Thursday, March 23, 2017

कॅशलेस व्यवहारांच्या प्रोत्साहनासाठी
 आज नांदेडमध्ये डिजीधन मेळावा
नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
नांदेड दि. 23 :- केंद्र शासनाच्या निती आयोगाच्या धोरणानुसार डिजीटल प्रदान मोहिमेत शुक्रवार 24 मार्च 2017 रोजी डिजीधन मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातील डॅा. शंकरराव चव्हाण नियोजन भवन परिसरात हा मेळावा होणार आहे. मेळाव्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. वस्त्रोद्योग, पशूसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यविकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जून खोतकर अध्यक्षस्थानी आणि राज्याचे गृह (शहरे), नगरविकास, विधी आणि न्याय विभाग, संसदीय कार्ये, कौशल्य विकास आणि उद्योजकता माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री डॅा. रणजित पाटील प्रमुख उपस्थित राहतील. मेळाव्यास उपस्थित राहण्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.
या मेळाव्याची जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली असून जिल्हाधिकारी प्रांगण प्रदर्शन व मेळाव्यातील विविध उपक्रमांसह सज्ज झाले आहे. मेळाव्यात डिजीटल प्रदानाशी निगडीत बँका, तसेच विविध व्यापारी कंपन्या, शासकीय विभाग आदी सहभागी झाल्या आहेत. त्यासाठी सुमारे 63 अधिक दालनांची उभारणी करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी अकरा वाजता मेळाव्याचे  उद्घाटन होईल. दुपारच्या सत्रात साडे तीन वाजता नियोजन भवन सभागृहात मुख्य कार्यक्रम होईल. याप्रसंगी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहतील. वस्त्रोद्योग, पशूसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यविकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जून खोतकर अध्यक्षस्थानी आणि राज्याचे गृह (शहरे), नगरविकास, विधी आणि न्याय विभाग, संसदीय कार्ये, कौशल्य विकास आणि उद्योजकता माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री डॅा. रणजित पाटील प्रमुख उपस्थित राहतील. तसेच जिल्हा परीषद अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, खासदार राजीव सातव, खासदार डॅा. सुनिल गायकवाड, महापौर शैलजा स्वामी, आमदार सर्वश्री अमरनाथ राजूरकर, सतीश चव्हाण, विक्रम काळे, डी. पी. सावंत, वसंतराव चव्हाण, प्रदीप नाईक, सुभाष साबणे, प्रताप पाटील-चिखलीकर, हेमंत पाटील, नागेश पाटील-आष्टीकर, डॅा. तुषार राठोड, श्रीमती अमिताताई चव्हाण आणि निती आयोगाच्या डिजीटल पेमेंट विभागाच्या संचालक श्रीमती मेरी बार्ला यांचाही निमंत्रितामध्ये समावेश आहे.  या कार्यक्रमात  कॅशलेस व्यवहार करणाऱ्या ग्राहक तसेच व्यापारी-व्यावसायीकांतून भाग्यवान विजेत्याची (लकी ड्रॅा) काढण्यात येणार आहे.
 मेळाव्यात बँका, आधार क्रमांकाशी निगडीत पेमेंट, तसेच मोबाईल कंपन्या, खते, इंधन आदी कंपन्याही सहभागी होणार आहेत.  त्यांच्याकडील विविध ॲप व त्यांच्या वापराबाबत याठिकाणी डिजीटल प्रदानाच्या व्यवहारांची प्रात्यक्षिके तसेच खरेदी आदीबाबत माहिती दिली जाणार आहे.
या मेळाव्यास जिल्ह्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव व्ही. के. गौतम आणि नांदेडचे जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी केले आहे. सकाळी 11 पासून डिजीधन मेळाव्यातील प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.

  • डिजीधन मेळाव्यात शासकीय विभागांचाही सहभाग. महापालिका, आरटीओ अशा यंत्रणा ई-गव्हर्नन्सद्वारे तसेच डिजीटल पेमेंटबाबतची माहिती देतील.
  • बँका, खासगी पेमेंट संस्था (पेटीएम, एअरटेल पेमेंट बँक, पेवर्ल्ड इ. कंपन्या) सहभागी होतील. या बँका व्यवहारांबाबतची प्रात्यक्षिकेही दाखवतील. प्रत्यक्ष ग्राहक नोंदणीही करतील. खाती सुरु करतील.
  • मेळाव्यात कॅशलेस व्यवहार करणाऱ्या विविध व्यावसायिकांनीही आपली दालने थाटली आहेत. त्यामध्ये खाद्य पदार्थासोबतच ग्राहकोपयोगी वस्तुंचेही दालने असून त्याठिकाणी डिजीटल पेमेंट पद्धतीने खरेदी करता येणार आहे.                             000000
मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या
पात्र परिसरात कलम 144 लागू
नांदेड, दि. 23 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.
या बंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पूर्वेस वाजेगाव कोल्हापूरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा सोमवार 27 मार्च 2017 च्या सहा वाजेपासून ते बुधवार 26 एप्रिल 2017 च्यामध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे. हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

000000
आधार कार्ड शिष्यवृत्ती खात्याशी जोडण्याबाबत
मुख्याध्यापकांना समाज कल्याणचे आवाहन
नांदेड दि. 23 :- जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडून देण्यात येणाऱ्या सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती (इयत्ता पाचवी ते दहावी) तसेच मॅट्रिक पुर्व भारत सरकार शिष्यवृत्ती, अस्वच्छ व्यवसाय या शिष्यवृत्तीसाठी सन 2013-14 पासून ऑनलाईन प्रदान केल्या जातात. जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिनस्त सर्व मुख्याध्यापकांची बैठक बोलावून आधार कार्ड संबंधीत शिष्यवृत्तीच्या बँक खात्याशी संलग्न करुन घ्याव्यात, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी उमाकांत तोटावाड यांनी केले आहे.
या शिष्यवृत्तीचा लाभ योग्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावा यासाठी विद्यार्थ्यांचा आधार कार्ड क्रमांक संकलीत करुन तो योग्य असल्याची तपासणी करुन आधार कार्ड क्रमांक त्यांच्या शिष्यवृत्ती योजनेशी संलग्न करण्याच्या सूचना आयुक्त समाज कल्याण पुणे यांनी दिल्या आहेत.

000000
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार
योजनेअंतर्गत अर्ज करण्यास मुदतवाढ
         नांदेड दि. 23 :-  शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जाती नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना " योजनेंतर्गत अर्ज 23 मार्च 2017 पर्यंत मागविण्यात आले होते. आता अर्ज करण्यासाठी मुदत शुक्रवार 31 मार्च 2017 पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी दिली आहे.  
             या योजनेच्या लाभ मिळण्यासाठी पुढील विद्यार्थी पात्र आहेत. विद्यार्थी अनुसूचित जाती नवबौध्द प्रवर्गातील असावा. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली शैक्षणीक संस्था ज्या ठिकाणी आहे अशा स्थानिक ठिकाणचा हिवासी नसावा. सन 2016-17 या वर्षामध्ये इयत्ता आकरावीचे विद्यार्थी इयत्ता बारावी नंतर प्रथम वर्षात प्रवेश घेणारे पदविका, पदवीचे विद्यार्थी आणि प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या पदव्युत्तर पदवी पदवी, पदवीकाचे विद्यार्थ्यांना हा लाभ दिला जाणार आहे.  सन 2017-18 पास पुढे हा लाभ 11 वी 12 वीचे विद्यार्थी आणि 12 वीनंतर प्रथम वर्ष पदविका ,पदवी पदव्युत्तर पदवीका पदवीच्या विद्यार्थ्यांना सुध्दा हा लाभ दिला जाणार आहे. अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 3 टक्के आरक्षण असेल त्यांच्या पात्रतेची किमान टक्केवारी 50 टक्के असावी. दिव्यांग विद्यार्थी वगळता इतर विद्यार्थ्यासाठी इयत्ता 10 वी, 12 वीमध्ये  किमान 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे.  त्यापेक्षा कमी गुण असणारे विद्यार्थी या योजनेस पात्र होणार नाहीत. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा कुंटूबांचे, पालकांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्यांने स्वत:च्या नावे राष्ट्रीयकृत, शेडयुल  बँकेत खाते उघडणे आधार क्रमांकाशी सलग्न करणे अनिवार्य आहे. विद्यार्थी शासन निर्णयातील तरतुदी प्रमाणे इयत्ता 10 वी किंवा 12 वीनंतरचे अभ्यास क्रमामध्ये प्रवेशित असावा त्यास कोणत्याही शासकिय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेला नसावा. बारावी नंतरच्या तसेच पदवी नंतर पदव्युत्तर पदवी, पदवीका अभ्यासक्रम हा दोन वर्षा पेक्षा कमी कालावधीचा नसावा विद्यार्थी केवळ प्रथम वर्षात प्रवेशित असावा. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेले महाविद्यालय अभ्यासक्रम यास राज्य शासन वा संबधीत तत्सम सक्षम प्राधिकारी यांची मान्यता असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेनुसार करण्यात येईल. निवडलेला विद्यार्थी संबधीत अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील. ही सवलत शैक्षणीक कालावधीत जास्तीजास्त 7 वर्षापर्यंत घेता येईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी  प्रत्येक वर्षी किमान 60 टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे अन्यथा तो या योजनेस अपात्र होईल.  विद्यार्थ्यांने खोटी माहिती कागदपत्र देवून या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास किंवा शैक्षणीक अभ्यासक्रम पूर्ण केल्यास अथवा नौकरी व्यवसाय करीत असल्यास किंवा इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेवून गैर वापर केल्याचे निदर्शनास आल्यास तो कारवाईस पात्र राहील तसेच त्यास दिलेल्या रक्कमेची 12 टक्के व्याजासह वसुली केली जाईल.
वरील अटीची तसेच  शासन निर्णयातील तरतुदीची पुर्तता करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विहित जोडपत्र क्रमांक 1 मधील अर्ज त्यासोबत जोडपत्र क्रमांक 2 मध्ये नमुद कागदपत्राच्या सांक्षाकिंत प्रती जोडून परिपूर्ण अर्ज शुक्रवार 31 मार्च 2017 पर्यंत समाज कल्याण कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे. विहित नमुन्यातील अर्ज जोडपत्र तसेच शासन निर्णय दिनांक 6 जानेवारी 2017 हा सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या सुचना फलकावर लावण्यात आलेला आहे. अधिक माहितीसाठी संबधीत विद्यार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन , ग्यानमाता शाळे समोर, ांदेड या कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.

000000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...