Friday, January 2, 2026

वृत्त क्रमांक 8 

जिल्हाधिकारी कार्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

नांदेड दि. ३ जानेवारी:- जिल्हाधिकारी कार्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज शनिवार दिनांक 03 रोजी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, डीडीएमओ किशोर कुऱ्हे, कुणाल  जगताप, रावसाहेब पोहरे,श्रीमती व्ही. आर. एकलारे, अर्चना कर्णेवाड, गजानंद ऐनवाड,शेषराव पाटील, भास्कर गुंगे, बाळासाहेब भराडे, आदींसह अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते.

०००००



 वृत्त क्रमांक 7

‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर ३५० वा शहीदी समागम 

कार्यक्रम २५ जानेवारीला नांदेडमध्ये;

मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम  

नांदेड, दि. 2 जानेवारी:-  “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २५ जानेवारी रोजी कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाची सुरूवात ३ जानेवारी  रोजी दुपारी १२ वाजता आरंभता की अरदास या विधीने असर्जन परिसर मामा चौक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे, मैदान येथे होणार आहे.

 सदर आरंभता की अरदास विधी तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वाराचे पंचप्यारे यांच्या हस्ते आणि सिख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल,वाल्मीकि, भगत नामदेव व उदासीन समाज-संप्रदाय या नऊ समाजाच्या संतांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.  

या  विधीच्या माध्यमातून “हिंद-दि-चादर” उपक्रमास औपचारिक व  प्रारंभ तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा अबचलनगर नांदेड, मुख्य जथ्थेदार संत बाबा कुलवंत सिंघजी, भाई जोसिंदर सिंघजी, भाई राम सिंघजी, भाई कश्मिर सिंघजी, भाई गुरमीत सिंघजी, गुरुद्वारा लंगर साहिबचे संतबाबा बलविंदर सिंघ यांच्या हस्ते होणार आहे. 

यावेळी महेंद्रजी रायचुरा, विधान परिषद सदस्य बाबुसिंग महाराज, क्षेत्रीय समिती अध्यक्ष डॉ. विजय सतबीर सिंग, हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, सरजीत सिंघ गिल आणि जिल्हाधिकारी राहूल कर्डीले, पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार, क्षेत्रीय समिती पदाधिकारी, इतर वरिष्ठ अधिकारी व राज्यस्तरीय समिती सदस्य इतर अधिकारी  यांची उपस्थिती राहणार आहे.

“हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे रविवार दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. मुख्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक पूर्वतयारी व नियोजनाला वेग देण्यात आला असून सुरक्षा, वाहतूक तसेच कार्यक्रमस्थळ व्यवस्थापनाबाबत सर्व संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.  

०००

वृत्त क्रमांक 6

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली

महिला व बाल विकास विभागास बालविवाह रोखण्यात यश

नांदेड, दि. 2 जानेवारी :- नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली बालविवाहमुक्त भारत 100 दिवस अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत नांदेड शहरातील 16 वर्षीय बालिकेचा बालविवाह होणार असल्याची गोपनीय माहिती चाईल्ड लाईन 1098 या टोल फ्री क्रमांकावर प्राप्त झाली.

सदर तक्रार प्राप्त होताच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गणेश वाघ यांच्या आदेशानुसार जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे संदीप फुले तसेच चाईल्ड हेल्प लाईनचे कर्मचारी ऐश्वर्या शेवाळे व दिपाली हिंगोले यांनी तात्काळ संबंधित बालिकेच्या घरी भेट देऊन कारवाई केली. यावेळी बालिकेच्या आई व नातेवाईकांचे समुपदेशन करण्यात आले. तसेच बालिकेच्या वयाची खातरजमा करून बालविवाहाचे दुष्परिणाम व बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. 

बालविवाह हा कायद्याने गुन्हा असल्याचे पालकांना स्पष्टपणे समजावून सांगण्यात आले. बालिकेच्या काळजी व संरक्षणाच्या दृष्टीने तिला बाल कल्याण समिती, नांदेड यांच्यासमोर हजर करण्यात आले. तसेच पालकांकडून बालविवाह न करण्याबाबत लेखी हमीपत्र घेण्यात आले असून, या तत्पर कारवाईमुळे सदर बालविवाह यशस्वीपणे रोखण्यात आला आहे.

बालविवाहाची कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ शहरी भागात बाल विकास प्रकल्प अधिकारी, ग्रामीण भागात ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, तसेच चाईल्ड हेल्प लाईन 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, जेणेकरून भविष्यात अशा अनिष्ट प्रथा रोखता येतील, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

00000


वृत्त क्रमांक 5

स्वतः डिजिटल व्हा आणि घरच्यांना डिजिटल साक्षरतेचे धडे द्या : राहुल पाटील

राष्ट्रीय ग्राहक दिन जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा

नांदेड, दि. 2 जानेवारी :- आजच्या युगात डिजिटल साक्षर होणे अत्यंत आवश्यक असून, डिजिटल व्यवहार करताना संपूर्ण माहिती घेऊनच काळजीपूर्वक व्यवहार करणे महत्त्वाचे आहे. डिजिटल व्यवहार करताना येणारे संदेश तपासणे, फेकलिंक व संशयास्पद ॲप्स ओळखण्यासाठी इंटरनेटवर माहिती पडताळून घेणे आवश्यक आहे. यामुळे ग्राहकांची फसवणूक टाळता येईल. युवावर्गाने स्वतः डिजिटल साक्षर व्हावे आणि हीच माहिती घरच्यांपर्यंत पोहोचवून त्यांना डिजिटल साक्षरतेचे धडे द्यावेत, असे आवाहन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी केले.

डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात आज राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सदस्या शलाका ढमढेरे, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद देशपांडे, आयोगाचे सदस्य ज्ञानेश्वर पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. जगदीश बारदेवाड, तहसीलदार संजय वारकड, जिल्हा संघटक ॲड. आनंद कृष्णापूरकर, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सायन्रा मठमवार, सहसचिव ॲड. दिपाली डोणगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्ष राहुल पाटील पुढे म्हणाले की, ग्राहक संरक्षण कायदा 2019 ची व्याप्ती व्यापक असून आपण दररोज कुठल्या ना कुठल्या स्वरूपात ग्राहक असतो. सेवा बदलून देणे, नुकसान भरपाई देणे तसेच कायद्याची अंमलबजावणी न केल्यास शिक्षेची तरतूदही या कायद्यात आहे. ग्राहक जागरूकता हा या कायद्यातील महत्त्वाचा हक्क असून, ही जबाबदारी शासनासह प्रत्येकाची आहे.

डिजिटल साक्षरतेमुळे ग्राहकांना ई-जागृती पोर्टलवर घरबसल्या तक्रार नोंदविता येते तसेच आभासी पद्धतीने सुनावणीत सहभागी होता येते, अशी माहितीही त्यांनी दिली. ई-कॉमर्स व ऑनलाईन खरेदी व्यवहार करताना आधी पडताळणी करूनच व्यवहार करावेत. बँकिंग व्यवहारात ओटीपी, लिंक, बँक डिटेल्स कोणालाही देऊ नयेत व संशयास्पद लिंक उघडू नयेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जागरूक होऊन इतरांना प्रेरित करा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले म्हणाले की, दैनंदिन जीवनात फसव्या जाहिराती, प्रलोभने, प्रवासातील गैरसोयी यासारख्या अनेक ठिकाणी ग्राहकांची फसवणूक होते. मात्र फसवणूक झाल्यानंतर कुठे व कशी तक्रार करायची याची माहिती नसल्यामुळे अनेक ग्राहक पुढे येत नाहीत. यासाठी ग्राहकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक असून, प्रत्येकाने स्वतः जागरूक होऊन इतरांनाही प्रेरित करावे, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने देशपातळीवर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी आयोगाचे कौतुक केले व भविष्यात ग्राहक जागृतीसाठी आणखी प्रभावी उपक्रम राबविण्याची गरज व्यक्त केली.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद देशपांडे यांनी ग्राहक हा राजा असून त्याची जाणीव करून देणारा दिवस म्हणजे राष्ट्रीय ग्राहक दिन असल्याचे सांगितले. सेवा देताना कर्तव्य भावना ठेवली तर ग्राहकांची फसवणूक होणार नाही. प्रत्येक ग्राहक हा न्यायाधीश असल्याने जागरूक राहणे अत्यंत आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात ग्राहक पंचायतचे संघटक ॲड. आनंद कृष्णापूरकर, उपाध्यक्ष डॉ. सायन्रा मठमवार, सहसचिव ॲड. दिपाली डोणगावकर यांनी ग्राहक जागृतीसाठी मनोगत व्यक्त केले. स्वरा गौतम भुसावळ, लालबहादूर शास्त्री प्राथमिक शाळा, कल्याणनगर (नांदेड) येथील विद्यार्थिनीनेही आपले विचार मांडले.

कार्यक्रमात बहुउद्देशीय सेवाभावी संस्था भोकर यांनी पथनाट्य सादर केले, तर “मी एक ग्राहक” हे पथनाट्य जिल्हा परिषद शाळा, पार्डी मक्ता (ता. अर्धापूर) येथील विद्यार्थ्यांनी सादर केले. “मी एक जागरूक ग्राहक” या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी ग्राहक पंचायतच्या ‘अष्टाध्यायी’ या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहायक महसूल अधिकारी मधुकर फुलवळे यांनी केले.

00000








वृत्त क्रमांक 4

नांदेड शहरात जड वाहनांना प्रवेशबंदी   

नांदेड, दि. 2 जानेवारी :- जड वाहनामुळे नांदेड शहरात वाहतुक कोंडी, अपघात अशा समस्‍या उद्भवत आहेत. या अनुषंगाने नांदेड शहरात 7 जानेवारी 2026 पासून जड वाहनांना सकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत प्रवेशबंदी राहणार आहे. याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्‍यावी असे आवाहन जिल्‍हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.   

याबाबत अधिसुचना निर्गमीत करण्‍यात आली असून या अधिसुचनेचा अंमल 7 जानेवारी 2026 पासुन सुरु होईल.  जड वाहनामुळे शहरातील वाहतुक कोंडी व जडवाहन अपघाताने होणारी जिवीत हानी या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयास विविध संघटना, जनतेकडून निवेदने प्राप्‍त झाली आहेत. 16 डिसेंबर रोजी बैठकीत यासंबंधाने जिल्‍हादंडाधिकारी तथा जिल्‍हाधिकारी समवेत पोलीस अधिक्षक, मार्ग परीवहन अधिकारी नांदेड यांच्यात झालेल्‍या चर्चेनुसार या समस्‍येवर उपाययोजना करण्‍यासाठी जड वाहनांना नांदेड शहरात सकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत प्रवेशबंदी करण्‍याचे निश्‍चीत झाले आहे. याची सर्व संबंधित जडवाहनधारकांनी नोंद घ्यावी असेही आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...