Friday, January 16, 2026

 विशेष वृत्त  

गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त

आयोजित ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमाचा विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याकडून आढावा

छत्रपती संभाजीनगर, दि.16 (विमाका): श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त आयोजित ‘हिंद दी चादर’ या कार्यक्रमाच्या तयारीचा विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज सविस्तर आढावा घेतला. या ऐतिहासिक व प्रेरणादायी कार्यक्रमाच्या आयोजनात कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी प्रशासनाने दक्षतेने व समन्वयाने काम करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीला दुरदृष्य प्रणालीद्वारे नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह विभागातील महसूल, शिक्षण, आरोग्य, माहिती यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. तर विभागीय आयुक्त कार्यालयात अपर आयुक्त मंजुषा मिसकर, नगर प्रशासन विभागाचे देविदास टेकाळे यांच्यासह संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते. 

आढावा बैठकीत कार्यक्रमाची एकूण रूपरेषा, जनजागृती उपक्रम, प्रभात फेऱ्या, विद्यार्थी व युवकांचा सहभाग, मुख्य सोहळ्याचे नियोजन तसेच कायदा-सुव्यवस्था, वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता व आरोग्य सुविधांबाबत सविस्तर चर्चा झाली.

कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या त्याग, शौर्याचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन आयुक्त श्री. पापळकर यांनी केले. नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची विशेष काळजी घेऊन कार्यक्रम शिस्तबद्ध, शांततापूर्ण व उत्साहात पार पाडावा यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. तसेच सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून जबाबदारीने काम करावे, प्रत्येक विभागाने प्रचार व प्रसाराचे नियोजन करावे असे निर्देशही  त्यांनी यंत्रणेला दिले.  ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य, सद्भावना व ऐतिहासिक मूल्यांची जाणीव निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी "हिंद दी चादर" कार्यक्रमाच्या अनुषंगाने केलेल्या तयारीबाबत सविस्तर माहिती दिली. 

यावेळी बैठकीस विभागातील जिल्हा प्रशासनातील अधिकारी, आरोग्य, शिक्षण यांच्यासह विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते.  

0000







विशेष वृत्त  

‘हिंद-दी-चादर’च्या स्मृतींनी शाळा-महाविद्यालये भारावली; लातूर आणि धाराशिवमध्ये जनजागृतीचा उत्साह

लातूर  दि.१६ (‍विमाका):  धर्म, सत्य आणि मानवी हक्कांच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणारे ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षाचे औचित्य साधत लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात शालेय स्तरावर व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. नांदेड येथे होणाऱ्या ऐतिहासिक मुख्य सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या या उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

लातूर: डिजिटल सादरीकरणातून इतिहासाचा जागर

 जिल्ह्यातील शाळांमध्ये आजपासून विशेष उपक्रमांना प्रारंभ झाला. शासकीय आणि खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना एलईडी स्क्रीनद्वारे गुरुजींच्या जीवनपटावर आधारित माहितीपट (Documentary) दाखविण्यात आले. यावेळी शाळांचा परिसर ‘हिंद दी चादर’ गीतांच्या सामूहिक गायनाने दुमदुमून गेला. केवळ पुस्तकी ज्ञान न देता, दृक-श्राव्य माध्यमातून गुरुजींचा त्याग विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाने केला आहे.

धाराशिव: प्रभात फेरीने वेधले लक्ष

धाराशिव जिल्ह्यातील शिंगोली (ता. जि. धाराशिव) येथील विद्यानिकेतन माध्यमिक व आदर्श प्राथमिक आश्रमशाळेत गुरुजींना अनोखी आदरांजली वाहण्यात आली. शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी भव्य ‘प्रभात फेरी’ काढत परिसरात जनजागृती केली. कार्यक्रमात श्रीमती ज्योती राठोड यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी रत्नाकर पाटील यांनी गुरुजींच्या बलिदानाचे महत्त्व विशद करताना, "अन्यायाविरुद्ध लढणारे 'हिंद-दी-चादर' म्हणजे देशाचा गौरव," अशा शब्दांत त्यांच्या कार्याचा गौरव केला.

स्पर्धांमधून गुणांचा सन्मान

दोन्ही जिल्ह्यांत निबंध, चित्रकला, वक्तृत्व आणि गायन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यात सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.  हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूरजींचा ज्वलंत इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, हाच या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

000000




जिल्हा परिषद हायस्कूल, पेनुर (ता. लोहा, जि. नांदेड) येथे ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना कार्यक्रमासंदर्भातील माहितीपर चित्रफीत दाखविण्यात आली.

तसेच शाळेच्या परिपाठावेळी ‘महती गीत’ ऐकविण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये कार्यक्रमाविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांनी ही माहिती आपल्या घराघरांत पोहोचवावी, तसेच कुटुंबीय व परिसरातील नागरिकांना कार्यक्रमाची माहिती द्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.



विशेष वृत्त क्रमांक 51

हिंद दी चादर च्या जयघोषाने शाळा दुमदुमल्या

प्रभातफेऱ्या व स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नांदेड, दि. १६ जानेवारी : ‘हिंद दी चादर’ या कार्यक्रमाच्या प्रचार–प्रसिद्धीसाठी आज जिल्ह्यातील शाळा चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जयघोषाने दुमदुमून गेल्या. उत्साहात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रभातफेऱ्यांद्वारे ‘हिंद दी चादर – श्री गुरु तेग बहादूर’ या जयघोषाने शाळा व परिसर भारावून टाकला. त्यामुळे सर्वत्र देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले.

आजपासून जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये प्रभातफेऱ्यांच्या माध्यमातून ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमाची प्रभावी प्रचार–प्रसिद्धी करण्यात येत आहे. आज कंधार तालुक्यातील जि.प.प्राथमिक शाळा, नागापूर येथे विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढून या उपक्रमाची सुरुवात केली. प्रभातफेऱ्या तसेच विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.

या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये निबंध, चित्रकला, वक्तृत्व, गायन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून ‘हिंद दी चादर’ विषयावरील डॉक्युमेंट्री, चित्रपट व गीतांचे सादरीकरणही केले जात आहे. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या त्याग, बलिदान आणि धर्मनिष्ठेचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

०००००







वृत्त  

विद्यानिकेतन व आदर्श आश्रमशाळेत ‘हिंद की चादर’ गुरु तेग बहादूर यांना अभिवादन

धाराशिव,दि.१६ जानेवारी (जिमाका ) ‘हिंद की चादर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहादत वर्षानिमित्त विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळा व आदर्श प्राथमिक आश्रमशाळा, शिंगोली (ता.जि.धाराशिव) यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी १५ जानेवारी रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात श्रीमती.ज्योती राठोड यांच्या हस्ते "हिंद दि चादर" गुरु तेग बहादूर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.यानंतर प्रभात फेरी काढण्यात येऊन विविध घोषणा देण्यात आल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रत्नाकर पाटील सर यांनी केले.ते म्हणाले की,गुरु तेग बहादूर हे सिखांचे नववे गुरु असून त्यांनी अन्याय व अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवत खंबीरपणे लढा दिला.धर्म व देशाच्या रक्षणार्थ त्यांनी आपले बलिदान दिले. देशरक्षणासाठी दिलेल्या या महान त्यागामुळेच त्यांना “हिंद की चादर” ही गौरवशाली उपाधी बहाल करण्यात आली,असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक दिपक खबोले,चंद्रकांत जाधव,कैलास शानिमे, पडवळ खंडू,साने ज्योती,सुरेखा कांबळे, श्रद्धा सूर्यवंशी,सुधीर कांबळे,शेषेराव राठोड,सचिन राठोड,बालिका बोयणे, इरफान शेख तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी गोविंद बनसोडे,सागर सूर्यवंशी,संजय मस्के आदी उपस्थित होते.

गुरु श्री गुरु तेग बहाद्दर साहिब जी यांच्या ३५० व्या शहादत समागम वर्षानिमित्त शाळेत चित्रकला व निबंध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक रत्नाकर पाटील यांनी केले,तर आभार शिक्षक दिपक खबोले यांनी मानले.

****



 विशेष लेख :

‘हिंद दी चादर’ गुरु तेगबहादुर साहिब यांच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण

‘हिंद दी चादर’,श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या शहिदीला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याने महाराष्ट्र शासन आणि श्री गुरु तेग बहादुर साहिबजी ३५० वी शहिदी समागम राज्यस्तरीय समितीमार्फत गेल्यावर्षी ७ डिसेंबर रोजी झालेल्या देखण्या आयोजनानंतर २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत नांदेड येथे भव्य अध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी स्वाभीमान आणि देश रक्षणासाठी दिलेले बलिदान अनन्य साधारण आहे. त्यांच्या परिवारातील सदस्यांनीही देशासाठी शहादत दिली. हा गौरवशाली इतिहास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्याचे स्मरण करणारा आणि गुरुंनी देशासाठी दिलेल्या बलिदानावर प्रकाश टाकणारा हा लेख…

कश्मीरचा सुभेदार हा शिखांचे नववे गुरु तेगबहादुर साहिब यांच्या मदतीसाठी गेले. ‘ना पेह देना ! ना पेह सेना’ म्हणत (घाबरायचे नाही व घाबरवयाचेही नाही) कश्मीरींच्या  रक्षणासाठी गुरु तेगबहादुर साहिब यांनी थेट तत्कालीन सत्तेला आवाहन दिले व दिल्लीकडे कुच केली. आग्रा येथेच तेगबहादुरांना अटक करण्यात आली.दिल्लीला आणून त्यांना धर्मांतराची बळजबरी करण्यात आली. गुरु तेगबहादुरांनी  त्यास नकार देऊन लाल किल्ल्यासमोरील चांदणीचौकात बलिदान दिले. त्यांचे हे बलिदान इतिहासात अमर झाले व भारतभूमीचे कवच म्हणून त्यांना ‘हिंद दी चादर’म्हणून ओळखले जाते. सत्य व अहिंसेचे प्रेषित असलेल्या तेगबहादुरांनी बलिदान देऊन मानवी स्वातंत्र्याचा व स्वतःस पटेल तो धर्म आचरण्याचा आदर्श भारतीयांना घालून दिला.

श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या सोबत अनेक समाज उभे होते विशेषत: सिकलीगर, बंजारा, लबाना, मोह्याल, सिंधी समाजांनी या संघर्षात मोलाचे योगदान देत तेगबहादुर साहेबांनी दिलेल्या देश व मानवतेच्या रक्षणाची शिकवण सर्वदूर पोचवली. भाई मतीदास, भाई सतीदास आणि भाई दयाल गुरु तेग बहादुरांच्या आत्मसन्मानासाठी आणि गुरुनिष्ठेसाठी शहीद झाले. हे समाज सेवाभाव, साहस आणि श्रद्धेसाठी ओळखले जातात. दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ला परिसरातील चांदणी चौकात सीसगंज गुरुद्वारा सर्व भारतीयांसाठी प्रेरणास्त्रोत ठरला आहे. याच ठिकाणी गुरु तेगबहादुरांनी तत्कालीन सत्तेला आपल्या प्राणांच्या आहुतीतून भारतीयांच्या एकीचा व सद्भावनेचा संदेश दिला. २५ मे १६७५ रोजी सत्ताधाऱ्यांच्या आज्ञेनुसार  गुरु तेगबहादुरांचे शिर अमानुषपणे धडापासून वेगळे करण्यात आले आणि ‘जो कोणी तेगबहादुरांचे उत्तर कार्य पार पाडेल त्याला व त्याच्या कुटुंबीयांना कठोर शिक्षा करण्यात येईल,’ असा फतवा काढला. 

अशा दहशतीच्या वातावरणामध्ये ढवळून निघालेले भारतीय मन नव्या उमेदीने उभे राहण्यासाठी धडपडू लागले. सत्तेची अवाज्ञा करून भाई जेतासिंह यांनी त्यांचे ‘शिर’आनंदसाहेब दरबार येथे शिखांचे दहावे गुरू आणि गुरू तेगबहादुरांचे पुत्र गुरू गोविंदसिंह यांच्या सुपूर्द केले. इकडे भाई लखीशाह बंजारा यांनी मुलगा नाथईय्याजी यांच्या मदतीने गुरू तेगबहादुरांचे ‘धड’ दिल्लीतीलच रकाबगंज गावात आणले व आपल्या राहत्या घरात ते ठेवून घरालाच अग्नी दिला. त्यानंतर त्याच ठिकाणी पवित्र अस्थी जमिनीत पुरल्या आज तिथेच ‘रकाबगंज गुरुद्वारा’उभा आहे.

त्याग व शौर्याचे प्रतीक ‘सीसगंज’ आणि ‘रकाबगंज’ गुरुद्वारा

सरदार बघेलसिंह यांनी १७८३ मध्ये दिल्ली सर करून लाल किल्ल्यावर कब्जा मिळवला आणि गुरू तेगबहादुरांच्या शहीदस्थळी सीसगंज गुरूद्वारा बांधण्यात आला. पुढे १९३० रोजी याच गुरूद्वाऱ्याचे पुनर्निर्माण करण्यात आले. स्वधर्माची ज्योत भारतीयांमध्ये तेवत ठेवण्याकरिता व प्रसंगी बलिदान देण्याचा संदेश देणारा सीसगंज गुरूद्वारा भारतीयांचे मुख्य श्रद्धास्थान ठरले आहे. दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ला परिसात स्थित सीसगंज गुरुद्वारा हा दिगंबर जैन अतिशय क्षेत्र लालमंदिरापासून सुरु होणाऱ्या चांदणीचौकाकडील रस्त्यावर आहे, तर संसद भवनाच्या मागील भागात रकाबगंज गुरुद्वारा स्थित आहे.

शीख धर्मियांचे मार्गदर्शक दहा गुरु आहेत. यापैकी दोन गुरु हे तेग बहादुरांचे आप्त आहेत. गुरु तेगबहादुर हे शिखांचे नववे गुरू असून सहावे शीखगुरू हरगोविंद यांचे ते सर्वात धाकटे पुत्र व शिखांचे दहावे व शेवटचे गुरू गोविंदसिंह यांचे ते पिता होत. तेगबहादुरांचा जन्म अमृतसर येथे झाला. वयाच्या ८ व्या वर्षी कर्तारपूर येथील लालचंदजी खत्री यांची कन्या गुजरी यांच्याशी तेगबहादुरांचा विवाह झाला. त्यांचे मूळ नाव त्यागमल होते. लहानपणीच त्यांना वैराग्य प्राप्त झाले. गृहस्थ असूनही ते वडिलांच्या मृत्युनंतर बकाला येथे जाऊन विरक्त वृत्तीने राहू लागले.

शिखांचे आठवे गुरू हरकिशन यांच्या निधनानंतर १६६४ मध्ये तेगबहादुर यांना नववे गुरू म्हणून गादीवर बसविण्यात आले. त्यांनी स्वतःसाठी शिवालिक पर्वतराजीत एक नगर वसविले आणि तिथे आपली गादी स्थापून ते धर्मप्रचारासाठी यात्रा करू लागले. हे नगर आनंदपूर म्हणून पुढे शिखांचे प्रसिद्ध व पवित्र क्षेत्र बनले. पाटणा येथे त्यांचे पुत्र गोविंदसिंह यांचा जन्म झाला. पुढे शिखांचे दहावे व शेवटचे गुरू गोविंदसिंह म्हणून ते उदयास आले.

तेगबहादुर यांच्या कुटुंबातील सात सदस्यांचे बलिदान

देशहितासाठी प्राणांचे बलिदान देणारे गुरु तेग बहादुर यांनी मोठा आदर्श घालून दिला. त्यांचीच शिकवण पुढे घेऊन जात त्यांच्या कुटुंबीयांनीही बलिदान दिले. आनंदपूरच्या लढायांनंतर सरदार वजीर खानाने गुरू गोविंदसिंग यांच्यावर हल्ला केला.यात मोठे दोन साहिबजादे अजीतसिंग आणि जुझारसिंग यांनी सरदाराच्या सैन्यासमोर शौर्याने लढत वीरगती प्राप्त केली. छोटे साहिबजादे जोरावरसिंग आणि फतेहसिंग यांना त्यांच्या आजी माता गुजरीजींसोबत सरहिंदच्या थडग्यात कैद करण्यात आले. वजीर खानाने त्यांना थंडीच्या रात्री उघड्यावर ठेवले आणि नंतर जिवंतपणे भिंतीत बंद करून मारले. या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी केंद्र शासनाने २१ ते २७ डिसेंबर हा  'बलिदान सप्ताह' आणि २६ डिसेंबर हा 'वीर बाल दिवस' म्हणून घोषित केला व देशभर तो साजरा केला जात आहे. शिखांचे दहावे व शेवटचे गुरु, गुरु गोविंद सिंग यांनी १४ युद्धे लढली. १७०८ मध्ये नांदेड येथे देश रक्षणासाठी लढताना ते शहीद झाले.

गुरु तेगबहादुरांनी आसामपासून काश्मीरपर्यंत आपल्या सद्विचारांचा प्रसार केला. त्यांनी विविध विषयांवर ११६ पद्ये रचली. ही पद्ये पुढे गुरू गोविंदसिगांनी गुरु ग्रंथसाहिबात अंतर्भूत केली. यांतील ५९ पद्ये ‘शबद’ (स्तोत्रे) आणि ५७ पद्ये ‘श्लोक’ आहेत. त्यांच्या रचनेत वैराग्य व क्षमाशील वृत्तीचा उत्कृष्ट आविष्कार आढळतो. अहिंसा व सत्याचे प्रेषित असलेल्या तेगबहादुरांनी  प्राण त्याग करून मानवी स्वातंत्र्याचा व स्वतःस पटेल तो धर्म आचरण्याचा आदर्श भारतीयांना घालून दिला. त्यांच्या बलिदानाने भारतीयांमध्ये जी अस्मिता निर्माण झाली तिला इतिहासात तोड नाही. तेगबहादुर साहिब यांच्या शहिदीला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने यावर्षी भारतभर मोठया प्रमाणात विविध कार्यक्रम आखण्यात आले आहेत.

‘हिंद दी चादर’श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागमानिमित्त राज्यभर विविध प्रबोधनपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. याअंतर्गत नागपूर येथील नारा परिसरातील सुरेश चंद्र सुरी मैदानावर ७ डिसेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्यावर भारतीय डाक विभागामार्फत विशेष टपाल तिकीट जारी करण्यात आले. सिंधी आणि पंजाबी समाजाच्या इतिहासाचे दर्शन घडविणाऱ्या ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शन लावण्यात आले. विदर्भ आणि छत्तीसगढ मधील शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, मोह्याल, वाल्मीकी आणि सिंधी समाजबांधवानी एकत्र येऊन हा ऐतिहासिक समागम कार्यक्रम साजरा केला.     

 श्री हुजूर साहिब नांदेड

शीखांचे दहावे गुरू श्री गोविंद साहिबजी यांची कर्मभूमी ही महाराष्ट्रातील श्री हुजूर साहिब नांदेड असून याठिकाणी त्यांनी सर्व शीख बांधवांना उद्देशून, 'सब सिक्खन को हुकम हे गुरू मान्यो ग्रंथ साहिब' असा उपदेश दिला होता. हा मानवतेचा संदेश घरोघरी पोचविण्यासाठी व श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या त्यागाची शिकवण समाजाच्या सर्व घटकांत पोचविण्याच्या उद्देशाने नांदेड येथे येत्या २४ व २५ जानेवारीला शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

नांदेडमध्ये देहरुपी गुरु जाऊन गुरुग्रंथ साहिबची स्थापना झाली.  नांदेड येथील बंदासिंग यांनी गुरु गोविंद सिंग यांच्या प्रेरणेने पंजाबात जाऊन परकियांशी लढा दिला व प्रशासक बनले. त्यांनी सरहिंद जिंकून शेतकऱ्यांना जमीन मालकीचा अधिकार दिला आणि स्वराज्याची पायाभरणी केली.

गुरू गोविंद सिंग यांनी १७०६ मध्ये ‘जफरनामा’ हे पत्र लिहून सत्ता प्रमुखाला नैतिकतेचे आव्हान दिले. हे पत्र फारसी भाषेत असून, त्यात सत्ताधिशांच्या विश्वासघातकी वर्तनाचा, जुलूमांचा आणि शीखांवर केलेल्या अत्याचारांचा समाचार घेतला. पत्र वाचून बादशाहने गुरूजींना सन्मानाने आणण्याचा आदेश दिला, पण गुरूजींनी ते नाकारले. हे पत्र शीख इतिहासातील विजयाचे प्रतीक मानले जाते.

मराठवाडयातील नरसी नामदेव हे थोर वारकरी संत, संत नामदेवांचे जन्म गावही याच भागात आहे. संत नामदेवांनी वारकरी संप्रदायाच्या विस्ताराकरिता देशभ्रमण केले. पंजाबात गेले असता त्यांच्या उद्बोधनाने सर्व समाज भारावला त्यांच्या ६१ अभंगांचा शिखांच्या पवित्र गुरु ग्रंथसाहिबमध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे.

श्री गुरु तेग बहादुर साहिब यांचा देशरक्षण, सहिष्णुता आणि मानवतेचा संदेश महाराष्ट्रातील घराघरांत पोहचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासन तसेच शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, मोह्याल, वाल्मिकी उदासीन आणि गुरुनानक नामदेव संगत, तखत नांदेड गुरुसाहेब यांचा समावेश असलेल्या श्री गुरु तेग बहादुर साहिबजी ३५० वी शहिदी समागम राज्यस्तरीय समितीमार्फत नांदेड येथे २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी शहिदी समागम कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पंजाब, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगना आणि मराठवाडयातील शीख व अन्य समाज बांधव मोठया संख्येने यात सहभागी होणार आहेत. गुरु तेगबहादुरांच्या कार्याची महिती पोचविण्यासाठी प्रत्येक शाळा,महाविद्यालये, विद्यापीठांमध्ये वक्तृत्व स्पर्धा, गीते, डाक्युमेंटरी प्रदर्शीत करण्यात येत आहेत. या सर्व आयोजनातून ‘हिंद दी चादर’श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे महान विचार आणि  अजोड कर्तृत्वाचा परिचय जनतेला होणार आहे.

रितेश मो.भुयार,                                                                                                

माहिती अधिकारी,  माहिती व जनसंपर्क, नागपूर.

००००००




रविवार १८ जानेवारी २०२६ रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय,नांदेड


वृत्त क्रमांक 50

नांदेड जिल्ह्यात ‘बालविवाह मुक्त भारत अभियान राबविण्यास सुरुवात

नागरिकांना सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन

नांदेड, दि. १६ जानेवारी : बालविवाह मुक्त भारत, महाराष्ट्र आपला संकल्प १०० दिवस अभियान नांदेड जिल्ह्यात राबविण्याबाबत केंद्र व राज्य शासनाकडून निर्देश प्राप्त झाले आहेत. त्या अनुषंगाने नांदेड जिल्हा बालविवाह मुक्त करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध जनजागृती व प्रतिबंधात्मक उपक्रम राबविण्यात येत आहेत.

केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री श्रीमती अन्नपूर्णा देवी यांच्या सूचनेनुसार नांदेड जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी सर्व शासकीय व अशासकीय अधिकारी-कर्मचारी, समाजसेवी संस्थांचे कर्मचारी, सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच सुजाण नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

यासाठी https://stopchildmarriage.wcd.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा (Pledge) घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या संकेतस्थळावर स्वतःचे नाव व जिल्हा निवडून प्रतिज्ञा घेतल्यानंतर केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री श्रीमती अन्नपूर्णा देवी यांच्या स्वाक्षरीचे स्वतःच्या नावाचे प्रमाणपत्र डाऊनलोड करता येणार असून, याद्वारे बालविवाह मुक्त भारत अभियानात आपला सहभाग नोंदविता येईल. प्रतिज्ञा घेण्यासाठीची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे. 

संकेतस्थळावरील Menu वर क्लिक करून Take Pledge हा पर्याय निवडावा. त्यानंतर स्वतःचे नाव व मोबाईल क्रमांक टाकावा. राज्य म्हणून महाराष्ट्र व जिल्हा म्हणून नांदेड निवडावा. भाषा (हिंदी/इंग्रजी) निवडून कॅप्चा कोड भरावा. प्रतिज्ञा वाचून शपथ घ्यावी व प्रमाणपत्र डाऊनलोड करावे.

बालविवाह प्रतिबंधासाठी सर्व स्तरातून व्यापक सहभाग आवश्यक असून, नांदेड जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

**




वृत्त क्रमांक 49

राज्य परिवहन महामंडळाच्या नांदेड विभागात १५० शिकाऊ उमेदवारांची भरती

नांदेड, दि. १६ जानेवारी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नांदेड विभागामार्फत सन २०२६–२७ या प्रथम सत्रासाठी विविध व्यवसायांमध्ये ०१ वर्ष कालावधीसाठी शिकाऊ उमेदवार (Apprentice Trainee) भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ही भरती ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असून एकूण १५० पदे भरण्यात येणार आहेत. व्यवसायनिहाय पदसंख्या पुढीलप्रमाणे आहे. 

मेकॅनिक मोटार व्हेईकल – ५०, मेकॅनिक डिझेल – ५०, शीट मेटल वर्क्स – २०, ऑटो इलेक्ट्रिशियन – ०८, मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडीशनर – ०८, पेंटर (जनरल) – ०६, वेल्डर (गॅस अँड इलेक्ट्रिक) – ०४, टर्नर – ०२ तसेच अभियांत्रिकी पदवी/पदविका – ०२ अशी एकूण १५० पदे आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दिव्यांग उमेदवारांसाठी शिकाऊ उमेदवार कायद्यानुसार जागा आरक्षित राहतील.

आय.टी.आय. किंवा व्होकेशनल अभ्यासक्रम तसेच ऑटो इंजिनिअरिंग टेक्निशियन अभ्यासक्रम उत्तीर्ण उमेदवारांनी प्रथम www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर स्वतःचे नोंदणीकरण करणे आवश्यक आहे. अभियांत्रिकी पदवी/पदविका उत्तीर्ण उमेदवारांनी www.mhrdnats.gov.in किंवा www.nats.education.gov.in या NATS पोर्टलवर नोंदणी करून MSRTC Division Nanded या आस्थापनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा.

त्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विहित नमुन्यातील छापील अर्ज भरून सादर करणे आवश्यक आहे. विहित नमुन्यातील छापील अर्ज आस्थापना शाखा, विभागीय कार्यालय, रा.प. महामंडळ, नांदेड येथे दिनांक १९ जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत (शनिवार, रविवार व सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत उपलब्ध राहतील व तात्काळ स्वीकारले जातील.

छापील अर्जाची किंमत (जीएसटी सह) खुल्या प्रवर्गासाठी ५९० रुपये असून मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी वैध जातीचे प्रमाणपत्र सादर केल्यास २९५ रुपये इतकी राहील. इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करण्याचे आवाहन रा.प. महामंडळ नांदेड विभागामार्फत करण्यात आले आहे.

***

वृत्त क्रमांक 48

नांदेड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत १९ जानेवारी रोजी पीएमएनएएम शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा

नांदेड, दि. 16 जानेवारी :- मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र व औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री नॅशनल अप्रेंटिसशिप प्रोत्साहन योजना (PMNAM) अंतर्गत शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन सोमवार, दि. १९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे करण्यात आले आहे.

या भरती मेळाव्यात आयटीआय, बारावी उत्तीर्ण/नापास तसेच पदविधारक उमेदवारांसाठी विविध नामांकित कंपन्यांमार्फत शिकाऊ उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. भरतीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. जॅबिल इंडिया प्रा. लि., पुणे येथे वायरमन, मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रीशियन, कोपा (COPA), आयसीटीएसएम (ICTSM), फिटर या व्यवसायांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

क्वीज कॉर्प प्रा. लि., पुणे येथे बारावी उत्तीर्ण तसेच आयटीआय (दोन वर्षांचा व्यवसाय) उत्तीर्ण उमेदवारांची भरती होणार आहे. नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी, हैदराबाद येथे इलेक्ट्रीशियन, आयसीटीएसएम, वायरमन, इलेक्ट्रॉनिक्स या व्यवसायांच्या उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज जॉब प्लेसमेंट, नांदेड या आस्थापनेद्वारे फिटर, एमएमव्ही (MMV), डिझेल मेकॅनिक, इलेक्ट्रीशियन, मशीनिस्ट तसेच बारावी उत्तीर्ण व पदविधारक उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

पात्र आयटीआय, बारावी उत्तीर्ण/नापास व पदविधारक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह दि. १९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार पी. के. अन्नपुर्णे यांनी केले आहे.

०००००

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...