Friday, October 7, 2022

 जिल्ह्यातील 429 गायवर्ग पशुधनाला लम्पी बाधा

लाख 79 हजार 12 पशुधनाचे लसीकरण

नांदेड (जिमाका) दि. 7 :- लम्पीच्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनामार्फत व्यापक लसीकरणावर भर देण्यात आला आहे. आजच्या घडीला लाख 79 हजार 12 पशुधनाचे लसीकरण पुर्ण झाले आहे. 429 गायवर्ग पशुधनाला लम्पीची बाधा झाली आहे तर आज पर्यंत 26 पशुधन लम्पी आजारामुळे मृत पावले आहेत. लम्पी चर्म रोगाने मृत झालेल्या जनावराच्या पशुपालकांना शासनाच्या निकषानुसार अर्थसहाय्य देण्यात आले आहे. या लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर आरटीजीएसद्वारे हे अर्थसहाय्य 29 सप्टेंबर 2022 रोजी जमा करण्यात आले आहेत. इतर प्रकरणाचे प्रस्ताव जसे येत आहेत त्याप्रमाणे निकषानुसार प्रक्रिया सुरू असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एम. आर. रत्नपारखी यांनी दिली.

 

लम्पी हा आजार गोठ्यातील अस्वच्छतापशुधनाच्या अंगावरील गोचिड व इतर किटकांमुळे होण्याचा संभव अधिक असतो. हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे ग्रामपातळीवर जाऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे.

 

आजच्या घडीला नांदेड जिल्ह्यातील 63 गावे लम्पी बाधित आहेत. या 63 गावातील एकुण गाय वर्ग पशुधन हे 29 हजार 831 एवढे आहे. यातील 429 बाधित पशुधनाला वेगळे काढून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. बाधित गावाच्या किमी परिघातील गावांची संख्या 359 एवढी आहे. एकुण गावे  422 झाली आहेत. या बाधित 63 गावाच्या किमी परिघातील 422 गावातील (बाधित 63 गावांसह) एकुण पशुधन संख्या ही 1 लाख 14 हजार 268 एवढी आहे. लम्पीमुळे मृत पशुधनाची संख्या 26 एवढी झाली आहे. पशुपालकांनी घाबरून न जाता आपल्या पशुची स्वच्छतागोठ्यातील स्वच्छता व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे काळजी घ्यावीअसे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

0000

 धान खरेदीसाठी 15 ऑक्टोंबर पर्यत

ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- आधारभूत किंमत खरेदी योजना खरीप हंगाम 2022-23 मध्ये बिलोली (कासराळी) धान/भरडधान्य खरेदी करण्यासाठी उत्पादक शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी 15 ऑक्टोबर पर्यत ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

 

धान, भरडधान्य नोंदणीसाठी ज्या शेतकऱ्यांचा सातबारा आहे. त्याच शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. त्याशिवाय नोंदणी पूर्ण होणार नाही. ज्या शेतकऱ्यांना शेतमाल विक्री करावयाचा आहे. त्याच शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करिता लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी स्वत: खरेदी केंद्रावर उपस्थित राहावे, असेही जिल्हा पणन अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

 औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने

सोमवारी भरती मेळाव्याचे आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने  आयटीआय शिकाऊ उमेदवारासाठी सोमवार 10 ऑक्टोंबर रोजी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  पात्र प्रशिक्षणार्थ्यांनी या भरती मेळाव्यास सोमवारी सकाळी 10 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार पि.के.अन्नपुर्णे यांनी केले आहे.

या मेळाव्यात पुढील व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांची शिकाऊ उमेदवार म्हणून भरती करण्यात येणार आहे. फिटर, एसएमडब्लू, एमआरएसी, मेकॅनिस्ट, टर्नर, वेल्डर, इलेक्ट्रीशियन, कोपा, टीडीएम, ड्राफ्टसमॅन मेकॅनिकल, आयसीटीएसएम, वायरमन, पेन्टर सामान्य, इलेक्ट्रीशियन मेकॅनिकल इ. आवश्यक ट्रेडसाठी आयटीआय उत्तीर्ण व परीक्षा दिलेले परंतु निकाल प्रलंबित असलेले उमेदवारांनी उपस्थित राहावे, असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

0000

स्टार्टअप,नाविन्यता यात्रेच्या जिल्हास्तरीय

प्रशिक्षण शिबिर, सादरीकरण सत्राचा लाभ घेण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या अंतर्गतचा दुसरा टप्पा जिल्हास्तरीय प्रशिक्षण  शिबिर व सादरीकरण सत्र 13 ऑक्टोबर रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात सामाजिक शास्त्र संकूल येथे सकाळी 9.30 ते दुपारी 4 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. यासाठी नाविन्यपूर्ण व्यवसाय संकल्पना असणाऱ्या आणि नवउद्योजक होवु इच्छिणाऱ्या युवक युवती व नागरिकांनी या प्रशिक्षण शिबिर व संकल्पना सादरीकरणासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

 

नाविन्यता,कल्पकता,यांना भौलिकतेच्या मर्यादा नसतात त्या कुठेही यशस्वी होवू शकतात. नव संकल्पनांना योग्य पाठबळ मिळण्याची आवश्यकता असते. काही वेळा योग्य मार्गदर्शनाअभावी  चांगल्या कल्पना प्रत्यक्षात उतरू शकत नाही. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत जिल्हयातील नागरिकांच्या नाविन्यपूर्ण नवसंकल्पनांना मुर्त स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्ट व नाविन्यता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

महाराष्ट्र स्टार्ट व नाविन्यता यात्रेचे ठळक उद्दिष्टे

जिल्हातील तळागळातील नवउद्योजकांच्या आणि नाविन्यपूर्ण कल्पनांच्या शोध घेवून त्यांना स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करून देणे. नव संकल्पनांना तसेच सुरूवातीच्या टप्यातील नवउद्योजकांना प्रोत्साहन, तज्ञ मार्गदर्शन, निधी आणि आवश्यक पाठबळ पुरविणे, महाराष्ट्रातील नाविन्यपूर्ण कल्पना असलेल्या विद्यार्थी व नव उद्योजकांच्या सहभाग वाढविणे या महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचे उद्दिष्ट आहे.

 

जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण सत्र :- महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचा दुसरा टप्पा जिल्हास्तरीय एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण सत्राचे 13 ऑक्टोबर रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे सामाजिक शास्त्र संकूल विभागामध्ये आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षण शिबिरात नवउद्योजकतेबाबतचे माहिती सत्र स्थानिक उद्योजक व तज्ञ मार्गदर्शक यांची व्याख्याने होणार आहेत. नोंदणी केलेल्या नवउद्योजकांच्या संकल्पनांची सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. सादरीकरण सत्रात नोंदणी केलेल्या नागरिकांना स्थानिक समस्येसाठी उत्तम उपाय व कृषी शिक्षण, आरोग्य, सस्टेनिबिलिटी (कचरा व्यवस्थापन, पाणी, स्वच्छ उर्जा इत्यादी ) ई-प्रशासन, स्मार्ट पायाभुत सुविधा आणि गतीशिलता याक्षेत्रातील आपल्या नाविन्यपूर्ण व्यवसाय संकल्पनांचे प्रत्येकी 10 मिनिटात सादरीकरण जिल्हास्तरीय तज्ञ समितीसमोर करण्याची संधी देण्यात येणार आहे. यामधून जिल्हास्तरावर अव्वल तीन पारितोषिक विजेते घोषित केले जातील. जिल्हास्तरीय प्रथम विजेत्यास 25 हजारद्वितीय विजेत्यास 15 हजार, तृतीय विजेत्यास 10 हजार पारितोषिक देण्यात येईल. त्यानंतर निवड करण्यात आलेल्या नवसंकल्पनांना राज्यस्तरावर सादरीकरणाची संधी देखील मिळेल.

 

राज्यस्तरीय विजेत्यांची घोषणा व पारितोषिक समारोप 

प्रत्येक जिल्हयातील सादरीकरण सत्रातील सर्वेात्तम तीन संकल्पनामधून राज्यस्तरीय निवड तज्ञ समितीसमोर अंतिम विजेत्यांची निवड करण्यात येईल. यामधुन विविध 7 क्षेत्रातील राज्यस्तरीय विजेत्यांना प्रथम पारितोषिक 1 लाख द्वितीय पारितोषिक 75 हजार तसेच सर्वेात्कृष्ट महिला उद्योजिका यांना 1 लाख असे 21 पारितोषिक 17 ऑक्टोंबर 2022 रोजी राजभवन, मुंबई येथे राज्यपाल यांचे हस्ते विशेष समारंभात वितरीत करण्यात येणार आहे. विजेत्यांना पेटेंट सहाय्य, इन्क्युबेशन सहाय्य, बीज भांडवल/ निधीसाठी सहाय्य, नाविन्यता परिसंस्थेतील महत्वाच्या संस्था व तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन, तसेच सॉफ्टवेअर क्रेडिटस क्लाउड क्रेडिटस इत्यादीसारखे इतर लाभही पुरविण्यात येणार आहेत. या महाराष्ट्र स्टार्ट अप व नाविन्यता यात्रेच्या जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरणासाठी जिल्ह्यातील विद्यार्थी, युवक युवती व नाविन्यपूर्ण नवउद्योजक नागरिकांनी सहभागी होण्यासाठी www.mahastartupyatra.in संकेतस्थळावर नोंदणी करावी. जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण सत्रास 13 ऑक्टोंबर 2022 रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे सामाजिक शास्त्र संकूल नांदेड येथे सहभाग नोंदवावाअसे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती रेणूका तम्मलवार यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास सन्मवयक इरफान खान मो.नं.7030555244 यांच्याशी संपर्क साधावा .

00000

 गट-ब संयुक्‍त पुर्व परीक्षा केंद्र परीसरात प्रतिबंधात्‍मक आदेश 

नांदेड (जिमाका) दि. 7 :महाराष्‍ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्‍त पूर्व परीक्षा-2022 ही शनिवार 8 ऑक्‍टोंबर 2022 रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राच्या परिसरात बाहेरील व्यक्तींचा उपद्रव होवू नये म्हणून नांदेड जिल्ह्यात घेण्यात येणाऱ्या 61 परीक्षा केंद्र परीसरात कलम 144 अन्‍वये जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी प्रतिबंधात्‍मक आदेश लागू केला आहे.  

 

या परीक्षा केंद्रापासून 100 मीटरच्या परिसरात शनिवार 8 ऑक्‍टोंबर  2022 रोजी सकाळी 9 ते  दुपारी 2 वाजेपर्यंतच्‍या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी, कर्मचारी या व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच दर्शविलेल्या या वेळात परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स / एस.टी.डी. / आय.एस.डी. / भ्रमणध्वनी / पेजर/ फॅक्स / झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी आदेशाद्वारे प्रतिबंध केले आहे.  

000000

 जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 


नांदेड (जिमाका) दि. 7 :- नांदेड जिल्ह्यात 7 ऑक्टोंबर रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 21 ऑक्टोंबर 2022 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 


जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात शुक्रवार 7 ऑक्टोंबर रोजी सकाळी 6 वाजेपासून ते शुक्रवार 21 ऑक्टोंबर 2022 रोजी मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी,  शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

 जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 16.40 मि.मी. पाऊस

नांदेड (जिमाका) दि. 7 :- जिल्ह्यात शुक्रवार 7 ऑक्टोंबर रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 16.40 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 1081.30 मिलीमीटर पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात शुक्रवार 7 ऑक्टोंबर 2022 रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणेकंसात एकूण पाऊस : नांदेड- 19 (1089.30), बिलोली-6.60 (1059.40), मुखेड- 25.40 (983.90), कंधार-9 (926.20), लोहा-9.90 (938.80), हदगाव-13.70 (970.30), भोकर-35 (1218.90), देगलूर-9.90 (881.80), किनवट-29.40 (1319.20), मुदखेड- 7.80 (1207.60), हिमायतनगर-12.60 (1331.90), माहूर- 32.20 (1166.40), धर्माबाद- 13.90 (1351.60), उमरी- 9.30(1242.50), अर्धापूर- 10.30 (999.70), नायगाव-8.40(953.20मिलीमीटर आहे.

0000

 तात्पुरता फटाका परवाना अर्ज विक्री व

स्विकारण्यास 15 ऑक्टोंबर पर्यत मुदतवाढ

नांदेड (जिमाका) दि. 7 :- सन 2022 मध्‍ये दिपावली उत्‍सव 21 ते 26 ऑक्टोंबर 2022 या कालावधीत साजरा होणार आहे. त्‍याअनुषंगाने तात्‍पुरते फटाका परवाना अर्ज विक्री व स्विकारण्‍याच्‍या कालावधीस शनिवार 15 ऑक्टोंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्‍यात आली आहे. 

नांदेड महानगरपालिका हद्दीतील तात्‍पुरता फटाका परवाना सेतू समिती जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्‍यामार्फत व जिल्‍हयातील उपविभागीय कार्यालयामार्फत त्‍यांच्‍या कार्यक्षेत्रातील तात्‍पुरते फटाका परवाना अर्ज विस्‍फोटक अधिनिमय 2008 नुसार 22 सप्टेंबर ते 4 ऑक्‍टोंबर 2022 या कालावधीत विक्री व स्विकारण्याची मुदत देण्यात आली होती. परंतू तात्‍पुरते फटाका परवाना अर्ज विक्री व स्विकारण्‍याच्‍या कालावधीची मुदतवाढ आता 15 ऑक्टोंबर 2022 पर्यंत देण्‍यात आली आहे. याव्‍यतीरिक्‍त 20 सप्टेंबर 2022 रोजी दिलेल्या जाहीर प्रगटनातील अटी व शर्ती कायम राहतील, याची संबधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...