Monday, January 19, 2026

वृत्त क्रमांक 65

अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया अभियान’ जोमाने ; 

राज्य नोडल अधिकारी डॉ. कानगुले यांच्याकडून क्षेत्रीय पाहणी व मार्गदर्शन

नांदेड दि.१९ जानेवारी:- राज्यात १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया निर्मूलन अभियानाच्या अनुषंगाने राज्य नोडल अधिकारी डॉ. कानगुले यांनी नांदेड जिल्ह्याचा विशेष दौरा केला. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासी भागात सुरू असलेल्या कामाची त्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली आणि आरोग्य यंत्रणेला महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.

या दौऱ्यात डॉ. कानगुले यांच्यासोबत जिल्हा आरोग्य अधिकारी आणि आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

किनवट, माहूर ते नांदेड दौऱ्याचा सविस्तर आढावा

१५ जानेवारीपासून सुरू झालेली ही मोहीम ७ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. कानगुले यांनी जिल्ह्यातील आदिवासी पट्टा असलेल्या किनवट, माहूर आणि भोकर,नांदेड तालुक्यांसह नांदेड जिल्ह्यातील  विविध आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या.

सर्वेक्षण आणि तपासणी: आरोग्य केंद्रांवर सुरू असलेल्या सिकलसेल स्क्रिनिंग (तपासणी) प्रक्रियेची त्यांनी बारकाईने पाहणी केली. सर्वेक्षणादरम्यान एकही नागरिक तपासणीपासून वंचित राहू नये, याची दक्षता घेण्याचे आदेश त्यांनी दिले.

 जनजागृती मोहीम: या अभियानाचा मुख्य उद्देश जनजागृती हा आहे. डॉ. कानगुले यांनी स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांशी चर्चा करून, सिकलसेल बाबत समाजात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी प्रभावी संवाद साधण्याबाबत मार्गदर्शन केले.

संस्थात्मक भेटी: विविध ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील औषधोपलब्धता आणि प्रयोगशाळांमधील सुविधांचा त्यांनी आढावा घेतला. सिकलसेल बाधितांना मिळणाऱ्या उपचारांमध्ये सातत्य राखण्याच्या सूचना त्यांनी केल्या.मार्गदर्शन आणि सूचना:

डॉ. कानगुले यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "७ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या विशेष मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांची आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. हा आजार रोखण्यासाठी वेळीच निदान होणे ही काळाची गरज आहे."

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी यावेळी प्रशासकीय तयारीची माहिती दिली आणि जिल्ह्याला सिकलसेलमुक्त करण्यासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध असल्याचे सांगितले.

०००००







विशेष लेख

 धर्माची शिकवण आणि आपत्तीत मदतीचा हात...!

शिख धर्मियांचा एक मोठा उपक्रम साजरा करताना या धर्माने विविध क्षेत्रात दिलेले योगदान आपण बघितले पाहिजे. त्यात सेवा आणि निस्वार्थ सेवा याकडे आपण लक्ष द्यायलाच हवे. पूर असो वा भूकंप किंवा इतर कोणतीही नैसर्गिक आपत्ती यात निःस्वार्थ सेवा या समुदायाकडून  दिल्ली जाते. गरजूंना (सामुदायिक स्वयंपाकघर) अर्थात लंगरच्या माध्यमातून  अन्न व निवारा देण्यासोबतच  आपत्तीतून सुटका करणे व आवश्यक ते मदत कार्य करणे यासाठी शीख स्वयंसेवक योगदान देतात.

सेवा भाव अर्थात सेवा करवाना धर्म-पंथ याचा भेद न पाळता सर्वांना माणुसकीच्या नात्याने शक्यतोपरी मदतीचा हात स्वयंसेवक देताना जगभरात आपणास दिसतील.

गुरुद्वारांमध्ये २४ तास अखंड सेवा,मदतीचा एक भाग बनते त्यावेळी गरजूंना अन्न पुरवण्याचा मोठा स्रोत  समाजासाठी खुला होतो.

जगभरात 'खालसा एड' (Khalsa Aid) च्या माध्यमातून आपत्तीच्या काळात मदत पुरवली जाते. यात शीख स्वयंसेवक जगभरात सर्व भौगोलिक सिमांच्या पलिकडे जाऊन मदत करतात.

आपत्ती काळात जी विविध कामे होतात त्यात भोजन व पिण्याचे पाणी पुरविणे, तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करणे व बचाव कार्यात सहभाग अशी विभागणी आपणास दिसते. यात सर्वाधिक मोलाचे कार्य म्हणजे आपत्तीच्या काळात पिडितांना भावनिक आधार देणे होय. आपत्तीत आप्त स्वकियांना गमावलेल्यांना मोठा मानसिक धक्का बसलेला असतो अशा सर्वांना भावनिक आधार  देणे महत्वाचे असते हे काम स्वयंसेवक करतात.

शीख धर्मावर आणि धर्मतत्वांवर आधारित अशी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था म्हणून खालसा एड'ची जगभरात ओळख आहे. केवळ धार्मिक शिकवण न राहता आपत्तीच्या काळात मदतीचा हात पुढे करणारी एक महत्वाची ताकद म्हणून या स्वयंसेवी संस्थेला ओळख मिळाली आहे.

याच स्वरुपाचे आपत्तीकाळात काम करणारी आणखी एक स्वयंसेवी संस्था म्हणजे 'युनायटेड शिख होय. या संस्थेने 2025 मध्ये पंजाब मध्ये आलेल्या महापूरातून लोकांना सावरण्यास खूप मोठी मदत केली .या भूतो-न-भविष्यती महापूरामध्ये पंजाबात अतोनात नुकसान झाले. गावेच्या गावे यात बुडाली. अनेकजण विस्थापित झाले. घरे आणि शेती याचेही या पुरात मोठे  नुकसान झाले. 

या काळात 2000 हून अधिक जणांची पुरातून सुखरूप सुटका करण्यासोबतच 8 हजाराहून  अधिक नागरिकांना वैद्यकीय उपचार तसेच तात्पुरता निवारा, अन्न,  पिण्याचे शुद्ध पाणी , वस्त्रे आणि गरजेचा शिधा पुरविण्यात या संस्थेने  पुढाकार घेतला . या पुरात  ८७ हून अधिक गावात पूर्णतः नुकसान झाले. यातील अनेकांना आर्थिक मदतीची गरज लागणार आहे यासाठी,  एक लक्ष डॉलरचा निधी उभारण्याचे काम ही संस्था करीत आहे.

नैसर्गिक आपत्ती कोणत्या स्वरुपात समोर येईल  हे सांगता येत नाही. या काळात मानवता वादी दृष्टीकोण आणि निःस्वार्थ सेवा याचा वस्तुपाठ शीख बांधवांनी जगासमोर सादर केलाय असं म्हणता येईल. 

प्रशांत दैठणकर /9823199466

(संकलन आभार - गुरमीत कौर  आणि खालसा एड )




विशेष लेख

 संपन्न अशी 'पंजाबी भाषा'

शिख धर्मियांचे 9 वे गुरू ज्यांना 'हिंद दि चादर' म्हणून ओळखले जाते ते श्री गुरू तेग बहादूर साहिब यांचा 350 वा शहिदी समागम नांदेड येथे 24 व 25 जानेवारी, 2026 या कालावधीत होत आहे. या निमित्ताने या धर्माबाबत अल्प स्वरूपात माहिती आपणास असली पाहिजे.
गुरू-शिष्य यांची परंपरा असलेल्या या मानवतावादी धर्मात शिष्य हा महत्वाचा या अर्थाने संस्कृत भाषेतून घेतलेला हा शब्द म्हणजे शीख ( शिष्य ) होय. पंजाब प्रांतात पंजाबी भाषा प्रामुख्याने बोलली जाते. ही भाषा ज्या लिपीत आहे ती लिपी म्हणजे गुरूमुखी होय. तर पाकिस्तान विभाजनानंतर पकिस्तानात गेलेल्या पंजाब प्रांतात याच बोलीसाठी शाहमुखी लिपी वापरली जाते.
भाषिक वैशिष्ट्य बघताना ही लिपी इंडो-आर्यन आहे. पंजाबी गुरूंनी स्वीकारलेली व ज्या भाषेत रचना केल्या गेल्या व ज्यात श्री गुरू ग्रंथ साहिब आहे ती गुरूमुखी लिपी 11 ते 12 व्या शतकात प्राकृत भाषेपासून आजपर्यंत आली आहे.
पाकिस्तानातील पंजाब प्रांतात वापरला जाणाऱ्या शाहमुखी लिपीवर लगतच्या पारशी (पर्शियन) आणि अरबी शब्दांचा प्रभाव अधिक आहेत. जगभरात असलेल्या साधारण 2 कोटीहून अधिक पंजाबी भाषकांची भाषा मुळ पंजाबी हीच आहे.
देशात पंजाब राज्याची प्रमुख अशी असणाऱ्या पंजाबी भाषेला लगतच्या हरयाणा आणि दिल्ली राज्यातही अधिकृत भाषा म्हणून ओळख मिळालेली जगात कॅनडा, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, ऑस्ट्रेलिया आदी देशात पंजाबी भाषकांची संख्या अधिक आहे.
पाकिस्तानात असलेल्या पंजाब प्रांतात देखील पंजाबी ही सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. पंजाबमध्ये भाषिक महत्व लक्षात घेऊन भाषेच्या नावाने असणारे पंजाब विद्यापीठ आहे. याची स्थापना 30 एप्रिल, 1969 रोजी पतियाला येथे करण्यात आली. या ठिकाणी पंजाबी भाषा संशोधन व तंत्रज्ञान शाखा आहे. या केंद्रातर्फे ऑनलाईन पंजाबी भाषेचा वापर तसेच सॉफ्टवेअर निर्मितीचे काम सातत्याने सुरू आहे. याचा माध्यमातून पंजाबी सायबर कमिटीला व सायबर क्षेत्रातील प्रत्येकाला मदत होत आहे.
पंजाबी भाषेबाबतचा विश्वकोष अर्थात Encyclopedia तयार करण्यात आला असून हा ऑनलाईन विश्वकोष पतियाला येथील विद्यापीठाने 2014 साली पंजाबीपिडीया (Punjabipedia) उपलब्ध करून दिला आहे.
1954 साली पंजाबी साहित्य अकादमीची स्थापना करण्यात आली असून याला पंजाब राज्य शासन भाषक प्रस्तावासाठी मदत करीत आहे. पंजाबी साहित्य अकादमी पुरस्कार साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी 1955 पासून सुरू करण्यात आला आहे. ज्ञानपीठ नंतर दुसऱ्या क्रमांकाचा हा पुरस्कार मानला जातो.
या खेरीज कॅनडा-भारत शिक्षण संस्थेतर्फे प्रतिवर्षी ढाहान पुरस्कार देखील दिला जातो.
पंजाब आणि महाराष्ट्र यांना जोडणारा महत्वाचा दुवा संत नामदेवांच्या रचना आहेत. त्यांच्या रचना शिख धर्मग्रंथात समाविष्ट आहेत. याच निमित्ताने 2015 साली संत नामदेवांची पंजाबातील कर्मभूमी असलेल्या घुमान येथे 88 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्यात आले होते.
संवाद हा भाषेतूनच पुढे जातो. त्याच संवादाचा सेतू नांदेड नगरीत 'हिंद-दि-चादर' श्री. गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागमातून होणार आहे. भक्ती हा मार्ग आणि त्याचसाठी भाषा हे साधन याची प्रतिती या काळात नक्की येईल.
(संदर्भ : पंजाब विद्यापीठ व विकिपिडीया)
- प्रशांत दैठणकर
9823199460
----------------



गुरु तेग बहादूर साहिबजींच्या 350 व्या शहादत सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना निमंत्रण

नवी दिल्ली, दि. 19 : 'श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त “हिंद दी चादर” हा भव्य व ऐतिहासिक कार्यक्रम 24 आणि 25 जानेवारी 2026 रोजी नांदेड येथे आयोजित केला आहे. या सोहळ्याचे निमंत्रण केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांना राज्यस्तरीय समागम समिती सदस्य यांनी प्रत्यक्ष भेटीदरम्यान दिले.
नवी दिल्ली येथे राज्यस्तरीय समागम समितीच्या (महाराष्ट्र राज्य) पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सदिच्छा भेट घेऊन निमंत्रण दिले. केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी 25 जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण स्वीकारले. यावेळी पोहरादेवीचे महंत बाबुसिंग महाराज (सहअध्यक्ष), समन्वय समितीचे अध्यक्ष रामसिंग महाराज, नांदेड येथील गुरुद्वारा प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंग, समन्वयक श्री. रामेश्वर नाईक, सहसमन्वयक जसपाल सिंग, सदस्य चरणदीप सिंग (हॅप्पीसिंग), सतिश निहलानी आणि सहनिमंत्रक तेजासिंग बावरी आदी उपस्थित होते.
नांदेड येथील मोदी मैदान येथे आयोजित या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे २५ जानेवारीला दुपारी २ ते ५ या वेळेत उपस्थित राहणार आहेत. तसेच, पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री (बागेश्वर धाम सरकार) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील निमंत्रण स्वीकारले असून ते २४ जानेवारीला या सोहळ्याला उपस्थित राहतील, अशी माहिती समितीच्या वतीने देण्यात आली.
0000



विशेष वृत्त

हिंद-दी-चादर’ कार्यक्रमासाठी नांदेड सज्ज !

१० लाख भाविकांची मांदियाळी - विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

लातूर, दिनांक १९ (विमाका) :  नांदेड नगरी एका ऐतिहासिक सोहळ्यासाठी सज्ज होत आहे. शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांचा ३५० वा 'शहीदी समागम' हा भव्य कार्यक्रम येत्या २४ आणि २५ तारखेला पार पडणार आहे. त्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. देश-विदेशातून सुमारे १० लाख भाविक या सोहळ्यासाठी नांदेडमध्ये दाखल होण्याची शक्यता असल्याचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.

सूक्ष्म नियोजन आणि विविध समित्या 

कार्यक्रमाच्या दृष्टीने प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले आहे. भाविकांच्या सोयीसाठी  विविध समित्या स्थापन केल्या आहेत. यात बुटांच्या व्यवस्थेपासून ते भोजनापर्यंतच्या जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या आहेत. भाविकांसाठी ८ ठिकाणी अखंड 'लंगर' (महाप्रसाद) सुरू राहतील. तसेच, त्यांच्या निवासाचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रम ठिकाणी आरोग्य शिबिरे उभारण्यात आली आहेत. यासोबतच शासकीय योजनांचे आणि विविध उद्योजकांचे स्टॉल्सही उपलब्ध असतील.

 या सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर राज्यांचे मुख्यमंत्रीही नांदेडमध्ये येतील. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीनेही कडेकोट तयारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाचा अल्पसंख्याक विभाग या कार्यक्रमासाठी 'नोडल एजन्सी' म्हणून काम पाहत आहे.

 हा कार्यक्रम एका समाजापुरता मर्यादित नाही. यात लबाना, बंजारा,सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल आदींसह आणि इतर सर्व समुदायांचे लोक मोठ्याप्रमाणात सहभागी होत आहेत. 

जनतेचे योगदान महत्त्वाचे 

आजच्या धावपळीच्या जगात 'त्याग आणि सेवा' हीच खरी माणुसकी आहे. हा विचार जपण्याची ही सुवर्णसंधी आहे. त्यामुळे मराठवाडा आणि महाराष्ट्रातील जनतेसह देशभरातील जनतेने या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. ज्यांना या महायज्ञात सेवा (स्वयंसेवक म्हणून) द्यायची आहे, त्यांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी नमूद केले.

00000



वृत्त क्रमांक 64

माजी सैनिकांसाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य

31 मार्चनंतर सर्व सेवा ऑनलाईन – निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर

नांदेड, दि. १९ जानेवारी : नांदेड जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्त सैनिकी अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा, वीरपत्नी, वीरमाता व वीरपिता यांच्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ३१ मार्च २०२६ नंतर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत दिली जाणारी आर्थिक मदत व इतर सर्व सेवा केवळ ऑनलाईन पद्धतीनेच करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी किरण अंबेकर यांनी दिली आहे.

यासाठी संबंधित लाभार्थ्यांनी https://mahasainik.maharashtra.gov.in किंवा DSW पोर्टल या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन नोंदणी फॉर्म भरावा व आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी पुढील कागदपत्रे आवश्यक असून, ती सर्व पीडीएफ स्वरूपात अपलोड करणे बंधनकारक आहे. त्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, डिस्चार्ज बुकची सर्व पाने, पीपीओ (पेन्शन पेमेंट ऑर्डर), ईसीएचएस कार्ड, पेन्शन जमा होणाऱ्या बँकेच्या पासबुकचे पहिले पान तसेच पासपोर्ट साईज फोटो यांचा समावेश आहे.

नोंदणी पूर्ण न झाल्यास भविष्यात आर्थिक मदत व इतर योजनांचा लाभ मिळण्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सर्व पात्र माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांनी तात्काळ ऑनलाईन नोंदणी करून आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, असेही जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

०००००

 वृत्त क्रमांक 63

किराणा दुकाने व पानटपऱ्यांमधून औषधे खरेदी करू नका - प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

नांदेड, दि. १९ जानेवारी : सध्या वातावरणातील बदलामुळे अंगदुखी, डोकेदुखी, सर्दी, खोकला, ताप व घसा खवखवणे यांसारखे आजार मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. मात्र अशा आजारांवर उपचार करण्यासाठी अनेक नागरिक डॉक्टरांचा सल्ला न घेता परस्पर किराणा दुकाने व पानटपऱ्यांमधून औषधे खरेदी करून त्यांचे सेवन करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.

ही बाब आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असून, अशा प्रकारे अनधिकृत ठिकाणांहून औषधे घेणे मानवी शरीरासाठी घातक ठरू शकते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधांचे सेवन केल्यास त्याचे दुरगामी व अपायकारक परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी परस्पर किराणा दुकाने, पानटपऱ्या किंवा इतर अनधिकृत विक्रेत्यांकडून औषधे खरेदी करू नयेत, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त औषधे अ.तु.राठोड यांनी केले आहे.

नागरिकांनी औषधांची खरेदी केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व अधिकृत औषध विक्रेत्यांकडूनच करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, किराणा दुकाने, पानटपऱ्या व तत्सम आस्थापनांकडून सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखी यावरील औषधांची खरेदी व विक्री करणे हे औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० व त्याखालील नियम १९४५ चे उल्लंघन ठरते. अशा प्रकारची बाब आढळून आल्यास संबंधित विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

तसेच नांदेड जिल्हा केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन यांनी सर्व किरकोळ व घाऊक औषध विक्रेत्यांना कायद्याच्या चौकटीत राहूनच औषधांची विक्री व वितरण करण्याबाबत त्यांच्या स्तरावरून सूचना द्याव्यात, असे आवाहनही करण्यात आले आहे.

००००००

 वृत्त क्रमांक 62

दिव्यांग सक्षमीकरणासाठी समाजाने ठामपणे पुढे यावे – शरद देशपांडे

जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धांचे उत्साहात उद्घाटन

नांदेड, दि. १९ जानेवारी : दिव्यांगता ही उणीव नसून दृष्टीपेक्षा दृष्टीकोन अधिक महत्त्वाचा आहे. दिव्यांग व्यक्तींमध्येही इतरांप्रमाणेच प्रगती करण्याची क्षमता असून, त्यासाठी समाजाने त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद देशपांडे यांनी केले.

दिव्यांग कल्याण आयुक्तालय, जिल्हा परिषद नांदेड व जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त नांदेड येथील सायन्स कॉलेज मैदानावर आयोजित जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धांचे क्रीडाज्योत प्रज्वलन करून आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. लक्ष्मण शिंदे, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी अवधूत गंजेवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, नियोजन विभागाचे शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, सीएम फेलो भार्गवी मुंढे, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक शुभम तेलेवार, बळीराम येरपूलवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सचिव शरद देशपांडे पुढे म्हणाले की, दिव्यांग व्यक्ती केवळ शारीरिकदृष्ट्या अडचणीत असतात; मात्र त्यांच्या क्षमतांमध्ये कोणतीही कमतरता नाही. योग्य संधी, सकारात्मक दृष्टिकोन आणि प्रोत्साहन मिळाल्यास ते समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊन भरीव योगदान देऊ शकतात.

यावेळी समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी दरवर्षी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. अनेकदा विशेष शाळांतील शिक्षक दिव्यांग विद्यार्थ्यांची पालकांप्रमाणे काळजी घेतात. या स्पर्धा उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात पार पडल्या पाहिजेत, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर दिव्यांग क्रीडा शपथ घेण्यात आली. जिल्ह्यातील विविध शाळांतील दिव्यांग विद्यार्थ्यांनी पोलीस बँडच्या सुरेल साथीत आकर्षक पथसंचालन केले. हिरवा झेंडा दाखवून क्रीडा स्पर्धांना औपचारिक सुरुवात करण्यात आली.

याप्रसंगी राज्य व राष्ट्रीय स्तरावर विविध क्रीडा स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अवधूत गंजेवार यांनी केले. सूत्रसंचालन मुरलीधर गोडबोले यांनी केले. विद्यार्थ्यांना भाषणे समजावून सांगण्यासाठी निखिल किरवले व साईनाथ ईप्तेकर यांनी दुभाष्य म्हणून काम पाहिले.

चौकट

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक स्पर्धा आज

जिल्हा परिषद नांदेड व जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांच्या वतीने मंगळवार, दि. २० जानेवारी रोजी सकाळी १० वाजता, नांदेड येथील शंकरराव चव्हाण सभागृहात जिल्हास्तरीय दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी अवधूत गंजेवार यांनी केले आहे.

०००००






 #हिंददीचादर #गुरुतेगबहादूर #शहीदीसमागम

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...