Friday, October 7, 2022

स्टार्टअप,नाविन्यता यात्रेच्या जिल्हास्तरीय

प्रशिक्षण शिबिर, सादरीकरण सत्राचा लाभ घेण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या अंतर्गतचा दुसरा टप्पा जिल्हास्तरीय प्रशिक्षण  शिबिर व सादरीकरण सत्र 13 ऑक्टोबर रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात सामाजिक शास्त्र संकूल येथे सकाळी 9.30 ते दुपारी 4 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. यासाठी नाविन्यपूर्ण व्यवसाय संकल्पना असणाऱ्या आणि नवउद्योजक होवु इच्छिणाऱ्या युवक युवती व नागरिकांनी या प्रशिक्षण शिबिर व संकल्पना सादरीकरणासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

 

नाविन्यता,कल्पकता,यांना भौलिकतेच्या मर्यादा नसतात त्या कुठेही यशस्वी होवू शकतात. नव संकल्पनांना योग्य पाठबळ मिळण्याची आवश्यकता असते. काही वेळा योग्य मार्गदर्शनाअभावी  चांगल्या कल्पना प्रत्यक्षात उतरू शकत नाही. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत जिल्हयातील नागरिकांच्या नाविन्यपूर्ण नवसंकल्पनांना मुर्त स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्ट व नाविन्यता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

महाराष्ट्र स्टार्ट व नाविन्यता यात्रेचे ठळक उद्दिष्टे

जिल्हातील तळागळातील नवउद्योजकांच्या आणि नाविन्यपूर्ण कल्पनांच्या शोध घेवून त्यांना स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करून देणे. नव संकल्पनांना तसेच सुरूवातीच्या टप्यातील नवउद्योजकांना प्रोत्साहन, तज्ञ मार्गदर्शन, निधी आणि आवश्यक पाठबळ पुरविणे, महाराष्ट्रातील नाविन्यपूर्ण कल्पना असलेल्या विद्यार्थी व नव उद्योजकांच्या सहभाग वाढविणे या महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचे उद्दिष्ट आहे.

 

जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण सत्र :- महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचा दुसरा टप्पा जिल्हास्तरीय एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण सत्राचे 13 ऑक्टोबर रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे सामाजिक शास्त्र संकूल विभागामध्ये आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षण शिबिरात नवउद्योजकतेबाबतचे माहिती सत्र स्थानिक उद्योजक व तज्ञ मार्गदर्शक यांची व्याख्याने होणार आहेत. नोंदणी केलेल्या नवउद्योजकांच्या संकल्पनांची सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. सादरीकरण सत्रात नोंदणी केलेल्या नागरिकांना स्थानिक समस्येसाठी उत्तम उपाय व कृषी शिक्षण, आरोग्य, सस्टेनिबिलिटी (कचरा व्यवस्थापन, पाणी, स्वच्छ उर्जा इत्यादी ) ई-प्रशासन, स्मार्ट पायाभुत सुविधा आणि गतीशिलता याक्षेत्रातील आपल्या नाविन्यपूर्ण व्यवसाय संकल्पनांचे प्रत्येकी 10 मिनिटात सादरीकरण जिल्हास्तरीय तज्ञ समितीसमोर करण्याची संधी देण्यात येणार आहे. यामधून जिल्हास्तरावर अव्वल तीन पारितोषिक विजेते घोषित केले जातील. जिल्हास्तरीय प्रथम विजेत्यास 25 हजारद्वितीय विजेत्यास 15 हजार, तृतीय विजेत्यास 10 हजार पारितोषिक देण्यात येईल. त्यानंतर निवड करण्यात आलेल्या नवसंकल्पनांना राज्यस्तरावर सादरीकरणाची संधी देखील मिळेल.

 

राज्यस्तरीय विजेत्यांची घोषणा व पारितोषिक समारोप 

प्रत्येक जिल्हयातील सादरीकरण सत्रातील सर्वेात्तम तीन संकल्पनामधून राज्यस्तरीय निवड तज्ञ समितीसमोर अंतिम विजेत्यांची निवड करण्यात येईल. यामधुन विविध 7 क्षेत्रातील राज्यस्तरीय विजेत्यांना प्रथम पारितोषिक 1 लाख द्वितीय पारितोषिक 75 हजार तसेच सर्वेात्कृष्ट महिला उद्योजिका यांना 1 लाख असे 21 पारितोषिक 17 ऑक्टोंबर 2022 रोजी राजभवन, मुंबई येथे राज्यपाल यांचे हस्ते विशेष समारंभात वितरीत करण्यात येणार आहे. विजेत्यांना पेटेंट सहाय्य, इन्क्युबेशन सहाय्य, बीज भांडवल/ निधीसाठी सहाय्य, नाविन्यता परिसंस्थेतील महत्वाच्या संस्था व तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन, तसेच सॉफ्टवेअर क्रेडिटस क्लाउड क्रेडिटस इत्यादीसारखे इतर लाभही पुरविण्यात येणार आहेत. या महाराष्ट्र स्टार्ट अप व नाविन्यता यात्रेच्या जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरणासाठी जिल्ह्यातील विद्यार्थी, युवक युवती व नाविन्यपूर्ण नवउद्योजक नागरिकांनी सहभागी होण्यासाठी www.mahastartupyatra.in संकेतस्थळावर नोंदणी करावी. जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण सत्रास 13 ऑक्टोंबर 2022 रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे सामाजिक शास्त्र संकूल नांदेड येथे सहभाग नोंदवावाअसे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती रेणूका तम्मलवार यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास सन्मवयक इरफान खान मो.नं.7030555244 यांच्याशी संपर्क साधावा .

00000

No comments:

Post a Comment

मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु

  मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु   नांदेड दि.  9   :-   प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने परिवहन्नेतर संवर्...