Monday, March 19, 2018


शासकीय तंत्रनिकेतन येथे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
युवा क्षमतेचा योग्य वापर करुन
देशाचा नावलौकिक वाढावावा
- सहसंचालक महेश शिवनकर
       
नांदेड, दि. 19 :- तज्ज्ञ अभियंता देशाची ताकद असून नवीन अडचणीवर मात करण्यासाठी तज्ज्ञ अभियंता उपाय शोधू शकतात. आपल्या युवा क्षमतेचा योग्य वापर करुन देशाचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन  औरंगाबाद येथील तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयाचे सहसंचालक महेश शिवनकर यांनी केले.
"युवोत्सव 2018"  वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम शासकीय तंत्रनिकेतन येथे उत्साहात पार पडला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री शिवनकर बोलत होते. या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून कोषागार अधिकारी निळकंठ पांचगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधिक्षक अभियंता ए. एच पठाण यांची उपस्थिती होती. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य पी. डी. पोपळे हे होते.  
             
यावेळी प्राचार्य श्री पोपळे यांनी अध्यक्षीय भाषणात स्नेह संमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाला वाव मिळतो, असे सांगून विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात प्रेरणा मिळावी यासाठी संस्थेतून उत्तीर्ण होऊन जाणारा सर्वोत्तम विद्यार्थी निवडण्याचा नवी उपक्रम यावर्षीपासून सुरु करत असल्याचे सांगून यावर्षासाठी स्थापत्य तृतीय वर्षाची विद्यार्थीनी कु. नम्रता गरड हिची निवड करण्यात आल्याचे सांगितले.
कोषागार अधिकारी श्री पाचंगे यांनी देशाला चांगल्या अभियंत्यांची गरज असून जास्तीतजास्त विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे. सहाय्यक अधिक्षक अभियंता ए. एच पठाण यांनी स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कला अविष्कारांना वाव मिळू शकतो. सर्व गुणसंपन्न विद्यार्थी यातून पुढे येतात असे सांगितले.
कार्यक्रमासाठी प्रा. सकळकळे, प्रा. सी. व्ही लहाडे, डी. एम. लोकमनवार, प्रा. एस. पी. कुलकर्णी, प्रा. श्री. व्ही. बी. उष्केवार, डॉ. एस. एस. चौधरी, प्रा. एस. एम. कंधारे, प्रा. व्ही. व्ही. कुलकर्णी, प्रा. एस. आर. मुधोळकर, प्रा. व्ही. यु. दातीर, डॉ. व्ही. एम. यादव, डॉ. ए. ए. जोशी, डॉ. एस. व्ही. बेट्टीगिरी, विद्यार्थी संसद सचिव विठ्ठल नरवटे, जिमखाना उपाध्यक्ष ए. बी. दमकोंडवार, जिमखाना सचिव प्रदीप सेवलीकर यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. आर. के. देवशी, चंदना टेकाळे, सुरज आठवले, विना देशमुख यांनी केले. तर "युवोत्सव 2018"चे स्नेहसंमेलन प्रभारी अधिकारी डॉ. ए. डब्ल्यू पावडे यांनी स्नेहसंमेलन यशस्वी केल्याबद्दल आभार मानले.
00000


राजर्षी छत्रपती शाहू महाराज
शिक्षण शुल्क शिष्यवृत्तीचे अर्ज करण्यास मुदतवाढ
  नांदेड, दि. 19 :- राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेंंतर्गत सन 2017-18 साठी विद्यार्थ्यांकडून ऑफलाईन अर्ज घेण्यास बुधवार 21 मार्च 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर महाविद्यालयांनी प्रपत्रा विद्यार्थ्यांची मुद्देनिहाय माहिती तयार करुन सीडीसह नांदेड विभागाचे सहसंचालक उच्च शिक्षण व लेखाधिकारी (अनुदान) उच्च शिक्षण यांचेकडे पुढील मंजुरीसाठी शुक्रवार 23 मार्च 2018 पर्यंत सादर करावीत, असे आवाहन उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. शैला सारंग यांनी केले आहे.
शासन निर्णयानुसार राजर्षी छत्रपती शाहु महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना शैक्षणिक वर्ष 2017-18 साठी महाडीबीटी प्रणालीतून वगळून त्यांची अंमलबजावणी पुर्वीच्या ऑफलाईन पध्दतीने करण्यात आली आहे.  याबाबत नांदेड विभागांतर्गत स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली या जिल्ह्यातील शासकीय/अशासकीय, कनिष्ठ/वरिष्ठ, कला, वाणिज्य, विज्ञान अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालये, अध्यापक महाविद्यालये तसेच व्यवसायिक महाविद्यालयांनी शासन परिपत्रकानुसार पात्र विद्यार्थ्यांना निदर्शनास आणून द्यावे. तसेच याबाबत महाविद्यालयाने दर्शनी भागावर सूचना लावावी. विद्यार्थ्यांकडून शासन परिपत्रकासोबत देण्यात आलेला ऑफलाईन अर्ज नमुन्यात माहिती 21 मार्च 2018 पर्यंत घेवून त्यांची अंमलबजावणी विहित कालावधीत पुर्ण करावी. तसेच एक्सल सीट इंग्रजी प्रपत्रामध्ये  विद्यार्थ्यांची मुद्देनिहाय माहिती तयार करुन सीडीसह शिक्षण सहसंचालक, उच्च शिक्षण, नांदेड विभाग, नांदेड व लेखाधिकारी (अनुदान), उच्च शिक्षण, नांदेड विभाग, नांदेड यांचेकडे पुढील मंजुरीसाठी शुक्रवार 23 मार्च 2018 पर्यंत सादर करावी, असेही आवाहन डॉ. शैला सारंग, सहसंचालक, उच्च शिक्षण, नांदेड विभाग, नांदेड यांनी केले आहे.
00000

वृत्त क्र. 283

  वृत्त क्र.   283 निवडणूक खर्च निरीक्षक नांदेडमध्ये दाखल ; खर्चावर काटेकोर लक्ष ठेवण्याचे आवाहन नांदेड, दि. 28 : लोकसभा निवडणूक ही अतिशय गं...