Thursday, December 9, 2021

 नांदेड जिल्ह्यात 3 व्यक्ती कोरोना बाधित

तर 2 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 927 अहवालापैकी 3 अहवाल कोरोना बाधित आले आहे. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 3 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 502 एवढी झाली असून यातील 87 हजार 829 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 19 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 654 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 2, नांदेड ग्रामीण 1 असे एकुण 3 बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यातील 2  कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 2 असे एकूण 2 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 19 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 11, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 3, खाजगी रुग्णालय 3 अशा एकूण 19 व्यक्ती उपचार घेत आहेत.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 83 हजार 66

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 79 हजार 68

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 502

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 829

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 654

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-19

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

 महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक कार्यालयांतर्गत

तक्रार निवारण समिती अनिवार्य

प्रभारी जिल्हाधिकारी दिपाली मोतियाळे 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक कार्यालयातर्गंत तक्रार निवारण समिती गठीत करणे अनिवार्य आहे. कामाच्या ठिकाणी महिलांचे छळापासून संरक्षण (प्रतिबंध मनाई व निवारण) अधिनियम 2013 अंतर्गत कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन प्रभारी जिल्हाधिकारी दिपाली मोतीयाळे यांनी केले. 

कामाच्या ठिकाणी महिलांचे छळापासून संरक्षण (प्रतिबंध मनाई व निवारण) या अधिनियमाच्या 8 व्या वर्धापन दिनानिमित्त आज डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी कार्यालय आणि महिला बाल विकास विभागाच्यावतीने या अधिनियमाविषयी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी तथा स्थानिक तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा जयश्री गोरे, विधिज्ञ आणि अशासकीय सदस्य छाया कुळजाईकर, महिला बाल विकास अधिकारी अब्दूल रशिद शेख, महसुल सहाय्यक श्रीमती स्वाती पंदेवाड, मनपाच्या उपायुक्त श्रध्दा उदावंत, लेखाधिकारी श्रीमती मुंडे मॅडम तसेच सर्व विभागाच्या महिला अधिकारी कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती. 

घर किंवा कार्यालयीन काम असो ती समन्वयाने केले तर उत्कृष्ट होऊ शकते, असेही प्रभारी जिल्हाधिकारी दिपाली मोतीयाळे यांनी सांगितले. प्रतिकार करण्याचे सामर्थ्य प्रत्येक महिलेत असले पाहिजे. लिंग समभाव हे मूल्य सगळ्यांमध्ये झिरपले पाहिजे.  तसेच समाजात अजूनही कायद्याची पाहिजे तेवढी जनजागृती झालेली नाही. म्हणून महिलांचे सक्षमीकरण होण्यास कमतरता दिसून येते. लैगिंक व अनेक छळातून अनेकदा महिला जातात. कायद्याने आता महिलांना सक्षम केले असून याबाबत शारीरिक, मानसिक साक्षर होण्यासाठी  महिलांनी एकत्रित आले पाहिजे. लैगिंक छळ प्रतिबंध करण्यासाठी कार्यालयात प्रत्येक महिलेला सखी, मैत्रिण असणे गरजेचे आहे, असे माजी शिक्षणाधिकारी जयश्री गोरे यांनी सांगितले. कामाची व्याप्ती वाढल्यामुळे महिलांना अनेकदा उशिरापर्यंत थांबावे लागते. त्यावेळी कार्यालयातील सुरक्षित वातावरण असणे अत्यंत महत्वाचे आहे. तसेच कामाच्या ठिकाणी महिलांवर छळ झाल्यास 30 दिवसाच्या आत तक्रार व 90 दिवसांच्या आत अपिल करणे गरजेचे असल्याचेही असेही त्यांनी स्पष्ट केले. 

यावेळी विधिज्ञ आणि अशासकीय सदस्य छाया कुळजाईकर यांनी महिलांनी ठरविले तर महिला या कुठल्याही क्षेत्रात कमी नाहीत. महिलांना आपल्या संस्कृतीत दुय्यम स्थान आहे हे चुकीचे असून शासनाने सर्व महिलांना कायद्याने भक्कम संरक्षण देऊन सक्षम बनविले आहे. महिलांवर होणाऱ्या शाररिक, आर्थिक, मानसिक कायदेविषयक कलमाची सविस्तर माहिती दिली. महिलांना समाजात समान स्थान मिळवून देण्यासाठी सर्वांनी व विशेषत: महिलांनी महिलांना मदत केली पाहिजे. कार्यालय हे कुटूंबाप्रमाणे असून प्रत्येकांने त्या जबाबदारीने वागले पाहिजे. 

यावेळी महसूल सहाय्यक स्वाती पेदेवाड यांनी कायद्याच्याबाबीचे पीपीटीद्वारे सादरीकरण करुन शासनाच्या उपाययोजनामूळे सध्या महिलांची संख्या पुरुषाच्या मानाने जास्त झाली आहे, ही समाधानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांच्या हक्काबाबतच्या सर्व कायद्याविषयी सविस्तर माहिती दिली. प्रस्तावना ॲङ सोनकांबळे मॅडम यांनी केली . यावेळी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापिठातील समाजकार्याचे विद्यार्थ्यांनी वाय फाय काळातील ती या विषयावरील पथनाटयाचे सादरीकरण करुन जनजागृती केली.

00000

कोविड-19 आजारामूळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या परिवाराला

सानुग्रह सहाय्यासाठी अर्ज करण्यास संकेतस्थळ विकसीत   

नांदेड (जिमाका) दि. 9 :- कोविड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास 50 हजार रुपये इतके सानुग्रह सहाय्य देण्यात बाबत मा.सर्वोच्च न्यायालयाने 4 ऑक्टोंबर 2021 रोजी दिलेल्या निर्देशानुसार, महसूल व वन (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन) विभागाने शासन निर्णय 26 नोव्हेंबर रोजी प्रसारीत केला आहे. 

या शासन निर्णयाच्या अनुषंगाने शासनाने ऑनलाईन वेब पोर्टल Online web portal विकसित केले असून, याद्वारे कोव्हिड-19 या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य प्राप्त करुन घेण्यासाठी कमीत कमी कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल. यासाठी अर्जदाराने mahacovid19relief.in या वर लॉगिन करणे आवश्यक राहील. तसेच यासाठी https://epassmsdma.mahait.org/login.htm  यावर देखील लिंक देण्यात आली आहे.  

अर्जदारास, त्याच्या आधार क्रमांक, मृत व्यक्तीचा तपशील जसे मृत्यू प्रमाणपत्र आणि रुग्णालयाचा तपशील (पर्यायी) या कागदपत्रांच्या आधारे त्याचा स्वत:चा मोबाईल क्रमांक वापरुन सहाय्य मिळण्यासाठी लॉगिन करता येईल. केंद्र शासनाकडे ज्यांच्या कोव्हिड-19 मुळे मृत्यूची नोंद झालेली आहे, अशा व्यक्तींच्या नातेवाईकाचा अर्ज इतर कोणत्याही कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येईल. इतर प्रकरणी, कोव्हिड-19 मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र असेल, तर अशी प्रकरणे देखील इतर कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येतील. अर्जदाराकडे मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र नसेल, तर कोव्हिड-19 मुळे मृत्यू झाल्याच्या पुष्ठर्थ कागदपत्रे अर्जदारास अर्जासोबत द्यावी लागतील. 

जर एखादे प्रकरण नामंजूर झाल्यास त्यावरअर्जदारास शासन निर्णय क्र. सार्वजनिक आरोग्य विभाग, न्यायिक-2021/प्र.क्र.488/आरोग्य-05, दिनांक 13 ऑक्टोबर, 2021 अन्वये जिल्हास्तर/महानगरपालिका स्तरावर तक्रार निवारणासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीकडे तक्रार निवारण अपिल करण्याचे व या समितीस अशा प्रकरणांची सुनावणी घेऊन अंतीम निर्णय देण्याचे अधिकार असतील. 

अर्ज अंतिमत: मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास राहतील. 

सानुग्रह सहाय्यासाठी मंजूर करण्यात येणारे सर्व अर्ज 7 दिवसांकरिता वेब पोर्टलवर सार्वजनिक करण्यात येतील, जेणे करुन मृत व्यक्तीच्या योग्य वारसास सहाय्य मिळावे याकरिता त्याला अपिल करण्याची संधी मिळू शकेल. 

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अंतिमत: मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार, अर्जदाराच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये सानुग्रह सहाय्याची रक्कम थेटरित्या जमा करण्यात येणार आहे असे निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 वसतिगृहातील प्रवेशासाठी 15 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- मागासवर्गीय मुलां-मुलींचे सर्व शासकीय वसतिगृहे सुरु झालेली आहेत. विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश देण्याबाबतची प्रक्रीया सुरु झालेली आहे. जिल्ह्यातील इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी बुधवार 15 डिसेंबर 2021 पर्यत अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे. 

इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या तसेच इयत्ता अकरावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या व पदवी  प्रथम वर्षात व पदव्युत्तर प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या प्रवेशोत्सूक विद्यार्थ्यांनी संबंधित वसतिगृहातील गृहपाल यांच्याकडे प्रवेश अर्ज भरून द्यावेत. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. याची कृपया नोंद घ्यावी, असेही समाज कल्याण विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.  

00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...