Friday, May 6, 2022

आज एकही कोरोना बाधित नाही

तर एकाला उपचारानंतर सुटृी   


नांदेड (जिमाका) दि. 6 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 70 अहवालापैकी एकही अहवाल कोरोना बाधित नाही. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 804 एवढी झाली असून यातील 1 लाख 112 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरणातील एका रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.


एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 1 हजार 119

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 81 हजार 95

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 804

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 112

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.38 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-निरंक

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-00

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक

 000000

शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणीच्या सुविधेत गैरवापर आढळल्यास दोषीवर कारवाई

 

शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणीच्या सुविधेत गैरवापर

आढळल्यास दोषीवर कारवाई

 

नांदेड, (जिमाका) दि. 6 :- प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील महा ई-सेवा केंद्र, इंटरनेट कॅफे व मोटार ड्रायव्हींग स्कुल इत्यादी संस्थाना अचानक भेट देण्यात येणार आहेत. या भेटी दरम्यान  संबंधित संस्थामध्ये ऑनलाईन सुविधांचा गैरवापर होताना आढळल्यास दोषी संस्थांवर कायद्यातील तरतूदींप्रमाणे व अर्जदारावर मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 19 (1) (इ) अन्वये कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदिप निमसे यांनी केले आहे.

 

केंद्रीय मोटार वाहन नियम 11 अन्वये शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी अर्ज करताना उमेदवारास केंद्र शासनाने विहीत केलेली परीक्षा देणे अनिवार्य आहे. या मागचा प्रमुख उद्देश हा संबंधित अर्जदारास वाहतूक नियमांचे, चिन्हांचे व वाहन चालकाच्या जबाबदाऱ्यांचे महत्व याची माहिती व जाणीव असणे आवश्यक आहे. यामुळे वाहनचालकांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण होते. यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करतेवेळी पालकांनी त्यांच्या पाल्यास या परीक्षेचे महत्व पटवून देणे आवश्यक ठरते. उक्त प्रणालीचा गैरवापर होणार याची जाणीव देखील करुन देणे आवश्यक आहे.

 

परिवहन विभागात शिकाऊ अनुज्ञप्तीची चाचणी ऑनलाईन देण्याची प्रणाली 14 जून 2021 पासून सुरु करण्यात आली आहे. शासनाने सुरु केलेल्या शिकाऊ अनुज्ञप्ती व वाहनचालक अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी तात्काळ सेवा उपलब्ध केलेल्या धोरणाचा गैरफायदा सायबर कॅफे घेत असून तशी जाहिरात प्रसिध्द करुन गैर व्यवहार सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा जाहिरातीमध्ये शिकाऊ अनुज्ञप्ती काढण्यास आरटीओमध्ये जाण्याची व टेस्टचीही गरज नसुन फक्त फोटो व आधारकार्ड द्या आणि शिकाऊ अनुज्ञप्ती मिळवा अशा प्रकारच्या तक्रारी परिवहन आयुक्त कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत.

0000

 

 युवक-युवतीनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घ्यावा 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- राज्याच्या नवीन औद्योगिक धोरण-2019 अंतर्गत अनेक नाविन्यपुर्ण योजना व कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने हाती घेतले आहेत. यात स्थानिक पातळीवर व्यापक प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी सुक्ष्म व लघु उपक्रमांना चालना दिली जाणार आहे. यासाठीच ही  मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना राबविण्यात येत असून या योजनेतर्गंत जिल्हा उद्योग केंद्राकडून बँकेच्या कर्ज मंजुरीनंतर 15 ते 35 टक्के जात प्रवर्ग/उद्योग क्षेत्रानुसार अनुदान दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रासह maha-cmegp.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे. 

ही योजना मागील तीन वर्षापासून जिल्हा उद्योग केंद्र नांदेड अंतर्गत राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील युवक/युवतीच्या सर्जनशिलतेला वाव मिळून जिल्ह्यात स्वयंरोजगार पूरक वातावरण तयार केले जात आहे. याबरोबर नवीन योजनेद्वारे ग्रामीण तसेच शहरी भागात सुक्ष्म लघु उपक्रमाद्वारे व्यापक रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. 


योजनेच्या पात्रता अटी

जिल्ह्यातील स्थानिक असलेले व किमान 18 ते 45 वयोगटातील स्वयंरोजगार करु इच्छिणारे उमेदवार. विशेष प्रवर्गासाठी (अनुसूचित जाती/जमाती/महिला/अपंग/माजी सैनिक) 5 वर्षाची अट शिथील. रुपये 10 लाखावरील प्रकल्पासाठी किमान शैक्षणिक पात्रता 7 वी पास व रुपये 25 लाखावरील प्रकल्पासाठी किमान 10 वी पास असणे आवश्यक आहे. अर्जदाराने यापुर्वी लाभ घेतलेला नसावा. 


प्रकल्प मर्यादा किंमत

प्रक्रीया व निर्मिती प्रकल्पासाठी कमाल रुपये 50 लाख व सेवा कृषी पुरक उद्योग प्रकल्पासाठी कमाल रुपये 10 लाख.


आवश्यक कागदपत्रे

जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे/प्रमाणपत्रे, आधारकार्ड, पॅनकार्ड, जातीचे प्रमाणपत्र, वाहतुकीसाठी परवानगी व वाहन चालविण्याचा परवाना ई-व्हेइकल स्वयं साक्षांकित, विहित नमुन्यातील वचनपत्र ग्रामीण भागासाठी लोकसंख्या प्रमाणपत्र प्रकल्प अहवाल, फोटो इ. आवश्यक कागदपत्रे आहेत.

0000

 दिव्यांग व्यक्तींच्या मदतीसाठी आता महा-शरद संकेतस्थळ    

नांदेड (जिमाका), दि. 6 :- दिव्यांग व्यक्तींना जीवन जगणे सुलभ व्हावे व त्यांना सुगम्यता प्राप्त व्हावी यासाठी विविध सहायक उपकरणाची आवश्यकता असते. या उपकरणामुळे ते त्यांच्या  दिव्यांगत्वावर मात करून सर्वसामान्याप्रमाणे जीवन जगतात. यासाठी समाजातील अनेक दानशूर व्यक्तीसामाजिक संघटना त्यांना मदत करू इच्छितात. ही मदत गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहचावी या उद्देशाने सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागदिव्यांग कल्याण आयुक्तालय व राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळामार्फत महा-शरद हे वेब पोर्टल सुरू करण्यात आले. दिव्यांग व्यक्तींना सहाय्य करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी   www.mahasharad.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

 

याकरिता दिव्यांग व्यक्तींकडे केंद्र शासनाच्या वैश्विक ओळखपत्र प्रणालीअंतर्गत प्रमाणित असणे आवश्यक आहे. जी व्यक्ती आणि सामाजिक सेवाभावी संस्थांकडून या प्रणालीद्वारे मदत करतील त्यांना आयकरात 80-जी अंतर्गत सूट राहिल. या प्रणालीत जास्तीत-जास्त दिव्यांग व दानशूर व्यक्ती आणि सामाजिक सेवाभावी संस्थांनी www.mahasharad.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असेही आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

000000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...