Friday, August 4, 2023

 वृत्त क्र. 477

मेरी माटी मेरा देश” अभियान जिल्ह्यातील

प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर यशस्वीपणे राबविण्यात येणार

 

§  मेरी माटी मेरा देश अभियानात विविध उपक्रमाचे आयोजन

§  प्रत्येक गावात घेतली जाईल पंच प्रण प्रतिज्ञा

§  प्रत्येक गावातील माती अमृतवाटिकेसाठी पाठविण्यात येणार


नांदेड (जिमाका) दि. 4 :-  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “हर घर तिरंगा” अभियानाने सारा देश देशभक्तीने जागा झाला. या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता येत्या 15 ऑगस्ट 2023 रोजी होत आहे. याचे औचित्य साधून यावर्षी “मेरी माटी मेरा देश” या संकल्पनेला जनमाणसापर्यंत विविध उपक्रमाच्या माध्यमातून पोहोचविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यानुसार महाराष्ट्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार “मेरी माटी मेरा देश” नांदेड जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर यशस्वीपणे राबविण्याचे नियोजन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.  नागरिकांनी या अभियानात उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 

जिल्हाधिकारी अभिजीत राऊतजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल व इतर शासकीय विभागाच्या समन्वयातून हा उपक्रम अधिक व्यापक करण्यावर भर दिला जात आहे. या अभियानातर्गंत जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गत शिलाफलक उभारण्याचे येणार आहेत. ज्या व्यक्तींनी निस्वार्थपणे देशाची सेवा केली आहे व ज्यांनी बलिदान दिले त्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करून ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. या अभियानात देशाचा स्वाभिमान जपण्यासमवेत नागरिक म्हणून आपली कर्तव्य भावना व जागरूकता वृद्धींगत व्हावी यासाठी पंच  प्रण प्रतिज्ञा गावोगावी घेतली जाणार आहे.

 

ज्यांनी निस्वार्थपणे देशाची सेवा करून आपले बलिदान दिले त्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरीता स्वातंत्र्य सैनिकसेवानिवृत्त संरक्षण कर्मचारीकेंद्रीय शसस्त्र पोलीस दलाचे कर्मचारीराज्य पोलीस दलाचे कर्मचारी यांना याअंतर्गत सन्मानित करून कृतज्ञता व्यक्त केली जाईल. तसेच या अभियानात पुढील पिढ्यांसाठी साक्षीदार ठरतील अशी दीर्घकाळ टिकणारी 75 झाडांचे वृक्षारोपन करून एक वेगळा संदेश गावोगावी दिला जाणार आहे. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त नित्यराजशिष्टाचाराप्रमाणे गावोगावी ध्वजारोहण व राष्ट्रगान गायले जाईल. प्रत्येक गावातील माती एका कलशातून एकत्र करून ती राजधानी दिल्ली येथे कर्तव्यपथावर अमृतवाटिकेसाठी पाठविण्यात येणार आहे. प्रत्येक गावातील मुठभर मातीतून हा अखंडतेचा संदेश यातून रुजला जाईल. 27 ते 30 ऑगस्ट या कालावधीत हा कलश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थित होणाऱ्या विशेष कार्यक्रमासाठी तालुकास्तरावरील प्रथीतयश युवकाच्या हस्ते पाठविण्यात येणार आहे.

000000

वृत्त क्र. 475 18 वर्षावरील नागरिकांचे आधार नोंदणी व आधार कार्डचे अद्ययावतीकरण सुरु

 वृत्त क्र. 475

18 वर्षावरील नागरिकांचे आधार नोंदणी व

आधार कार्डचे अद्ययावतीकरण सुरु

नांदेड (जिमाका) दि. 4 :- आपल्या जवळच्या आधार केंद्रावर सर्व 18 वर्षावरील नागरिकांनी आधार नोंदणी करावी  तसेच 10 वर्षापूर्वी ज्यांनी आधार कार्ड काढले आहेत त्यांचे अद्ययावतीकरण करण्याची कार्यवाही प्रशासनाने सुरु केली आहे. नागरिकांनी आपले आधार नोंदणी व अद्ययावतीकरण करुन घ्यावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.

सर्व नागरिकांना आधार नोंदणी व आधार अद्ययावतीकरण कार्यवाही सुलभ होण्यासाठी सर्व आधार केंद्रानी आपल्या आधार केंद्रावर सर्व सूचनांचे  माहिती फलक दर्शनी भागात लावावेत अशा सूचना प्रशासनाच्यावतीने देण्यात आल्या आहेत. तसेच 18 वर्षावरील सर्व नागरिकांचे आधार नोंदणी होत असल्याचे फलक सर्व ठिकाणी लावण्यात यावेत असे निर्देशही दिले आहेत. आधार नोंदणी बाबत नागरिकांच्या तक्रारी निवारण्यासाठी 1947 मदत क्रमांक  व ई-मेल help@uidai.gov.in नागरिकांना दिसेल अशा दर्शनी भागात आधार केंद्र धारकांनी प्रदर्शित कराव्यात. नागरिकांना आधार नोंदणीबाबत काही तक्रार असल्यास नागरिकांनी 1947 या क्रमांकावर कॉल करुन अथवा help@uidai.gov.in  ईमेलवर तक्रार नोंदवून टोकन क्रमांक हस्तगत करावा, सदर टोकन क्रमांक व सविस्तर माहिती जिल्हा समन्वयक आधार जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे द्यावी असे  कळविले आहे.  तसेच आधार केंद्र धारकांनी प्रौढ नागरिकांचे आधार नोंदणी होत असल्याचे फलकही आधार केंद्रावर लावावेत अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.

00000

हर घर तिरंगा अभियानांतर्गत सर्वांसाठी राष्ट्रध्वज डाक कार्यालयात माफक दरात उपलब्ध

 वृत्त क्र. 476

हर घर तिरंगा अभियानांतर्गत सर्वांसाठी

राष्ट्रध्वज डाक कार्यालयात माफक दरात उपलब्ध

नांदेड (जिमाका) दि. 4 :-  स्वातंत्र्य दिनानिमित्त शासनाच्यावतीने हर घर तिरंगा 2.0 अभियान 2023 राबविण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकांना 15 ऑगस्ट 2023 रोजी आपल्या घरावर तिरंगा लावता यावा व यातून आपला सहभाग घेता यावा याला प्रोत्साहन दिले जात आहे.

नागरिकांसाठी राष्ट्रध्वज सर्व डाक कार्यालयात माफक दरात उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. डाक कार्यालयातून एक राष्ट्रध्वज 25 रुपये याप्रमाणे उपलब्ध केले आहेत. मोठया प्रमाणात राष्ट्रध्वजाची मागणी असल्यास मुख्य डाक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन डाक विभागाचे  अधिक्षक आर.व्ही. पालेकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मुख्य पोस्ट कार्यालयातील पोस्ट मास्टर एस.एन.भिसे यांचा मो.क्र. 9834662258, जनसंपर्क अधिकारी व्ही.व्ही.कऱ्हाळे यांचा मो. क्र. 9423306750, पीएलआयचे डीओ एस.यु. वाघमारे यांचा मो. क्र. 9423140640 यांच्याशी संपर्क साधावा.

00000

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी 10 ऑगस्ट पर्यत अर्ज करण्याचे आवाहन

                                                            जवाहर नवोदय विद्यालय

प्रवेशासाठी 10 ऑगस्ट पर्यत अर्ज करण्याचे आवाहन 

 

नांदेड (जिमाका) दि. 4 :-  शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता 6  वी वर्गाच्या प्रवेशासाठी प्रवेश परिक्षा शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रवेश प्रक्रीया सुरु आहे. विद्यार्थ्यानी प्रवेशासाठी 10 ऑगस्ट 2023 पर्यत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन शंकर नगर येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस.जी.मांडले यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांना पात्रता व अटी याप्रमाणे आहेत.

विद्यार्थी इयत्ता पाचवीच्या वर्गात सरकार मान्य शाळेत वर्ष 2023-24 मध्ये शिकत असावा. सदर शाळा ही नांदेड जिल्ह्यातील च असावी. विद्यार्थी इयत्ता तीसरी, चौथी व पाचवी सरकार मान्य शाळेतूनच शिकलेला असावा. या तीनही वर्षा दरम्यान विद्यार्थ्यांचे शिक्षण कुठेही खंडीत झालेले नसावे. अधिक माहितीसाठी संबंधित शिक्षणाधिकारी कार्यालय व तालुका शिक्षणाधिकारी अथवा शाळेच्या मुख्याध्यापकांना संपर्क साधावा. अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांचा जन्म दिनांक 1 मे 2012 ते 31 जुलै 2014 मधील असावा. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज www.navodaya.gov.in  या संकेतस्थळावर भरावेत अथवा दिलेल्या क्यूआर कोड वर स्कॅन करुन भरावा.  

विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फार्म भरतांना आधार क्रमांक, चालू मोबाईल नंबर लिंक असल्यास आधार पर्यायावर ओके करावे. शाळेचे स्टडी सर्टिफिकेट शाळा मुख्याध्यापकाचे सही व शिक्का घेवून शाळेच्या दाखल्याप्रमाणे वर्ग 5 वीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती भरावी व ऑनलाईन अर्ज अपलोड करावेत. ही प्रवेश परिक्षा शनिवार 20 जानेवारी 202 रोजी जिल्ह्यातील संबंधित परिक्षा केंद्रावर घेण्यात येईल संबंधित शाळा मुख्याध्यापक, शिक्षक, पालक  व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी 83008078080, 7261986654, 9733227677 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य यांनी केले आहे.

00000

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पेन्शन अदालत

 वृत्त क्र. 473

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पेन्शन अदालत 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 8 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

 वृत्त क्र. 471

पीएम किसान योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना

ई-केवायसी प्रमाणीकरण करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 4 :-  पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कुटूंबनिहाय प्रति वर्ष 6 हजार रुपये इतके आर्थिक सहाय्य 3 टप्प्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात येते. या योजनेअंतर्गत चुकीने मयत मार्क केलेल्या तथापि पात्र असलेल्या लाभार्थ्यानी पी.एम. किसान जीओआय (PMKISAN GOI) या ॲपचा वापर करुन पात्र करण्याच्या सुविधेचा वापर करावा. तसेच फेस ऑथेंटीफिकेशन द्वारे ई-केवायसी प्रमाणिकीकरण करुन पीएम किसान योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.


शासन, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग यांचे परिपत्रकानुसार केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पोर्टलवर चुकीने मयत मार्क केलेल्या लाभार्थ्यांना केंद्र शासनाने विकसित केलेल्या पीएम किसान जीओआय (PMKISAN GOI)या ॲपचा वापर करुन पात्र करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. चुकीने मयत मार्क केलेल्या तथापी पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे या ॲपद्वारे फेस आर्थटीफिकेशन मोडयुलचा वापर करुन ई-केवायसी प्रमाणिकरण करता येईल. याप्रमाणे मयत ठरविलेल्या लाभार्थ्याचे फेस ऑथेंटीफिकेशन द्वारे ई-केवायसी प्रमाणीकरण केल्यावर सदरचा लाभार्थी पीएम किसान योजनेच्या लाभासाठी पात्र ठरेल. याशिवाय अशा लाभार्थीचे ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी सामाईक सुविधा केंद्राकडील बायोमेट्रीक पध्दतीचा सुध्दा वापर करता येईल. जेणेकरुन असे लाभार्थी पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत. सद्यस्थितीत पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्याचे वितरण माहे जुलै 2023 पासून सुरू आहे.

00000

 जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- नांदेड जिल्ह्यात 11 ऑगस्ट 2023 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 11 ऑगस्ट 2023 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

वृत्त

 जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध

 नांदेड (जिमाका)दि. 4 :-  जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड येथील जुन्या वर्तमानपत्राची रद्दी, कालबाह्य अन्य नियतकालिके इत्यादींची आहे त्या परिस्थितीत विक्री करावयाची आहे. ज्यांना रद्दी घ्यावयाची असेल त्यांना कार्यालयीन वेळेत रद्दी पाहावयास मिळेल. त्यासाठी खरेदीदार संस्थाकडून प्रती किलो प्रमाणे खरेदी दरपत्रकाची निविदा गुरुवार दि. 17 ऑगस्ट, 2023 पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दाखल करावीत. इच्छूकांनी आपले लिफाफा बंद दरपत्रक जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, पार्वती निवास, खुरसाळे हॉस्पिटल, यात्री निवास रोड, बडपूरा, नांदेड -431601 या पत्यावर कार्यालयीन वेळेत दाखल करावेत. या संदर्भातील अटी व शर्ती या कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रदर्शित करण्यात आल्या आहेत, असे जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड यांनी कळविले आहे.

      रद्दी विक्रीचे दरपत्रक मंजूर करणे अथवा रद्द करणे हे सर्व अधिकार जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड यांना राहतील. 

000000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...