंभीर रुग्णांसाठी 110 खाटा मोठ्या प्रमाणात दिलासा देणार असल्याचे सांगत यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल डॉ. देशमुख पालकमंत्र्यांचे आभार मानले. रुग्णांच्या सेवेसाठी याठिकाणी 400 पेक्षा अधिक नर्सींग स्टॉफ व विविध विभागांचे तज्ज्ञ सर्वस्व अर्पूण रुग्णांना सेवा देत असल्याचेही त्यांनी सांगीतले.  

जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांना अधिकाधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत व शासनाकडून विविध योजनेच्या माध्यमातून त्यांनी निधी उपलब्ध करुन दिला आहे. या निधीतून आता अतिदक्षता विभागाच्या नवीन 110 खाटांचे दोन वार्ड कार्यान्वित करण्यात आले आहे. याचे प्रातिनिधीक लोकार्पणही पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते दि. 17 सप्टेंबर रोजी करण्यात आले.  

00000




वृत्त क्र.  883  

277 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

283 बाधितांची भर तर पाच जणांचा मृत्यू 

नांदेड (जिमाका) दि. 18 :- शुक्रवार 18 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 277 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 283 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 106 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 177 बाधित आले. 

आजच्या एकुण 1 हजार 156 अहवालापैकी  822 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 12  हजार 984 एवढी झाली असून यातील 8  हजार 757 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 3 हजार 817 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 34 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.  

या अहवालात एकुण 5 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. सोमवार 7 सप्टेंबर रोजी पवार गल्ली लोहा येथील 53 वर्षाचा एका पुरुषाचा खाजगी रुग्णालात, बुधवार 9 सप्टेंबर रोजी कंधार येथील 63 वर्षाचा एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात, मंगळवार 15 सप्टेंबर रोजी भोकर येथील 64 वर्षाचा एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे , गुरुवार 17 सप्टेंबर रोजी गांधी नगर बिलोली येथील 70 वर्षाचा एका पुरुषाचा तर इस्लापुर किनवट येथील 38 वर्षाचा एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे  उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 343 झाली आहे.   

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये खाजगी रुग्णालय 24, अर्धापूर कोविड केंअर सेंटर 19, लोहा कोविड केंअर सेंटर 10, माहूर कोविड केंअर सेंटर 5, नायगाव कोविड केंअर सेंटर 1, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड 17,  देगलूर जैनब कोविड केंअर सेंटर 2, बिलोली कोविड केंअर सेंटर 7 , एनआरआय / पंजाब भवन / महसूल भवन / होमआयसोलेशन 167, मुखेड कोविड केंअर सेंटर 25 असे 277 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 74, लोहा तालुक्यात 5, हदगाव तालुक्यात 1, कंधार तालुक्यात 1, बिलोली तालुक्यात 2, हिंगोली 6, नांदेड ग्रामीण 7, भोकर तालुक्यात 2, नायगाव तालुक्यात 4, हिमायतनगर तालुक्यात 2, किनवट तालुक्यात 1, देगलूर तालुक्यात 1, असे एकुण 106 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 85,  हदगाव तालुक्यात 9, अर्धापूर तालुक्यात 9, किनवट तालुक्यात 11, बिलोली तालुक्यात 13, मुखेड तालुक्यात 15, धर्माबाद तालुक्यात 9, हिंगोली 1, नांदेड ग्रामीण 5, मुदखेड तालुक्यात 4, लोहा तालुक्यात 8, कंधार तालुक्यात 3, भोकर तालुक्यात 1, नायगाव तालुक्यात 3, यवतमाळ 1 एकुण 177 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 3 हजार 817 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 281, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन, होम आयशोलेशन एकत्रित  1 हजार 762 जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 84, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवीन इमारत) 40, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 134, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 77, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 176,  देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 69, लोहा कोविड केअर सेंटर येथे 78, हदगाव कोविड केअर सेंटर 53, भोकर कोविड केअर सेंटर 42, कंधार कोविड केअर सेंटर येथे 46, बारड कोविड केअर सेंटर 23, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 46, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 39, मुदखेड कोविड केअर सेटर 79,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 22, किनवट कोविड केअर सेंटर येथे 205, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 53, उमरी कोविड केअर सेंटर 76, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 18,  खाजगी रुग्णालयात 329 बाधित, जिल्हा मध्यवर्ती कारागृह नांदेड 82, औरंगाबाद 1 व निजामाबाद 1, हैद्राबाद येथे 1 संदर्भित  झाले आहेत.  

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 69 हजार 898,

निगेटिव्ह स्वॅब- 53 हजार 589,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 283,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 12 हजार 984,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-32

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 10,

एकूण मृत्यू संख्या- 343,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 8 हजार 757,

आज रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 3 हजार 817,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 1 हजार 320, 

आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 34,

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 70 टक्के 

 

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

00000


  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...